वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय अकरावा

ग्रामगीता 
 
अध्याय अकरावा : ग्रामरक्षण
 
॥ श्रीगुरुदेवाय नम: ॥
ईश्वरसेवाचि गांव-सेवा । तो सर्वांच्याचि सुखाचा ठेवा ।
परि कांही असुरहि असती गांवां । यज्ञभंग करावया ॥१॥

एका सज्जनें प्रश्न केला । गांवीं बाग फुलूं लागला ।
परि दुष्ट लाविती आग त्याला । काय उपाय नित्यासाठीं ? ॥२॥

आम्हीं केली संघटना । निवडोनि आणिलें सज्जना ।
परंतु दुर्जनापुढे बनेना । कांही केलें तरीहि ॥३॥

त्यांना दावा आदर्श जीवन । अथवा प्रचारें द्या पटवून । 
किंवा सेवा रात्रंदिन । करा त्यांची हवी ती ॥४॥

परंतु ते न जुमानिती । उपदेश देतां उलटे चिडती । 
कार्यकर्त्यांसि हाणूनि पाडिती । पदोपदीं अडवोनिया ॥५॥

चांगल्यातूनहि काढिती वाईट । हवा फैलाविती रोगट । 
सज्जनांवरि आणिती संकट । कारस्थानें करोनि ॥६॥

कमलकसाई बोलभांड । मुडदेफरास गांवगुंड । 
कज्जेदलाल धनाढय धेंड । हातीं तयांच्या ॥७॥

सत्तेचाहि पाठिंबा सतत । घेवोनि आणिती पेचांत । 
बसली लोकांना त्यांची दहशत । सांगा काय करावें ? ॥८॥

मित्रा ! जो जो जेयीचा रोग । तेथेचि त्याची औषधि सांग ।
योजकचि पाहिजे कराया उपयोग । कुशलपणाने ॥९॥

सत्य पडताहे कमजोर । म्हणोनीच असत्य होई शिरजोर । 
यास्तव सत्यासि करावें कठोर । सामर्थ्यशाली सेवेसाठी ॥१०॥

सत्याचें बळ वाढेल कैसें । तेंहि सांगतों ऐका शांतसे । 
सज्जनांनी न बसावें आळसें । अथवा हताश होवोनि ॥११॥

लोकांचिया मनीं जरी दहशत । तरी तुमच्यासारिखेचि कांही त्यांत । 
असतील हृदयीं तळमळत । चांगलें व्हावें म्हणोनि ॥१२॥

ऐसी ज्यांना ज्यांना आवडे सेवा । जे सत्याचा जपती ठेवा । 
त्या लोकांचा करोनि मेळावा । सक्रिय संघटन वाढवावें ॥१३॥

जनतंत्राचा हा काळ । शक्ति लोकांअंगींच सकळ । 
जनतेच्या निश्चयाचें बळ । साम्राज्यासहि नमवूं शके ॥१४॥

हत्तीस आवरी गवती दोर । मुंग्याहि सर्पासि करिती जर्जर । 
व्याघ्रसिंहासि फाडिती हुशार । रानकुत्रें संघटोनि ॥१५॥

संघटनेने काय नोहे ? । बिंदू मिळतां सिंधुपणा ये । 
गांवचा बाग बहरोनि जाय । फुलाफळांनी संघटनेच्या ॥१६॥

ग्रामसुधारणेचा मूलमंत्र । सज्जनांनी व्हावें एकत्र । 
संघटना हेंचि शक्तीचें सूत्र । ग्रामराज्य निर्माण करी ॥१७॥

गांव करी तें राव न करी । ऐसें सांगोनि ठेविलें चतुरीं । 
जरी दाद न घेतील अधिकारी । तरी गांव तय सुधारूं शके ॥१८॥

यासाठीच पाहिजे सशक्त संघटन । जें करी अन्याय-निर्मूलन । 
देवोनिया न्यायदान । करी रक्षण गांवाचें ॥१९॥

संघटन गांवीं मजबूत असावें । आपापलें दु:ख त्यासि सांगावे । 
कोणावरि अन्याय होऊं न द्यावे । कार्य संघटनेचें ॥२०॥

त्यासाठी मिळोनि लोक नेमावे । जे असतील इमानी बरवे । 
त्यागी निर्भय, चरित्र असावें । उज्जल ज्यांचें ॥२१॥

गांवाचे जे पवित्र सेवक । तेचि प्रसंगी होती सैनिक । 
ज्या गांवी ऐसे सावध पाईक । तेथ विघ्न न ठाके ॥२२॥

कांही अपराध घडतां गांवांत । त्वरित कळवावी खबरमात ।
सर्वांनी भाग घेवोनि त्यांत । ठीक करावें बिघडेल तें ॥२३॥

गांवचा प्रत्येक सज्ञान । यांचें असावें सहकार्य पूर्ण । 
हांक देतां सर्वजण । जमोनि यावेत एकत्र ॥२४॥

एकाने कोणी गुन्हा केला । शहाणपण सांगावें सकळांनी त्याला । 
गुन्हेगार ऐकेनासा झाला । शिक्षा द्यावी गांवाने ॥२५॥

जेथे समजदार प्रलोभनीं पडला । सोंग करोनि घोरूं लागला । 
चिमटे घेवोनीच त्याला । उठविलें पाहिजे ॥२६॥

कोळसा साबूने धुवा उगाळा । परि तो शेवटवरि काळा । 
अग्निसंस्कारी जळतां उजाळा । येई त्यालागी ॥२७॥

म्हणोनि बहिष्कार असहकार । करोनि त्याचे तोडावे आधार । 
नाक दाबतां तोंड सत्वर । उघडों लागे ॥२८॥

ऐसी सर्वांनी पाठ पुरवावी । जो कोणी गांवास बिघडवी । 
ऐकेनासा होतां सत्ताप्रभावीं । मुक्त करावा गांवांतूनि ॥२९॥

उत्तमांचाचि संग्रह बरवा । वाईटाचा निषेध करावा । 
जराहि पनपूं न द्यावा । वृक्ष वाईटाचा ॥३०॥

सर्वांनी झटावें यासाठी । करावी लागेल ती आटाआटी । 
प्राण गेला तरी संकष्टीं । सहन करावें सेवेस्तव ॥३१॥

ऐसी असावी गांवाची तयारी । तरीच गांव बनेल स्वर्गपुरी । 
नलगे सत्ताधीशांची तुतारी । पाठीमागे ॥३२॥

ऐसा होतां आचार-विचार । गांव होईल न्यायभांडार । 
जागृत असतां सज्जन चतुर । सेवेसाठी ॥३३॥

ऐसें जें जें गांव वागलें । त्या गांवाचें भाग्य उघडलें । 
नाहीतरि टक्केटोणपे आले । नशिबीं त्याच्या ॥३४॥

हें ऐकोनि एक बोलला । म्हणे तुम्ही शांतीचा पुरस्कार केला । 
आणि तुम्हीच ससेमिरा लाविला । दुराचार्‍यांपाठीं ॥३५॥

सज्जन आणि दुर्जन । सर्वांत सारखाचि भगवान । 
एकासि देतां दंड धावोन । तेव्हा सेवा कुठे राहे ? ॥३६॥

दया क्षमा आणि शांति । हीच सात्विकाची संपत्ति । 
निष्ठुरपणें दंडावें विरोधकांप्रति । हें सज्जनपण कशाचें ? ॥३७॥

ऐका ऐसी विचारसरणी । ऐकोनि भुलूं नये कोणी । 
तारतम्यचि ठेवोनि मनीं । गांव सुधारावें विचारें ॥३८॥

काय केलें म्हणजे होतो सज्जन । याचें आहे मोजमाप जाण । 
हें प्रथमक्षणींच ओळखोन । हुशार व्हावें गांवाने ॥३९॥

सेवा द्यावी कोणे ठायीं । हें तारतम्य असावें हृदयीं । 
याची दृष्टि ज्यांस नाही । होतील फजीत ते प्राणी ॥४०॥

ज्यासि करणें चोरबाजार । त्यासहि नोकर पाहिजे इमानदार । 
त्यासि देतां सेवा सुंदर । पुण्य लाभेल कोणासि ? ॥४१॥

साधुसंतें जनसेवा केली । परि सत्यासाठीच काया झिजविली । 
कधी आसचि नाही ठेविली । राजेरजवाडयांची ॥४२॥

जगीं अनंत राजे झाले । परि सर्वचि नाही पूजिले । 
संतसज्जनचि देव मानले । हृदयमंदिरीं तयांनी ॥४३॥

म्हणोनि कोणी कोणास सेवा द्यावी । हेचि प्रथम दृष्टी यावी । 
मग सेवेसाठी उडी घ्यावी । हाचि धर्म मानवाचा ॥४४॥

सदैव दया असावी चित्तीं । मनास परोपकाराची प्रीति । 
राहूं न द्यावी उणीव कोणती । दिसतां कोठे ॥४५॥

क्षमाशांतिमय हृदय । विश्वासूपणाचें वर्तन निर्भय । 
प्राण गेलियाहि निर्दय । न व्हावें आम्ही ॥४६॥

परि जेथे निर्दयपण हवें । तेथे दगडापेक्षाहि कठिण व्हावें । 
हेंहि सांगणें लक्षांत घ्यावें । तारतम्याने ॥४७॥

नाहीतरि दया केली । उलट आपुल्यासचि भोवली । 
जिने गांवाची नासाडी झाली । नव्हे ती दया ॥४८॥

भिकार्‍यास भीक दिली । त्याने दारू-गांजांत उडविली । 
सांगा काय दया घडली । ऐशियापरीं ? ॥४९॥

कांही चोरटे गांवीं फिरती । दिवसां साधुवेष घेती । 
रात्रौ तेचि डाका मारिती । वेषभूषा बदलोनि ॥५०॥

ते लोकांनी सहन करावें । साधु म्हणोनि सोडोनि द्यावें । 
ऐसे दयेचे वेडे गोडवे । गाऊं नयेत वीरांनी ॥५१॥

दयाधर्म दानधर्म । यांचें ओळखावें वर्म । 
वेडयापरी न करावें कर्म । पोषक आळसा विकारा ॥५२॥

एरव्ही संसार सोडोनि बुवा झाले । दारोदारीं भिकेसि लागले । 
सदाचार सर्व बुडविले । ऐसे झालें याच गुणें ॥५३॥

कष्ट नाही करणें अंगीं । नाही संग्रहाचे खरे त्यागी । 
वेष घेवोनि फिरती ढोंगी । नांव बुडवाया संतांचें ॥५४॥

यांना दानधर्म द्यावे । तरि सर्व पापांसि स्थान मिळावें । 
म्हणोनि तारतम्य ठेवावें । दानधर्मियाने ॥५५॥

गांवीं मागती माधुकरी । खुशाल खेळती फिचर जुगारीं । 
दारूगांजा भांग पोरी । गुप्त राखती मठामाजी ॥५६॥

ऐशा लोकां दान द्यावें । गांव बुडवावें, बदनाम व्हावें । 
ऐसा धर्म कोणत्या देवें । सांगितला सांगा ? ॥५७॥

दया हें मुख्य धर्मलक्षण । परि दया म्हणजे प्राण्यांचें पालन । 
आणि कंटकांचें निर्दालन । बोलिलें संतीं ॥५८॥

सज्जनांचें संरक्षण । आणि दुर्जनांचें दमन । 
हेंचि अवतारांचेंहि कार्यलक्षण । न्यायसंगत ॥५९॥

म्हणोनि गांवीं कोणी अन्याय केला । दु:ख दिलें कोणा गरिबाला । 
त्याचा प्रतिकारचि पाहिजे झाला । गांवामाजी ॥६०॥

नाहीतरि गुंडांस फावे । सुटती जैसीं स्वैर गाढवें । 
दुष्टासि दया करोनि सोडोनि द्यावें । नव्हे हा धर्म ॥६१॥

अन्याय होतां प्रतिकारचि करावा । प्रथम अन्याय समजूनि घ्यावा । 
निश्चित कळतां आवाज द्यावा । संघटनेचा ॥६२॥

अन्याय नाना तर्‍हेचे असती । कांही धनाचे मानाचे दिसती । 
कांहींनी वाढे व्यसन अनीति । लोकांमाजी ॥६३॥

त्या सर्वांतूनि मार्ग काढावा । गांवीं दुराचार होऊं न द्यावा । 
हाचि खरा धर्म ओळखावा । विचारवंताने ॥६४॥

न्यायाचा कांटेकोरपणा । भिनावा आपुल्या हृदयीं जाणा । 
एका बाजूने दयेचा बाणा । दुसर्‍या बाजूने न्यायदंड ॥६५॥

हेंचि खरें मानवाचें लेणें । उगीच आहे सोनें मिरविणें । 
अंगीं वीरता नसतां मरणें । चोराहातीं ॥६६॥

कांहीलोक भोळे असती । आपुलें मानव्यभूषण खोविती । 
लोक त्यांसीच सात्विक म्हणती । वेडयापरी ॥६७॥

ज्यास करवेना ब्रीदाचें रक्षण । नाही अंगीं न्यायाचें भूषण । 
तो कैसा सात्विकजन । म्हणावा आम्हीं ? ॥६८॥

जो चोरांनी नागवावा । गुंड लोकांनी फसवोनि द्यावा । 
परस्त्रियेने भोंदवावा । तो सात्विक कैसा ? ॥६९॥

तोंडावरची न उडवी माशी । दच्के पाहतांचि पोलिसासि । 
न कळे आपुला हक्कहि ज्यासि । सात्विक त्यासि म्हणों नये ॥७०॥

त्यास म्हणावें दुबळा प्राणी । भित्रा विकासहीन अज्ञानी । 
ज्यांत नाही पुरुषार्थाचें पाणी । रक्षणासाठी ॥७१॥

त्यास कोणीहि उचलोनि न्यावें । दारूगांजादिक पाजोनि द्यावें । 
त्याने भोळा म्हणोनि पिऊनि घ्यावें । वारे भोळा ऐसा ॥७२॥

हा तो निर्बुध्दसा पाषाण । उत्तम वागण्याचें नाही ज्ञान । 
गंभीर शांत म्हणती जन । मुकामैंद म्हणोनिया ॥७३॥

खरा शांत तोचि नेमाने । जो न फसे कोणाच्या फसविल्याने । 
कधीहि चकाटया पिटणें ज्याने । पाहिलें नाही ॥७४॥

परनिंदा नावडे ज्यासि । परदु:ख न पाहवे डोळयांसि । 
धांवोनि जाय अडल्या-पडल्यासि । सहकार्य द्याया ॥७५॥

उगीदुगी ऐकतां कानीं । लगेच जाय तेथोनि उठोनि । 
लोकां सांगे उगीच बोलणीं । बोलूं नयेत ॥७६॥

कोणाची लपोनि टीका न करी । बोलणें ज्याचें तोंडावरि । 
निर्भय निर्मळ अंतरीं । स्फटिक जैसा ॥७७॥

गंदेपणा मुळीच नावडे । सुजनांचे गातो सदा पवाडे । 
सत्संगतीसि जीव धडपडे । सदैव ज्याचा ॥७८॥

सर्वांशीं बंधुत्वाचें वागणें । मन-मिलाफ संपादणें । 
लोकसंग्रह कुशलतेने करणें । जागृतीसाठी ॥७९॥

सुखीं अहंकारें न चढावें । संकटीं घाबरोनि न जावें । 
न्यायाने वागावें वागवावें । सर्व जना ॥८०॥

हें ज्यांनी अंगीं बाणविलें । तेचि शांतसात्विक बोलिले । 
तयांनीच गांवाचें हित झालें । समजतों आम्ही ॥८१॥

याऐवजीं दुबळेपण आलें । तरि गांवचि मग विलया गेलें । 
सांभाळितां न जाय सांभाळिलें । कोणाकडोनि ॥८२॥

म्हणोनि पाहिजे न्यायनिष्ठुरता । दयेमाजींहि तारतम्यता । 
उन्नति करील तीच सेवा तत्त्वता । हरप्रकारें ॥८३॥

द्वेष न करितां दुर्जनदमन । हें त्यांच्याहि उन्नतीसचि कारण । 
डॉक्टरें करावें अवयवच्छेदन । ती दयाचि तयाची ॥८४॥

सर्वाभूतीं परमेश्वर । त्यासि बाधक नसे सत्यव्यवहार । 
करावें संघटनेने गांव सुंदर । ही पूजाचि तयाची ॥८५॥

सर्वाभूतीं प्रेमभाव । वाढवावा गुणगौरव । 
दूर सारोनि उपद्रव । गांवचे आपुल्या ॥८६॥

’ जग तरि आम्हां देव । परि हा निंदितों स्वभाव ’ । 
म्हणोनि गुंडांसि आणिला खेव । संत तुकारामांनी ॥८७॥

’ हरिभक्त राहती जेथे । परचक्र यावें कैसें तेथे ? ’ 
ऐसें म्हणोनि लाविला पणातें । जीव त्यांनी ॥८८॥

आपुले वारकरी भाविक । तेचि वारकर्ते पाईक । 
करोनि दुष्टांसि लाविला धाक । शिवाजीच जणुं सर्वहि ॥८९॥

तीच घेवोनि प्रेरणा । गांवी उभारावी न्यायसेना । 
जेणें कांही नुरे धिंगाणा । गांवीं आपुल्या ॥९०॥

दारू गांजा भांग अफीम । जुगार वेश्यादि वाईट काम । 
यांचें उरूं न द्यावें नाम । आपुल्या गांवीं ॥९१॥

त्यासाठी गांवच्या कांही सज्जनांनी । लागावें व्यसन-निर्मूंलनीं । 
उत्तम गुणांच्या अनेक श्रेणी । वाढवाव्या गांवीं ॥९२॥

गांवचे चार सज्जन मिळोनि । अनिष्टप्रथा बंद कराव्या त्यांनी । 
ज्याने गांवास पावे नुकसानी । न ठेवावें तें ॥९३॥

कांही उन्मत्त शेतकरी । टोचती बैलासि तुतारी । 
रक्त काढूनि वासना पुरी । करिती आपुली ॥९४॥

देवाचिया नांवाखाली । कांही देतात जीव बळी । 
बंद करावी प्रथा असली । भावना सुधारोनि लोकांची ॥९५॥

कोणी घुमारे लुबाडिती । बुवा लोकांस फसविती । 
भ्रमिष्ट मतें व्रतें शिकविती । सावध करावें त्याठायीं ॥९६॥

परस्परांना मदत करावी । अडीअडचण ती निभवावी । 
सर्वांकडोनि करोनि घ्यावी । योग्य सेवा ॥९७॥

गांवसेवेंत आली अडचण । तिला द्यावें अग्रस्थान । 
आपापली जागा-जमीनहि देऊन । सोय करावी सर्वांची ॥९८॥

सर्वांकडोनि ऐसी सेवा नव्हे । तरि गरजूंना सहकार्य द्यावें । 
होईल तेवढें तरी करावें । निष्कपटपणें ॥९९॥

मुलाबाळांचें असतां लग्न । सर्वांनी जावें धावोन । 
पडोंचि न द्यावें ओझें, न्यून । आईवडिलांसि तयांच्या ॥१००॥

थोडेंथोडें सर्वांनी आणावें । वरवधूंना साहित्य द्यावें । 
भोजनापासोनि उरकवावें । सर्वतोपरीं ॥१०१॥

मांडवावरी पांच डहाळे । टाकावे हा धर्म गांवकर्‍या कळे । 
तैसेचि निभवावे प्रसंग सगळे । सहकार्याने ॥१०२॥

जैसें जैसें सहकार्य वाढे । तैसें गांव उन्नतीस चढे । 
न पडे विपत्तीचें कोडें । गांवीं कोणा मानवासि ॥१०३॥

ऐसी सेवा बिंबतां जीवनीं । कांहीच गांवीं न पडे उणी । 
तरीहि असावा स्वतंत्रपणीं । सेवकांचा विभाग ॥१०४॥

सुसज्ज असावेत गांवचे तरुण । कोणतेंहि संकट येतां ऐकून । 
आपुलीं सर्व कामें सोडून । धांव घ्यावी तयांनी ॥१०५॥

आग लागणें, विहिरींत पडणें । कॉलरा होणें, मूर्च्छा येणें । 
प्रत्येक प्रसंगीं धांवून जाणें । कर्तव्य त्यांचें ॥१०६॥

ऐसी ग्रामसेवेची योजना । जागृत जेथे ग्राम-सेना । 
तेथे स्वर्गींच्या नंदनवना । बहर येई सहजचि ॥१०७॥

ऐसें संघटनांनी गांव । भोगूं लागेल दिव्य वैभव । 
ग्रामराज्यचि सुखाची ठेव । तुकडया म्हणे ॥१०८॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्रस्वानुभवसंमत । 
ग्रामरक्षणाचा वर्णिला पंथ । अकरावा अध्याय संपूर्ण ॥१०९॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥