(चाल : घनश्याम सुंदरा श्रीधरा...)
करुणेच्या सागरा, योगी - मनहरा ! भला छंदी ।
दावुनिया जगतास लिला, मन लावियले नादी ॥धृ.॥
अजब घातले दुकान जग हे नाना रुपवर्णी ।
एकापासुनि अनेक करिसी अजब तुझी करणी ॥
प्रथम बीज ओंकार संचला स्फूर्तिरुप धरुनी ।
अजब वाढला वृक्ष थोर हा न दिसे या नयनी ॥
बीजापासुनि वृक्ष काढिसी वृक्षि बीज - साठे ।
बीजरूप हे तुझे संचले या जगती वाटे ॥
(अंतरा)
गणपती मुळी जाहला, पाहता ॥
ब्रह्मा लिंगी बसविला, पाहता ॥
नाभित विष्णु स्थापिला, पाहता ॥
स्फुरणाचे मुळ स्थान वेष्टिले, अंतःकरण बंदी ॥१॥
भोला शंकर हृदय-स्थानी करुनी कैलास ।
मनादीक ही भुते घेउनी करीतसे वास ॥
या पिंडीचा जीव कंठ स्थानात उभा केला ।
भली लाधली वेळ जिथे अज्ञातवास झाला ॥
पुढे लागली वाट, अजब तो घाट; चहूफेरी ।
जिला सर्वही म्हणती माया, तीच तिचे द्वारी ॥
(अंतरा)
संगमी मौज वाटते, पाहता ॥
पाहता नेत्र आटते, पाहता ॥
झुरझुरा मधू-लाट ते, पाहता ॥
गगनमंडळी खूब गर्जना, कैसि दिली संधी ॥२॥
त्रिकुट घाट श्रीहाटावरि गोल्हाट औटपीठ ।
झगमग झगमग भानु उदेला, पहा पहा नीट ॥
ब्रह्मरंध्र झकदार, सर्व व्यवहार शून्य तेथे ।
निर्गुण-सगुणी-वाद निमाला, मी तू नच जेथे ॥
अजब गडी करतार कमाई दिधली भू वरते ।
चीडी पासुनी ब्रम्हा वरतो नाही दुजे जेथे ॥
(अंतरा)
वेदही मौन जाहला, पाहता ॥
संत तो गुंग बैसला पाहता ॥
मुकरुप-रुपी गुंगला पाहता ॥
तुकड्यादास म्हणे या, लागा स्वरुपाचे छंदी ॥३॥