वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय एकोणीसावा

ग्रामगीता 


अध्याय एकोणीसावा : जीवनशिक्षण


॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥


श्रोतियाने केला प्रश्न । खेडें शहराहूनि महान ।

ऐसें म्हणतों आपण जन । परि एक खूण न विसरावी ॥१॥


शहरांत आहे उच्च शिक्षण । तें खेडयांत पावेल कोण ?

कोणी आला जरी शिकोन । तरी येथे होतो गावंढळ ॥२॥


’नगरामाजीं नागरचि होइजे’ । यासाठी शहरचि विद्यार्थ्यां पाहिजे । 

खेडयामाजीं ’नांगरचि वाहिजे’ । ऐसें होतें ॥३॥


ऐका ऐसी जयांची भावना । लक्ष द्यावें त्यांनी या वचना ।

येथे शिक्षणाची मूळ कल्पना । तीच चुकली आपुली ॥४॥


दिखाऊ कपडे कोरडी ऐट । नोकरपेशी थाटमाट । 

हें शिक्षणाचें नव्हे उद्दिष्ट । ध्यानीं घ्यावें नीट हें आधी ॥५॥


अजब ऐसी शिक्षणाची प्रथा । जेथे कामीं नये बापाची संथा । 

बाप करी शेतीची व्यवस्था । मुलगा मागे नोकरी ॥६॥


व्हावें मोठे बाबूसाहेब । काम जुजबी पैसा खूब । 

मोठी पदवी दिखाऊ ढब । ही उच्चता म्हणोंचि नये ॥७॥


हें सर्व मागील विसरोन । मुलामुलींना द्यावें शिक्षण । 

जेणें गांवाचें वाढेल भूषण । सर्वतोपरीं ॥८॥


नुसतें नको उच्च शिक्षण । हें तों गेलें मागील युगीं लपोन । 

आता व्हावा कष्टिक बलवान । सुपुत्र भारताचा ॥९॥


शिक्षणांतचि जीवनाचें काम । दोन्हींची सांगड व्हावी उत्तम । 

चिंता नसावी भोजनासाठी दाम । मागण्याची भीक जैसी ॥१०॥


मुलांत एखादा तरी असावा गुण । ज्याने पोट भरेल त्यांत निपुण । 

नये संसारामाजी अडचण । कोणत्याहि परी ॥११॥


जीवनाच्या गरजा संपूर्ण । निर्वाहाचें एकेक साधन । 

संबंधित विषयांचें समग्र ज्ञान । यांचा अंतर्भाव शिक्षणीं ॥१२॥


नदी तलाव आणि विहिरी । यांत पोहणें नानापरी । 

आपत्ति येतां धावोनि तारी । ऐसें शिक्षण असावें ॥१३॥


गांवीं भोजनाचे असती प्रसंग । स्वयंपाक करतां यावा यथासांग । 

हेहि कला शिकवावी सप्रयोग । मुलांमुलींसि ॥१४॥


असलें शिक्षण वाटतें साधारण । परि याचें जीवनांत अग्रस्थान । 

नाहीतरि जगावें जनावरासमान । होईल स्वयंपाक न येतां ॥१५॥


मुलगी बहु शिकली शाळेमाझारीं । परि स्वयंपाक करतां नये घरीं । 

काय करावी विद्याचातुरी ? कामाविण लंगडी ती ॥१६॥


अशिक्षित स्वयंपाक करोनि खाई । सुशिक्षित चणे फाकीत राही । 

दोरास घालता नये वंधाहि । जेथे तेथे पराधीन ॥१७॥


मुलास पंगत वाढतां नये । घरचें पाणी भरतां नये । 

आपुल्याच तोर्‍यामध्ये राहे । तरि तें व्यर्थ ज्ञान त्याचें ॥१८॥


घरीं ज्याची उणीव पडे । मुलगा धावोनि पुरवी कोडें । 

धडाडीने कर्म करण्या धडपडे । तरीच शिक्षण कामाचें ॥१९॥


विद्येअंगीं व्हावा विनय । विद्या करी स्वतंत्र निर्भय । 

शिक्षणाने वाढावा निश्चय । जीवन-जय करावया ॥२०॥


याचसाठी शिक्षण घेणें । कीं जीवन जगतां यावें सुंदरपणें । 

दुबळेपण घेतलें आंदणें । शिक्षण त्यासि म्हणों नये ॥२१॥


गांवावर आली गुंडांची धाड । विद्यार्थी दारें लाविती धडाधड । 

वाडवडिलांच्या अब्रूची धिंड । काय शिक्षण कामाचें ? ॥२२॥


म्हणोनि पाहिजेत बलवान मुलें । कुस्ती मल्लखांब खेळणारे भले । 

धडाडीने प्रतिकारार्थ धजले । तरीच शिक्षण उपयोगी ॥२३॥


ऋषिकालीन ऐसी प्रथा । शिक्षणांत होती जीवन-संथा । 

याकरितां आश्रमांची व्यवस्था । होती पूर्वी ॥२४॥


धनुर्विद्या मल्लविद्या । आयुर्वेद आणि शस्त्रास्त्रविद्या । 

उत्तमोत्तम चौदा विद्या । शिकवीत होते आचार्य ॥२५॥


चित्रकला चर्मकला । रांगोळियांचीहि उत्तम कला ।

बुरडकाम कुंभारकामादि सकला । चौसष्ट कला नानापरी ॥२६॥


संगीतशास्त्र स्वयंपाकशास्त्र । गृह स्थापनेचें सुंदर तंत्र । 

अश्वपरीक्षा रत्नपरीक्षादि समग्र । जीवनविद्या शिक्षणीं ॥२७॥


ऐसी प्रथा पूर्वी होती । आता उच्च ज्ञान घेवोनि येती । 

परि गांवची न सुधारवे शेती । गांवच्या उपलब्ध साधनांनी ॥२८॥


शिक्षण झालें वैभवस्थानीं । मग गांवचें जीवन न बसे मनीं । 

उच्च ज्ञान आणावें साध्या जीवनीं । कैसें तेंहि कळेना ॥२९॥


त्यापेक्षा उच्च ज्ञानाचीं विद्यालयें । गांवींच आणावीं निश्चयें । 

जीं ग्रामजीवन सजवितील चातुर्ये । शिकवोनि जना ॥३०॥


मुलांना शिकवाव्या नाना कला । चापल्य ध्येयनिष्ठादि सकला । 

गांवचि सांभाळूं शकेल आपुला । ऐसें द्यावें शिक्षण ॥३१॥


गांवासि कैसें आदर्श करावें । याचेंचि शिक्षण प्रामुख्यें द्यावें । 

सक्रियतेने करावयासि लावावें । विद्यार्जनीं ॥३२॥


सहकार्याची प्रबल भावना । हेंचि शिक्षणाचें मुख्य सूत्र जाणा । 

सहकार्यावाचोनि शिक्षणा । महत्त्व नाही ॥३३॥


व्हावें परस्पराशीं पूरक । हेंचि आहे शिक्षणाचें कौतुक । 

व्यक्तिनिष्ठतेने भयाण दु:ख । मानव-जीवनीं ॥३४॥


जनसेवेचें प्रमाणपत्र । त्यासि महत्त्व यावें सर्वत्र । 

उद्याचें राष्ट्र आजचे कन्यापुत्र । समजोनि त्यांना सुधारावें ॥३५॥


गांवचें सर्वांत मुख्य पुत्रधन । त्याचें संरक्षावें चरित्रधन । 

तेणें गांवाचें वाढेल महिमान । चारित्र्यापरी उज्ज्वल ॥३६॥


आपणांसि वाटे जैसें गांव व्हावें । तैसेंचि बालकांना शिकवावें । 

शहाणे करोनि सोडावे । विद्याशिक्षणें सर्वचि ॥३७॥


बाळपणींच शिक्षण होई । वय झालिया त्रास जाई । 

वळविल्याहि न वळती कांही । इंद्रियें त्यांचीं ॥३८॥


मग तो राही आंगठाछाप । कोणीहि त्याला द्यावी थाप । 

आयुष्यभरी कष्ट-संताप । भोगीतसे आंधळयापरी ॥३९॥


त्यासि बंद उन्नतीचीं द्वारें । आयुष्य जाय हमालींत सारें । 

किसान परि कळेना गोजिरें । शेतीचेंहि नवें ज्ञान ॥४०॥


नाही अवजारांत सुधारणा । सुधारूं न शके पिकें नाना । 

घाण्याच्या बैलापरी धिंगाणा । जीवनाचा त्याच्या ॥४१॥


वडिलाने मुलगा नाही शिकविला । तोहि पापांचा भागीदार झाला । 

जैसें जन्म देणें कर्तव्य त्याला । तैसेंचि शिक्षण देणें अगत्याचें ॥४२॥


जरि आपुल्याने व्यवस्था नव्हे । तरि देशोध्दारक संस्थेसि सोपवावें । 

परि मुलास पतित न ठेवावें । अशिक्षितपणें कधीहि ॥४३॥


आईबापांनी अंगावरि । मुलें ठेवूं नयेत निरंतरी । 

सोपवावीं बालकांच्या विद्यामंदिरीं । रक्षक असतील जे त्यांना ॥४४॥


जन्म देण्याचें काम मातापित्यांचें । शिक्षणाचें काम विद्यागुरूंचें । 

तेथे आसक्तीने पुत्रधन देशाचें । बिघडवूं नये लाडवोनि ॥४५॥


आईबापांचा प्रेमळ चाळा । पुरवी लहान मुलांचा आळा । 

मुलगा होतो ठोंब्या-भोपळा । अतिलाडाने निकामी ॥४६॥


हें तों विद्यागुरु साहेना । अथवा शिक्षिका चालूं देईना । 

मुलांस वळवावें कैसें त्यांना । माहीत असतें मानसशास्त्र ॥४७॥


म्हणोनि सर्व गांवाने मिळून । काढावें शिशुसंगोपन । 

बाईबुवास शिक्षण देऊन । नेमावें त्या कार्यासि ॥४८॥


असावें गांवींच विद्याभुवन । बालोद्यान शिशुसंगोपन । 

मुलें बाळपणींच त्यांत ठेवोनि । वळण द्यावें साजेसें ॥४९॥


आईबापांस फुरसत नाही । कामास जातां अडचण येई । 

मुलाबाळांची आबाळ होई । हें सर्व मिटे विद्याश्रमें ॥५०॥


याचेंचि त्यांना असावें शिक्षण । कैसें करावें बालसंगोपन । 

आपलें काम द्यावें नेमून । मुलामुलींना कैशापरी ॥५१॥


कोठेहि मुलांना लहानपणीं । व्यसनें लागूं न द्यावीं कोणी । 

लागतांचि घ्यावी झाडणी । शिक्षकां-पालकांची ॥५२॥


नाहीतरि एककल्ली । शिक्षण घेवोनि वृत्ति केली । 

आपण फसोनि दुसर्‍यांचीं फसविलीं । मुलेंबालें, ऐसें न हो ॥५३॥


म्हणे मी शिक्षणकार्यी लागलों । पवित्र गुरुजी मुलांचा झालों ।

परि व्यसनांचा अवतार बनलों । म्हणोनि मना धिक्कारीना ॥५४॥


मुलांस म्हणे सद्वर्तनी राहा । आपण बिडी पिण्यांत वाजवी दहा । 

मग उष्णतेने बोलतो पहा । साजरा रेलगाडीपरी ॥५५॥


ओळखोनि गांवाची जबाबदारी । शिक्षक जिव्हाळयाने काम करी । 

तरीच गांव होय स्वर्गपुरी । न पडे जरूरी कोणाची ॥५६॥


घरींदारीं उत्तम पाठ मिळे । जें जें पाहिजे तें तें कळे ।

तरीच गुरुजनांचा आशीर्वाद फळे । काम केल्या विकासाचें ॥५७॥


जीवन-विकासाचें शिक्षण । गांवींच असावें सर्वसंपन्न । 

आपुल्याचि ग्रामरचनेचें आयोजन । शोभवाया शिकवावें ॥५८॥


पाठशाळा असावी सुंदर । जेथे मुलीमुलें होती साक्षर । 

काम करावयासि तत्पर । शिकती जेथे प्रत्यक्ष ॥५९॥


सुंदर गाणें बोलणें वागणें । टापटिपीने घरीं राहणें ।

आपलें काम आपण करणें । शिकवावें तयां ॥६०॥


ऐसें करितां होईल प्रगति । मुलें उत्तम विद्यार्थी बनती । 

थोरथोर उद्योगधंदेहि शिकती । पुढे पुढे ॥६१॥


विद्यार्थी कार्याने सुरवात करी । त्यांतचि गणितशास्त्रादि सांवरी । 

नाहीतरी वाचनपठणचि परोपरी । कांही करवेना अंगाने ॥६२॥


म्हणोनि अभ्यासाबरोबरी । सक्रिय करूं द्यावी तयारी । 

मुलगा सर्व कामें करी । जीवनाचीं आपुल्या ॥६३॥


तो पुढे ज्यांत दिसे निष्णात । त्या विद्येचा घेऊं द्यावा अंत । 

होऊं द्यावें अभ्यासें संशोधनांत । गर्क त्याला ॥६४॥


ऐसें जीवन आणि शिक्षण । यांचें साधावें गठबंधन । 

प्रथमपासूनचि सर्वांगीण । शिक्षण द्यावें तारतम्यें ॥६५॥


जीवनाचें प्रत्येक अंग । शिकवावा महत्त्वपूर्ण उद्योग । 

काम करावायची चांग । लाज नसावी विद्यार्थ्या ॥६६॥


मुलगा वरोनि दिसे शिक्षित । काम करतांहि दिसे निष्णात । 

कामाची लाजचि नाही ज्यांत । जन्मास आली ॥६७॥


करितो शेताचें निंदण । उपणणें, उतारी, नांगरण । 

शेण काढावयासहि उत्सुक मन । दिसे जयाचें ॥६८॥


सर्व तर्‍हेचा उद्योगधंदा । कराया लागला मुलगा छंदा । 

वाढला अभिमान गांवचा बंदा । तयार झाला म्हणोनिया ॥६९॥


ऐसी घ्यावी गांवें काळजी । मुलांच्या अज्ञानपणामाजीं । 

तरीच गांवाचा उत्कर्ष सहजीं । होईल तेणें ॥७०॥


अवधी धरला अठरा वर्षांचा । पांग फेडील हजारो पिढयांचा । 

नमुना बनेल उत्तम गांवाचा । विद्यार्जनें ॥७१॥


जीवनाचें उज्ज्वल अंग । मुलें शिकतील होवोनि दंग ।

वाढेल गांवाचा रागरंग । म्हणाल तैसा ॥७२॥


आजचे सान सान बाल । उद्या तरुण कार्यकर्ते होतील । 

गांवाचा पांग फेडतील । उत्तमोत्तम गुणांनी ॥७३॥


म्हणोनि म्हणतों बालधन । ठेवा गांवकर्‍यांनो ! जपून । 

कोण सांगेल निघतील रत्न । किती गांवीं ॥७४॥


ईश्वराचें जन्म देणें । आईबापासि निमित्त करणें । 

विद्यागुरूंचें शिकवणें । भाग्य बने गांवाचें ॥७५॥


या कोवळया कळयांमाजीं । लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी । 

विकसतां प्रकटतील समाजीं । शेकडो महापुरुष ॥७६॥


कितीक होतील सेवाभावी । कित्येक चतुर कलावैभवी । 

उद्योगधंद्यांनी रंगवी । ग्रामासि आपुल्या ॥७७॥


कित्येक निर्मितील यंत्रागार । कित्येक होतील इतिहासकार । 

कित्येक होतील सल्लाचतुर । गांवीं आपुल्या ॥७८॥


कित्येक होतील राजकारणी । कित्येक होतील तत्त्वज्ञानी ।

कित्येक देतील भूषण मिळवोनि । क्रीडांगणीं गांवासाठी ॥८०॥


कित्येक संत-उपदेशक । कित्येक वीर-संरक्षक ।

कित्येक व्यापारनिपुण, सेवक । हरकामी ऐसे ॥८१॥


ऐसा हा साजेल गांव-संच । सर्व गुणांचा आदर्श उच्च । 

कोणी न दिसेल जीव नीच । आपुल्या गांवीं संस्कारें ॥८२॥


गांवचें राज्य गांवचि करी । कोणाचीच न चाले हुशारी । 

आमुचे आम्हीच सर्वतोपरीं । नांदूं गांवीं ॥८३॥


प्रेमें सर्वचि करूं सेवा । जेणें सर्व गांवासि लाभ बरवा । 

मग ऐसा कोण उरेल ठेवा । जो न लाभे खेडयामाजीं ? ॥८४॥


खेडयांत उपजले ज्ञानेश्वरादि । काय उणी त्यांची बळबुध्दि ? 

श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी । हालवी सूत्रें खेडयांतूनि ॥८५॥


म्हणोनि मित्रहो ! ऐका निश्चिती । गांवींच मुलांचें शिक्षण घ्या हातीं । 

पांग फिटेल जन्मजातीं । सुखी होतील सकळ जन ॥८६॥


कोणी म्हणती जातचि मूर्ख । मुलें कैसी निघतील चलाख ? 

कांही जाती मुळांतचि चोख । हुशार असती शिक्षणीं ॥८७॥


ही कल्पनाहि चूक असे । भेद मुळामाजीं नसे । 

तो परंपरागुणें भासे । वातावरणाच्या योगें ॥८८॥


एकाचा बाप न्यायाधिकारी । काका करतो प्रोफेसरी । 

मामा कथाकीर्तन करी । मग तो हुशार कां नोहे ? ॥८९॥


भोवती बुध्दिवंतांचा मेळावा । खावया सत्त्वशील मेवा । 

घरींदारीं सहवास बरवा । त्याची उन्नति सहजचि ॥९०॥


बाप गुराखी आणतो मोळी । चुलता विकतो बांगडयाचोळी । 

मामा सरकारी नोकरी सांभाळी । परि तो शिपाई-चपराशी ॥९१॥


खावयासि कळणाकोंडा । संगतीस ढोरांचा तांडा । 

परि तो अभ्यासें पुढे जाय थोडा । तरी कौतुक कां न करावें ? ॥९२॥


त्याला सहवास उत्तम द्यावा । दर्जा जीवनाचा वाढवावा । 

त्याने समाज होईल नवा । ज्ञानवंतांचा निर्माण ॥९३॥


हें होण्यास पाहिजे शिक्षण । शिक्षणाशिवाय व्यर्थचि भाषण । 

हें कळेल तेव्हाचि जन । सुशिक्षित होतील ॥९४॥


नाहीतरि पूर्वजांनी मूर्खपण केलें । तें मुलाबाळांस भोगणें आलें । 

लौकरि सुधारेना एकदा चुकलें । दोष चाले कुळीं सार्‍या ॥९५॥


घराण्यांत एकाने पाप करावें । पिढीजात पुढेहि तेंचि भोवे । 

ऐसें चालू आहे हें स्वभावें । लोकांमाजीं ॥९६॥


मागील कलंक धुण्यासाठी । पुढे घडावें पुण्य गांठीं ।

तरीच सुटते बदनामी पाठी । लागलेली सारी ॥९७॥


एकाने सदगुण आचरिले । नांव त्याचें दिगंतरीं गेलें । 

पुढे पुत्र वांढाळ झाले । तरी कीर्ति मुरेना ॥९८॥


खपती सारे मागील नांवें । जो तो म्हणे वडिलांस बघावें । 

कीर्तिवंत झाले पूर्वज बरवे । घराण्यामाजीं ॥९९॥


परि त्याहूनि घडलें पाप अधिक । नांवाचा वाजा झाला आणिक । 

मग न विचारी मागील कौतुक । ’ काय झालें ’ कोणीहि ॥१००॥


चाले तीच परंपरा । जोंवरि विशेष न घडे पुत्रपौत्रां । 

ऐसीच आहे नामयात्रा । इहलोकींची ॥१०१॥


एक एकवीस कुळें उध्दरितो । एक बेचाळीस कुळें बदनाम करतो । 

सारांश, विशेष घडल्यावरीच होतो । पालट नांवा ॥१०२॥


रावण पवित्र ब्रह्मकुळींचा । राक्षस ठरे वंशचि त्याचा । 

विश्वमित्र राजर्षीचा । ब्रह्मर्षि होय विशेषत्वें ॥१०३॥


ऐसा विशेष कृतीचा महिमा । जाणोनि करावें परिश्रमा । 

उध्दरावें आपल्या कुळा ग्रामा । शिक्षण देवोनि नेटाने ॥१०४॥


गोरगरीबांचीं मुलें असती । ज्यांसि नाही शिक्षणाची शक्ति । 

त्यांसि सरकार वा जनपदाहातीं । देवोनि शिक्षण पुरवावें ॥१०५॥


असतील भिकार्‍यांचीं मुलें । शिक्षण देवोनि करावे चांगले । 

पुण्य लाभेल पांग फेडले । त्यांचे म्हणोनि गांवासि ॥१०६॥


असोत गरीब किंवा धनिक । मुलांस विद्या शिकवाव्या अनेक । 

गांवाने संपत्ति पुरवावी अधिक । याच मार्गी ॥१०७॥


यांतचि वेचावें खूप धन । करावें पूर्वजांचिया नांवाने दान । 

विद्यालयें झालिया पवित्र संपन्न । गांव होईल स्वर्गपुरी ॥१०८॥


आदर्श होतील विद्यार्थीगण । गांवाचें पालटेल जीवन । 

कोठेच न उरेल गावंढळपण । टिकाऊ परिवर्तन या मार्गे ॥१०९॥


विद्यामोलें ऐसें चढतां । येईल भाग्य गांवाचे हातां । 

तुकडयादास म्हणे तत्त्वता । विसरूं नका हा मूळमंत्र ॥११०॥


इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । 

कथिला सर्वोन्नतीचा विद्यार्जनपथ । एकोणिसावा अध्याय संपूर्ण ॥१११॥


॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥