वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अंबिके ! तारक सकलांची

(चाल : आरती जय जगदीश्वर की...)

अंबिके ! तारक सकलांची ।
आदिजननी तू जगताची ॥धृ.॥

शक्ति तू मूळ अनादीची ।
स्फूर्ति तू निज चैतन्याची ॥
रुपसुंदर लावण्याची ।
चित्कळा चराचरी साची ॥
स्थान तव रम्य अती शोभे ।
अमरपदि प्रशांत सुख लाभे ।
मन हे मोहुनि पदि झोंबे ।
तुझा दरबार, सुखाचा सार, म्हणो अवतार
खचित तू स्फूर्तिदायि अमुची ।
गमसि मूळ वाचा वैखरिची ॥१॥

कितिक सांगती तुझी ख्याती ।
नाहि त्या साक्षीची गणती ॥
पावसी तू पुढता पुढती ।
कुलस्वामिनी तुला म्हणती ॥
नवविधा भक्ती नवरात्री ।
आदरे यथामती पुजती ॥
कुठे तू महिषासूर-मथनी ।
कुठे तू योगेश्वरि म्हणुनी ।
इथे तू एकविरा जननी ।
भक्त सुखदायि, वत्सले आई !,  नमू तव पायि
होई रथ-वाहक तुकड्याची ।
भक्ति मज दे श्रीसदगुरुची ॥२॥