वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

पंढरिये मज जादु केलि कोणी

पंढरिये मज जादु केलि कोणी ।
कळो द्या हे मनी झटो त्यासी ॥

आम्ही सहज गेलो वाटसरुसंगे ।
जाता चंद्रभागे बरे आलो ॥

दिसले निशाण भगव्या रंगाचे ।
तेथेचि अंगाचे पाणी झाले ॥

उठले रोमांच गळा दाटियला ।
अंगी संचरला अष्टभाव ॥

नाद ऐकू येता ओढले हे मन ।
विसरले भान साथियांचे ॥

तुकड्यादास म्हणे महाव्दारी येता ।
तन्मयता चित्ता झाली माझ्या ॥