वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय विसावा

ग्रामगीता 

अध्याय विसावा : महिलोन्नती

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण । उद्याचें राष्ट्र आजचें संतान । 
यासाठी आदर्श पाहिजेत गुरुजन । राष्ट्रनिर्माते ॥१॥

विद्यागुरुहूनि थोर । आदर्श मातेचे उपकार । 
गर्भापासोनि तिचे संस्कार । बालकांवरि ॥२॥

’ जिच्या हातीं पाळण्याची दोरी । तीच जगातें उध्दरी ।’ 
ऐसी वर्णिली मातेची थोरी । शेकडो गुरुहूनिही ॥३॥

मातेच्या स्वभावें पुत्राची घडण । त्यास उज्ज्वल ठेवी तिचें वर्तन । 
स्त्रीच्या तेजावरीच पुरूषाचें मोठेपण । ऐसें आहे ॥४॥

म्हणती जरी ’ बाप तैसा लेक ’ । परि माऊलीचें महत्त्व अधिक । 
मातृशक्तीनेचि वाढती सकळीक । मुलें चारित्र्याने ॥५॥

पुरूष सर्वकाहीं करी । परि बांधला राहे घराबाहेरी । 
सर्व विचार घेवोनि आचरी । तरीच शांति त्यासहि लाभे ॥६॥

उत्तम महिला हेंचि करी । आपुलें घर ब्रीदासह सावरी । 
मूलबाळ आदर्श करी । वरि प्रेमळपण सर्वांशीं ॥७॥

याच गुणें ’ मातृदेवो भव ’ । वेदाने आरंभीच केला गौरव ।
नररत्नांची खाण अपूर्व । मातृजाति म्हणोनिया ॥८॥

प्रल्हादाची कयाधु आई । छत्रपतींची जिजाबाई । 
कौसल्या देवकी आदि सर्वहि । वंदिल्या ग्रंथीं ॥९॥

कांही पुराणीं सांगितली दीक्षा । करावी स्त्रीजातीची उपेक्षा । 
ती होती साधनाची शिक्षा । सर्वतोपरीं ॥१०॥

वियोगाने वैराग्य दृढ करावें । मन इंद्रियसुखांतूनि परतवावें । 
म्हणोनि विषयप्रवृत्तीचे गोडवे । निषेधिले त्यांत ॥११॥

वैराग्यांत न कथिलें दोषविरोधा । नसली साधनांत आपदा । 
कीर्तीत नसली कांही निंदा । तरि पूर्ण नोहे साधन ॥१२॥

म्हणोनि इंद्रिय-विषय-दोषदर्शन । देहाचें नश्वरत्व ओंगळपण । 
हें वैराग्यार्थ केलें कथन । व्यक्तिनिंदा नव्हे ती ॥१३॥

जेथे जेथे मन मोहूनि धावे । तेथूनि त्यास परतवोनि लावावें । 
लहान मुलापरी सांगावे । छीः छीः ऐसें म्हणोनि ॥१४॥

हें पुरुषास कथिलें स्त्रियेसाठी । तोच भाव पुरुषाविषयीं तिचें पोटीं । 
तेथे कवणाची तुच्छता मोठी ? छीः छीः विषयांसि शास्त्र म्हणे ॥१५॥

परि छीः छीः नेहमीच म्हटलें । तरि पालनपोषणचि बिघडलें । 
संसारचक्रचि थांबोनि गेलें । त्यांतूनिहि फुटती हीन मार्ग ॥१६॥

म्हणोनि विधीने सेवन उचित बोलिंलें । महिलेविण विश्व न चाले । 
काय होतें पुरुषाने केलें ? अभद्र झालें घर सारें ॥१७॥

घरचा उत्तम कामधंदा । हें महिलेचेंचि लक्षण सदा । 
आलिया-गेलियासि आपदा । महिला असतां न वाटे ॥१८॥

खस्ता सोसूनि परिचर्या । प्रेमळपणें बारीक कार्या । 
करूं जाणती उत्तम भार्या । न कंटाळतां काळजीने ॥१९॥

पुरुष-हृदया नाकळे जेवढें । स्त्रियेचें समजणें तितुकें गाढें । 
तियेच्या भावनागंगेचे पवाडे । वर्णिले न जाती माझ्याने ॥२०॥

सर्वांगीण एकतानता । तिजसीच घडे एकात्मता । 
जें जें ठरवील तें सर्वथा । करोनि सोडिल माऊली ती ॥२१॥

जगांत असती नाना जीव । सकळांस जाहीर त्यांचा भाव । 
परि मायाळुपणाचा गौरव । माऊलीसरिसा नाही ॥२२॥

देवाने निर्मिली ही क्षिति । तिचे उदरी खाणी किती । 
परि माऊलीजैसी प्रेमळ दीप्ति । कोठेच नाही ॥२३॥

माऊलीचें स्वभावकर्म । तोचि जगी म्हणविला मानवधर्म । 
माऊलीचें उत्कट प्रेम । म्हणोनीच देव प्रिय लोकां ॥२४॥

संती माऊलीचें रूप धरिलें । तरीच ते देवपणासि पावले । 
नाना साधनें करोनि फिरले । त्यांना न गवसलें देवरूप ॥२५॥

तें हें स्वतःसिध्द माऊलीपण । स्त्रियेअंगी सहजचि घडण । 
त्याचा विकास करावया पूर्ण । उत्तम शिक्षण पाहिजे ॥२६॥

स्त्री-दक्षता विचित्रचि आहे । तेथे माणसाचें लक्षचि न जाय । 
तेवढें शिक्षण मुलाबाळांस ये । तरीच सोय संसाराची ॥२७॥

पुरुष आहे पिंडवर्णी । स्त्री आहे दक्ष कारुणी । 
दोघांचे स्वभाव मिळतांक्षणीं । होय मेदिनी वैकुंठचि ॥२८॥

उत्तम पुरुषासवें उत्तम नारी । तरि त्यांचा संसार स्वर्गापरि । 
पुरुषाहूनि काकणभरि । महिला वरीच राहतसे ॥२९॥

जेव्हा पुरुष होय चिंतातुर । तेव्हा घरची लक्ष्मी सांगे विचार । 
हें मी पाहिलें घरीं अपार । प्रसंग येतां जाण्याचे ॥३०॥

निरीक्षोनि जीं जीं घरें पाहिलीं । तेथे सरसता अनुभवा आली । 
चातुर्य-लक्षणें अधिक दिसलीं । महिलांमाजीं ॥३१॥

मानवी स्वभावांचें अनुमान । प्रसंग पाहोनि अवधान । 
पुढील काळाचें अनुसंधान । स्त्रियांचे ठायीं ॥३२॥

स्त्रीलाच भक्ति स्त्रीलाच ज्ञान । तिलाच संयम शहाणपण । 
तिच्यानेच हालतीं वाटे संपूर्ण । संसारचक्रें ॥३३॥

म्हणजे पुरुषाचें कांहीच नाही । ऐसें म्हणणें नोहे कांही । 
सहज स्वभावाची रचनाचि ही । विशद करोनि सांगितली ॥३४॥

हें सर्व जरी सांगितलें । तरी त्यांत भावनेनेचि रंग भरले । 
कारण, मी नाही अनुभवलें । सुखदुःख संसाराचें ॥३५॥

माझा संसार विश्व आहे । सर्व स्त्री-पुरुष मायबाप । 
व्यवहारदृष्टीने समजून काय । पाहिजें तें तें बोललों ॥३६॥

परि यांतूनि एकचि घ्यावें । स्त्रियेसि कोठे अव्हेरावें । 
कोठे माऊली म्हणोनि पाय धरावे । ओळखावें हें तारतम्यें ॥३७॥

कोठे वागवावें मित्रभावें । कोठे देवी म्हणोनि पुजावें । 
कोठे वैरिणीसारखे बघावें । स्थलकालपात्रभेदाने ॥३८॥

हें ज्या पुरुषांना नाही कळलें । ते जरी रानीवनी पळालें । 
तरी काय होतें केलें । सोंग ऐसें वरपंगी ? ॥३९॥

ते जिकडे जातील तिकडे । स्त्रीचि आहे मागेपुढे । 
अंतरी-बाहेरी प्रकृतीचे वेढे । जीवापाडें पडले हे ॥४०॥

केवळ आपुल्या वृत्तीकरितां । केली स्त्रीनिंदा तत्त्वता । 
तेथे माऊलीपणाचिया माथां । दोष देतां पाप लागे ॥४१॥

म्हणोनि वैराग्यें स्त्री अव्हेरली । त्यांनी विवेकें साधना केली । 
त्यापुढे त्यांनीच संबोधिली वंदिली । माऊली तीस म्हणोनि ॥४२॥

परि हें एकांगीपणें नोळखती । स्त्रियांची अनास्था करिती । 
यानेच झाली घोर दुर्गति । समाज-जीवनाची ॥४३॥

हीन-दुबळें केलें स्त्री-समाजा । तैसीच पुढे वाढली प्रजा । 
म्हणती स्त्रीजात तेवढी पशूच समजा । पाशवी झालें जग सारें ॥४४॥

कोणी भोगवस्तु समजोनि भली । सजवोनि ठेवती नुसती बाहुली । 
त्याने घरोघरीं शिरला कली । अबला बनली मायभूमि ॥४५॥

म्हणती स्त्री ही गुलामचि असते । तिला हक्क नाहीत उध्दरायापुरते । 
हें म्हणणें शोभेना शहाण्यातें । स्वार्थांधतेचे ॥४६॥

म्हणती स्त्री ही कार्यांत धोंड । म्हणोनि तिच्या प्रगतींत पाडावा खंड । 
ऐशापरी जाणोनि वाढविती दगड । मार्गी आपुल्या ॥४७॥

वास्तविक दोन्ही संस्कारें जन्मती । अपुल्या प्रयत्नेंच उन्नत होती । 
शेवटी उध्दारही तिच्याच हातीं । असे तियेचा ॥४८॥

काय देवें देवता भिन्न केल्या ? ऋषि-पत्न्या नव्हत्या सांभाळिल्या ? 
काय महिलात साध्वी नाही झाल्या ? पहा पुराणी मागच्या ॥४९॥

काय स्त्रियांनी नाही लिहिले वेद ? नाही केला ब्रह्मवाद ? 
नाना विद्याकला भेद । यांत प्रवीण कितीतरी ॥५०॥

काय स्त्रियांनी युध्द नाही केलें ? पतिपुत्रां नाही प्रोत्साहन दिलें ? 
काय स्त्रियांनी प्राण नाही अर्पिले । ब्रीदासाठी ? ॥५१॥

हजारो स्त्रिया फुलांहूनि नाजूक । ब्रीदासाठी जाहल्या राख । 
त्यांचें करावें तेवढें कौतुक । थोडेंचि आहे ॥५२॥

स्त्रियेसारिखी मोहिनी नाही । स्त्रियेसारिखी वैरागिणी नाही । 
स्त्रियेसारिखी मुलायम नाही । आणि कठोर रणचंडिका ॥५३॥

परि तिचें लक्ष कोणीकडे न्यावें । काय संस्कार तिच्यांत भरावे । 
काय शिकवोनि तयार करावें । हें आहे संगतीहातीं ॥५४॥

संगती विषयासक्तीची असली । तरि वेडीबावरी स्त्री बनली । 
तिच्यांत वैराग्यऊर्मी भरली । तरि न गवसे गुंडांसहि ॥५५॥

प्राण देईल आपुल्या हातें । परि भ्रष्ट न होईल लोभें-भयें ते । 
ऐसे विचारचि पाहिजे तेथे । बिंबविले धीरपुरुषें ॥५६॥

त्यासाठी तिला तैसेंचि ठेवावें । सुसंगति द्यावी आणि शिकवावें । 
नातेंगोतें सर्व तैसेंचि राखावें । स्त्रीचेप्रति ॥५७॥

अगदी मूलवयापासोनि । उत्तम चालीरीतींची राहणी । 
कार्यी चपल, सावध जीवनीं । शिक्षण देवोनि करावी ॥५८॥

कांही मुली शक्ति-शिक्षण घेती । मुलांपेक्षाहि धीट असती । 
नाही गुंडाचीहि छाती । हात घालील त्यांचेवरि ॥५९॥

तेथे कासयासि पडदा । परावलंबनाची आपदा । 
आत्मसामर्थ्यानेच सदा । स्त्रिया मर्दिती असुरांना ॥६०॥

परि इकडे करोनि दुर्लक्ष । आपुला राखोनि वरपक्ष । 
लोक स्त्रियांचें जीवन रुक्ष । करोनि ठेविती स्वार्थाने ॥६१॥

कांही लग्न होतां गुंतविती घरीं । नसे बोलण्याचीहि उजागरी । 
’चूल आणि मूल ’ हीच चाकरी । सांगती तिज ॥६२॥

कांही घरांतचि कोंडून ठेविती । बिचारीला जगचि नसे जन्मजातीं । 
जरा दिसली सूर्याप्रति । मारूनि करिती सरळ तिला ॥६३॥

मुलीने सदा लपोनि राहावें । मुलाने गांवीं रागरंग पाहावे । 
ऐसे हे दुष्ट रिवाज ठेवावे । न वाटती आम्हां ॥६४॥

अरे ! तुझ्याहूनि ती उत्तम वागते । समाजीं उत्तम भाषण देते । 
तुलाहि शहाणपण शिकवूं जाणते । मग ती मागे कशाने ? ॥६५॥

ऐसें असतां दाबून ठेवावें । आजच्या युगीं शोभा न पावे । 
जेथे समान हक्क असती बरवे । वर-वधूंना ॥६६॥

ईश्वरानेचि निर्मिलें हें सूत्र । दोन्ही ठेवावेत समान पवित्र । 
मुलांनीच काय केलें सर्वत्र । राहाया पुढे जगामाजीं ? ॥६७॥

वेगळे नियम प्रतिष्ठेसंबंधीं । विधवा होतां विवाह-बंदी । 
निर्वाहाचीहि नाही संधि । ही भेदबुध्दि कशासाठी ? ॥६८॥

कांही स्त्रिया विधवा होती । केश काढूनि विद्रुप करिती । 
त्याने कैसी साधे संन्यासवृत्ति । मला नसे ठावें हें ॥६९॥

आपुला झांकोनि दुबळेपणा । करावी दुसर्‍याची विटंबना । 
हा तों आहे दुष्टपणा । अमानुष जैसा ॥७०॥

संन्यास घेणें असेल विधवेला । तरि वनीं आश्रमीं ठेवावें तिला । 
सेवाशिबिरीं अभ्यास केला । पाहिजे तिने स्वइच्छें ॥७१॥

आपण खावें ल्यावें साजिरें । तिला जन्मवरि दु:खांचे भारे । 
त्याहूनि तिचें मरणें बरें । होतें पति-चितेमाजी ॥७२॥

तिने वृत्तीने राहावें उदास । करावा परमार्थाचा अभ्यास । 
विद्रूप करूनि आपणास । काय फायदा समजेना ॥७३॥

विधवेसि मानावें अभद्र । मुलगी जन्मतां ती दळभद्र । 
वय वाढतां समजावी क्षुद्र । हा तो दुष्टपणा समाजाचा ॥७४॥

जैसा पुरुष राहे ब्रम्हचारी । तैसी स्त्रीहि असूं शकते कुमारी । 
अधिकाराची उणीव सारी । घालविली पाहिजे ॥७५॥

स्त्रीजातीस संततिनियमन-बेडी । परि पुरुषास नाही कांही बेरडी । 
हें म्हणणें नव्हे अविचारी खोडी । वाटते मज ॥७६॥

नियमन असावें तें सर्वासि । अभ्यास द्यावा तो दोघांसि । 
विशाल करावें विचारशक्तीसि । देशक्लेश समजावोनि ॥७७॥

समाजीं जो पुरुषासि आदर । तैसाचि महिलांशि असावा व्यवहार । 
किंबहुना अधिक त्यांचा विचार । झाला पाहिजे समाजीं ॥७८॥

येथेच समाजाचें चुकलें । एकास उचलोनि दुसर्‍यास दाबलें । 
याचें कटुफळ भोगणें आलें । कितीतरी स्थानीं ॥७९॥

परि लक्ष नाही आज तिकडे । नाहीत मुलीबाळींना उत्तम धडे । 
कुरण वाढूं द्यावें ढोरांसाठी पुढे । तैसें झालें समाजाचें ॥८०॥

यास पाहिजे आता वळविलें । ठिकठिकाणीं शिक्षण दिलें । 
मुलीमहिलांचें जीवन जागविलें । तरीच जगलें गांवराज्य ॥८१॥

शहाण्यांनी हें विसरूं नये । गांवीं सर्वांची करावी सोय । 
जेणें पुरुषांचें तैसेंचि स्त्रियांचें होय । उत्थान आता ॥८२॥

तरीच ग्राम शोभूं लागे । पुरुष-नारी दोन्ही विभागें । 
जेणें स्वर्गचि उतरेल कार्यायोगें । विकासाच्या ॥८३॥

महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास । करील ऐसें शिक्षण खास । 
जरि दिलें जाईल त्यांस । तरीच भावी जग पालटे ॥८४॥

महिलांचें उच्चतम शिक्षण । शिक्षणांत असावें जीवनाचें स्थान । 
जीवनांत असावें स्वारस्य पूर्ण । शांतिदयादि भावनांचें ॥८५॥

समाजविकास ज्यास आवडे । त्याने शिकवावे मुलींना धडे । 
लिहितां-वाचतां येईल एवढें । तरी शिक्षण आवश्यक ॥८६॥

तैसीच शिकवावी टापटीप । गाणें बोलणें वागणें अनुरूप । 
घर पाहतांचि कळावें आपोआप । कैसी येथील महिला तें ॥८७॥

मुलीबाळीस उत्तम ठेवणें । हें तों मातापित्यांचें कर्तव्य प्रमुखपणें । 
त्यानेच राष्ट्राचें फेडील पारणें । घर संतानें आपुलिया ॥८८॥

मीं पाहिलें मुलें फार शिकती । यंत्रविद कारागीर होती । 
परि मुलींसाठी योजना अति । मंद आहे शिक्षणांची ॥८९॥

ऐसें समाजीं न व्हावें । मुलांपरीच मुलींना शिकवावें । 
त्यांचें स्थानमान नेहमी असावें । सहकारितेचें ॥९०॥

मुलांस विविध उच्च ज्ञान द्यावें । तैसेंचि मुलींनाहि शिकवावें । 
हेळसांड करूं नये हें जाणावें । समाजाने ॥९१॥

परि स्वतंत्र असावें मुलीचें शिक्षण । स्त्रीपुरुषांचे उद्योगहि भिन्न । 
जेथे होतें दोघांचें मिलन । प्रसंग कठिण ओढवती ॥९२॥

विचारें जें जें कांही होतें । त्यांत योजनाबध्दता राहते । 
अविचाराने जातां मोहपंथें । धोका मागुतां पावती ॥९३॥

म्हणोनि समजोनि शिक्षण द्यावें । दोन्ही रथचक्रां सारखें करावें । 
शक्तियुक्तींनी भरावें । गांव सारें आपुलें ॥९४॥

परंतु नेहमी भयभीत करावें । प्रत्येकाचें स्थान भिन्न ठेवावें । 
मग स्वभावास वळण कोणीं द्यावें । संसर्ग येतां ? ॥९५॥

स्त्रीपुरुषांच्या विकृत कल्पना । भ्रमविती परस्परांच्या मना । 
यासाठी वाढवावा बंधुभिगिनीपणा । योग्य संबंधें ॥९६॥

शिक्षणांत अशीच करावी व्यवस्था । न होईल परस्परांची अनास्था । 
या दृष्टीने शिकवोनि समस्तां । वळण द्यावें नैतिकतेचें ॥९७॥

दोघांनाहि आपुलें ब्रीद कळे । तरीच सगळा अनर्थ टळे । 
एरव्ही पिंजर्‍यांत जरी वेगळे । तरी गोधळे वृत्ति त्यांची ॥९८॥

म्हणोनि सहशिक्षणहि नाही वाउगें । जरि नैतिकभाव राहती जागे । 
शिक्षणीं जागृति ठेवणें सर्वांगें । काम नेत्या वडिलांचें ॥९९॥

शिक्षणीं सांभाळोनि तनुमन । करावें मुळीबाळीस विद्वान । 
अंगीं असावें शौर्य पूर्ण । ब्रीद आपुलें रक्षाया ॥१००॥

जेव्हा पुरुष पावतो पतना । त्यास स्त्रीप्रकृति सहन होईना । 
तेव्हां महिलांत असावी संघटना । त्याची सुधारणा करावया ॥१०१॥

जैसी मुलांची संघटित सेना । तैसी स्त्रियांची असावी संघटना । 
आपुल्या सुखदु:खांच्या भावना । प्रकटवाव्या सभासंमेलनीं ॥१०२॥

पुरुषांचें जैसें स्फूर्तिस्थान । तैसेंचि महिलांचें असावें उन्नतिभुवन । 
त्यांत सभा प्रार्थना कथाकीर्तन । उपक्रम पूर्ण महिलांचे ॥१०३॥

दूर सारोनि जातीय आदि भाव । जमवोनि महिलासमुदाय सर्व । 
तिळगूळ हळदीकुंकू शारदोत्सव । सहभोजनादि करावे ॥१०४॥

उत्सव साध्वीपतिव्रतांचे । जयंति-पुण्यतिथी पर्व तयांचे । 
वाचनालयादिक महिलाविभागाचें । जेथे तेथे आवश्यक ॥१०५॥

स्त्रियांचे स्वतंत्र मेळे-समुदाव । त्यांच्या उन्नतीचा कला-गौरव । 
प्रतिकाराचीहि त्यांना जाणीव । अवश्य असावी ॥१०६॥

माझें म्हणणें श्रोतयांतें । जें जें सुख असेल पुरुषातें । 
महिलांसीहि असावें अभिन्नपणें तें । स्वातंत्र्य सुखसाधन ॥१०७॥

सर्व सोयी पुरुषांकरितां । स्त्रियांसाठी सर्व व्यथा । 
हें कोण बोलतें शास्त्र आता ? द्यावें हातां झुगारोनि ॥१०८॥

पुरुष उन्नतीस चढला । परि कांहीच न कळे महिलेला । 
तरि तो गांवहि एक कल्ली झाला । नशीबीं आला र्‍हास त्रास ॥१०९॥

म्हणोनि रथाचीं दोन्ही चाकें । मजबूत करावी कांतोनि सारखें । 
तरीच संसारगाडी सुखें । सुखावेल ग्रामजीवनाची ॥११०॥

आदर्श ऐसे मातापिता । जन्म देतील आदर्श सुतां । 
ते वैकुंठ बनवितील भारता । तुकडया म्हणे ॥१११॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । 
ग्रामोद्वार कथिला महिलोन्नतींत । विसावा अध्याय संपूर्ण ॥११२॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥