ग्रामगीता
पुरुष आणि महिला देख । सृष्टिचक्र चालविती ॥१॥
चालावा जगाचा प्रवाह । व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह ।
यासाठीच योजिला विवाह । धर्मज्ञांनी तयांचा ॥२॥
स्त्रीपुरुष हीं दोन चाकें । जरि परस्पर सहायकें ।
तरीच संसाररथ चाले कौतुकें । ग्राम होई आदर्श ॥३॥
परि याची हेळसांड झाली । विवाहाची रूढीच बनली ।
मग यांतूनचि उदया आलीं । हजारों दु:खें समाजाचीं ॥४॥
पुरुषार्थासाठी वैवाहिक जीवन । विवाह समाजस्थैर्याचें साधन ।
परि वाढोनि अज्ञान प्रलोभन । झाली धुळधाण समाजाची ॥५॥
कितीतरी मुली असती सुंदर । परि हुंडयासाठी राहती कुवार ।
तैसाचि मुलांचा व्यवहार । जातींत भासे कित्येक ॥६॥
ऐसी वाईट पडली प्रथा । तेणें व्यभिचार वाढले सर्वथा ।
हें महापाप असे माथां । समाजाच्या ॥७॥
कुणाचे पिते लग्न करोनि देती । घराणें, पैसा, प्रतिष्ठा बघती ।
विवाहाआधी न पुसती । दोघांसहि ॥८॥
भिन्न स्वभावांचे प्राणी । जमवोनि आणावेत दुसर्यांनी ।
कैसी रुचेल जिंदगानी । दोघांसहि ? ॥९॥
वडिलांचा मान राखावा । म्हणोनि का संसार नागवावा ?
ऐसातरी हेतु कां धरावा । वरिष्ठांनी ? ॥१०॥
विवाहाआधी परस्पराने । पाहावें दोघांनाहि निश्चयाने ।
विचारस्वातंत्र्य दोघांसहि देणें । अगत्याचें ॥११॥
वडिलांनी पहावी एक खूण । लग्न करिती काय आंधळे होऊन ।
पश्चात्तापाचें कारण । न पडावें म्हणोनिया ॥१२॥
एरव्ही दोघांच्याही मतें । लग्न जुळवूनि आणावें सु-मतें ।
नांदोत दोघेंहि एकसुतें । संसार सुखी करावया ॥१३॥
जुळतां दोघांचेहि विचार । विकास पावेल कारभार ।
दोघांची उत्साहशक्ति अपार । कार्य करील सेवेचें ॥१४॥
उत्तम राहणें उत्तम बोलणें । उत्तम सौंदर्य सात्विक लेणें ।
घरामाजी शोभून उठती तेणें । देवता जणूं समविचारें ॥१५॥
विचाराविण जें जें करणें । तें सर्वचि होतें लाजिरवाणें ।
ऐसेंचि मागील गार्हाणें । ऐकतों आम्ही ॥१६॥
भोगासाठी लग्न केलें । आंधळेपणीं संसार चाले ।
वर्ष लोटतांचि गोंधळले । दोन्ही प्राणी ॥१७॥
एक एकाशीं बोलेना । संशय वाढले दोन्हीजणां ।
कशाचा संसार ? यमयातना । वाटे पतिपत्नीसि ॥१८॥
विषय-विकारें लग्न केलें । पूर्वीच परस्परांसि नाही ओळखलें ।
तेणें सर्वाचि वाया गेलें । जीवन दोघांचें ॥१९॥
केवळ भोगासाठी लग्न । हें तों दिसे विचित्रपण ।
काय होतें पशु जमवोन । एके ठायीं ? ॥२०॥
मानवांचें एक होणें । स्वर्गसुखहि त्यांना ठेंगणें ।
त्यांच्या संयोगें उत्त्कर्ष पावणें । लावण्यासि ॥२१॥
श्वानांचिया पशुत्वसंयोगें । जन्मती जीव कर्मभोगें ।
टाकिलीं जाती सर्व मार्गें । श्वान-पिलीं ॥२२॥
तैसें नोहे मानवांचें । त्यांचें राहणें जबाबदारीचें ।
एक संतानहि थोर कामाचें । दिगंतरीं ॥२३॥
देशीं पाहिजे सर्वचि धन । रानधन, लेणीं आदि मानधन ।
द्रव्यधन, खाणी आणि गोधन । सर्वकांही ॥२४॥
सर्व धनांमाजी सुपुत्रधन । वाढवी राष्ट्राचें गौरवस्थान ।
म्हणोनिच वधुवरांनी शोधून । लग्न करावें विचारें ॥२५॥
नाहीतरि मरतुकडे पुत्र व्हावे । तेणें घराणें बुडोन जावें ।
देशासहि कलंकित करावें । न होवो ऐसें ॥२६॥
उत्तम बीजसि उत्तम जमीन । तेणें वृक्ष वाढतो भेदूनि गगन ।
ऐसेंचि असावें सन्तान । बलभीमासारिखें ॥२७॥
ऐसें सन्तान घराणें शोभवी । एकवीस कुळांचें नांव जागवी ।
स्वकर्तव्याने चमकवी । देश आपुला ॥२८॥
परि पुत्रांचीहि असावी मर्यादा । देशीं न वाढवी आपदा ।
शरीर संरक्षणाचीहि संपदा । गमावूं नये संसारीं ॥२९॥
निरोगी रक्त उत्तम गुण । सुस्वभावी ऐसें सन्तान ।
हें नाही सर्वस्वीं अवलंबून । जाति-कुळ-गोत्रावरि ॥३०॥
दोघें प्राणी उपवर असती । भिन्नजाति लग्न करूं म्हणती ।
विचारें करितां, त्यांसि संमति । अवश्य द्यावी ॥३१॥
गुण गुणाकडे धांव घेतो । आपण शास्त्रींपुराणींहि ऐकतों ।
मिश्र विवाहाने बिघाड होतो । म्हणणें व्यर्थ ॥३२॥
मिश्र विवाह ऐसा नसावा । इच्छा नसतां बळी पाडावा ।
विचार करण्यास अवकाश द्यावा । प्रसन्न चित्तें ॥३३॥
विचारें ’ जीवनाच्या संग्रामीं । हाचि विवाह करूं आम्ही ।
’म्हणती दोन्ही विवेकी प्रेमी । आड कोणी कां यावें ? ॥३४॥
मागे गुणविवाह बहुत झाले । श्रीकृष्णें अर्जुनादिकें केले ।
समाजीं अनेक प्रयोग घडले । विवाहांचे भिन्न भिन्न ॥३५॥
गुणसाम्याचे मिश्रविवाह । वीरश्रीच्या कसोटीचे विवाह ।
राष्ट्रांतील भेद मिटविण्याचे विवाह । नाना जमातींमधूनि ॥३६॥
ऐसे अनेक तात्विक विवाह । त्यांत कांही राक्षस-विवाह ।
बळजबरीने बांधले देह । अनेक हेतूंसाठी ॥३७॥
ऐशा गोष्टीस मात्र जपावें । बाळपणींहि लग्न नसावें ।
समजूतदारीने करूनि द्यावे । लग्नप्रसंग ॥३८॥
कांही पित्यांची असते हौस । मुलींचें वय तीन वर्ष ।
अथवा असतां तीन मास । करिती लग्न ॥३९॥
वयांत येती वधुवर । माहीत नसतो मानवी व्यवहार ।
बळी पडती रूढीसि पामर । दोन्ही प्राणी ॥४०॥
पुढे एक एकाशीं न मिळे । सर्प-मुंगुसापरी सगळें ।
मग पंचायती-नोटिसांचे सोहळे । जीवन गारद यांतचि ॥४१॥
कांही मुली विधवा होती । बालवयींच पति वारती ।
पुढे त्याची होते फजीती । लग्नावांचोनि ॥४२॥
रूढि सांगते लग्न न करावें । मन बावरे कोणीं आवरावें ?
चोरूनि पापाचरणी व्हावें । तरि तें दु:खदायी ॥४३॥
ऐशा ज्या ज्या वाईट रीती । झुगारोनि द्याव्या हातोहातीं ।
करावी पुन्हा नवीन निर्मिती । समाजनियमांची ॥४४॥
ज्या विधवेस वाटे लग्न करावें । तिने वडीलधार्यांसि सांगावें ।
त्यांनी सहृदयपणें लग्न योजावें । जीवधर्म म्हणोनिया ॥४५॥
ज्या विधवेची इच्छा नाही । तिला छळूं नये कोणी कदाहि ।
ती सती संन्यासिनी समजोनि देहीं । राखावी समाजाने ॥४६॥
ऐसेंचि हें घडूं द्यावें । मानवांच्या प्रकृतिस्वभावें ।
तरीच मानव म्हणविणें बरवें । शोभा देतें ॥४७॥
कांहींचे वडील लग्न करोनि देती । मनास वाटेल तो हुंडा घेती ।
जोड-विजोड कांही न पाहती । धनापायीं ॥४८॥
वृध्द वा रोगी असोनि वर । वधु देती बालिका सुंदर ।
धनासाठी दुर्व्यवहार । परोपरीचे ॥४९॥
मुलामुलींचा घेवोनि पैसा । जीवनांत वाढविती निराशा ।
मोलाने का प्रेम-फासा । पडे गळीं कोणाच्या ? ॥५०॥
बालक-बालिकेसि वाचा नसते । तोंड फोडोनि बोलेना ते ।
परि हे कसाब म्हणावेत पुरते । जे विजोड लग्न योजिती ॥५१॥
ऐशा असतील ज्या वेडया रीती । त्या काढोनि टाकाव्या प्रवृत्ती ।
जीवनाचें प्रेम चित्तीं । तेंचि धन समजावें ॥५२॥
ज्याने मुलामुलींचे पैसे घेतले । त्यासि समाजाने पाहिजे निषेधिलें ।
तरीच हे दुराग्रह मोडले । जातील आता ॥५३॥
नाहीतरि हुंडयापांडयासाठी । जीवन होईल मसणवटी ।
अनेक मुलेंमुली करिती शेवटीं । आत्मघात ॥५४॥
कित्येक हात धरोनि जाती । समाजजीवनीं कालविती माती ।
परि लोभ न सोडवे शहाणियांप्रति । पैशांचा अजुनि ॥५५॥
हें गांवाने दुरुस्त नाही केलें । तोंवरि पापांचें डोंगर वाढले ।
सगळे गांवचि भागीदार झालें । समजावें त्यांचें ॥५६॥
कांही घरीं मुली उपवर । मुलेंहि लग्नासाठी तयार ।
तेथे आटयासाटयाचा व्यवहार । करिती कोणी ॥५७॥
मुलामुलींची नसतां जोड । आपुलिया सोयीसाठी उघड ।
लादिती मानेवरि जोखड । मायबाप ॥५८॥
मग तेथे भांडाभांडी । मुलगी माहेरींच न धाडी ।
अथवा टाकोनि करिती नासाडी । जीवनाची तिच्या ॥५९॥
कांही आपुल्या मानाकरितां । मुलींच्या दैवीं आणिती व्यथा ।
ऐशा वाढल्या वाईट प्रथा । कितीतरी गांवीं ॥६०॥
कांही जातींत ठेविती पडदा । जणूं कोंडवाडयाचाचि धंदा ।
त्याने लग्न झालियाहि आपदा । येते केव्हा ॥६१॥
मुलगी पडद्याने बघितली नव्हती । आता कळलें तिरळी होती ।
कांही म्हणती लग्नप्रति । मागे घ्यावें काडीमोडीने ॥६२॥
पडद्याचिया प्रस्थामुळे । शहाणे तेहि होती खुळे ।
गर्दीत पति चुकतां गोंधळें । पडे बापडी गुंडाहातीं ॥६३॥
दुर्जन बुरख्याआड लपविती । ऐशा स्त्रिया नेल्या किती ।
अजूनिहि नेत्र न उघडती । समाजाचे ॥६४॥
पडदापध्दति बहुपरी भोवे । थोरांपुढे कधी न यावें ।
परिशुश्रुषाहि अंतरल्या याभावें । कितीतरी मुली ॥६५॥
ऐशा विचित्र कांही प्रथा । मोडोनि टाकाव्या समाजीं व्यथा ।
लावूं नये दोष माथां । कोणा एकाच्याचि ॥६६॥
कांही मायबाप पोरा चढविती । पुरुषें कैसेंहि वागावें म्हणती ।
मुलीस गांजिती, मार देवविती । ऐसी वृत्ति आसुरी ॥६७॥
कांही मायबाप मुलींचे कैवारी । ’ हूं ’ म्हणतां जावोनि पडती द्वारीं ।
ऐसें कु-शिक्षण नानापरी । दु:ख संसारीं वाढवी ॥६८॥
कांही पतिपत्नींचें संघटन । परि आड येई थोरांचा मान ।
काडीमोड, विरोध अथवा भांडण । करी वैराण जीवन त्यांचें ॥६९॥
कांही लपवालपवी करिती । मुली नांदायासि न धाडिती ।
कांही मुलींना ओढूनि नेती । तमाशा करिती जीवनाचा ॥७०॥
कांही लग्नाआधी लपविती उणीव । त्याची पुढे होतां जाणीव ।
जन्मभरि भोगावा लागे उपद्रव । सकळांसि मग ॥७१॥
कांही बढाई दाविती खोटी । कांही रुसती आंदणासाठी ।
सोय न पाहतां करिती कष्टी । परस्परांसि सोयरे ॥७२॥
कोणास दागिन्यांची हाव । सदगुणांचा नकळे भाव ।
त्यांस फसवी नकली वैभव । जीवन गारद मुलींचें ॥७३॥
मुलीमुलांचा लग्नाबाजार । शिक्षण, सौंदर्य, नोकरीवर ।
भाव न्यूनाधिक ठरविती साचार । जीवनमूल्यें न जाणतां ॥७४॥
कांही लग्नांचे दलाल । उधळीत जाती रंग गुलाल ।
मुलामुलींचें जीवन हलाल । करिती स्वार्थास्तव ॥७५॥
कांही मुलींना खपवूं पाहती । ध्यानीं न घेतां नीति-अनीति ।
ऐसी लाचार केली स्थिति । नाना रूढयांनी ॥७६॥
ज्योतिषासि देऊन-घेऊन । मनासारिखे काढविती गुण ।
प्रसंगीं नावंहि सांगती बदलून । दंभ दारूण वाढला ॥७७॥
आकाशांतील पाहती ग्रह । इकडे स्वभावीं वेगळे दुराग्रह ।
जीवनांत वाढे जयांनी द्रोह । ऐसे त्यांना न दिसती ॥७८॥
म्हणती वधुवरें सुलक्षण । जुळले त्यांचे छत्तीसगुण ।
इकडे छत्तीसी अथवा खडाष्टक पूर्ण । करी जीवन बरबाद ॥७९॥
वधुवरांचे उत्तम गुण हेंचि परस्परांचें महाभूषण ।
त्यावांचोनि विवाह केला वैभवपूर्ण । तरि तो सर्व अमंगल ॥८०॥
कांही ठिकाणीं विवाह करिती । वेडयासारखा पैसा उधळिती ।
उपयोग नाही ऐसी रीति । कासयास आचरावी ? ॥८१॥
लग्नाचे अपार सोहळे । विहीण-व्याही-मामे सगळे ।
वर्हाडांचे गोंधळ सावळे यासि विवाह म्हणों नये ॥८२॥
अस्ताव्यस्त तारांबळ । उधळपट्टी आणि धांवपळ ।
यासि म्हणावें कार्य अमंगळ । खर्च निष्फळ पैशांचा ॥८३॥
लग्नाकरितां कर्ज करावें । जन्मभरि व्याज भरीत जावें ।
लग्नासाठी कफल्लक व्हावें । कोण्या देवें सांगितलें ? ॥८४॥
चार-पांच दिवस लग्न । लग्नांत होती नाना विघ्नं ।
मोठेंपणाचें विडंबन । कासयासि करावें ? ॥८५॥
असोत अडी-अडचणी किती । साधिलीच पाहिजे तिथि ।
ऐसी कां ठेवावी प्रवृत्ति । रूढिबध्द ? ॥८६॥
प्रसन्न हवापाणी ऋतु । हाचि विवाहाचा मुहूर्त ।
बाकीचें झंजट फालतू । समजतों आम्ही ॥८७॥
दिवस पाहावा सुंदर । हावापाणी सोयीस्कर ।
सर्वांसि होईल सुखकर । म्हणोनिया ॥८८॥
खर्च नको भव्य मंडपाचा । देखावा असवा निसर्गाचा ।
अथवा सभामंडप मंदिराचा । योजावा या कार्यासि ॥८९॥
वेळ पैसा आणि श्रम । वाचवावेत करोनि नेम ।
गुणांस द्यावें महत्त्व परम । जाति-धन-भ्रम सोडोनि ॥९०॥
सुंदर करावें सभास्थान । बैसवावे साजेलसे जन ।
वरवधूंना समोर बसवून । सूचना द्यावी सूचकें ॥९१॥
द्यावा वरवधूंचा परिचय । प्रकट करावा सत्कार्य-निश्चय ।
मग साधावें कार्य मंगलमय । मंगलाष्टकें म्हणोनिया ॥९२॥
मंगलाष्टकीं विवाह-उद्देश । सज्जनें करावा उचित उपदेश ।
येऊं न द्यावा नाटकी अंश । अपवित्र त्यांत ॥९३॥
सभा असावी आदरपूर्ण । देऊं नये धूम्रपान ।
धर्मसंस्कार वाटावें लग्न । अग्निदेवते स्मरोनिया ॥९४॥
वडील जनांचे आशीश घ्यावे । सर्वांशी प्रेमादरें वागावें ।
गोडं बोलोनिं उरकवावें । लग्नप्रसंगा ॥९५॥
वरवधूंना ग्रामीण खादी । असो जुनी वा नवी साधी ।
ऐशा वस्त्रींच लग्नाक्षदी । पडाव्या शिरीं उभयतांच्या ॥९६॥
कपडे असती ते घालावे । नसतां धुवोन स्वच्छ करावे ।
अहेरादि नको लग्नप्रसंगीं यावें । सर्वजनें आदरें ॥९७॥
लग्नानिमित्त भेटीच देणें । तरि उभयतांचा संसार सुरू व्हावा तेणें ।
अथवा गांवाचें फिटावे उणें । ऐशी योजना करावी ॥९८॥
सारांश, लग्नाचा प्रसंग । विचाराने करावा यथासांग ।
समजोनि परिस्थिति वेळप्रसंग । सर्वकांही ॥९९॥
ऐसा हा मंगल प्रसंग । देशाचें भूषवी अंग ।
समाजजीवन करील अभंग । वाढेल कीर्ति गांवाची ॥१००॥
विवाहाचा जो संस्कार । त्याचें महत्त्व सर्वांत थोर ।
त्या पायावरीलच समाजमंदिर । म्हणोनि सुंदर करा यासि ॥१०१॥
यासाठीच वधुवरांसंबंधीं बोललों । नवनिर्माण ओघानें पुढे चाललों ।
सांगोनि एकदा मुक्त झालों । सुखदु:ख समाजाचें ॥१०२॥
स्त्रीपुरुष हीं दोन चाकें । परस्परपोषक होतां निके ।
गांव नांदेल स्वर्गीय सुखें । तुकडया म्हणे ॥१०३॥
इतिश्री ग्रामगीत ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत ।
विवाहसंस्कारें ग्रामोद्वार कथित । एकविसावा अध्याय संपूर्ण ॥१०४॥
॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥
॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥