वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अध्याय पहिला

वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज - विरचित

आत्मप्रभाव
(ओवीबद्ध ग्रंथ)

अध्याय पहिला 
(श्रीगणेश - शारदा स्तवन)

॥ श्रीगुरुदेवाय नमः ॥

जयजयाची श्रीगणराया ! ओंकाररुप तुझी काया ।
रिद्धी-सिद्धिंच्या राजया । मंगलमूर्ती ॥१

सर्व गणांचा गणराज । सर्व गुणांचा महाराज ।
निर्गुण सिंहासनी तुज । वंदितो मी पुनःपुन्हा ॥२

अकार, उकार, मकार । अर्धमात्रा ती निराकार ।
स्थूल-सूक्ष्म, विश्वाकार । महाकारण तूंचि ॥३

तूंचि मूळ निरंजन । परात्पर परब्रह्म पूर्ण ।
तुझे ठायी जे स्फुरण । तींच देवी शारदा ॥४

परा-पश्यंति-मध्यमा-वैखरी । नवनवे रुप तींच धरी ।
पंचतत्वांचा वीणा करी । षड्चक्र खुंट्या तयाला ॥५

हं-सोहं अजपा स्वर । सुरु राहे निरंतर ।
बावन्न मातृका सुंदर । उमटती बरव्या ॥६

चौदा विद्या, चौसष्ट कला । ज्ञान-विज्ञान रंग भरला ।
नाना भाषा ग्रंथ-सोहळा । त्यांतचि उपजे ॥७

म्हणोनि माते सरस्वती !  तुजला नमन पुढत-पुढती ।
देई ग्रंथ-लेखना मती । तूंचि स्फूर्तिदेवते ! ॥८

बैसोनि माझिया जिव्हाग्री । लोटी अमृताची झारी ।
आत्मप्रभाव-माधुरी । मिळू दे सर्वा ॥९

माते ! तुझिया कृपेविण । मज बालका कैचे ज्ञान ? ।
हंसवाहिनी तूंचि पूर्ण । ब्रह्मवीणा वाजविसी ॥१०

मी नाही केले विद्याध्ययन । परि तुझी लीला विलक्षण ।
मुकाही बोले वेदवचन । चिंता मजला कासयाची ? ॥११

तुझा वळता कृपाकटाक्ष । घडे आपुली आपणा साक्ष ।
साहित्यकलाहि प्रत्यक्ष । अवतरे तेथें ॥१२

म्हणोनि माते ! तुज प्रार्थना । स्फूर्ति देई माझिया मना ।
शब्दोशब्दी उमटवी खुणा । निजबोधाच्या ॥१३

स्वरुपाची अनुभूती । तीच तूं देवी सरस्वती ! ।
तुजवाचूनि कवणाप्रती । शरण रिघावे ? ॥१४

तुजसी येवो जाता शरण । आड येई जरा-विघ्न ।
करिता गणाधीशाचे स्मरण । निस्तरे सकळ ॥१५

विघ्नहर्ता गणनायक । सर्वतोपरी मंगलदायक ।
जेथे नुरे द्वैताचीच भाक । मग विघ्न ते कैचे ? ॥१६

मनाचा चंद्रमा कलंकित । तोचि विघ्नरुप येथ ।
स्मरता गणेशु मनातीत । बाधा उरेना ॥१७

स्वामी ! तुझे जे स्मरण । ते विलया ने विस्मरण ।
मग द्वैताचे नुरे भान । जीवन धन्य होतसे ॥१८

तुझे पावता वरदान । सर्व सुखे पायी लीन ।
जें जें करावे तें तें पूर्ण । होय शुभ फलदायी ॥१९

जिकडे पाहावे तयाठायी । स्वरुपावीण दुजे नाही ।
जें जें बोलावे तें तें होई । कल्याणमय ॥२०

जें जें काही करु जावे । तेणें विश्व सुखी व्हावे ।
ऐसे प्रसादफळ बरवें । प्रभुजी ! तुझे ॥२१

म्हणोनि मी अनन्य शरण । द्यावी आपुली कृपा पूर्ण ।
केले गणेश-शारदा स्तवन । याचि भावे ॥२२

इतिश्री आत्मप्रभाव ग्रंथ । वेदान्तसार संमत ।
तुकड्यादास विरचित । मंगलाचरण पूर्ण हे ॥२३

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय