(चाल : उध्दवा ! शांतवन कर जा...)
अगं वृत्ति ! कुठे तू जाते ?
तव प्रेम कुणाशी जडले ? ॥धृ.॥
सोडशील का गे मजला ? मम हृदय अधिर गडबडले ।
सुखरूप - स्थला सोडुनिया, तव प्रेम कसे गे उडले ?
(अंतरा)
चल फिर अता माघारा ।
सोड हा बहिर्मुख चारा ।
का घेसि विषय - सुख - वारा ?
का अनल नेत्र हे चढले ? तव प्रेम कुणाशी जडले ? ॥१॥
तुज आठवते का माझी, मित्रता कितिक दिवसाची ?
विसरलीस का गे अपुल्या, त्या याद निज स्वरुपाची ?
'अस्मिती ब्रह्म'- भानूच्या, तू लाट तेजपुंजाची ॥
(अंतरा)
असुनिया अशी का वेडी ?
धरितेस विषय- भ्रम-बेडी ।
तुज कुणी दाविली गोडी ?
विपरीत असे का घडले ? तव प्रेम कुणाशी जडले ? ॥२॥
स्वानंदपरीमल घ्याया, तुज स्वाद नसे का आला ?
साम्राज्य ब्रह्म-भुवनाचा, स्वातंत्र्यपणा ना रुचला ?
की वरताना सर्वज्ञा, तव प्रेम अचानक विरला ?
(अंतरा)
कोणते दुःख तुज होते ?
म्हणउनिया जाऊ पहाते ।
व्यभिचारपणा अनुसरिते ।
तुज हवे काय ते नडले ? तव प्रेम कुणाशी जडले ? ॥३॥
अग ! सोडशील मम आशा, लागेल सवेच दुराशा ।
चौऱ्यांशि लक्ष योनींच्या, जाशील बांधुनी पाशा ।
वळवील कोण मग तुजला ? भोगशील गर्भ- इराशा ॥
(अंतरा)
हो ऊर्ध्व अंतरामाजी ।
बघ नको करु इतराजी ।
तुकड्याचि आस ही गर्जी ।
सांगता चित्त धडपडले, तव प्रेम कुणाशी जडले ? ॥४॥