वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय दुसरा

ग्रामगीता

अध्याय दुसरा : धर्माध्ययन

॥ श्रीगुरूदेवाय नम : ॥

देवें निर्माण केली क्षिती । प्रजा वाढवी प्रजापति ।
मानवसमाज राहाया सुस्थितीं । धर्म सकळां निवेदिला ॥१॥

’धर्म ’ बोलावया शध्द एक । परि त्याचा विस्तार अलौकिक ।
लौकिक आणि पारमार्थिक । मिळोनिया ॥२॥

अनेक प्राणी जेथे राहती । त्या सर्वांची राहावी सुस्थिती ।
समान समाधानाची गति । त्यास धर्म म्हणावें ॥३॥

आत्मरूपाची धारणा । सर्वांठायी समभावना ।
विश्वकुटुंब ऐशा आचरणा । धर्म म्हणावे निश्चयें ॥४॥

आपुली साधावी उन्नति । सौख्य द्यावे इतरांप्रति ।
या उद्देशे जी जी संस्कृति । धर्म म्हणावे तिजलागी ॥५॥

परस्परांशी वागणूक । ज्यांत न्याय – नीति सम्यक ।
प्रत्येकांचे कर्तव्य चोख । धर्म ऐसें त्या नांव ॥६॥

कोणाचा द्रोह न करून । करावा ऐहिक उत्कर्ष पूर्ण ।
साधावे आत्मसमाधान । हाचि बाणा धर्माचा ॥७॥

सर्वांस असावा संतोष । दुःख न व्हावें प्राणीमात्रास ।
याचा सक्रिय कराया अभ्यास । धर्मनीति बोलली ॥८॥

भिन्न लोकांची भिन्न कामें । मिळोनी पुरती जीवनकर्मे ।
असोत भिन्न गुण भिन्न नामें । परि सुख सर्वांचे सहकारीं ॥९॥

नको सत्तेचा बडगा त्यासि । नको दंडभय सत्कर्मासि ।
आपापले कर्म सर्वासि । धर्म शिकवी सर्वांगें ॥१०॥

धार्मिक त्यासचि म्हणावें । सत्तेवाचूनि वागे बरवें । 
स्वयें आपुल्याचि स्वभावें । समरस होई सर्वांशी ॥११॥

नको वैद्य अथवा डॉक्टर । आपणचि राहे आरोग्यतत्पर । 
नको वकील न्यायाधीश दंडधर । न्यायव्यवहार सहजचि ॥१२॥

नको धाक तरवारीचा । चुकीस्तव तळमळे आत्मा साचा । 
साक्ष देतो अंकुश देवाचा । अंतरामाजीं ॥१३॥

ऐसें ज्याचे हृदयीं स्फुरण । तोचि खरा धर्मवान । 
बाह्य अवडंबर धर्मचिहन । तें तें गौण , धर्म नव्हे ॥१४॥

शुध्द सात्विकता प्रकट करावी । लौकिकीं तीच जागवावी । 
आपुल्या चारित्र्याने सांभाळावी । सुव्यवस्था जगाची ॥१५॥

व्यक्तिधर्म , कुटुंबधर्म । समाजधर्म , गांवधर्म । 
बळकट होई राष्ट्र्धर्म । प्रगतिपथाचा ॥१६॥

व्यक्ति व्हावी कुटुंबपूरक । कुटुंब व्हावें समाजपोषक । 
तैसेंचि ग्राम व्हावें राष्ट्रसहाय़क । राष्ट्र विश्वाशांतिदायी ॥१७॥

याकरितां जी जी रचना । तियेसि धर्म म्हणती जाणा । 
देशद्रोह अधार्मिकपणा । एकाच अर्थी ॥१८॥

मुख्य धर्माचें लक्षण । त्याग अहिंसा सत्य पूर्ण । 
अपरिग्रह ब्रम्हचर्य जाण । तारतम्ययुक्त ॥१९॥

निर्भयता शरीरश्रम । परस्परांशी अभेद प्रेम । 
पूरक व्हावया विद्या सत्कर्म । सकलांसाठी ॥२०॥

सर्व विश्वची व्हावें सुखी । ही धर्माची दृष्टी नेटकी । 
ती आणावी सर्व गांवलोकीं । तरीच लाभ ॥२१॥

विश्वाचा घटक देश । गांव हाचि देशाचा अंश । 
गांवाचा मूळपाया माणूस । त्यासि करावें धार्मिक ॥२२॥

व्यक्तिधर्म सर्वां कळावा । कुटुंबधर्म आचरणी यावा । 
ग्रामधर्म अंगी बाणावा । राष्ट्रधर्माच्या धारणेने ॥२३॥

व्यक्ति – व्यक्ति व्हावी धार्मिक । धर्म नव्हे एकांगी लटक । 
भौतिक आणि पारमार्थिक । विकास व्हावा सर्वांचा ॥२४॥

प्रत्येकासि शरीर , मन । वाणी , इंद्रियें , बुध्दि , प्राण ।
या सर्वांचें विकास साधन । तोचि धर्म ॥२५॥

ऐशा सदधर्माचें ज्ञान । आधी प्राप्त व्हावें सर्वांगीण । 
मगचि त्यासारिखे जीवन । जगतां येई या लोकीं ॥२६॥

यासाठीच आश्रमव्यवस्था । पूर्वजांची उत्तम प्रथा । 
आरंभी मिळे धर्माची संथा । पुढे जीवन धर्ममय ॥२७॥

मानव पशूयोनींतूनि आला । नराचा नारायण होणें त्याला । 
यासाठी संस्कार देऊनि सावरिला । क्रमाक्रमाने ॥२८॥

मानवाकडोनि जें जें घडतें । तें बरें – वाईट दोन्ही होतें । 
त्यांतूनि निवडावे लागतें । पापपुण्य ॥२९॥

त्यांचे सुधारोनि आचरण । द्यावें लागतें नवें वळण । 
जेणें आपलें करील उध्दरण । इतरां सहायक होऊनि ॥३०॥

यासाठी धर्मे नेमिले संस्कार । आश्रम गोविले जीवनीं चार । 
आयुष्य कल्पूनि वर्षे शंभर । विभागलें ते उन्नतिस्तव ॥३१॥

मानवजीवनीं करितां पर्दापण । ब्रम्हचर्याश्रम लागे जाण । 
जो सर्व आश्रमांचें मूलस्थान । पाया म्हणावा जीवनाचा ॥३२॥

ज्याचा ब्रह्मचर्याश्रम साधला । त्याचा पुढील काळ सुखी गेला । 
मग प्रत्येक आश्रम त्याला । उत्कर्षदायी होतसे ॥३३॥

या ब्रह्मचर्याश्रमचें साधन । चाले गर्भधारणेपासून । 
पोटांतचि असतां जीव पडोन । जतन करावा संस्कारें ॥३४॥

संस्कार दुष्परिणामकारी । न पडावे आंतील गर्भावरि । 
म्हणोनी मातापित्यांनी सदाचारी । राहावे सदभावें ॥३५॥

न करावें अश्लील भाषण । न बघावें दृष्य हीन । 
न राहावे व्यसनाधीन । दुर्गुणी अन्न न खावें ॥३६॥

आहारविहार सात्विक पूर्ण । उत्तमगुणी चिंतन वाचन । 
न ऐकावे शॄंगारगाय़न । गर्भवतीस घेवोनि ॥३७॥

येथोनि पाहिजे जतन केलें । पुढे मूल जन्मासि आलें । 
तेव्हापासूनि संस्कार घडले । पाहिजेत सत्कर्माचे ॥३८॥

घरीं पुत्ररत्न जन्मलें । कांही दिवस त्याचें कौतुक केलें । 
परि जन पुढे पाहूं लागले । कर्तव्य तयाचें ॥३९॥

मुलगा काय खेळणें खेळतो । काय बघतो कोठे जातो । 
कैसा बोलतो चालतो गातो । पाहती जन ॥४०॥

मुलास जैसें कळों लागलें । तैसें त्यास सांभाळणें अवश्य झालें । 
त्याचे समोर न पाहिजे बोलिले । दुर्विषय कोणीं ॥४१॥

त्यावरि उत्तम संस्कार घडावे । म्हणोनीच व्रतबंधादि बरवे । 
शिकवावे पाठ करोनि घ्यावे । उत्तम विषय ॥४२॥

मग जो तो त्यासि म्हणे । काय रे ! केलें की नाही वाचणे ? । 
कैसा फिरतोसि रानेंवनें । वेडया – पिशांसारिखा ? ॥४३॥

तुज नाही का संस्कार । घडावया सदगुणी व्यवहार ? । 
काय करिती पालक चतुर ? लक्ष नाही तुझ्यावरि ॥४४॥

सांगितली नाही का स्नानसंध्या । स्मरावयासि जगदवंद्या ? । 
नमस्कारिलें नाहीस का प्रतिपाद्यां । सकाळींसायंकाळी जाऊनि ? ॥४५॥

मग का फिरतोसि रानावना ? कैसा होशील शहाणा ? । 
उपदेश देती ऐसा , सदगुणा । वाढवाया जन थोर ॥४६॥

घडावया उत्तम संस्कार मायबाप शिकविती सदाचार । 
व्हावया उत्तम गुणी चतुर । मोठेपणी ॥४७॥

आठवर्षांचें आंतचि त्याला । पाहिजे उपनयन संस्कार केला । 
तोहि नको रूढीचा बांधला । नाटक नुसतें बटूचें ॥४८॥

उपनयन म्हणजे विद्येचें व्रत । ब्रह्मचर्याश्रमाची सुरुवात । 
गुरुजवळी करणें समर्पित । जीवन त्याचें घडवावय़ा ॥४९॥

तोहि गुरु असावा ब्रह्मचारी । अथवा वानप्रस्थ तरी ।
त्याने घ्यावी काळजी पुरी । मुलांचिया ब्रह्मचर्याची ॥५०॥

त्याचें राहणें खाणें पिणें । खेळ खेळणें ग्रंथ वाचणे । 
लक्ष ठेवावें आचार्याने । मनोरंजनादिकावरि ॥५१॥

जरा चुकलिया चुकतचि जातें । मग सावरेना कांही केल्य़ा तें । 
इंद्रियां वळण जैसे लागतें । तैसेंचि होतें जन्मभरि ॥५२॥

म्हणूनि गुरुआश्रमीं नियम । प्रत्येक आचरणी संयम । 
छात्रालयी हीच उत्तम । दॄष्टी असावी सर्वत्र ॥५३॥

मुलगा अभ्यासा लागला । कीं सात्विक खाणें असावें त्याला । 
खारट आंबट तिखट मसाला । देऊं नये भोजनीं ॥५४॥

चमचमीत चुरचुरीत । अति मधुर तळीव पदार्थ । 
अथवा रुक्ष कृत्रिम मिश्रित । भोजनासि न द्यावें ॥५५॥

साधें ताजे अन्न द्यावें । वेळेवरि झोपवावें जागवावें ।
झोपतां जागतां जवळी नसावें । स्पर्शणारें कोणी ॥५६॥

कराया लावावें प्रातर्ध्यान । सांयकाळीं प्रार्थना पूर्ण ।
झोपतां जागतां चिंतन । आदर्श महापुरूषांचें ॥५७॥

नित्य नियमें उषःपान । सुर्यनमस्कार आसन । 
पोहणें आणि निंबसेवन । आरोग्यदायी जें सोपें ॥५८॥

शीतजलें करवावें स्नान । सकाळीं रानींवनीं गमन । 
करवावें नेहमी पठणपाठण । चारित्र्यवंतांचें ॥५९॥

शौकिन राहणी वर्जावी । सुगंधी अत्तरें फुलेंहि त्यजावीं । 
कोणी बाल न ठेवी तेल न लावी । ऐसें करावें ॥६०॥

बघूं न द्यावें दर्पणीं तोंड । वाढूं न द्यावें पोषाखाचें बंड । 
पान बिडी चहाचे थोतांड । सर्वतोपरी वर्जावें ॥६१॥

कोणीहि न घ्यावे मादक द्रव्य । तोंडी नसावें नाटकीं काव्य ।
समजावूनि द्यावें सेव्यासेव्य । उपवासहि करवावा ॥६२॥

कराया सांगावें आपुलें काम । दुसर्‍यासाठीहि परिश्रम । 
शिकवावें बंधुभगिनी – प्रेम । सेवाधर्म शिकवावा ॥६३॥

बसवूं नये मुलींसह शिक्षणीं । तेथे संमिश्र नाटकें कोठोनि ? । 
स्त्रैणांसंगती शृंगारगायनी । क्षणभरीहि बसों न द्यावें ॥६४॥

मुलाचें वय जसजसें वाढे । तोडावे स्त्रियाचें संबंध गाढे । 
नेहमी चरित्रवंतांचे धडे । द्यावेत तयासि ॥६५॥

विवाहादि कार्ये न दाखवावीं । शॄंगारकाव्यें न शिकवावीं । 
व्यायामदंगलीं खेळवावी । मुले निर्भयत्वें ॥६६॥

अश्लीलता कोठेहि न दिसावी । दिनचर्या आदर्श असावी । 
सकाळीं सायंकाळी द्यावीं । बौध्दिकें ब्रह्मचर्याची ॥६७॥

सांगावे ब्रह्मचर्याचें महिमान । ब्रह्मचर्याचा उद्देश कोण । 
काय सेविल्या होतें रक्षण । ब्रह्मचर्याचें ॥६८॥

ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माचरण । ब्रह्मतेजाचें साधन । 
विद्याप्राप्तीचें वर्तन । वीर्यरक्षण ब्रह्मचर्य ॥६९॥

ब्रह्मचर्यासमान कोण । जगीं महत्त्वाचें साधन ? । 
जो ब्रह्मचर्य करी पालन । तो देवासमान होतसे ॥७०॥

रिध्दिसिध्दी त्याच्या दासी । देव धांवती त्याच्या हांकेसि । 
सूर्यासमान कांति तयासि । लाभतसे निरोगी ॥७१॥

भीष्मचा व्रतनिश्चय । कार्तिकेयाचें चातुर्य । 
शुकाचा ज्ञानयोग निर्भय । लाभे ब्रह्मचर्याने ॥७२॥

अवधूताची दृष्टी विशाल । हनुमंताचे महाबल । 
ब्रह्मचारी पावे महाचपल । वज्रदेह ॥७३॥

सर्व बळांत वीर्यबळ । वीर्य नाही तो दरिद्री दुर्बळ । 
रोगांचिया मुखींचा कवळ । नेहमी होतो ॥७४॥

ज्याने वीर्य सांभाळलें । यश तयासि माळ घाले । 
वीर्य क्षीण होतां मॄत्युने केले । शिकार त्यासि ॥७५॥

वीर्यअंगी आहे ओज । वीर्याअंगी नवें तेज । 
वीर्याअंगी आरोग्यबीज । बुध्दिसामर्थ्यहि ॥७६॥

ऐका वीर्य कैसें बनतें । चाळीस शेर अन्न पचतें ।
त्याचें एक शेर रक्त होतें । वीर्य त्याचें दोन तोळे ॥७७॥

पुरुष रोज एक शेर जेवला । तरी एक महिना तीस शेरांला । 
त्यांत दीड तोळा उपजला । वीर्यरसबिंदु ॥७८॥

तो नष्ट होय एका क्षणीं । केवढी थोर केली हानि ! 
द्रव्य मिळविलें कष्ट करोनि । केली धुळधाणी हौसेने ॥७९॥

ब्रह्मचारी पतन पावला । महिन्याची कमाई खोवतो क्षणाला ।
केवढा हा तोटा झाला । आयुष्याचा ? ॥८०॥

सातां दिशा अन्नरस होई । तो साता दिसां रक्तपण घेई । 
रक्तामधूनि मांस होई । थोडें थोडें ॥८१॥

त्यांतूनि मेद आणि हाडें ।साता दिसां मज्जा वाढे । 
मग वीर्य निपजे थोडथोडें । सप्ताहानंतरी ॥८२॥

बेचाळीस दिवसानंतर । वीर्य शुक्रधातु शक्तिकर । 
त्यासि किती प्रयास दिवसरात्र । अन्नखर्च कितीतरी ॥८३॥

तें अमोल वीर्य देहातील रत्न । ज्यावरि देहाचें जीवन । 
ते आरोग्यदायी अमृतकण । तेज वाढे रोमरोमीं ॥८४॥

म्हणून यासि सांभाळावे । ओज सामर्थ्य वाढवावें । 
सूर्यचंद्रापरी शोभावें । ब्रह्मचर्याने ॥८५॥

ऐसें शिकवावें बाळां तरुणां । बौध्दिक द्यावें सर्व जना । 
बुध्दि बनतां वेळ लागेना । जीवन आदर्श व्हावया ॥८६॥

गुरुजनीं ऐसे द्यावेत धडे । आपुला आदर्श ठेवोनि पुढे । 
विद्यार्थी तयार होतां चहूकडे । राष्ट्र होई तेजस्वी ॥८७॥

चोवीस वर्षे ऐसीं गेलीं । त्याची जीवन – सफलता झाली । 
गृहस्थपणें गुढी उभारली । सत्कार्याची त्यापुढे ॥८८॥

ब्रह्मचारी घे गृहस्थपण । शंभर वर्षे जगे तयाचें संतान । 
रोगराई दुबळेपण । तया न बाधे सर्वथा ॥८९॥

यानेच गांव होईल आदर्श । बलवान बनेल सर्व देश । 
मानवासमाजाचा उत्कर्ष । होईल सर्वतोपरी ॥९०॥

हें साधाया पहिला उपक्रम । पाहिजे ब्रह्मचर्याश्रम । 
जेणें प्रजा होई कार्यक्षम । स्वतःसाठी तैसी राष्ट्रासाठी ॥९१॥

राष्ट्रासाठी जीवन बनविणें । त्यासि चारित्र्ययोग संपादणे । 
आरोग्यबल शरीरीं राखणें । ब्रह्मचर्यायोगें ॥९२॥

परस्परांत प्रेम राखणें । समाजाकरितां तत्पर होणें । 
त्यासाठीहि आधी जीवन बनविणे । हाचि पाया आवश्यक ॥९३॥

जे हे नियम मुलांसाठी । तीच मुलींकरितां रहाटी । 
वयाचीच मुख्य़ विषमता पोटी । राही तयांच्या ॥९४॥

भारतीं झाल्या ब्रह्मचारिणी । विद्यासंपन्न तेजस्विनी । 
त्यांचे आश्रम स्वतंत्र स्थानी । आदर्शरूप ॥९५॥

जोंवरि हे होते आश्रम । तोंवरि राष्ट्र बलवान उत्तम । 
वाढूनि व्यसनें विषयप्रेम । पतन झाले समाजाचें ॥९६॥

धर्माचा पाया विद्यार्थीधर्म । तयासाठी ब्रह्मचर्याश्रम ।
त्यानेच जीवन होईल उत्तम । व्यक्तीचें आणि राष्ट्राचें ॥९७॥

म्हणोनि साधा या व्रतनियमाला । असेचि आश्रम काढा गांवाला । 
शिकवा आपुल्या भावी पिढीला । लक्ष देऊनि मित्रहो ! ॥९८॥

मी हें जाणतो मागील वर्म । त्याकाळीं सुलभ श्रध्दा संयम । 
तैसे आज करितां आश्रम । कठीण जाईल गांवासि ॥९९॥

उपभोग सकलांचे वाढले । राहणीमाजीं अंतर पडलें । 
सभोवताली तार चढले । विषयसतारीचे ॥१००॥

मुलींचें विद्यालय अलग नाही । विधवाहि शृंगाराविण न राही । 
धाक कोणाचा कोणाहि । उरला दिसेना ॥१०१॥

नटवेष घुसले जीवनीं । भुलविलें चित्रपट – कादंबर्‍यांनी । 
अध्यापक तोचि विलासी व्यसनी । शॄंगारकाव्य शिकवितो ॥१०२॥

रस्तोरस्तीं खाद्य पेयें । वैभवशाली विद्यालयें । 
चैन हेंच जणू जीवन ध्येय । कोणीं सोय लावावी कोणा ? ॥१०३॥

ऐसे वातावरण जरी असलें । तरी ह्रदयवंताने पाहिजे सुधारलें । 
आपुलें गांव बिघडू दिलें । ऐसे न करावें सुज्ञाने ॥१०४॥

नियमित मुलांचें वर्तन । नियमित ठेवावें खानपान । 
नियमित ब्रह्मचर्याचें पालन । घडलेंच पाहिजे ॥१०५॥

सर्व भुक्तिमुक्तिसि कारण । असे ब्रह्मचर्य धर्मज्ञान । 
म्हणोनि विनवितों श्रोतेजन । इकडे दुर्लक्ष न व्हावें ॥१०६॥

ऐसे साधाल जेवढयापरीं । संतान बळकट होई संसारीं । 
गांवाचे स्वास्थ वाढेल निर्धारीं । तुकडया म्हणे ॥१०७॥

इति श्री ग्रामगीता ग्रंथ । गुरू – शास्त्र – स्वानुभव – समंत । 
धर्म ब्रह्मचर्य निवेदिले येथ । दुसरा अध्याय संपूर्ण ॥१०८॥

॥ सद्गुरूनाथ महाराज की जय ॥