वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय आठवा

ग्रामगीता

अध्याय आठवा : प्रचार-महिमा


॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥


एक साधुवेषी मजशीं बोले । आमुचे आचरण जरी भलें ।
परि लोक दुसर्‍यांनी दिपविले । न ऐकती ते ॥१॥

वाईटाकडे सहज प्रवृत्ति । अनेक प्रलोभनें दुष्टांचे हातीं । 
आम्रतरु मेहनतीनेहि न जगती । गवत वाढे न पेरतां ॥२॥

ऐसा अनुभव मज आला । सांगोनीहि न पटे जनतेला । 
वाटे काय करावें याला । ऐकती ना हे वेडे जन ॥३॥

म्हणोनि प्रार्थना करितों साहेबासि । त्यांनी करावें कायद्यासि । 
जनता उध्दारावी हवी तैसी । दंड कैद करोनि ॥४॥

ऐकतांचि त्याचें वचन । म्हणालों मग सरकारचि झाला भगवान । 
कासया करिशी देवाचें भजन ? पुजावे जोडे साहेबाचे ॥५॥

वास्तविक संताचे सांगणें प्रेमाचें । सरकारचें सांगणें दंडुक्याचें । 
जरी पर्यायाने दोघांचें । एकचि ध्येय पाहतां ॥६॥

यांत दमनाने लोक भिती । तेवढयापुरती नीट वागती । 
आणि मार्ग काढोनि पापें करिती । कोटयानुकोटी ॥७॥

तैसें नाही साधुसंतांचें । त्यांचें बोलणें आपुलकीचें । 
एकदा विचार पटले त्यांचे । लोक मरेतों न विसरती ॥८॥

साधूंनी देवासि प्रार्थावें । सकळ जनासि बोधीत जावें । 
ऐसें आहे साधन बरवें । साधुसंतांचें ॥९॥

पूर्वी प्रचारक साधु म्हणोन फिरती । गांवोगावी लोकां जागविती । 
’आलख’ म्हणोन पाहरा देती । घरोघरीं अरुणोदयीं ॥१०॥

त्यांचें प्रेमचि कार्य करी । लोक उठती नित्यनेमावरि । 
राहणें टापटिपीचें बाहेरी । अंतरी निर्मळपणा ॥११॥

कथाकीर्तनादिकांच्या योगें । पापभीरुता अंगी वागे । 
तेणें कायद्याविणहि सुमार्गे । जाती बहुजन ॥१२॥

जगीं कांही लोक अज्ञानी । ते दुसर्‍याऐसी करिती करणी । 
थोरांचें आदर्श जीवन म्हणूनि । पाहिजे अनुकरणास्तव ॥१३॥

कांही लोक चिकित्सक । विचार पटतांचि वागती चोख । 
त्यासाठी उत्तम विवेचक । प्रचारक पाहिजे ॥१४॥

कांही लोक प्रलोभनीं पडले । लाभ असेल तेंचि घेती भलें । 
त्यांना स्वर्गसुख पाहिजे दाविलें । दुःखें निवारूनि सेवकांनी ॥१५॥

परंतु भयावांचोनि कांही लोक । न ऐकतीच बोध सम्यक । 
दंडाविण जैसे पशु देख । न चालतीच योग्य मार्गें ॥१६॥

त्यांना हित कोणीं शिकवावें ? कोणीं मूर्खांचें हृदय धरावें ? 
म्हणोनि सत्तेने सरळ करावें । ऐसा मार्ग वाढला ॥१७॥

साम दाम दंड भेद । राजनीति ही बहुविध । 
कायद्याच्या आधारें शुध्द । करूं पाहे जनलोकां ॥१८॥

कायद्यानुसार गांवरचना । कायद्यापरी करावें वर्तना । 
कायद्यानुसारचि जना । सहाय्य द्यावें परस्परें ॥१९॥

जो करील कायदाभंग । त्यासि दंड द्यावा लागवेग । 
यासाठी नेमावा लागे मग । राजा सत्ताधीश मुखंड ॥२०॥

परि राजा हा विष्णु-अंश बरवा । ऐसा लोकीं करावा गवगवा । 
तेव्हाचि कायदा त्याचा चालावा । यांतहि आले प्रचारतंत्र ॥२१॥

देश हा देवचि पवित्र । कायदा त्याचें व्यवस्थासूत्र । 
तें न पाळतां पातक थोर । प्रचारतंत्र आवश्यक ॥२२॥

सत्ता, कायदा, ध्वजावरि श्रध्दा । प्रचारेंचि निर्माण होई सदा । 
त्याविण नुसतें भय सर्वदा । नियमयुक्त न ठेवी ॥२३॥

उलट राजाभयादि नसून । लोकांत प्रचार होतां पूर्ण । 
आत्मसाक्षीने वागती जन । उत्तम हाही अनुभव ॥२४॥

तैसेंच कायद्याची चुकवोनि रेषा । किती करिती पापें नित्यशा । 
परि विचार भिनतां प्रचारें सहसा । पाऊल न पडे वाममार्गीं ॥२५॥

सारांश सत्तानामेंहि राज्य करी । प्रचारचि सर्व जीवनावरि । 
सत्ता देहासचि बंधनकारी । अंधभिकारी कायदा ॥२६॥

प्रचार मनावरि संस्कार करी । तो संस्कार अंतरी बाहेरी । 
राज्य करोनि मानवा सुधारी । गांव करी तीर्थचि तो ॥२७॥

हें सत्तेने कधीच नव्हे । उलट चुकारासि लाभ पावे । 
गरीब सज्जन उगीच मरावे ।ऐसेंहि होतें ॥२८॥

सत्तेने जे कायदे केले । त्यांचे फायदे मुजोरांनी घेतले । 
आणि दुबळे भोळे मागेच राहिले । ऐसें झाले आजवरि ॥२९॥

म्हणोनि कायदाचि नव्हे सर्वकांही । प्रचाराऐसें श्रेष्ठ नाही । 
सर्वांसि मानवतेचे पाठ देई । तो नियमन करी न करितां ॥३०॥

राजे किती आले गेले । त्यांचे कायदे नष्ट झाले । 
सत्तेचे दरबार उजाडले । परि राज्य चाले संतांचें ॥३१॥

संतांचा तो प्रचार अमर । अजूनिहि लोक-मनावर । 
राज्य चालवोनि निरंतर । लाखो जीवां उध्दरितो ॥३२॥

नलगे सत्तेचा बडगा । नको भयभीतीहि सन्मार्गा । 
आपापले कर्तव्य जगा । प्रचारसूर्याचि दाखवी ॥३३॥

जेव्हा जाणीव देणें अपूर्ण पडे । तेव्हांचि दंडभेदाचा अवलंब घडे । 
ऐसेचि वाढत गेले पोवाडे । विकृतीचे ॥३४॥

परि दंडे अन्याय जरि नाशते । लोक जरि सुधारले असते । 
तरि तुरूंग हे न वाढते । गुन्हे न होते अधिकाधिक ॥३५॥

हेंचि जाणोनि सज्जन म्हणती । जागवा हृदयांतील अंतर्ज्योती । 
तरीच सुधारेल मानववृत्ति । जग होईल आदर्श ॥३६॥

जे जे म्हणती सत्तेवांचून । गांव होईना आदर्शवान । 
त्यांचे हें म्हणणे नाही परिपूर्ण । ठेवावी खूण बांधोनि ॥३७॥

त्यासि पाहिजे सत्प्रचारक । प्रेमळ सरळ नम्र भाविक । 
सत्तेवाचूनिहि करी हांक । पूर्ण लोकांची सेवाप्रेमें ॥३८॥

अहो ! जनशक्ति केवढी महान । ती जो आणील संघटोन । 
तो स्वर्गावरीहि लावील निशाण । आपुल्या कार्यें ॥३९॥

हातीं न घेतां तरवार । बुध्द राज्य करी जगावर । 
त्यासि कारण एक प्रचार । प्रभावशाली ॥४०॥

जगीं आजवर जें कार्य घडलें । तें प्रचारकांच्याच करवीं झालें । 
प्रचारक नाही म्हणोनि अडलें । कार्य आपुलें ॥४१॥

ग्राम सुधारावयाचा मुलमंत्र । उत्तम पाहिजे प्रचारतंत्र । 
प्रचारकांवाचून सर्वत्र । नडतें आहे ॥४२॥

प्रचारकाची पाठ बळे । जिकडे तिकडे सूर्य मावळे । 
उदासीनतेचें अंधारजाळें । पसरोनि राही ॥४३॥

प्रचार जेथे धांवला दिसे । तेथील गांव स्वर्गचि भासे । 
जनलोक न्यायास साजेसे । वागती तेथे ॥४४॥

प्रचारक प्रेतांत प्राण आणी । दुबळयासि करी कार्याभिमानी । 
बिघडवी आणि सुधारवी दोन्ही । प्रचारक ॥४५॥

प्रचार ही कला आहे । प्रचार अंतःकरणहि राहे । 
पोट भरवयाचाहि उपाय । प्रचारतंत्र ॥४६॥

प्रचार खोटयास खपवी बाजारीं । प्रचार गोटयास देव करी । 
प्रचार युध्दाची वाजवी भेरी । वृष्टीहि करी अमृताची ॥४७॥

कांहीकांचा स्वभावचि असे । अपप्रचार करोनि भरावे खिसे । 
जना नागवितां आनंद दिसे । कांहीकांना ॥४८॥

परि तो प्रचारक दुराचारी । आपण मरूनि इतरां मारी । 
यानेच बिघडली गांवाची थोरी । अशांति संसारीं माजली ॥४९॥

त्यांच्या विषारी प्रचाराहून । झाला पाहिजे प्रबल पूर्ण । 
सत्यप्रचार आपुला महान । तरीच परिवर्तन सहज घडे ॥५०॥

जोंवरि अंतःकरण नाही गुंतले । तोंवरि प्रचार वरवर चाले । 
यासाठी पाहिजे जीवनचि रंगलें । प्रचारकांचे ॥५१॥

मित्रहो ! आदर्श कराया ग्राम । उत्तम प्रचारक पाहिजे प्रथम । 
तरी चाले उत्तम काम । गांवाचें आपुल्या ॥५२॥

राणीमाशी जाऊन बसली । तेथे मधमाशांची रीघ लागली । 
पाहतां पाहतां सृष्टी सजली । होईल ऐसें ॥५३॥

श्रोतियांनी विचारला प्रश्न । प्रचार करील गांवी पूर्ण । 
तया प्रचारकांचे लक्षण । कैसें असे ? ॥५४॥

प्रचारकांचें वर्तन कैसें ? राहणी, स्वभाव, भाषण कैसें ? 
ध्येय, धोरण, साधन कैसें । गांवासाठी ? ॥५५॥

याचीं उत्तरे श्रवणी ऐका । जे जे गुण व्हावेत प्रचारका । 
ते अंगी बाणतां सुधारील लोकां । कोणीहि सहज ॥५६॥

गांवाचे भवितव्य कराया उज्ज्वल । पाहिजे प्रचारक-शक्ति प्रबल । 
प्रचारकाअंगी पाहिजे शील । सत्य चारित्र्य नम्रता ॥५७॥

प्रचारकाचीं मुख्य लक्षणें । सत्तेवाचूनि कार्य करणें । 
आत्मशुध्दिने गांव सुधारणें । गवसे तया ॥५८॥

त्यासि सत्तेची नाही चाड । नसे धनाचा मोह द्वाड । 
आत्मप्रेमाचा झरा अखंड । वळवीं मना ॥५९॥

प्रचारक स्वभावाचा सरळ । वाईट मनोवृत्तीचा काळ । 
अंतःकरण पाण्याहूनि निर्मळ । अहिंसक ॥६०॥

बोलण्यांत राही निर्भय । कष्ट करण्यांतहि पुढेच पाय । 
वागणूक तरि आदर्श राहे । प्रचारकाची ॥६१॥

प्रचारकाची दिनचर्या । वेळ जराहि न घालावी वाया । 
जें जें शोभे सेवेच्या कार्या । तें तें करी सर्वचि ॥६२॥

नेत्री तयाच्या सात्विक तेज । बोलण्यांत भरले असे ओज । 
राहणींत वैराग्य त्याग सहज । प्रचारकाच्या ॥६३॥

पिकलिया फळाचें देठ तुटलें । तैसें प्रचारकाचे मन झालें । 
आसक्तिविषय सर्व गेले । इंद्रियांचे ॥६४॥

इंद्रियांसि नुरली ऊर्मि । सर्व उन्मुख सेवाकर्मीं । 
पावसाळा हिवाळा गर्मी । सारखीच त्यासि ॥६५॥

परि उदास नसे प्रचारकाची मति । नेहमी दिसेल हसरी मूर्ति । 
सदा कार्य करावयाची स्फूर्ति । स्फूरली दिसे ॥६६॥

कधी न करी चिडचीड । कोसळो का आपत्तीचा पहाड । 
श्रम करोनि जिवापाड । लोक लावी सन्मार्गीं ॥६७॥

प्रचारकासि उरले नाही घर । सर्वचि घरें त्याचें माहेर । 
सर्व जन हेंचि त्याचें गोत्र । विश्वमाजी ॥६८॥

नाही सत्तेचें प्रलोभन । प्रतिष्ठेचेंहि कुठलें भान ? 
आपणासाठी न मागे धन । रेंगाळोनि कोणा ॥६९॥

सत्कार्यासाठी पाठीं लागे । धन जमीन मान मागे । 
सर्वस्व मागे, प्राण मागे । न संकोचतां ॥७०॥

आपणासाठी कांहीच नाही । जें करील तें सर्वांचें पाही । 
प्राण तोहि अर्पावा ही । भावना सेवेसाठी ॥७१॥

सर्व करणें सर्वांसाठी । आत्म्यासाठी देवासाठी । 
बांधावया मनुष्यत्वाच्या गांठी । समाधानें ॥७२॥

त्यासि एकचि वासना उरली । जनता पाहिजे सुखें सुधरली । 
मानवांची दैना गेली । पाहिजे पळोनिया ॥७३॥

सर्वांची प्रार्थना व्हावी एक । मानवांचा व्यवहार मानवां पूरक । 
राहणी सर्वांची समान सात्विक । सर्वांसाठी ॥७४॥

याचसाठी आटाआटी । करावया पडतो संकष्टीं । 
प्राण तोहि अर्पावा शेवटी । वाटे त्यासि ॥७५॥

ही भूमिका साधुसंतांची । हींच साधनें प्रचारकांची । 
प्रचाराचा कळस सत्यचि । संतपण ॥७६॥

खरे प्रचारक साधुसंत । त्यांनीच कळविला जगाचा हेत । 
सत्य काय, काय असत्य । जगामाजीं ॥७७॥

तेथूनीच प्रचारकांची निर्मीती । प्रचारक सत्य समजावोनि घेती । 
शंकासमाधान ऐकती । मन लावोनि ॥७८॥

जया क्षणी बोध झाला । अंतःकरणीं स्फुरूं लागला । 
त्यासि अभ्यासाने चांगला । बळकट करिती सत्संगीं ॥७९॥

मनन करोनि आत्मसात करिती । मग पुढे तैसीच होय मति । 
एकदा वाणी रंगली सुमती । सरळ चाले माप तिचें ॥८०॥

उत्तम पुरुषाने कान फुंकले । समजा त्याने मंत्रचि घेतले ।
मग वारियापरी प्रचार चाले । प्रचारकाचा ॥८१॥

प्रचारक प्रचारानेच प्रचार करी । त्याचें माप चाले वार्‍यावरि । 
वाहन पोहोचण्याचे अगोदरी । प्रचार धावे तयाचा ॥८२॥

जो जो कोणी जिकडे भेटला । त्यास आपुलें सांगत सुटला । 
पाहणेंचि नाही मेघापरी त्याला । घेतो कोणी की नाही ॥८३॥

फाटका तुटका कोणी दिसो । गरीब-अमीर कोणी असो । 
विद्वान शिक्षित हसो रुसो । प्रचार त्याचा बंद नाही ॥८४॥

कोणी असो कोण्या पंथाचा । आधार देई त्यासीच त्याचा । 
ओघ चालला प्रचाराचा । खळगे भरीत दिसती ते ॥८५॥

जरा मुखवटा डोळयांनी पाहिला । वाचा फुटली प्रचारकाला । 
राघूपरी । बोलत सुटला । होय-नव्हे सर्व कांही ॥८६॥

लोकांनी जरी थांब म्हटलें । तरी याचें कार्य झालें । 
जरा वेळाने पुन्हा चाले । रस्ता करीत शब्द गंगा ॥८७॥

प्रचारकाचे बोल तत्त्ववादी । अचूक धरूनि संशया छेदी । 
टोचक नसतांहि मर्मभेदी । सरस हृदयाचे ॥८८॥

कोणी विरोधक शिव्या देई । हसूनि त्याचे शब्द साही । 
गोड बोलूनि समजावीत जाई । आपुलें म्हणणें ॥८९॥

सहनशीलताचि त्याचें ब्रीद । कधी तोंडी नये अपशब्द । 
जरी झाला वादविवाद । तरी गांभीर्यासि न सोडी ॥९०॥

कोणासि ’ हट ’ न बोलतां । अंगी ठेवोनि सहनशीलता । 
आपलें तत्त्व बोलतां चालतां । समजावोनि दे प्रचारक ॥९१॥

गोड बोलूनि मना वळवी । गांवाच्या सेवेलागी लावी । 
अनंत प्रकारें वृत्ति बरवी । करोनि सोडी ॥९२॥

बिघडलेलें घर सुधरवी । फाटाफूट तेथे संगति जुळवी । 
निर्दयासीहि दया उपजवी । नाना प्रयत्नें ॥९३॥

प्रचारकाची यत्नसाधना । सांगताचि नये एक कोणा । 
नाना प्रकार नाना योजना । प्रचारकापाशीं ॥९४॥

कोठे भजनांतून प्रचार करी । कोठे प्रार्थना करून कानीं भरीं । 
कोठे कथा सांगून मनासि सावरी । प्रचारक ॥९५॥

कोठे कीर्तन प्रवचन करी । तुंबडी पोवाडे नानापरी । 
यात्रा उत्सव हातीं धरी । प्रचारक ॥९६॥

कोठे उद्योगांतून हात घाली । कोठे कलारंजनाने जनता वेधली । 
मनोरंजनांतूनहि चाली । चालावी कोठे ॥९७॥

कोठे व्यायामांतूनहि स्फूर्ति भरली । कोठे पार्टीतहि सभा रंगली । 
कोठे लग्नांतून सुरवात केली । पाहिजे त्याने ॥९८॥

कोठे जन्मतिथि पुण्यतिथि । मौंजीबंधनेंहि न ठेवी रितीं । 
जैसी वेळ पडे प्रचारकप्रति । सर्व करी स्वभाचें ॥९९॥

कोठे शिंपियाचे दुकानीं । कोठे न्हावियाचे सलूनीं । 
ओटी चोहटीं चहूकोनीं । प्रचार चाले ॥१००॥

हाटीं बाजारीं तेंचि करी । तमाशींहि तेंच बोलें वैखरी । 
प्रचारकाची ऐसी बावरी । जिव्हा असे ॥१०१॥

कोठे आईबाईपाशी बैसे । त्याने घरांतील वळवी माणसें । 
काय मार्गाने प्रचारक घुसे । हें तों सांगतां नये कोणा ॥१०२॥

कामांतूनि गाण्यांतूनि । हसण्यांतूनि व्यवनांतूनि । 
चालतां बोलतां प्रचारवाणी । रंगे त्याची ॥१०३॥

प्रचारक असे बालकांत बालक । तरुणासि बोधया तरुण सम्यक । 
वृध्दासि द्यावया अनुभव तात्त्विक । त्याचेपाशीं ॥१०४॥

मुलांत जाऊनि सेवा वाढवी । मुलींमाजीं कला उपजवी । 
तरुण-तरुणी दोघांतहि लावी । गांव-सेवेसि ॥१०५॥

व्यसनाधीनाची धरी संगति । परि नीट करावया त्याची मति । 
डाव न चुके कल्पांर्ती । प्रचारकाचा ॥१०६॥

नाना कला त्याच्या अंगी । जैसी वेळ पडे प्रसंगी । 
रंगवी नाना साधन-रंगीं । प्रचार आपुला ॥१०७॥

तारतम्य ठेवोनि अंतरी । गोड बोलोनि प्रचार करी । 
वाटे टाकली मोहनी बरी । गांवावरि प्रचारकाने ॥१०८॥

तो प्रचारक आवडे सर्वांच्या मनीं । त्यासि बघतांचि पडे मोहनी । 
लोक धावती बोलतांक्षणीं । कार्य कराया गांवाचें ॥१०९॥

हां-हां म्हणतां गांवांत फिरला । सवें लोकांचा थवा घेऊन आला । 
सांगेल तैसे करूं लागला । प्रचारक त्यासि ॥११०॥

ऐसा प्रचारक जादुगार । त्याच्या मुठींत जनसागर । 
नव्या सृष्टीचा कारागीर । साधासुधा ॥१११॥

प्रचारक सर्वांशी बोलणीं पुरे । ज्ञान अंगी त्याच्या संचरे । 
रोमरोमांत-वैराग्य अंकुरें । दिसती तयाच्या ॥११२॥

म्हणोनि असे आकर्षण । लोक धावूनि येती पक्ष्यासमान । 
करावया गांव स्वयंपूर्ण । प्रचारकचि पाहिजे ॥११३॥

त्याचे अंगी महान निश्चय । जें संकल्पील घेईल ठाय । 
नाना करोनि उपाय । साधील त्यासि ॥११४॥

त्याचा प्रचार महाप्रबल । चालतसे सर्वस्पर्शी सर्वकाल । 
प्रचाराविण एकहि बोल । न निघे त्याचा ॥११५॥

’काय करावें’ हेंचि बोलणें । न करावें तें तें कांहीच न जाणे । 
’नाही’ हें बोलणेंचि उणें । त्यांच्या जीवनकोश ॥११६॥

काय नाही आमुच्या गांवी । त्यासि ही वदंताच कळावी । 
हातीं घेतां करोनि दावी । पूर्तींच त्याची ॥११७॥

नसलें तें तें उभें करी । लोकजीवनाची कलाकुसरी । 
चेतना जीवा-जीवांत भरी । सत्कार्याची ॥११८॥

ज्याचा प्रचार हाती धरला । समजोनि जावें पूर्ण केला । 
नाहीतरि आपणचि मेला । समजावा प्रचारक ॥११९॥

म्हणोनि बोललों गांवाचें अधिष्ठान । प्रथम पाहिजे प्रचारक महान । 
जी जी असेल ती उणीव भरोन । काढावया गांवाची ॥१२०॥

सारांश प्रचारक ज्या गांवी । तेथे दुसरी पंढरी जाणावी । 
जना मना पाषाणा नाचवी । आनंदाने ॥१२१॥

ऐसे प्रचारक निवडा गांवी । मग गांव नांदेल वैभवीं । 
सेवामंडळे स्थापूनि द्यावीं । सेवेसाठी ॥१२२॥

ऐसे गांव ज्यांनी केलें । तेचि कीर्तिवंत होती भले । 
म्हणोनि पाहिजे आरंभिले । प्रचारकार्य ॥१२३॥

त्यासाठी पुनः पुन्हा बोललों । प्रचारक करावयासि लागलों । 
प्रचारकांकरवी झालों । दास सर्व लोकांचा ॥१२४॥

निश्चयें ग्राम निर्मावया । प्रचारक हाचि मुख्य पाया । 
ग्रामगीताहि याच कार्या । निर्माण केली तुकडया म्हणे ॥१२५॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु शास्त्र स्वानुभव-संमत । 
कथिला प्रचारमहिमा येथ । आठवा अध्याय संपूर्ण ॥१२६॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥