वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

मन हे तुझ्या विरहाने

(चाल : रमला कुठे ग कान्हा...)

मन हे तुझ्या विरहाने,
झुरते रे ! लाजिरवाणे ॥धृ.॥

तू लाविशि वेळ कशाला ?
का भेट न देशि अम्हाला ?
अति दुःख सख्या ! जिवप्राणे,
झुरते रे ! लाजिरवाणे ॥१॥

रानी हंबरती गायी,
पाहती तुज वळूनि सदाही ।
रडती गोपाल दुःखाने,
झुरते रे ! लाजिरवाणे ॥२॥

राधेस गमेना काही,
जणु चंद्र-चकोर-तुटी ही ।
बघ एक वेळ प्रेमाने,
झुरते रे ! लाजिरवाणे ॥३॥

तू निघुनी येथुनि गेला,
हा ओसचि भारत झाला ।
धरला करि हा असुराने,
झुरते रे ! लाजिरवाणे ॥४॥

चल ये अमुच्या कनवाळा,
पुरवी भक्तांचा आळा ।
सांगति तव ब्रीद पुराणे,
झुरते रे ! लाजिरवाणे ॥५॥

तुकड्याची आशा ऐसी,
तू अवनीवर अवतरसी ।
पळतील असुर हिरसाने,
झुरते रे ! लाजिरवाणे ॥६॥