वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय तिसरा

ग्रामगीता 

अध्याय तिसरा : आश्रमधर्म

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

श्रोतियांनी प्रश्न केला । मागे ब्रह्मचर्याश्रम निरूपला ।
जीवन -विकासाचा बोलिला। पाया धर्ममय ॥१॥

तेथे संशय उपन्न झाला । काय ब्रह्मचारी राहणें सर्वांला ?
मग संसाराचा उलाढाला । कोणी करावा ? ॥२॥

यांचें उत्तर आहे सोपें । जग चाले कोणाच्या प्रतापें ?
आपुलेंच रडें आपणा न संपे । म्हणे जगाचें कैसे होय ? ॥३॥

अरे ! तुम्हांस याची चिंता कशाला ? तें पाहूं द्या निर्मीत्याला ।
तुम्ही साधलिया साधा व्रताला । ब्रह्मचर्याच्या ॥४॥

नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळा । परंतु अधःपात टाळा ।
वृत्ति आठवे विषयचाळा । तरि सांभाळा गॄहधर्म ॥५॥

चोवीस वर्षे ब्रह्मचर्य । नियमें सांभाळिले वीर्य ।
तरि याने का खुंटेल कार्य । संसाराचे ? ॥६॥

मुलगा जरा वयांत आला । हवें तैसे वागूं लागला ।
बाळपणीच भोगी तारूण्याला । जन्म गेला दुःखीं मग ॥७॥

ऐसे क्षयी श्वानसूकर । दुबळे पाप्याचे पितर ।
यांनी होईल का संसार । कधी सुखाचा ? ॥८॥

त्याचें जीवन म्हणजे पाप । त्याचा संसार म्हणजे ताप ।
त्यांचें संतान म्हणजे शाप । संसारासि ॥९॥

संसार सर्व सुखी व्हावा । आपुलाहि उध्दार घडावा ।
यास्तव ब्रह्मचर्याचा ठेवा । साधलाचि पाहिजे ॥१०॥

संसारपंथ न मोडावा । प्रजातंतु न खंडावा ।
म्हणोनि ब्रह्मचार्‍याने साधावा । गॄहस्थाश्रम ॥११॥

ध्यानीं घेवोनि निसर्गनियम । धर्मे योजिला गृहस्थाश्रम । 
ज्याने व्यक्ति -गांव -राष्ट्र उत्तम । धारणेंत चाले ॥१२॥

इंद्रियांची दुर्धर गति । ती लागेना सहज हातीं ।
पुढे होऊ नये फजीती । म्हणोनि यावें या मार्गी ॥१३॥

येरव्ही लग्न केलेंचि पाहिजे । त्याविण कार्यचि न साजे ।
ऐसा आग्रह धरतील जे । ते व्यर्थवादी ॥१४॥

जयासि साधे इंद्रियदमन । वृत्ति सत्कार्यी रमे पूर्ण ।
त्याने केलेंचि पाहिजे लग्न । ऐसें नाही ॥१५॥

परि संसार न करितां विरागी होय । त्यासि आहे महाभय ।
सेवासाधनाहि कठिण जाय । बिकट आहे मार्ग तो ॥१६॥

मुक्याने वेद अभ्यासावे । लंगडयाने पर्वतीं चढावें ।
आधंळ्याने युध्द करावें । तैसे कठिण ब्रह्मचर्य ॥१७॥

हें साधणें सोपें नाही । तैसीच ही निसर्गाशीं लढाई ।
म्हणोनि त्याचा राजमार्ग तोहि । कथिला धर्मे ॥१८॥

मुलगा धर्मविद्या शिकला । अभ्यासाने सदगुणी झाला । 
शक्तियुक्तींनी उंबरठा गांठला । तारुण्याचा ॥१९॥

घडलें निष्ठावंत ब्रह्मचर्य । शरीरीं प्रगटलें ओजवीर्य । 
निसर्गेचि झालें अनिवार्य । लग्न करणें ॥२०॥

न जाणों लग्नासि झाला उशीर । घडेल झणी दुर्व्यवहार ।
म्हणोनि वडील होती चिंतातुर । मुलासाठी ॥२१॥

योग्य देती लग्नसंस्कार । बालपणाचा पाडोनि विसर ।
करिती तया जबाबदार । दीक्षा देवोनि संसाराची ॥२२॥

गृहस्थाचा काय धर्म । कोणतें आचरण काय वर्म ।
कैसें आचरावें कर्म । गृहस्थाश्रमा शिकविती ॥२३॥

आजवरि होता ब्रह्मचारी । आता वाढली जबाबदारी ।
पत्नी येंता आपुल्या घरी । घरचि लागे साधावें ॥२४॥

मागे विद्यार्जनाचा व्यवहार । पुढे पाऊल पडे कामावर ।
म्हणोनि सावध – सावधान सत्वर । बोलती ज्ञाते ॥२५॥

निधि घेऊनि ज्ञानाचा । मार्ग सुधारावा जीवनाचा । 
धर्म साधावा कुटुंब -राष्ट्राचा । याचसाठी सावधान ॥२६॥

प्रकृतीचा संयोग दिला । व्यक्तीने कुटुंबरूपें विकास केला ।
तेणें घराचा भाग पडला । अंगावरि ॥२७॥

कैसे घडेल उद्योग करणें । आपुला सर्वांचा निर्वाह साधणें ।
लग्नसंस्कारें लाविली बंधनें । समाजधर्माचीं ॥२८॥

एकपत्नीव्रता घ्यावें । वाईट कुणाकडे न बघावें ।
हेंच निश्चयाने शिकवावें । लागे तया ॥२९॥

काहीं घडतां दुर्व्यवहार । कलंक लागे घराण्यावर ।
म्हणतील मुलगा कुलांगार । जन्मा आला ॥३०॥

याच कारणासि जपावें । सात्विक मार्गां अवलंबावें ।
संती सांगितले जें बरवें । तेंचि करावें सर्वथा ॥३१॥

एकांतीं लोकांती स्त्री पाहोन । होऊं न द्यावें वृत्तीचें उत्थान ।
प्राण गेलियाहि अमोल जीवन । खोंवू नये कुमार्गीं ॥३२॥

एका पत्नीसि शास्त्रें नेमिलें । ऐशा गृहस्थाश्रमीं राहिलें ।
तरी तो ब्रह्मचारीच म्हणविलें । पाहिजे आम्हीं ॥३३॥

गृहस्थाश्रम जरी घेतला । पथ्याने विषयीं वागला ।
तरी तो ब्रह्मचारीच समजला । जातो गृहस्थ ॥३४॥

त्यासाठीं उभयतांनी पाळावा संयम । कारणाविण नको समागम ।
येरव्ही आपले व्रतनियम । दोघांनीहि आचरावें ॥३५॥

संतानाकरितांच वीर्य देणे । येरव्ही आपुलें ब्रीद रक्षिणें ।
ऐसें साधलें जीवन ज्याने । महान तपस्वी ॥३६॥

अहो ! लग्न जरी केलें । तरी विषय-दास्य नाही सांगितलें ।
जन्म निभवावयासि मिळविले । साथीदार लग्नाने ॥३७॥

जिंकावया कामवृत्ति । पत्नी , नव्हे वाढवाया ती ।
उत्तममार्गे मिळवावी संपत्ति । तीहि आसक्ति जिंकाया ॥३८॥

जीवन -शक्ति एक झाली । तेणें सुकीर्ति प्रकाश पावली ।
सतकार्य -कळी उमलों लागली । ऐसें व्हावें ॥३९॥

सुख व्हावें मातापित्यासि । बंधुभगिनी आणि इतरांसि ।
वागण्याची रीति ऐसी । मोह पाडी सर्वांना ॥४०॥

मोकळें बोलणें गोजिरवाणें । चाल चालणें चारित्र्याने ।
जीवन कंठणे उज्ज्वलतेने । थोरामोठयांचें पाहूनि ॥४१॥

संतॠषींनी कथिले ज्ञान । त्याचें करणें अध्ययन ।
यानेच फिटेल ॠषिॠण ।गृहस्थाचें ॥४२॥

संतान करावें आदर्श साचें । तरि ॠण फिटे मातापित्याचें ।
अथवा आपणचि नाम वाढवावें तयांचें । देशसेवेने ॥४३॥

विश्वीं देव जाणूनि सेवावा । तोचि वैश्वदेव बरवा ।
प्राणीमात्रासि वाटा द्यावा । हाचि यज्ञ पावन ॥४४॥

यानेचि फिटे देवॠण । गृहस्थाश्रमी सर्वांचें जीवन ।
संतोषवावे दीन दुःखी जन । सेवाभावें ॥४५॥

उचित करावी कुटुंबसेवा । जीवसेवा , ग्रामसेवा ।
ध्यानधारणेचा ठेवा । त्रिकाळ नेमिला सर्वांसि ॥४६॥

गृहस्थाश्रमीं ऐसें वर्तलें । अतिमहत्त्व जीवना आलें ।
साधुसंती गौरविलें । ऐशा गृहस्थाश्रम ॥४७॥

असो कोणताहि आश्रम । त्यांत मुख्य असे संयम ।
विकासाचा वाढता क्रम । त्यागबुध्दीच्या ॥४८॥

गृहस्थासि संतान झाले । उपभोगाचें पारणें फिटलें ।
पुढे संस्कार बळावले । त्यागवृत्तीचे ॥४९॥

आपुली असली -नसली हौस । वाहे मंद सावकाश ।
सुख व्हावें पुत्ररत्नास । वाटे पित्यासि ॥५०॥

आपणासि आवडे घास । तो राखून देई तयास ।
दुसर्‍याच्या सुखार्थ भोगी त्रास । हें शिक्षण गृहधर्मी ॥५१॥

त्याच्या गुणात आपुलें भुषण । त्याच्या कीर्तीत समाधान ।
तो वाईट होतां दुषण । लागेल आम्हां ॥५२॥

ऐसी धरोनि दूरदृष्टी । व्हावें लागे त्यासाठी कष्टी ।
प्रसंग पडतां उठाउठी । धांवूनि झेली स्वतःवरि ॥५३॥

परि आपुल्या पुत्राकारणें । कोणावरि अन्याय न करणें ।
आपुल्या ऐसींच समजणें । मुलें सर्वांचीं ॥५४॥

सर्वांकरितांच झटावें । ऐसें व्यापकपण साधावें।
हेंच गृहस्थाश्रमीं शिकावें । लागे तत्व ॥५५॥

पुत्रावरि दया करी । तीच दासदासीवरि । 
पंक्ति प्रपंच नाही अंतरी । तोचि धन्य गृहधर्म ॥५६॥

पुत्र शिकून मोठा झाला । एक होता दुसराहि जन्मला । 
तिसरा होतांचि संसार संपला । पाहिजे पित्याचा ॥५७॥

न संपतां मग यातना । भोगाव्या लागताति नाना । 
वानप्रस्थाश्रम म्हणोनिच जाणा । योजिला धर्मसंस्कारें ॥५८॥

ऐसें जयाने साधलें । त्यासीच ’पुरूष’ म्हणणें शोभलें । 
येरव्ही ते विषयी झाले । गधे घोडे वानर ॥५९॥

मीं तों ऐसें नवल पाहिले । एकाने चाळीस विवाह केले । 
त्यास साठ पुत्र झाले । ते राहिले शेतावरि ॥६०॥

एका शेतावरि एक पत्नी । चिमण्या हाकली महाराणी ।
लग्न म्हणजे आमदानी । जंगलीजेठांची ॥६१॥

असा हा संसाराचा तमाशा । वारे संसाराची आशा । 
सगळया आयुष्याची दुर्दशा । वासनेपायीं ॥६२॥

काहीं दोनचार स्त्रिया करिती । आयुष्य सर्वांचे नागविती । 
ही तों आहे पशुवृत्ति । गृहस्थाश्रम म्हणों नये ॥६३॥

पुरुषा बहुपत्नींचा अधिकार । स्त्रियांनी कां न करावे चार ? 
हा दुर्गतीचाचि विचार । दोघांचाहि ॥६४॥

एका स्त्रियेसि दहा पति । अजूनहि कोठे असे ही रीति ।
त्या माऊलीची कोण गति । देव जाणे ॥६५॥

हा सर्व अज्ञानाचा पसारा । वाढवाल तेवढा वाढे भारा । 
म्हणोनि आळा या विकारा । घातलाचि पाहिजे ॥६६॥

एकदा एक पत्नी केली । पुढे पत्नीची भाषाचि संपली । 
तरीच दोघांनाहि लाभली । शांति संसारी ॥६७॥

संसार सदाचाच अपूर्ण । विकारी नसे समाधान । 
ऐसी गाठीं बांधोनि खूण । विचारें सुख साधावें ॥६८॥

दोघांचें व्हावें एक मन । तेथेचि नांदे स्वर्ग पूर्ण । 
होतां आदर्श संतान । पांग फेडील देशाचा ॥६९॥

यावरि श्रोतीं विचारलें । संतानासाठी लग्न नेमिलें । 
परि एका स्त्रियेसि संतान न झालें । म्हणूनि केलें दुजें लग्न ॥७०॥

त्यासि निषधिलें आपण । आता सांगा न होतां संतान । 
कैसें फिटूं शकेल ऋण । देशाचें आणि वडिलांचें ? ॥७१॥

लग्न केलियाहि वरि । पुत्र न होतां उदरीं ।
म्हणती त्यास अधोगति सारी । प्राप्त होते ॥७२॥

याचें उत्तर यथार्थ ऐका । हा समजचि वेडयासारखा । 
सेवेने ज्ञानाने मुक्तिसुखां । प्राप्त होतो कोणीहि ॥७३॥

पुत्र न होतांचि एक । संन्यासी ब्रह्मचारी कित्येक । 
तरले ऋषिमुनि संत देख । बुडालीं अनेक श्वानसूकरें ॥७४॥

’निपुत्रिकास अधोगति’ । ऐसें जे ग्रंथवेत्ते म्हणती । 
त्यांच्या म्हणण्याची निष्पत्ति । दुसरी होती ॥७५॥

भारतीं ऐसा काळ आला । संन्यास देती ज्याला त्याला ।
महत्त्व न द्यावें लग्नकार्याला । ऐसें झाले ॥७६॥

ज्यानें त्याने तप करावें । ऐसें धरलें बहुतांच्या जीवें ।
म्हणोनि हें बंधन घालावें । लागलें ग्रंथकर्त्यां ॥७७॥

पुत्र व्हावा कुल -उध्दारी । येरव्ही ती वाझंचि बरी ।
ऐसेंहि बोलिलें निर्धारी । ग्रंथामाजीं ॥७८॥

यांतूनि हाच निघे सार । समाजधारणेसाठी संसार ।
पुत्र नसतांहि होतो उध्दार । प्रयत्नशील गृहस्थाचा ॥७९॥

समाजाच्या उनत्तीचें सुत्र । खंडूं न द्यावें सर्वत्र ।
यासि पूरक तोच योग्य पुत्र । बाधक तारि ती अधोगति ॥८०॥

’पापपुण्य आपुलें आपणा । पुत्रबंधु न तारी कोणा ।’
ही ग्रंथांची सत्य घोषणा । विसरूं नये कोणीहि ॥८१॥

एक पुत्र जरी नसला । सर्व पुत्र आपुलेचि म्हणाला । 
सर्वाच्याहि उपयोगा झाला । तरि झाला उध्दार त्याचा ॥८२॥

असेल मुलासाठी धन । करावें सत्कार्यासि अर्पण । 
यांत भावना ठेवूं नये भिन्न । तरीच पावे सदगति ॥८३॥

आपुलें घरचि नव्हे घर । विश्व आपुलें मकान सूंदर ।
हेंचि शिकावया असे संसार । उध्दार तो याच मार्गे ॥८४॥

ऐसा करावा पूर्ण विचार । दोघांनी आपुलें शोधोनि अंतर ।
दूरदृष्टीचा साधावा व्यवहार । पुत्र असले नसले तरी ॥८५॥

मन काढावें घरांतूनि । पुत्रास जबाबदारी समजावोनि ।
पुत्र नसतां गावांस अर्पूनि । देशाटनीं निघावें ॥८६॥

निघावें पत्नीस घेऊनि। जी धर्मअर्थकामीं सांगातिणी ।
ती जरि साथ न दे मोक्षसाधनीं । पुत्राजवळी राहूं द्यावें ॥८७॥

पत्नी जरी देई सहयोग । तरी जीवनीं वर्जावा भोग । 
दोघांनाहि अंगी बाणवावा त्याग । निश्चयाने त्यापुढे ॥८८॥

कार्य संपले संसाराचें । पुढील जीवन वानप्रस्थाचें । 
मिळोनी तपाचे सदवर्तनाचे । धडे पाळावे दोघांनी ॥८९॥

पाहावीं विशाल स्थानें मंदिरें । तीर्थें वनें मुनि -कुटीरें । 
अनासक्त व्हावया मनें शरीरें । चित्त लावावें सत्कार्यीं ॥९०॥

सर्वकार्यासि वाहून घ्यावें । अध्यात्मभावा अनुभवीत जावें । 
आणिकासहि धडे द्यावे । शिकवावा सेवाभाव ॥९१॥

सेवेसाठी घ्यावी दीक्षा । न्यावी लया गांवाची अवदशा । 
काम करावें भरूनि हर्षा । सर्वांसाठी अंतरी ॥९२॥

शिक्षणसंस्था , आश्रमसंस्था । सत्संगसंस्था परमार्थसंस्था । 
यांची करावी सर्व व्यवस्था । शांतीसाठी ॥९३॥

अंध पंगु महारोगी । अनाथ आणि वॄध्द जगीं । 
आश्रम चालवावे जागजागीं । त्यांच्या सेवेचे ॥९४॥

गृहस्थांना वेळ न फावे । म्हणोनि वानप्रस्थें लक्ष द्यावें ।
मुलाबाळांसि संगोपावें । ब्रह्मचारि रक्षूनि ॥९५॥

द्यावें जीवनाचें शिक्षण । जेणें कार्यकर्ते निघतील पूर्ण । 
सर्वांगीण उन्न्तीचें ज्ञान । द्यावें तयां आश्रमस्थानीं ॥९६॥

हें कार्य वानप्रस्थाने करावें । घरादारांचे बंध तोडावे । 
अनासक्तीने वागावें । सेवेसाठी सर्वांच्या ॥९७॥

नुरतां संसारात वासना । वैराग्य येतें सहज वर्तनां । 
उरले तें हेचि कार्य जाणा । शिक्षण द्यावें सर्वांसि ॥९८॥

ग्रामसेवाचि देशसेवा । देशसेवाचि ईश्वरसेवा । 
हेंचि अनुभवावया जीवभावा । वानप्रस्थ आश्रम ॥९९॥

तिसरा वानप्रस्थ आश्रम । हा संन्यासाचा उपक्रम । 
व्हावया वासनेचा उपशम । अंतरामाजीं ॥१००॥

पुढे आहे संन्यासधर्म । वानप्रस्थाचा तोडण्यासि भ्रम । 
अनुभवूनि आत्माराम । वृत्ति उपराम कराया ॥१०१॥

जेव्हां घरांतूनि मन निघालें । सर्वदेशी होऊनि सेवे लागलें । 
संन्यासवृत्तीने क्रमें साधलें । परमात्म्य अंगी ॥१०२॥

संन्यासी शिकवी वानप्रस्थासि । शेवटीं स्थितप्रज्ञता कैसी । 
प्राण गेल्याहि आसक्क्तीसि । स्पर्श मुळी होईना ॥१०३॥

वानप्रस्थीं संसार त्यागला । संन्यस्तीं स्वरूपं योग झाला । 
परम रस वृत्तीने चाखला । धागाचि खुंटला आसक्तीचा ॥१०४॥

कळला आत्मा -परमात्मा सकळ । जीव -ब्रह्म कैवल्य केवळ । 
प्रज्ञावॄत्ति होय निश्चळ । स्वरूपामाजीं ॥१०५॥

ही स्थितप्रज्ञता अंगी मुरली । त्यासि जीवन्मुक्ति लाभली । 
याचि देहीं त्याने साधली । पूर्ण सफलता जीवनाची ॥१०६॥

तो सकळां झाला स्फूर्तिदायक । निःस्पृहतेने मार्गदर्शक । 
जीवनदृष्टी देई सम्यक । सर्व जगाला ॥१०७॥

हेंचि सत्य -धर्माचें ध्येय । हेंचि सर्व कर्मांचें श्रेय । 
सर्व ग्रंथाचें हेंचि तात्पर्य । तुकडया म्हणे ॥१०८॥

इति श्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र -स्वानुभव संमत ।
तिन्ही आश्रम निरूपिले येथ । तिसरा अध्याय संपूर्ण ॥१०९॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥