वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 महत्वाची सूचना : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏

पटातटाला फोडुनि आलिस

(चाल : हटातटाने पटा रंगवुनि...)

पटातटाला फोडुनि आलिस पूर्वेहूनि कुणिकडे ।
धावसी धैर्यधीर निर्भिडे ! धृ.

जलबुंदांची करित गर्जना, फोडुनि गिरिचे कडे ।
ओघ दाविसी सरळ-वाकडे 
(अंतरा)
प्रचंड चक्रे मिरवित मिरवित, खळखळ ध्वनि तव पुढे ।
निघालिस वेष्टित गिरिचे कडे ।
(अंतरा)
अग आई नर्मदे ! बोल जरा तरि मशी ।
अग ! कुणा बघाया वेग धरुनि वाहसी ?
मधु रुचिर नेत्र करुनिया कुणा पाहसी ?
प्रेमामृत हृदयात उफाळित, भरुनि यशाचे चुडे ॥ धावसी० ॥१॥

प्रफुल्ल उपवन, भ्रमर सुरंमित, ओढित झर - जीवना ।
शांतवित आर्तांच्या मन्मना 
क्षेत्र - क्षात्र, मठ - मढी भोवती, वसवित सुंदरपणा ।
पुरविसी योगी - हृदय कामना 
पुष्प - अलंकृत बागबगीचे, किती धातुच्या कणा ।
उघडुनी दाविसी सकला जना 
(अंतरा)
किति तेज तुझ्या या लाटांच्या वरवरी ।
प्रत्यक्ष चंद्र जणु दिसे हृदय - मंदिरी ।
जणु  बाळ खेळती नाव जहाजे वरी ।
स्थलास्थलांच्या जन-समुहाचे पाप घेउनी गडे !  धावसी... ॥२॥

झटपट, लगबग, गडबड तुजला झालि कशाची तरी ?
उभी नच राहि जरा तिळभरी ॥
ऋषी-मुनींच्या आश्रमि जाया वेळ न उरते उरी ।
म्हणुनिया बघसि अम्हा कशि तरी ॥
पुण्यश्लोक जन उभे कुठे तरि म्हणुनि जासि झडकरी ।
पश्चिमे आखित पथ बावरी 
(अंतरा)
तव धन्य आई गे ! स्फूर्ति-स्फुरण चपलता ।
मज गमे तुझी ही बुध्दि सहज सहजता ।
तुज निर्मियले तो तोचि अखिल निर्मिता ।
तुकड्यादासा दे दर्शन, मम नेत्र तुझ्या पदि जडे ॥ धावसी... ॥३॥