(चाल : अरे हरि प्याली...)
धन्य तव करणी । करणी गुरुराया !
अज्ञ पामरासि ताराया ॥ धन्य... ॥धृ.॥
मार्ग दाविसी, दाविसी मुमुक्षुला ।
पंथ उलटाचि चालवीला ॥
काय मी वानू? वानू गुरुराया ! ॥ अज्ञ... ॥१॥
निजभक्तिचे, भक्तिचे मूळस्थान ।
दाविसी नरकायी भजन ॥
नवल अद्भूत, अद्भूत नाद जाण ।
पाहता ना उरले भान ॥
दंग जाहला, जाहला पडे मौन ।
प्रकाशे लखलखित गगन ॥
तेज फाकले, पदि लोळे माया ॥ अज्ञ... ॥२॥
रत्न झळकती, झळकती पाच सात ।
न लागे रंगांचा अंत ॥
दृश्य अद्भूत, अद्भूत श्वेत रक्त ।
नील वर बिंदू चकचकित ॥
शोभतो बरा, बरा नसे गणित ।
संत म्हणताति ब्रह्मज्योत ॥
पहा श्रीगुरु, श्रीगुरु हाचि पाया ॥ अज्ञ... ॥३॥
कळे कोणासी, विना कृपे ज्ञान ?
त्यागिला जरी निजप्राण ॥
साधु-संगती, संगती धरी नेम,
खुणा पटतील हेचि ठाम ॥
दास तुकड्या तो, तुकड्या तो जपे नाम ।
गुरु आडकुजी निजधाम ॥
सदा सर्वदा, सर्वदा धरी पाया ॥ अज्ञ... ॥४॥