वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय अठरावा

ग्रामगीता


अध्याय अठरावा : श्रम-संपत्ती


॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥


एक श्रोता प्रश्न विचारी । आम्हीं ऐकिलें गीतेमाझारीं ।

कर्ममय असे सृष्टि सारी । न करतांहि कर्म घडे ॥१॥

 

सर्वांसचि लागलें कर्म । कर्म हाचि देहाचा धर्म ।

तेथे काम करावें मुद्दाम । हें बोलणें विपरीत ॥२॥


आपण म्हणतां परिश्रम करा । येणें पोषण होईल अहंकारा ।

सहज चालेल तोचि बरा । व्यवहार लोकीं ॥३॥


ही श्रोतियाची शंका । भ्रमवीत आली नित्य लोकां । 

परि ही नव्हे गीतेची भूमिका । निर्भेळ ऐसी ॥४॥


कर्ममय विश्व आहे । कोण रिकामा बसला राहे ? 

प्रत्येक जण करीतचि जाय । कांहीतरि कर्म ॥५॥


परि त्या कर्माचे अनेक प्रकार । कांही शुध्द निषिध्द मिश्र । 

कांही विधियुक्त कांही पवित्र । निष्काम कर्म ॥६॥


कांही देहेंद्रियांसाठी । कांही निपजती मनाच्या पोटीं । 

कांही विवेकबुध्दीने गोमटीं । निपजती कर्मे ॥७॥


कांही कर्मे स्वत:करिता कांही कुटुंबाचीया हिता । 

कांही कर्मे गांवा लोकांकरितां । सेवाधर्मरूप ॥८॥


आपल्या देहाचें करणें काम । हा कसला आला महाधर्म ? । 

हें आहे नित्यकर्म । सहजचि घडणारें ॥९॥


तैसेंचि प्रसंगाविशेषें कांही । करणें सणोत्सवादि सर्वहि । 

त्यांतहि विशेष ऐसें नाही । नैमित्तिक कर्मी ॥१०॥


नित्यनैमित्तिक कर्मे सहज । तीं करणें आवश्यक काज । 

न करितां विस्कटेल समाज । परि करणें नव्हे महाधर्म ॥११॥


तैसेंचि पोटासाठी करणें काम । हे नव्हेत पुण्यपरिश्रम । 

उरल्या वेळीं जें सेवाकर्म । त्यासि धर्म बोलती ॥१२॥


तेंचि माणुसकीचें कर्म । जें दुसर्‍यांसाठी केले श्रम । 

एरव्ही पशुपक्षीहि करिती उद्यम । आपुलाले ॥१३॥


निषिध्द आणि सकाम कर्म । तैसेचि त्यागूनि अहं-मम । 

जगासाठी करावेत श्रम । ईश्वरार्पण बुध्दीने ॥१४॥


हेचि गीतेची शिकवणूक । वारंवार निश्चयात्मक । 

जेणें सर्वेश्वराचें पूजन सम्यक । तेंचि कर्म गीतामान्य ॥१५॥


एरव्ही कामाविण कोणी नाही । हें मजसीहि कळे नि:संशयीं । 

परि त्यासि काम आज न म्हणों कांही । जें न उत्पादन वाढवी ॥१६॥


जनतारूप जनार्दनाची । ज्यांत सेवा न होई साची । 

त्यास गीताप्रिय कर्माची । पदवी आम्हीं न देऊं ॥१७॥


आज भरपूर उत्पादन । हेंचि जनसेवेचें साधन । 

त्यासाठी झटेल जो जो जन । गीता कळली तयासि ॥१८॥


मंदिरीं बैसोनि नाक दाबावें । त्यापेक्षा मार्गींचे कांटे उचलावे । 

दु:खितासि प्रेमें पाणी पाजावें । हें श्रेष्ठ तीर्थस्नानाहूनि ॥१९॥


एक हात खोदावी जमीन । हें पूजनाहूनि पूजन । 

परिणाम शेकडों व्याख्यानांहून । अधिक तयाचा ॥२०॥


श्रमिकांस जेणें लाभेल अन्न । तें कर्म श्रेष्ठ यज्ञाहून । 

एरव्ही गीतेचें नांव सांगून । भलतें समर्थन करूं नये ॥२१॥


एक नौजवान आळसें निजला । म्हणे हेंहि पाहिजे शरीराला । 

म्हणोनि तो सारखाचि झोपला । फक्त उठला भोजनासि ॥२२॥


भोजन झाल्यावरि पुन्हा पडला । कैसा आवडेल घरच्या लोकांला ? 

कोणी थट्टामस्करी करूं लागला । म्हणे हेंहि कामचि आहे की ॥२३॥


एक सावकारीचें घाशी लिखाण । एक झगडयाचें चालवी प्रकरण । 

कोणी उपद्रव करी हातीं धरोन । लोक हरप्रकारें ॥२४॥


असलें काम जरी बंद पडलें । तरी माझ्यामतें कांही न अडलें । 

परि निर्वाहाचें उत्पादनचि शांतलें । कैसें चालेल जीवन ? ॥२५॥


म्हणोनि सर्वांनी काम करावें । ग्रामाचें धन वाढवावें । 

येथे गरीब-श्रीमंत न पाहावें । कामासाठी ॥२६॥


श्रीसंत गोरा राबे अंगें । देवहि माती तुडवूं लागे । 

तेथे श्रीमंत आळसें वागे । हें महापाप ॥२७॥


यावरि बोले एक श्रोता । नाही गरीब मजुरासीच काम पाहतां । 

बेकारांचा वाढतो जत्था । तेथे श्रीमंतां काम कोठे ॥२८॥


श्रोतियाची ही विचारसरणी । आहे भ्रमाची पोसणी । 

सारा देश दीन-दरिद्री अज्ञानी । तेथे काम न दिसे तया ॥२९॥


पुन:पुन्हा जन्मा यावें । मातृभूमीसि सुखी करावें । 

ऐसें थोर म्हणती जीवेंभावें । तेथे काम न दिसे तया ॥३०॥


देशांत कामांचा उभा डोंगर । दारिद्रयदु:खाचा वाहतो पूर । 

अर्धनग्न अर्धपोटी लोक अपार । त्यांचें दु:ख कां न दिसे ? ॥३१॥


येथे विश्रांतीसि नाही वेळ । निरंतर कार्यकर्ते प्रबळ । 

पाहिजेत ठायींठायीं सकळ । काम ऐसें देशापुढे ॥३२॥


परि ज्यांना होणें आहे साहेब । लोकांवरि कसावया रुबाब । 

न कष्टतां इच्छिती आराम खूब । तेचि राहती बेकार ॥३३॥


शिक्षणाचा द्यावा उपयोग । करोनि प्रचार आणि प्रयोग । 

तंव ते स्वत:चि बनती रोग । समाजाच्या जीवनीं ॥३४॥


एका बाजूने शिक्षित-श्रीमंतांचें । तैसेंचि झालें मजूर-गरिबांचें । 

शिथिलता आळस दोघांचे । घरीं थाटला दिसताहे ॥३५॥


जेव्हा पोटासि भूक लागे । तेव्हाचि घरोघरीं काम मागे । 

नाहीतरि आळसा घेवोनि संगें । खुशाल पडे झोपडीमाजी ॥३६॥


सकाळीं आठ वाजतांचें काम पूर्ण । दहा वाजतां उठे घरांतून । 

नाही कामावरि मन । चुथडा करी कामाचा ॥३७॥


म्हणे श्रीमंतासि काय झालें ? ते काय भिकेसि लागले ? 

काय होतें काम न केलें । तरी आमुचें नुकसान ? ॥३८॥


कामासाठी हात उचलेना । तोंडीं सारखा वाचाळपणा । 

मजूरी न देतां धिंगाणा । घालितसे लोकांपाशी ॥३९॥


ऐसें करणें आहे चुकीचें । पैसे कसून घ्यावेत कामाचे । 

परि कामचुकार होणें हें आमुचें । ब्रीद नव्हे सर्वथा ॥४०॥


मजूर सकाळीं पाहिजे उठला । नित्यविधिकर्मांतून निपटला । 

घरकाम करोनि निघाला । पाहिजे तत्काळ कामासि ॥४१॥


जेव्हा कामाची वाजेल घंटा । मजूर चालला चारी वाटां । 

उद्योगांचा चालला सपाटा । ऐसें व्हावें ॥४२॥


मजुरावरीच आहे उत्पादन । उत्पादनचि मुख्य ग्रामाचें धन । 

तयामाजी करणें कुचरपण । वेडेपणाचें ॥४३॥


मजूर इकडे कार्यनिष्ठा न जाणे । श्रीमंत तिकडे आळशी बने । 

म्हणोनि झालें कंटाळवाणें । जीवन आता देशाचें ॥४४॥


उत्पादनाची गति खुंटली । उपभोगाची भावना वाढली । 

काय करील भूमाता भली । मशागत नसतां जमिनीची ? ॥४५॥


यासि सर्वचि असती जबाबदार । शक्ति संपत्ति विचार प्रचार । 

हें एकहि नाही ताळयावर । म्हणोनि ग्राम ओसाडलें ॥४६॥


श्रीमंतां आपुलें न वाटे काम । गरीबा उत्पादनाचें नाही प्रेम । 

शिक्षितां हीन वाटतो परिश्रम । यानेच आली शिथिलता ॥४७॥


ऐसें न व्हावें आता पुढती । सर्वांनी सुधारावयास पाहिजे मति । 

म्हणोनि आहे माझी विनंति । सकळांप्रति आग्रहाची ॥४८॥


जें जें ज्याचेनि काम बने । त्याने तें सेवा म्हणोनि साधणें । 

आपुलेंहि बरें करणें । गांवासि होणें भूषणावह ॥४९॥


जो जो पोटापाण्याचें काम न करी । उत्पादनासि ना सुधारी । 

त्यास विरोध करावा, विचारी । माणसाने गांवाच्या ॥५०॥


श्रमनिष्ठेचा करावा प्रचार । सर्वांस आपुलकी वाटे पुरेपूर । 

ऐसी व्यवस्था करावी सुंदर । गांवचें उत्पादन वाढवोनि ॥५१॥


गांवचें वाढवाया उत्पन्न । गांवीं कराया नवनिर्माण । 

काय करावें ऐसा प्रश्न । वारंवार ऐकूं येई ॥५२॥


त्यासि उपाय हाचि प्रथम । कामगार करिती जे श्रम । 

त्यांची शक्ति वांचे तिला काम । द्यावें सहायक दुसरेंहि ॥५३॥


आणि इतरांचा वेळ कितीतरी । जाई व्यर्थचि गांवीं घरीं । 

कामीं लावितां तो निर्धारीं । काया पालटेल गांवाची ॥५४॥


कच्ची सामुग्री गांवच्या भागीं । ती पुरेपूर आणावी उपयोगी । 

शोध करोनि नाना प्रयोगीं । माती करावी सोन्यासम ॥५५॥


अन्य देशींच्या तरुणांसि वेड । नित्य नवें संशोधन प्रचंड । 

तैसी धुंद चढावी अखंड । गांवच्या शिक्षित तरुणां ॥५६॥


गांवचे कलावंत निपुण । त्यांना द्यावें उत्तेजन । 

नवनव्या वस्तु कराव्या निर्माण । उपयोगाच्या जीवनासि ॥५७॥


उद्योगें यंत्रेंहि निर्मावी । परदेशा भीक न मागावी । 

आपणचि करोनि भोगावीं । वैभवें सारीं ॥५८॥


चरखाटकळी पासून उद्योग । अन्न धान्यादिकांचे प्रयोग । 

घरेदारें सर्व सुयोग । आपणचि निर्मावे ॥५९॥


प्रत्येक घरीं जोडधंदा । सर्व स्त्रीपुरुष याचि छंदा । 

दूर करावया आपदा । जीवनाच्या लागावे ॥६०॥


कोणी पिशव्या कोणी नवारी । कोणी खादी विणतो घरीं । 

कोणी चपला चामडियाच्या करी । मेल्या जनावरांच्या ॥६१॥


कोणी चटया कोणी आसनें । कोणी खुर्च्या कोणी खेळणें । 

कोणी बादल्या पलंग गोणे । साबणहि घरीं करीं ॥६२॥


कोणी सुंदर मडकें घडवी । कुंडया फुल-पात्रें बरवीं । 

कोणी कवेलू मजबूत दावी । करोनिया सुंदरसें ॥६३॥


कोणी सुंदर विटा करी । कोणी फाडी फोडी बरी । 

सर्व हे आपापल्या परीं । घरोघरीं कार्यरत ॥६४॥


कोणी बैलांचा साज करी । कोणी रंग शोधी परोपरी । 

प्रत्येकजण कांहीतरी । करितचि आहे ॥६५॥


ऐसें हें सर्व गांव । जोडधंद्यांनी भरीव । 

जराहि नाही उणीव । कोणेपरी कोठे ॥६६॥


ऐसी असावी कलाकुसरी । उद्योगधंदे घरोघरीं । 

जराहि न दिसेल बेकारी । वाढली कोठे ॥६७॥


त्यासचि म्हणावी सुंदर कला । एरव्ही अवकळेची धर्मशाला । 

उसणें आणोनि सजविला । आपुला नवरदेव ॥६८॥


जो जो धंदा गांवीं नसला । प्रोत्साहन मिळावें त्या कार्याला । 

परि तो पाहिजे योग्य ठरला । गांवाच्यासाठी ॥६९॥


गांवचे उद्योग मागासले । त्यांस शिक्षणाने पुन्हा उजळिलें । 

ऐसें असावें सुधारलें । गांव आमुचें ॥७०॥


नसतील त्या वस्तु निर्माव्या । येत नसतां शिकोनि घ्याव्या । 

घरोघरीं त्याच दिसाव्या । गांवच्या वस्तु ॥७१॥


आपुल्या गांवीं जे जे होते । आपणचि वस्तु वापरावी ते । 

तेणें गांवींचें धन गांवींच राहतें । शक्ति वाढते गांवाची ॥७२॥


चांभार गांवीं उपाशी मरे । जोडयासाठी शिक्षित शहरीं फिरे । 

केवढी गांवाची कदर करणारे । बुध्दिमंत हे ! ॥७३॥


गांवीं विणकर फुटाने फाकती । यासि हवी मलमलची घोती । 

वा रे यांची देशभक्ति ! गांव मारिती शौकासाठी ॥७४॥


कोणी म्हणती आमुचा पैसा । आम्ही खर्चू हवा तैसा । 

गांव-द्रोही समजावा ऐसा । आपस्वार्थी मानव ॥७५॥


गांवचे कलावान मागासले । म्हणोनि न पाहिजे उपाशी मारिले । 

बाह्य वस्तूंनी आपणचि सजले । भूषण नव्हे दूषण तें ॥७६॥


देशांत एकटा ताजमहाल । त्यावरूनि न ठरे देशाचा हाल । 

घरोघरीं लोक जरि कंगाल । तरि तें मोजमाप कशाचें ? ॥७७॥


गांवीं एक कुस्तीगीर महान । आणि बाकीचे लकडी पहेलवान । 

तरी तें गांव शरीरबलाने पूर्ण । म्हणतां नये कधीहि ॥७८॥


मोजके थोरपुरुष होऊनि जाती । इतरांची पातळी नयेचि वरती । 

तंव ती समाजाची प्रगति । कैसी म्हणावी जाणत्याने ? ॥७९॥


यासाठी प्रत्येक घटक सज्ञान । पाहिजे निरोगी उद्योगी संपन्न । 

तरीच तें गांव आदर्शाचें भूषण । मिरवूं शके ॥८०॥


म्हणोनि प्रत्येकाने आपुल्या गांवीं । ग्रामीण वस्तूंना चालना द्यावी । 

त्यांत सुधारणाहि घडवावी । उन्नति व्हाया कलावंतांची ॥८१॥


ऐसे सर्वचि उद्योगधंदे । चालवावेत गांवींच आनंदें । 

नांदावेत सकळ लोक स्वच्छदें । सुखसमाधानें ॥८२॥


गांवीं असावें वस्तुप्रदर्शन । आपुल्याच गांवीं झालें निर्माण । 

बीं बियाणें, शेती-उद्योग-सामान । तयामाजीं ठेवावे ॥८३॥


खेळणीं लेणीं जीवनोद्यमें । लाकडी लोहारी बेलदारी कामें । 

कुंभारी, विणकरी, उत्तम चर्मे । असावीं तेथे ॥८४॥


असावें सुंदर एक घर । त्यामाजीं वस्तू विविध सुंदर । 

आम्हींच निर्मिलेल्यांचा भर । असावा तेथे ॥८५॥


गांवीं जें मालधन निर्माण होतें । बघावया लोकांनी यावें तेथे । 

योग्य किंमती देवोनि तें तें । घ्यावें सामान तयांनी ॥८६॥


गांवीं असावी उद्योग-समिति । जी सतत करील उद्योग-उन्नति । 

गांवाचें आर्थिक जीवन हातीं । घेवोनि लावील सोय जी ॥८७॥


गांवचिया धनिकांकडोनि । संपत्तीचा वांटा मिळवोनि । 

सर्वांच्या हितासाठी रात्रंदिनीं । उपयोग करावा तयाचा ॥८८॥


कांही असती जमीनदार । तेचि गांवचे अर्थभांडार । 

त्यांना सर्व कारभार । सोपवाया लावावा मजूरांवरि ॥८९॥


किंवा धनिक जरी ना वळे । शेतकरी-मजुरांच्याचि बळें । 

थेंबें थेंबें साचवावें तळें । त्यांच्या अल्प ठेवींचें ॥९०॥


त्यांतूनि निर्माण करावा वस्तुसंग्रह । सर्वांना उपयोगी भांडारगृह । 

सर्वां मिळोनि चालवावें नि:संदेह । दुकान सर्व वस्तूंचें ॥९१॥


त्यांत असावी सर्वांची मालकी । हुशार किसानांची ठेवावी चालकी । 

सर्वांच्या अनुमतीने व्यापार-एकी । करावी गांवीं ॥९२॥


एक असावें धान्यभांडार । चालावया गांवचे व्यवहार । 

त्यांत असावे सर्व जनतेचे शेअर । सोयीसारखे ॥९३॥


प्रसंगीं त्यांतूनचि धान्य न्यावें । सर्वांमिळोनि कर ठरवावे । 

प्रसंगीं सर्वांनी वाटून घ्यावें । उत्तम रीतीं ॥९४॥


त्यांतूनचि करावी गांवची सेवा । उणीव पडेल ज्या कष्टी जीवां । 

अथवा ग्रामसुधारणेस लावावा । वाढवा त्याचा ॥९५॥


गांवीं चालते सवाई-दिढी । त्यास याने बसेल अढी । 

ग्रामनिधीची उघडतां पेढी । थंडावेल व्यापारी-सावकारी ॥९६॥


गांवीं आवश्यक तेलघाणी । शुध्द तेलादिकांची निशाणी । 

गांवचीं कामें सर्व मिळोनि । गांवींच करावीं उपयुक्तशीं ॥९७॥


उद्योगहीनांना उद्योग द्यावे । कामें देवोनि सुखी करावें । 

आपणासमान पाहिजे बरवें । केलें त्यांसि सुखवस्तु ॥९८॥


काम ज्याने ज्याने करावें । त्याने हक्कानें पोटभरि खावें । 

लागेल तेवढें मागावें । हें तों आहे प्रामाणिक ॥९९॥


जयास न मिळे कामधाम । त्याने समितीस सुचवावें नाम । 

ग्रामसेवाधिकारी उद्यम । देईल त्यासि ॥१००॥


काम देणें कर्तव्यचि त्याचें । जमा असतील फंड गांवाचे । 

त्यांतूनि पुरवावें मोल कामाचें । उपयोगी ऐशा ॥१०१॥


मजुरा मजुरी पूर्ण द्यावी । जेणें मुलेंबाळें सुखें जगवी । 

तैसींच उत्पन्ने वाढवोनि घ्यावीं । गांवामाजीं ॥१०२॥


याने सर्वांस मिळेल सुख मिटेल जीवनाची भूक । 

ग्रामराज्य होईल सुरेख । आर्थिकतेने समृध्द ॥१०३॥


यास्तव श्रीमंत शिक्षित हुद्देदार । कलावंत शेतकरी कामगार । 

सर्वांनी मिळोनि ग्रामोध्दार । करावा ग्रामोद्योगांनी ॥१०४॥


शहराकडे चालला प्रवाह । तो थांबवाया नि:संदेह । 

सर्वांचा गांवींच होईल निर्वाह । ऐसी योजना करावी ॥१०५॥


खेडेंचि शहराचें जनक । शहर भोवतें खेडें उत्पादक । 

शहराकडे न जातां लोक । धावावे उलट खेडयाकडे ॥१०६॥


ऐसी करावी ग्रामसेवा । हेंचि कर्म आवडे देवा । 

संशय कांही मनीं न धरावा । तुकडया म्हणे ॥१०७॥


इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत । 

ग्रामोद्योगांचा कथिला तत्त्वार्थ । अठरावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥


॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥