वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अरे हरी ! स्वस्थ का उगा ?

(चाल : अरे ! हरी पाहिले स्वप्न...)

(अरे हरी !) स्वस्थ का उगा ? उगा, धाव वेगे ।
काळ येउनी उरी लागे ॥धृ.॥

वेळ पातली, न पाहवे डोळा, न कर्णी ऐकू ये चाळा ।
जीभ बोबडी, शब्द गुंग झाले,कंठ खरखरा स्वरी चाले ॥
कफाची हली, वपू-रोग जडले, धेर्य है देहातुनि गळले ।
स्मरण राहिना, वृत्ति क्षणि भंगे ॥ काळ ये...॥१॥

वेळ ही अशी न्यावया उभी झाली, वासना पुनर्जन्म व्याली ।
वाटते असे, असे सांगवेना, संशय होति उभे नाना ॥
गती कोणती, होईल या प्राणा ? परी भरवसा तुझा सजना !
पुरा वाटतो, काळ कंठवेना, ऐक बा ! दीनाची करुणा ॥
काय पाहतो ? घे करुणा वेगे ॥ काळ ये... ॥२॥

ब्रीद हे तुझे, तुझे सांगवेना, धावसी भक्तांच्या कामा ।
ऐकली स्तुती, स्तुती भक्तवाणी, ब्रीद रक्षितो चक्रपाणी ॥
अभागी पुरा, न धावसी म्हणुनी, ऐक बा ! शब्द तरी कर्णीं ।
चित्रपट उभे, काळाचे झाले, बंद इंद्रिये श्वास डोले ॥
उसळतो वरी, वरी प्राण जागे ॥ काळ ये... ॥३॥

किती पाहसी, पाहसी वेळ करुनी ?
कि नेईल काळ असा धरुनी ?
कोण आडवे येईल मग स्मरणी ? न्यावया पदपंकज भुवनी ?
तुझ्या श्रीहरी, श्रीहरी ! सांग वेगे,
दास तुकड्या चरणी लागे ॥
स्वस्थ का उगा ॥ काळ ये... ॥४॥