वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अवचित आली वेळा बाई !

(चाल : उठा गड्या ! अरुणोदय...)

अवचित आली वेळा बाई !
सद्गुरु दिसले डोळा वो ।
काय वानु मी रुप तयांचे ?
चहु वर्णांचा गोळा वो ॥धृ.॥

सहजासनि बैसली उगी मी,
एकांती निजध्यानी वो ।
झिलमिल झिलमिल रुप दाविले,
जैसे मृगजल पाणी वो ॥१॥

रक्तवर्ण नेसुनी सोवळे,
शुभ्रवर्ण अंगरखा वो ।
अंगरख्यावर चमके जैसा,
श्यामवर्ण तो बुरखा वो ॥२॥

बुरख्याच्यावर ऊर्ध्वगतीचा,
सुंदरसा एक जरखा वो ।
मधि सद्गुरुचे तेज फाकले,
कोटी रविशशिसरिखा वो ॥३॥

नेत्राची बाहुली फाकली,
नेत्रपणा मग गेला वो ।
जिकडे तिकडे सद्गुरु साक्षी,
दृष्टी - गोंधळ मेला वो ॥४॥

तुकड्यादासा दासपणाचा,
ठाव नुरेसा झाला वो ।
श्रीगुरुच्या स्वकृपे मिळाला,
निज-चरणाचा प्याला वो ॥५॥