वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय सतरावा

ग्रामगीता


अध्याय सतरावा : गरीबी-श्रीमंती


॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥


श्रोतेजन प्रश्न करिती । आमुच्या गांवीं आहे संपत्ति ।

परि सुख न मिळे लोकांप्रति । ऐसें झालें ॥१॥


विकास कार्याचा कोठला ? गांवीं वाद बळावला ।

धनिक-गरीबांचा लागला । वर्ग-कलह ॥२॥


समाज या दोहोंभागीं विभागला । एक न मानी एकाला ।

परस्परांवरोनि विश्वास गेला । उडोनि त्यांचा ॥३॥


आता काय करावी योजना ? कोणाची थोरवी पटवावी जना ! 

कैसेनि होईल ग्रामरचना । सुंदर आमुची ? ॥४॥


ऐका प्रश्न हा महत्वाचा । आवश्यकचि निर्णय याचा । 

त्यावांचूनि गांवाचा । मूळपायाचि ढासळे ॥५॥


श्रीमंत-गरीबांचा वाद । गांवास करील बरबाद । 

म्हणोनि ही दूर करावी ब्याद । जाणत्यांनी ॥६॥


देवाघरीं एकचि प्राणी । ना श्रीमंत ना भिकारी कोणी । 

ही आहे समाजरचनेची उणी । मानवनिर्मित ॥७॥


मूलसिध्दांतीं भेदचि नाही । हा प्रलोभनांचा खेळ सर्वहि । 

समज येतां दोघांसहि । भेद कांही दिसेना ॥८॥


खेळाकरितां दोन पक्ष केले । परि खेळ विसरोनि लढूं लागले । 

आपसांत वैमनस्य आले । अज्ञानाने ॥९॥


एकाकडे आले अधिक कंचे । तो म्हणे माझ्याचि मालकीचे । 

मग खेळणेंहि थांबलें इतरांचें । एकाचिया लोभामुळे ॥१०॥


ऐसेंचि आहे संसाराचें । घरचें आणि समाजाचें । 

तितंबे झाले कुटूंबांचे । अज्ञानें आणि लोभाने ॥११॥


कामाकरितां जाति केली । काम विसरून जातचि धरली । 

जन्मजात थोरवी मिरविली । वर्णधर्माच्या नांवाने ॥१२॥


ऐसेंचि झालें अर्थव्यवस्थेचें । हिस्सेदार सर्वचि धनाचे । 

पण कांहीच राहिले मानाचे । बाकी मेले भुकेने ॥१३॥


एक राहिला गरीब गडी । एकाची वाढली श्रीमंती बडी । 

ही सर्व अज्ञानाची बेडी । भोवली सगळया ॥१४॥


एकापाशीं ठेव ठेवली । त्याने अविचाराने उपभोगिली । 

कुणाची ठेव ही बोलीच गेली । कालांतराने ॥१५॥


देवळामाजी पुजारी ठेवला । तो देवूळचि ग्रासूनि बसला । 

बायकापोरंसाठीहि केला । उपयोग त्याने देवळाचा ॥१६॥


कोणी तीर्थी सदभक्त झाले । त्यांची देवळावरि सत्ता चाले । 

पुढे व्यापाराचें साधनचि केलें । हक्क दावूनि मुलांनी ॥१७॥


एकाकडे दिली खूप जमीन । गांवें वसवोनि त्यांना द्याया वाटून । 

परि तोचि बसला गबर होऊन । राबणारांसि पिळोनि ॥१८॥


धनासाठी राखणदार आणला । त्याने कमजोर मालक पाहिला । 

आपणचि बळकावून बसला । पैसा शक्तियुक्तीने ॥१९॥


ऐसेंचि झालें गरीबी-श्रीमंतीचें । कष्ट करणारे झाले दूरचे । 

पैसे घेणारे झाले कायमचे । मालक येथे ॥२०॥


श्रमणारापदरीं मोजकें माप । उरला गल्ला आपोआप । 

तो स्वयें उपभोगणें हें महापाप । परि ठरविला न्याय्य हक्क ॥२१॥


खोटयासि दिलें खरें नांव । पैशांनी पैशांचें वाढलें वैभव । 

म्हणती ही पूर्वजांची ठेव । हक्क कुठला श्रमिकांचा ? ॥२२॥


आता कांही केल्या समजेना । कोण पुसतो उपदेश-कीर्तना ? । 

फार तर मुंगियासि साखरकणा । देवोनि म्हणे दान केलें ॥२३॥


हजारोंचें जीवन पिळावें । तेणें त्यांच्यांत रोग वाढावे । 

मग दवाखाने धर्मार्थ घालावे । धर्मशील म्हणवोनिया ॥२४॥


पाहतां आजचा मजूर । न मिळे पोटासि भाकर । 

तैसेंचि काम करवी अहोरात्र । वारे मालक धर्मशील ! ॥२५॥


हा तों राहतो महालीं शहरीं । मुलें गाडी नेती सिनेमादारीं । 

शिकती व्यभिचार व्यसनें चोरी । लुटती कारभारी खेडुतां ॥२६॥


कांहींनी खूप बुध्दि लढविली । संपत्ति अतोनात वाढविली । 

काढोनि कवडीहि नाही दिली । प्राण जातां श्रमिकांचा ॥२७॥


गांवांतील लोक उपाशी मरे । म्हणती मरती ते मरोत बिचारे । 

आयुष्य सरल्या कोण तारे ? पैसा-दवा सब झूट ! ॥२८॥


ऐसें अधिक धन जमविलें । समाजीं कामीं नाही आलें । 

ते चोरचि म्हणावे ठरले । एकलकोंडे आपगर्जी ॥२९॥


ज्याचे पाशी अधिक जमीन । न देई मजुरां पोट भरून । 

तो कशाचा भाग्यवान ? महाकदर्यु म्हणावा ॥३०॥


भव्य वाडा पडला सुनसान । एकचि पत्नी एक संतान । 

परि न देई शेजारपण । वा रे भूषण कृपणाचें ! ॥३१॥


कित्येकांचें जनावरी वागणें । सरंजामशाहीने वजन टाकणें । 

धाकदडपणाने कामें घेणें । घातक होईल यापुढे ॥३२॥


गरीब सारेच ओरडती । श्रीमंत हे गुंड आहेत म्हणती । 

परि यांची लागली नेत्रपाती । कांहीं केल्या उघडेना ॥३३॥


यासि उपाय करावा कांही । त्यासाठी मार्ग दोनचि पाही । 

कायदा अथवा धर्ममार्ग राही । सेवाभावें समज द्याया ॥३४॥


यासहि कोणी न घालती भीक । त्याने पुढे चिडती लोक । 

मग रक्तक्रांतीची ऐकूं ये हांक । वाढे धाक मनस्वी ॥३५॥


कोणी घर फोडोनि चोरी करिती । कोणी डाके मारूनि लुटती । 

कोणी भरदिवसां कापिती । मुलाबाळांसहीत ॥३६॥


ही पाळीच कां येऊं द्यावी ? म्हणोनि कांही योजना शोधावी । 

गरीब-श्रीमंत दोन्हीहि बरवीं । राहतील ऐसी ॥३७॥


परस्परांचा विचार घ्यावा । आपला समतोल हिस्सा ठेवावा । 

कोणासहि राग न उदभवावा । ऐसें करावें गांवाने ॥३८॥


तुमचा पैसा आमचे श्रम । तुमची बुध्दि आमुचा उद्यम । 

एकाचा घोडा एकाचा सरंजाम । असावा जैसा ॥३९॥


मुळीं जीवनाची तैसीच रचना । एकास हात लागती नाना । 

सर्वां मिळोनीच हा आपुल्या स्थानां । बनतो सन्माना घ्यावया ॥४०॥


कोणाचे निभेना वगळूनि ग्राम । प्रत्येकासि प्रत्येकाचें काम । 

काम झालिया पुन्हा भ्रम । वाढतो याचा ॥४१॥


सुतार याचे खांब करी । बेलदार याची भिंत उभारी । 

कुंभार याचे कवेलू उतारी । छावणीसाठी ॥४२॥


लोहार खिळेफासे घडवी । मजूर बांधी घरें-पडवी । 

ऐसें न करितां हा गोसावी । राहता कोठे ? ॥४३॥


चांभार याचे जोडे बनवी । विणकर याला वस्त्रें पुरवी । 

नीटनेटके कपडे शिवी । शिंपी यासाठी ॥४४॥


शेतकरी याला पिकवोनि दे । धान्य मिरची भाजी कांदे । 

सर्वांच्या श्रमें घर आनंदें । साजवी हा आपुल्यासाठी ॥४५॥


सर्वांचे हात सर्वासि लागे । सर्वांस जगविती गुंतले धागे । 

हें समजोनि जो गांवीं वागे । तोचि खरा बुध्दिमान ॥४६॥


परि यांत भाव वाईट शिरला । कोणी न मानीच कोणाला । 

म्हणे पैसे देतों आम्हीं सकलां । म्हणोनि कामें करिती हे ॥४७॥


खरे महत्त्व आहे परिश्रमाला । परि हा मानतो पैशाला । 

काम न करितां, पैसा असला । तरी काय भागतसे ? ॥४८॥


खोदूनि आणली गोटेमाती । तासली फाडी रचल्या भिंती । 

तेव्हाच बनली ती संपत्ति । परिश्रमाच्या स्पर्शाने ॥४९॥


रानीं असोत लांकडे काडया । त्या श्रमाविण न होती गाडयामाडया । 

श्रमाविण संपत्ति म्हणजे कवडया । त्याहि वेचल्या श्रमाने ॥५०॥


खरें याचें तारतम्यज्ञान । सर्वांनी असावें समजोन । 

वाहावा सर्वांचा योगक्षेम पूर्ण । हाचि धर्म धनिकांचा ॥५१॥


गांवीं जे जे श्रीमंत असती । तयांचें धन गांवची संपत्ति । 

समजोनि वागावें या रीतीं । मदत द्यायासि प्रसंगीं ॥५२॥


आपणापाशी अधिक असे । शेजार्‍यासि पुरवावें हर्षें । 

सर्व मिळोनि राहावें सरिसें । गांवधर्म म्हणोनिया ॥५३॥


धन हें गरीबांचें रक्त । समजोनि वागोत श्रीमंत । 

श्रम ही गांवाची दौलत । म्हणोनि व्हावा मान तिचा ॥५४॥


ऐसें केलिया सकळ जनांनी । वर्गभेद मिटतील गांवचे दोन्ही । 

यास बुध्दि द्यावया उपजोनि । साधुसंतांनी काम घ्यावें ॥५५॥


आणि सावध असावें सरकार । नीटनेटका घडवाया व्यवहार । 

जनतेमाजी भराभर । वारें शिरवावें शिक्षणाचें ॥५६॥


लहान मुलीमुलांपासोनि । मिटवावी गरीब-श्रीमंत श्रेणी । 

सर्वांस पाहाया समानपणीं । लावावें प्रत्यक्ष कृतीने ॥५७॥


शब्दांत नको समसमान । प्रत्यक्ष पाहिजे धनमानशिक्षण । 

फूट पाडिती ते द्यावेत हांकोन । गांवचे भेदी ॥५८॥


नसतील ऐकत जे जे कोणी । त्यांना कायद्याने घ्यावें आटपोनि । 

मग रचना करावी समानगुणीं । इमान जागीं ठेवोनिया ॥५९॥


जैसे बापास पुत्र सारिखे । तैसे गरीब श्रीमंत राजाचे सखे । 

हा भेद मिटविणें काम निकें । त्याचेंचि असे राजधर्में ॥६०॥


पण जेथे सरकार मिंधा झाला । तेथे आग लागली प्रजेला । 

मग कोण पुसे कोणाला ? धिंगाणा झाला पहा सर्व ॥६१॥


संतसाधूहि मिंधे झाले । दक्षणेवरील मोहून गेले । 

मग पर्वताचे कडेचि लोटले । समाजावरि ॥६२॥


जनतेचा मग वालीच नाही । ती चेततां मग आगचि सर्वहि । 

भस्म होईल सगळी मही । हाहा:कारें ॥६३॥


सगळी जनता बंदिस्त केली अथवा मारोनि टाकिली । 

तरी श्रमाविण पैदास कुठली ? कष्टावें लागेल सर्वांसि ॥६४॥


मग हें ऐसें कां होऊं द्यावें ? सकळांनी आधीच जागृत व्हावें । 

आपुल्या परीने सावरावें । कार्य नीट गांवाचें ॥६५॥


उत्तम व्यवहारें धन घ्यावें । उत्तम कार्यासाठी लावीत जावें । 

जेणें परस्परांचें कल्याण व्हावें । तैसेचि करावे व्यवहार ॥६६॥


ऐसा कदर्युपणा नसावा । की ज्याने गांवचि व्याजें बुडवावा । 

प्रसंग पडतांहि न द्यावा । साथ लोकां ॥६७॥


अविचाराने न उधळावें धन । फसवोनि न घ्यावें गरीबांपासून । 

दोन्ही मार्ग समसमान । ठेवावे देवघेवीचे ॥६८॥


न व्हावा शेवटचा कळस । म्हणोनि सहानुभूतीचा वाढो हव्यास । 

विरोधचि करूं नये यास । कोणी कोणा ॥६९॥


सगळयांनी मिळोनि वागावें । सर्वांचें समजोनि कार्य करावें । 

श्रीमंत-गरीब दिसोंचि न द्यावे । बहिरंग जीवनीं ॥७०॥


ते दिसावेत गुणावरि । बुध्दीवरि, कार्यावरि ।

ऐसे असले प्रकार जरी । समताभाव तरी न सोडावा ॥७१॥


याचें समाजासि मिळे शिक्षण । तोचि खरा भाग्याचा दिन । 

त्यासि नाही मग भंग जाण । कल्पकाळीं ॥७२॥


समाजांत जेव्हा धुरीण वाढती । तेव्हाचि ऐसी होय क्रांति । 

आपोआपचि मिटेल भ्रांति । पक्षभेदांची ॥७३॥


तेचि करितील परिवर्तन । समाजांत उत्तम ज्ञानकण । 

पेरूनि करितील परम पावन । भारतमाता ॥७४॥


ऐसी सुबुध्दता सगळयांत यावी । तरी श्रीमंती-गरीबी मिटावी । 

नाहीतरि गति बरवी । नाही आता समाजीं ॥७५॥


हें समजणेंचि जरूर आहे । काळ याचीच वाट पाहे ।

तो ऐसा थांबलाचि न राहे । स्वारी करील वेगाने ॥७६॥


म्हणोनि माझें एवढेंचि सांगणें । वाढवा सामाजिक वृत्तीचें लेणें । 

मिरवा सामुदायिकतेचीं भूषणें । लोकांमाजी ॥७७॥


नुसतें श्रीमंत सहकार्य देती । खर्चूनि लक्षावधि संपत्ति । 

तरी तेवढयाने ही भेदवृत्ति । जाणार नाही ॥७८॥


ओळखोनि श्रमाची प्रतिष्ठा । त्यांनी दावावी कार्यनिष्ठा । 

श्रमणारांच्या निवारावें कष्टा । स्वत: श्रम करोनिया ॥७९॥


सर्वांनी सर्वांसि पूरक व्हावें । ऐसें धर्माचें सूत्र बरवें । 

हें काय तुम्हांसि सांगावें ? शहाणे जनहो ! ॥८०॥


त्याअभावीं बिघडली गांव-स्थिति । कोणी जनावरासम राबती । 

कोणी नाजुक होवोनि फिरती । टोळभैरव ॥८१॥


कोणी म्हणती धनी आम्ही । काय आहे आम्हां कमी ? 

कमाई केली वडिलें नामी । घरबसल्याचि आमुच्या ॥८२॥


हें तयांचें महाअज्ञान । कळली नाही त्यांना खूण । 

यापुढे जाईल धन-जमीन । निकष्टिकांची ॥८३॥


न करितां काजकाम । पावेल कोणा जीवा आराम ? 

सर्व धांवतील होवोनि बेफाम । निकष्टिकांमागे ॥८४॥


म्हणोनि सांगणें उद्योगा शिका । पराधीन राहूं नका । 

आपुल्या हक्काचा हा पैका । गोडी चाखा तयाची ॥८५॥


आज निकष्टिकांची चालती । उद्या विचारूं नका फजीती । 

म्हणोनि समजोनि घ्यावी युक्ति । उद्योगाची ॥८६॥


सर्व तर्‍हेच्या कलाकुसरी । शिकूनि वागावें शहाण्यापरी । 

पोट भरावयाची उजागरी । तेव्हा लाभे ॥८७॥


हें जंव करितील शिक्षितजन । तेव्हा बंद होतील मजुरांचे वाग्बाण । 

नाहीतरी ते बेईमान । ठरवितील आपणां ॥८८॥


म्हणतील आम्हीं कष्ट करावे । तुम्ही आरामांत राहावें । 

सांगतां ’ समानतेने ठेवावें ’ । कोण म्हणेल पुढारी ? ॥८९॥


सर्वांवरि सारखेंच प्रेम । मग सर्वांकरितां एकचि नियम । 

सर्वांनी करावेत परिश्रम । अपापल्या परींनी ॥९०॥


एकाने करावें काम । दुसर्‍याने करावा आराम । 

हें तों आहे हराम । देश-हिताच्या दृष्टीने ॥९१॥


दुनिया आहे कष्टिकांची । जो जो कसेल शेती त्याची । 

जो काम करील लक्ष्मी तयाची । दासी व्हावी नियमाने ॥९२॥


ऐसी आहे आजची प्रवृत्ति । पाहिजे हेंचि समाजा प्रति । 

त्यांत थोरांनी तरी खंती । काय म्हणोनि मानावी ? ॥९३॥


विद्वानाने शिक्षिताने । महंताने श्रीमंताने । 

कष्ट कराया मुद्दाम लागणें । हेंचि मोठेपणाचें ॥९४॥


तेणें सर्वांस होईल सुकर । कामें करितील जन भराभर । 

लाज जाईल निघोनि पार । वैभवाने निर्मिलेली ॥९५॥


कामांत पडले बुध्दिमान । तेणें प्रत्यक्षांत येईल ज्ञान । 

शेतीभातीची उन्नति पूर्ण । विकास होईल देशाचा ॥९६॥


एरव्ही उद्योगाविण जें भोगणें । तें मानवासि लाजिरवाणें । 

आळशासि खाणेंपिणें । देणें असे महापाप ॥९७॥


श्रमाने अंगीं हीनता येते । ऐसें बोलती कोणी एक ते । 

समजावे देशघातकी पुरते । उपद्रवी पापभक्षी ॥९८॥


आपुलें करावयासि काम । कां वाटावी लाजशरम ? 

उलट गर्व असावा निस्सीम । कामाचा आपुल्या ॥९९॥


जयास जैसी अभ्यासरीति मानवेल जैसी कार्यपध्दति । 

घेऊनि तेंचि शिक्षण सुमति । यावें पुढती तयाने ॥१००॥


कामें सर्वचि मूल्यवान । त्यांची योग्यता समसमान । 

श्रीकृष्णें सिध्द केलें उच्छिष्टें काढून । ओढिलीं ढोरें विठ्ठलें ॥१०१॥


कोणाचीच योग्यता कमी नाही । सर्वचि कामें आवश्यक हीं । 

म्हणोनि कामाचा बदला सर्वांहि । सारखा असे सामान्यत: ॥१०२॥


एक शेतीकामाचा कामगार । एक बेलदार सुतार लोहार । 

शिंपी धोबी कुंभार चांभार । सारिखेची उपयुक्त ॥१०३॥


कोणी भंगी-काम करी । कोणी वैद्य नाम घरी । 

कोणी देवालयीं सक्रिय पुजारी । सारिखेचि उपयुक्त ॥१०४॥


कोणी बुध्दिवंत पुराण सांगे । कोणी चुकलिया लावी मार्गे । 

जैसी ज्याची योजना निसर्गे । सहजचि केली त्यापरीं ॥१०५॥


परि सर्वांना सर्वांचा आदर । ऐसा असावा जगाचा व्यवहार । 

कोण ब्राह्मण कोण महार ? कामामाजीं सारिखे ॥१०६॥


येथे कामांत उच्च-नीचता । कोणें ठरवावी व्यवहारत: ? 

प्रत्येक काम महत्त्वपूर्णता । आपुल्या स्थानीं ठेवितसे ॥१०७॥


आहे सर्वांचीच गरज । सर्वकाळ सहजासहज । 

एक नसतां जग-जहाज । अपूर्णता दावीतसे ॥१०८॥


दोर घेवोनि साखळीचा । बोझा बांधावा लाकडांचा । 

एक तुटतां तार कडीचा । सर्व पडे विस्कटोनि ॥१०९॥


तैसी आहे कामांची गति । काम असावें सर्वांप्रति । 

तरीच जगेल ही क्षिती । सारखेपणीं राबतां ॥११०॥


ज्याचा असेल जो जो बाणा । तो लावावा देश-कारणा । 

जो असेल ज्या कार्यी शहाणा । तेंचि पुरवावें तयाने ॥१११॥


ज्यासि पुरेल जैशापरी । तैसी भरपूर द्यावी सामुग्री । 

श्रम करावे आपापल्यापरी । जैसी बळबुध्दि ज्यापाशीं ॥११२॥


ऐसें गांवीं कराल काम । तेणेंच पावेल आत्माराम । 

लाभेल संतोषाचें निजधाम । नाहीतरि संकट ना टळे ॥११३॥


अरे ! उठा उठा श्रीमंतांनो ! । अधिकार्‍यांनो ! पंडितांनो ! । 

सुशिक्षितांनो ! साधुजनांनो ! । हांक आली क्रांतीची ॥११४॥


गांवागांवासि जागवा । भेदभाव हा समूळ मिटवा । 

उजळा ग्रामोन्नतीचा दिवा । तुकडया म्हणे ॥११५॥


इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत । 

श्रमसंपत्तिमहत्त्व कथित । सतरावा अध्याय संपूर्ण ॥११६॥


॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥