(चाल : ना छेडो गाली देऊँगी...)
नटला भक्तांचेसाठी,
हाति नरोटी घेउनी ॥धृ.॥
सोडुनी देवपण सारे, करि दासासम काम रे !
प्रेमाचे सगळे वारे, अंगी भरवी नेउनी ॥१॥
चोख्याची ढोरे ओढी, माना, अपमाना सांडी ।
जनिसवे दळी वा कांडी, प्रेमा दावी सेवुनी ॥२॥
धावला भक्तजन-काजा, नच लाज कशी महाराजा !
खांदी घोंगडिया साजा, सांजा, रसिदा घेसी लिहुनी ॥३॥
द्रौपदीस सांभाळाया, वाढवी चीर यदुराया !
तुकड्यास ठाव दे पाया, अक्षय शांती देउनी ॥४॥