वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय चौथा

ग्रामगीता

अध्याय चौथा : संसार-परमार्थ

॥ श्रीगुरूदेवाय नम : ॥

मागे झालें निरूपण ! चार आश्रमांचें वर्णन ।
त्यांतील तत्त्व आहे सनातन । सर्वांसाठी ॥१॥

त्यांची करूं जातां योजना । उत्तम चाले समाजधारणा ।
ऐहिक उत्कर्ष अधात्मसाधना । सर्वांसि साधे ॥२॥

व्यक्तीचीहि पूर्ण उन्नती । समाजाची उत्तम स्थिती ।
आश्रमधर्मीं साधे निश्चती । आजहि सर्व ॥३॥

लहानपणी ब्रह्मचर्य पाळावें । गुरुघरीं विद्यार्जन करावें ।
पुढे मग्न करोनि निभवावें । पुत्रपौत्रां ॥४॥

ब्रह्मचर्यें घ्यावी धर्मसंथा । गृहस्थें साधावी अर्थव्यवस्था ।
काम जिंकणें वानप्रस्था । मुक्त व्हावया ॥५॥

पुत्र कामाकाजीं लागलें । की वैराग्य घ्यावें आपण भलें ।
सेवासाधनार्थ सोडिलें । पाहिजे घर ॥६॥

करावी ग्रामसेवा ज्ञानसेवा । वानप्रस्थवृत्ति बाणवूनि जीवा ।
आणी मोक्षासाठी साधावा । संन्यासभाव ॥७॥

संन्यासी सर्वांसीच होणें आहे । त्याविण नाही मोक्षाची नाही सोय ।
मोक्षावांचूनि तरणोपाय । दुसरा कोठे ? ॥८॥

वासना हाचि भवसागर । आसक्ति हाच खरा संसार ।
ज्ञानें त्यांचा पावणें पार । हाचि मोक्ष ॥९॥

झाला वासनेचा नाश । त्यासीच नाम असे संन्यास ।
मग त्यांचें सर्व करणें निर्विष । आदर्श लोकीं ॥१०॥
 
मुक्त तो वासनेंतूनि मोकळा । कोठे नाही आसक्तीचा लळा ।
ओळखोनी आत्मस्वरूपी सकळा । विलीन होई ॥११॥

हीच जगाची अंतिम धारणा । कर्म कराया निर्मळ बाणा ।
यांतचि वसते उपासना । उध्दाराची ॥१२॥

ही भूमिका ज्यासी गवसली । त्यांची कर्मे योगरूप झालीं ।
ही संन्यासदशा साधिली । पाहिजे सर्वांनी ॥१३॥

चौथा आश्रम वृध्दपण । ऐसें असले जरी वचन ।
तरी या आत्मविकासासि बंधन । लागु नसेचि वयाचें ॥१४॥

हें सर्वकांहि वृत्तीवरि । वृत्तीच करावी लागें सुसंस्कारी ।
बाह्यदीक्षा सहायकारी । म्हणोनि वर्णिली धर्मग्रंथीं ॥१५॥

कल्पिले आयुष्याचे चार भाग । भोगांतूनि साधाया त्याग ।
परि शतवर्षाचें आयुष्य अव्यंग । कोणास लाभे ? ॥१६॥

म्हणोनि प्रथा न पाहतां दीक्षांची । तत्त्वें चारहि आश्रमाची ।
आचरावीं जीवनीं साची । तातडीने सर्वांनी ॥१७॥

मात्र ज्या क्षणी वैराग्य आलें । तेव्हांचि घर सोडुनि पळालें ।
ऐसेंहि नाही पाहिजे केले । वेडयापरी ॥१८॥

कोणी वैराग्य येतां घर सोडती । तीर्थाटनीं भटकाया जाती ।
जीवन दुसर्‍यावरि जगविती । भीक मागती दारोदारीं ॥१९॥

पुन्हा वाढती क्रोध कामभाव । भोगूनि दुःख पाहूनि गौरव ।
संसाराचा पुन्हा प्रभाव । पडे त्यांवरि ॥२०॥

यासाठी दीक्षा संस्कारें घेणें । उचित जीवाच्या प्रगतीकारणें ।
परि बहिरंग दीक्षेचें सोंग धरणें । व्यर्थचि आहे ॥२१॥

माझा विश्वास आहे संस्कारावरि । परि व्यवस्था लागते तैशापरीं ।
नाहीपेक्षा उपेक्षाचि बरी । ऐशा दीक्षेची ॥२२॥

मग तो असो आश्रमदीक्षा । संप्रदायदीक्षा गुरूदीक्षा ।
व्रत्तदीक्षा वा कार्यदीक्षा । धर्मदीक्षेसहित ॥२३॥

दीक्षेने मन तयार होतें । परि कर्म पाहिजे नित्य केलें तें ।
आचराविण फजीती होते । दीक्षितांची ॥२४॥

एकादशीची घेतली दीक्षा । भोजन करी मागोनि भिक्षा ।
लोक पाहूनि हा तमाशा । हासती वेडा म्हणोनिया ॥२५॥

दीक्षा घेतली व्रतबंधाची । नाही संध्या नित्यनेमाची ।
काय करावी संस्कारांची । व्यवस्था तेथे ? ॥२६॥

ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली । संयमदृष्टीच बिघडली ।
तैसीच गृहस्थाश्रमाची झाली । उलटी रीति ॥२७॥

आश्रमपण निघोन गेलें । तमाशाचे भाव वाढले ।
तत्त्वाविण सामर्थ्य कुठलें । दीक्षेमाजी ? ॥२८॥

वानप्रस्थ म्हणोनि घर सोडलें । बाहेर व्यापार करूं लागले ।
संन्यासी मानासाठी झगडले । तरि ते व्यर्थ ॥२९॥

घातली भगवीं वस्त्रें अंगावरि । परि क्रोध भरला अंतरी बाहेरीं ।
लंगोटीसाठी झगडा करी । यजमानापाशीं ॥३०॥

चुंगी मागूनि धन जमवी । झोपडी बांधूनि वैभवें सजवी ।
राख फासूनि संन्यासी म्हणवी । दासचि तो संसाराचा ॥३१॥

न सुटे झोपडीचा अभिमान । मांजरी -श्वानावरि प्रेम पूर्ण ।
वेळ न फावे ब्रह्मज्ञान । सांगावया अनुभवावया ॥३२॥

ही कसली आहे दीक्षा । नाही सेवा नाही तितिक्षा ।
पशूजैसे शोधती भक्ष्या । मागती भिक्षा चैनीसाठी ॥३३॥

जी दीक्षा जयाने घ्यावी । त्याने ती पथ्थे सांभाळावीं ।
वृत्ति वाकडी होऊं न द्यावी । वाईट कर्मीं ॥३४॥

नाहीपेक्षा ऐसेंचि जगावें । काम करोनि न्यायें वागावें ।
नांव बदनाम होऊं न द्यावें । दीक्षा घेऊनि कोणती ॥३५॥

सुखें संसार करावा । साधेल तैसा परोपकार ।
चारहि आश्रमांचा सार । आचरणीं आणावा ॥३६॥

बायकामुलांची चिंता लागली । म्हणोनि वैराग्याची दीक्षा घेतली ।
तें वैराग्य नव्हे कुचराई केली । सोंग घेवोनि वैराग्याचें ॥३७॥

एका साधकास वैराग्य आलें । त्याने घरदार सोडूनि दिलें ।
लंगोटी लावून स्नान केलें । अरण्यामाजी ॥३८॥

रोज रोज स्नान करी । लंगोटी सुकवी झाडावरि ।
तेथे उंदीर जाऊनि कातरी । लंगोटी त्याची ॥३९॥

तो लंगोटी मागाया गांव जाय। म्हणे काय करावा उपाय ?
लंगोटी आमुची खाऊनि जाय । उंदीरराजा ॥४०॥

लोकांनी बैराग्यास सुचविलें । तेथे पाळा मांजरीची पिलें ।
म्हणजे लंगोटी राखाया झाले । सेवकचि ते ॥४१॥

घेतले बैराग्याने मना । आणलें मांजरीच्या धना ।
मग त्याची खाण्याची विवंचना । लागली मागे ॥४२॥

लोक म्हणती गायी पाळा । म्हणजे त्यांचा निर्वाह सगळा ।
आपणांसहि मिळेल गोळा । दहीदूधलोण्याचा सात्विक ॥४३॥

तेंहि त्याच्या मना आलें । लोकांसि मागूनि गोधन केलें ।
पुढे चार्‍याची चिंता चाले । मनीं त्याच्या ॥४४॥

चार्‍या गवताची मागे भीक । लोक म्हणती बाबा ! हे दुःख ।
करा तेथेचि शेती आणिक । थोडीबहू ॥४५॥

तेंहि पटलें त्याचे चित्तीं । मिळविली मनमाने शेती ।
राबविलीं गडीमाणसें , पूर्ति । करावया तिची ॥४६॥

अधिकाधिक तेंचि केलें । धनधान्य जमा झालें ।
सांभाळायाचें कोडे पडले । मनामाजी ॥४७॥

कोण मिळेल इनामदार । नसावा ऐदी अथवा चोर । 
आपला म्हणोनि करील व्यवहार । ऐसा कोण शोधावा ? ॥४८॥

लोक म्हणती कोणीं ठरवावें ? बुवा म्हणे लग्नचि करावें । 
म्हणजे होईल आता बरवें । धना मना सांभाळाया ॥४९॥

बिचार्‍याचे वैराग्य गेलें । पुन्हा संसारबंधन गळीं पडलें । 
याचें कारण संस्कार पालटले । नव्हते पूर्वीहि ॥५०॥

म्हणोनि म्हणतों वैराग्यासाठी । घर सोडणें नको उठाउठी । 
त्यासाठी पाहिजे बुध्दि गोमटी । सेवाभावना त्यागवृत्ति ॥५१॥

आपुलें घर सोडूनि द्यावे । गांवचि घर समजोनि रहावें । 
सर्व गांवाचे काम करावें । देवसेवा म्हणूनि ॥५२॥

मनीं ठेवावें ईश्वरभजन । काम करावें गांवाचें पूर्ण । 
फुकाचें न करावें भोजन । वैराग्याने कधीहि ॥५३॥

वैराग्य अथवा संन्यासी बाह्य त्यागचि नको त्यासि । 
त्यागवृत्तीने गृहस्थासी । वैराग्य साधे संसारीं ॥५४॥

वैराग्य म्हणजे आसक्तित्याग । संग्रहत्याग उपभोगत्याग । 
लागावी अंगी कार्यास आग । ग्रामसेवा करावया ॥५५॥

आपुल्या मुलासारखींच सर्व मुलें । होवोत ऐसें मनी आणिलें । 
त्यांच्या जोपासनेचें व्रत घेतलें । तोचि विरागी म्हणावा ॥५६॥

आपल्या अंगी असो फाटकें । परि गांवलोक राहोत नेटके । 
हें साधावया जो कवतुकें । कार्य करी जोमाने ॥५७॥

त्यासी म्हणावे वैरागी । जो सर्व लोभांचा परित्यागी । 
सेवेसाठी कष्ट घे अंगी । नेहमीच लोकांच्या ॥५८॥

अनेक साधिती स्वावलंबन । दानी दुसर्‍यास पुरवी धन । 
जो सर्वस्व आपुलें दे अर्पोन । तोचि संन्यासी म्हणावा ॥५९॥

ऐसा संन्यास सर्वांनी घ्यावा । आधी आपुला प्रपंच सावरावा । 
मुरलिया फळापरी सुखवावा । समाज मग ॥६०॥

कांही मुलांनाच संन्यास देती । त्यांची असते कोवळी स्थिती । 
ते जंव भरवयांत येती । पापें करिती मनमाने ॥६१॥

संन्यास घेतलिया स्वयें । मग लग्नहि करितां नये । 
मग शोधती नाना उपाय । उपद्रव बनती गावांचा ॥६२॥

संन्याशाने संन्यास द्यावा । गांवकर्‍यांनी जाच सोसावा । 
ऐसा बुध्दिहीनपणा कां करावा । समाजाने ? ॥६३॥

म्हणोनि हें चूकचि आहे । तो संन्यास संन्यासचि नोहे । 
वानप्रस्थचि संन्यासी राहे । धोका न होय मुलांऐसा ॥६४॥

संन्यास म्हणजे थकता काळ । आत्मचिंतनी जीवा वेळ । 
आशीर्वाद मिळावा सकळ । जनलोकांसि ॥६५॥

परि ज्यांनी कष्टचि नाही केले । गृह्स्थी जीवन नाही अनुभविलें । 
ते संन्यासी म्हणती झाले । आश्चर्य वाटे ! ॥६६॥

ही घडी जेव्हांपासूनि चुकली । ग्रामाग्रामाची फजिती झाली । 
प्रजा सर्व भिके लागली । गृहस्थाश्रमाची ॥६७॥

झुंडच्या झुंड मुलें नेती । कोणी बैरागी संन्यासी करिती । 
आणि मग बोके होऊनि फिरती । लोकांमाजीं ॥६८॥

त्यांना नसतो सेवेचा आदर । नसतो कळला कांही व्यवहार । 
मनास येईल तो उपकार । करितीं लोकीं ॥६९॥

म्हणोनि हें पाहिजे बदललें । अल्पवयीं न पाहिजे मुंडलें । 
त्यास अभ्यासोनीच काढलें । पाहिजे आधी ॥७०॥

कोणी असती महासंस्कारी । कोणी उपजत अनुभव -थोरी । 
त्यांनी इच्छेप्रमाणे संसारी । व्हावें न व्हावें ॥७१॥

त्यांना नसे आडकाठी । परि हें सुत्र नव्हे सर्वांसाठी । 
याने मोडेल परिपाठी । उत्तम गुणांची ॥७२॥

हें संतजनांनी जाणलें । म्हणोनीच कळवळोनि सांगितले । 
रांडापोरें सोडू नका बोलिलें । परमार्थासाठी ॥७३॥

करावा सुखाने संसार । करावा अतिथींचा सत्कार । 
बांधा सोपे माडया घर । उत्तम व्यवहारे धन जोडा ॥७४॥

वैराग्य वाढवा त्यांतूनि । सेवा परोपकार साधूनि । 
रंगा सदाचारें भक्तिरगंणीं । हाचा राजमार्ग संतांचा ॥७५॥

ऐसेचि संती सांगितलें । कितीतरी संत ऐसेंचि वागलें । 
त्यानेच नांव अमर झालें । तयांचे लोकीं ॥७६॥

हें जाणूनि वागावें आपण । गृहस्थाश्रमचि उज्ज्वल करून । 
वैराग्याचें तत्त्व सांभाळून । लोकसेवा साधावी ॥७७॥

सवें घेवोनि आपुली पत्नी । सेवा करिती मिळोनी दोन्ही । 
हेचि आहे वैराग्याची निशाणी । संसारसंग सुटावया ॥७८॥

यांतूनचि प्रकटे खरा संन्यास । नाहीतरि अवघा त्रास । 
आपण न तरे , न तारी कोणास । आसक्त नर ॥७९॥

आणि कोणी निरासक्त असला । संन्यास घेवोनि वनीं गेला । 
तोहि नाही उपयोग आला । समाजाच्या ॥८०॥

गृहस्थाश्रमासि नाही जाणलें । ज्याने त्याने मनानेच केलें । 
यानेच कार्य विस्कळीत झालें । समाजाचें ॥८१॥

गीतेने यथार्थ ज्ञान दिलें । परि तें जनमनाने नाही घेतलें । 
रूढीच्या प्रवाहीं वाहूं लागले । विसरले सर्वभूतहित ॥८२॥

ब्रह्मचारी अभ्यासचि करी । वानप्रस्थ वनींच विचरी । 
संन्यासी निरासक्तीच्या भरी । विटाळ मानी जगाचा ॥८३॥

ऐसेचें झालें धोरण आजचें । त्यामुळे ओझें वाढलें गृहस्थाश्रमाचें । 
प्रत्येकाने प्रत्येकाचें । पूरकत्व सोडलें ॥८४॥

सर्वांनी सर्वचि सोडलें । परि गृहस्थाने अधिक जोडलें । 
कष्ट करितां करितां मोडलें । हाड त्याचें ॥८५॥

सर्वांनाचि मदत करावी । पुन्हा दीनताचि अंगी घ्यावी । 
वरोनि त्यासि म्हणे गोसावी । ’लटका संसार छोड दे ’ ॥८६॥

हें सर्व सहन करोनी । आपुली हौस त्रास विसरोनि । 
जगाची राखी लाज देऊनि । धनमानादि ॥८७॥

स्वतः शरीराने राबावें । आपुलें जीवन आपण निभवावें । 
अधिकाधिक देतचि जावें । गांवासाठी ॥८८॥

साधु आला संत आला । राजा आला रंक आला । 
अतिथि पाहूणा भुकेला । सर्वांसाठी गृहस्थाश्रम ॥८९॥

करी आलेल्यांचा सत्कार । संतसाधूंचा सन्मान सुंदर । 
सार्वजनिक कामांचाहि बोझा वर । सांभाळीतसे प्रेमाने ॥९०॥

आला जातिदंड राजदंड । तोहि भरतसे उदंड । 
मुंगीपासूनि सर्व ब्रह्मांड । जीवजन त्याचेवरि ॥९१॥

हें सर्व गृहस्थाश्रम करी । मुलेंबाळें पोसोनि घरीं । 
काटकसरीने उरवूनि करी । अन्न्दान नम्रतेने ॥९२॥

गृहस्थधर्म म्हणजे जबाबदारी । स्त्रीपुत्रांपरीच सर्वतोपरीं । 
देश -भेष सांभाळणारी । वृत्ति असे त्याची ॥९३॥

येरव्ही असोत सर्व आश्रम । सर्वात मोठा गृहस्थधर्म । 
गृहस्थधर्मावरील योगक्षेम । चालतसे सर्वांचा ॥९४॥

ब्रह्मचर्याची शिक्षादीक्षा । वानप्रस्थांची तितिक्षा । 
संन्यासी ज्ञात्यांची समीक्षा । गृहस्थधर्माच्याचि योगें ॥९५॥

त्यासचि लोक फजूल म्हणती । आणि त्याचेवरीच जगती । 
ही कैसी आहे रीति संसाराची ! ॥९६॥

म्हणोनि संती गृहस्थ गौरविला । धन्य धन्य म्हणितलें त्याला । 
तोचि जगाचा मातापिता ठरला । पालनपोषण करणारा ॥९७॥

त्याचे उपकार येरव्ही फिटेना । एकचि आहे त्याची साधना । 
गृहस्थाचे पुत्र जाणा । शिकवोनि स्थानां बसवावे ॥९८॥

लहानपणींच आश्रमीं न्यावी मुलें । जैसे विश्वमित्रें रामलक्ष्मण नेले । 
सांदीपनी द्रोणांनी शिकविलें । तैसें विविध ज्ञान द्यावें ॥९९॥

माधुकरीपुरतेंचि गांवी न यावें । गांवाचें जीवन सुधारावें । 
घृणा करितां नरकी जावें । लागेल अहंकारें ॥१००॥

जोंवरि हवें आहे शरीर । आवश्यक वाटे अन्नवस्त्र । 
तोंवरि न म्हणावा मिथ्या संसार । सेवा करावी सर्वांची ॥१०१॥

गुरु म्हणोनि न गुरगुरांवें । आत्मवत सर्वांसि जाणावें । 
उठण्या बसण्यापासूनि शिकवावें । आईसारिखें अज्ञजना ॥१०२॥

आपापलें कार्य सर्वांनी करावें । परस्परांना पूरक व्हावें । 
म्हणजे जगाचें ओझें जावें । झेललें सहज ॥१०३॥

आश्रमांनी मुलें शिकवावी । गृहस्थांनी मदत पुरवावी । 
मुलें वाढतां पित्याने घ्यावी । परवानगी पुत्रांची ॥१०४॥

जावें देशपर्यटनीं । अथवा राहावें ग्रामसुधारणीं । 
पुढे संन्यासीहि होऊनी । सेवाभावेंचि वागावें ॥१०५॥

आपलें पोट सर्वांनी भरावें । वृत्तीसि कार्यें वाढवीत न्यावें । 
म्हणजे गृहस्थावरि अवलंबावें । ऐसें नव्हे ॥१०६॥

आपपलें कार्य सांभाळावें । जीवमात्रासि संतुष्ट करावें । 
कोणीच कोणावरि न राहावें । विसंबोनि ॥१०७॥

मग पुढे सर्वचि आहे सेवा । कार्य करावें जीवाभावां । 
उरला असेल तो सगळा ठेवा । वाटूनि द्यावा गांवासि ॥१०८॥

कोण कोण देतो सेवाधन । आपुलें कार्य सांभाळून । 
यावरीच खरें महिमान । लौकिकाचें आपुल्या ॥१०९॥

ऐसी आहे परंपरा । जेणें चाले जगाचा पसारा । 
वेगवेगळ्या कामांचा बटवारा । सारखाचि व्हावा ॥११०॥

जेथे सर्वांसीच काम करणें । कोणीच उत्तम कनिष्ट न म्हणे । 
सर्व मिळोनी जग साजविणें । आपुल्यापरीं ॥१११॥

मानावे सकलांचे आभार । करावा परस्परांसि पूरक व्यवहार । 
असो संन्यासी वा गृहस्थ नर । सारखा अधिकार सर्वाचा ॥११२॥

गृहस्थ तनुमनाने कष्ट करिती । संन्यासी त्यांना दिशा दाविती । 
मग कां उगेचि पायां पडती । एक -एकाच्या ? ॥११३॥

मला हें कांही उमजेना । कोणाचे उपकार आहेत कोणा ? 
सर्वचि आपापुल्या स्थांना । धन्य असती ॥११४॥

पुत्रधर्म पाळतां पुत्र श्रेष्ठ । पितृधर्म पाळतां पिता वरिष्ठ । 
तेथे म्हणावें श्रेष्ठ कनिष्ट कोणी कोणां ? ॥११५॥

पायां तयानेच पडावें । ज्याने आपुल्या कर्मासि चुकावें । 
नाहितरि प्रेम ठेवावें । परस्परांचे दोघांनी ॥११६॥

कोणी कोणासि न लेखावें हीन । तो असे सर्वेश्वराचा अपमान । 
अभिमानि संन्याशाहूनि महान । ठरे लीन पतिव्रता ॥११७॥

येरव्ही कोणाचाहि आदर । सर्वानी करावा होऊनि नम्र । 
हा तंव आश्रमधर्माचा सार । अहंकार नसावा ॥११८॥

हीनतेची भावनाहि नसावी । निष्ठेने सत्कार्यें करावी । 
सहकार्य द्यावें आपुल्या गांवी । गृहस्थाने ॥११९॥

आपुला साधावा गृहस्थाश्रम । पाळावा ग्रामसेवाधर्म । 
गांवाकरितांच आपुला नेम । सांभाळावा ॥१२०॥

कष्ट करोनि धन जोडावें । तें धन सत्कार्यींच लावावें । 
कधीहि निरर्थक न वेचावें । छंदी कुणाच्या लागूनि ॥१२१॥

याचें मिळावया शिक्षण । व्हावें गांवोगांवीं कथाप्रवचन । 
वाढवावा गृहस्थाश्रमाचा मान । नीटनेटका करावया ॥१२२॥

नेटका ऐसा प्रपंच झाला । तरि परमार्थ त्यांतचि साधला । 
हा समन्वय संतीं सांगितला । तोचि खरा ग्रामधर्म ॥१२३॥

आमुचा गॄहसंसारचि सार । आहे सहकार्याचें भांडार । 
सर्व मिळोनि उजळूं सुन्दर । ग्रामधर्म आपुला ॥१२४॥

ग्रामधर्माचें महत्त्व थोर । त्यांत गृहस्थधर्मांचा मोठा अधिकार । 
महातीर्थाचें तीर्थ सुन्दर । तुकडया म्हणे ॥१२५॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु -शास्त्र -स्वानुभव संमत । 
निरूपला संसारांत परमार्थ । चौथा अध्याय संपूर्ण ॥१२६॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥