वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अनुभवियांचा संग मिळाया

(चाल : दुर्दैवाचा अवचित सखये...)

अनुभवियांचा संग मिळाया,
जिव झुरे माझा  प्रभू रे ! ॥धृ.॥

कोठुनि हुडकावी ही रत्ने ?
केली असतिल कुणी प्रयत्ने ॥
जाउनी धरु मी चरण तयांचे ।
सांगा यदुराजा ?  प्रभू रे ! ॥१॥

जिकडे-तिकडे परोक्ष दिसतो ।
अपरोक्षाचा ठावचि नसतो ॥
म्हणोनि वळतो निश्‍चय मनि या ।
वाटतसे बोझा !  प्रभू रे ! ॥२॥

आपणची हे काहि करावे ।
तरि मग मार्गी अडुनि राहावे ॥
सद्गुरु वाचुनि सोय मिळेना ।
चुकेल अंदाजा !  प्रभू रे ! ॥३॥

धडपड ही सगळी जीवनाची ।
उरली थोडी वेळ वयाची ॥
तुकड्यादास म्हणे ऐकाहो !
ऐका गुरु - राजा !  प्रभू रे ! ॥४॥