(चाल : भला जन्म हा तुला लाभला...)
धन्य धन्य गे स्फूर्ति - तन्मये ! अखिल विश्व - व्यापिनी ।
नमन मम मनोत्साहि स्वामिनी ! ॥धृ.॥
प्रथम बीज ओंकार तुझा या जगदुत्पत्ती मुळी ।
प्रसवली निज चैतन्या - कुळी ॥
(अंतरा)
स्फूर्ति शुध्द - स्फुरणात प्रगटुनी, वाढवि वंशावळी ।
प्रगटली नभा-आत बिजकळी ॥
मज न कळे तू की तुझा कुणी दूसरा ।
पाजिसी अखिल विश्वासी जीवन झरा ।
नच अंत तुझा गे ! परेवरीच्या परा।
गंगेवर जणु तरंग, तैसी ब्रह्मी तू रंगिणी ॥ नमन... ॥१॥
नाभि-कमल-किरणात तेज झकझकाक दिसती खरे ।
तेच तव स्वरुपाचे गे ! झरे ॥
निजानंदि अवतरणी भरली, अंगभास दाविते ।
श्वासरुप घेउनि वर वाढते ॥
इडा-पिंगळा वस्त्र नेसुनी, भ्रमरी झुंजारिते ।
नख - शिखी बहुत रंग दाविते ॥
(अंतरा)
गे ! किती वर्णू गुण तुझे स्वरुप, माउले ।
नच तुझा खरा मज अंत, सखे ! गे कळे ।
तव - दूर राहिले सत्य, ब्रह्म आगळे ।
अगम्य अगणित वेदश्रुतीची तूचि खरी निर्मिणी ॥ नमन... ॥२॥
करी प्रखर भव-पार, दीनाची करुणा घेई मनी ।
त्रासलो जग-पाशे स्वामिनी ! ॥
तेज देइ स्फूर्तिला, प्रगटवी ज्ञानाग्नीचा ध्वनी ।
दाखवी तेज सतेजाहुनी ॥
सत्य कृत्य मनि घडो, पडो हे मस्तक पदि पावनी ।
होइ मग तुकड्या तल्लिन मनी ॥
(अंतरा)
तव आरंभी आवडी लागली मला ।
दे स्फूर्तिमायगे ! तव गुणगानी कला ।
टाळि गे मनाची दुर्व्यसनाची बला ।
होउ दे सुखी तव पदी बाळ आपुला ।
श्री ! सुस्वर गाताचि पावसी, इच्छा धरिली मनी ॥ नमन... ॥३॥