वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अबोला काय धरिसि गिरधारी !

(चाल : पुजारी मोरे मंदिरमो...)

अबोला काय धरिसि गिरिधारी !
बघ तरि कुंजविहारी ! ॥धृ.॥

दीन अम्हावर त्वाचि रुसावे,
सांग अम्ही कवणास पुसावे ?
तव आशेचे भिकारी ॥ अबोला... ॥१॥

चंद्रवद्न एक वेळ बघू दे,
ग्रहण मधातुनि पार निघू दे ।
लागू दे तव तारी ॥ अबोला... ॥२॥

मोर-मुकुट पीतांबर बरवा,
वाजवि अधरी धरुनी पावा ।
बंसि किती तव प्यारी ? ॥ अबोला... ॥३॥

तुकड्यादास म्हणे घे करुणा,
दाखवि भय-हरणा बा ! चरणा ।
अमुचे दु:ख निवारी ॥ अबोला... ॥४॥