ग्रामगीता
साधावया पुरूषार्थ परम । आचरावया मानवधर्म ।
निवेदले चार आश्रम | गृहस्थाश्रम मुख्य त्यांत ॥१॥
गृहस्थाश्रमीच समाज बहुतेक । त्याच्या गरजा असती अनेक ।
आणि प्रकृतीनेहि लोक । भिन्न भिन्न ॥२॥
जरी मानव दिसती समान । दोन हातपाय डोळे कान ।
तरी स्वभावाचें भिन्नपण । ओळखूं येतें ॥३॥
स्वरूपाची धारणा वेगळी । जी विचारें भरली सगळी ।
संस्कार खेळती चेंडूफळी । वेगळाले ॥४॥
एक शांत एक उग्र । एक चंचल एक एकाग्र ।
कोणें निवडावीं समग्र । गुणकर्में तीं ॥५॥
मग मानव कैसा म्हणावा एक । अधिकारहि न दिसे सम्यक ।
त्याचें जीवनहि भिन्नतेचें निदर्शक । स्वभावापरी ॥६॥
भिन्न वृत्ति भिन्न प्रकृति । भिन्न कुटुंबें भिन्न संगति ।
तीं आदळतीं परस्परांवरती । ज्ञान नाही म्हणोनि ॥७॥
त्यांत एक संधि ओळखूं येते । स्वभावसाम्य निवडलें जातें ।
राजस तामस सात्विक दिसते । प्रकृति वेगळाली ॥८॥
स्वभावाचे तीनचि प्रकार । त्यांत बसती सर्व प्राणीमात्र ।
जितुकें म्हणोनि विषयमंत्र । या जगीं जीवकोटीचें ॥९॥
ज्याचें अंगी जो मुख्य गुण । त्यापरीच त्याचें सारें वर्तन ।
प्रत्येकाचें कर्म भिन्न । एकमेकापासूनि ॥१०॥
प्रत्येक भिन्न दिशेस जाई । तरि समाज कैसा सुदृढ राहीं ?
मग कैसी उन्नति होई । व्यक्तीची आणि देशाची ? ॥११॥
हें धर्मवेत्त्यांनी जाणलें । गुणकर्मविभाग ध्यानीं घेतले ।
परस्परांसि पूरक बनविले । समाजव्यवस्थेकारणें ॥१२॥
सत्त्वप्रधान रजप्रधान । मिश्रित आणि तमप्रधान ।
शुध्दाशुध्द लक्षूनि गुण । विभाग चार नेमिले ॥१३॥
निसर्गावरि केली रचना । म्हणोनि म्हणती ईश्वरी योजना ।
कल्पिलें बुध्दि – बाहु – उदर – चरणा । समाजपुरूषाच्या ॥१४॥
मुळांत सर्वचि एकसम आहे । परि अनंत गुणें व्यापलें राहे ।
गुण गुणासि पोषक होय । यासीच संसार बोलती ॥१५॥
धंदे असती अनेक गुणांचे । परि मुख्य भेद चारचि त्यांचे ।
म्हणोनि ’ चातुर्वर्ण्य ’ नांव याचें । ठेविलें ऋषिजनीं ॥१६॥
संरक्षण देती ते क्षत्रिय । व्यापार करिती ते वैश्य निर्भय ।
न्यायदर्शन योजनाकार्य । ब्राह्मणवर्णा नेमिलें ॥१७॥
या तिन्ही कामीं अनधिकारी। तया शूद्र नाम निर्धारीं ।
करी सर्वाची सेवाचाकरी । तोहि सर्वांसि पूरक ॥१८॥
सत्य न्याय अस्तेय संयम । सर्वांसि सारखाचि नियमधर्म ।
परि आपापलें भिन्न कर्म । वाहूनि पूजिती समाजदेवा ॥१९॥
जो ज्यापाशीं उत्तम गुण । त्यानेच त्याचें चालावें जीवन ।
व्हावें समाजाचेंहि धारणपोषण । हीच योजना चातुर्वर्ण्यीं ॥२०॥
भिन्न गुणांचा सहकार्य – संगम । त्यांत सर्वांचाचि योगक्षेम ।
मग कैसा चाले जीवनसंग्राम ? वर्गकलह न राहे ॥२१॥
सर्वकालीं सर्वदेशीं । नैसर्गिक गुणभिन्नता ऐसी ।
म्हणोनि वर्णाश्रमयोजना जगासि । शांतिदायी ॥२२॥
परि हें तत्त्व राहिलें मागे । आसक्तीचे जडतां धागे ।
आपुला पुत्र शूद्रापरी वागे । तरी त्या गणावें आपुल्यावर्णीं ॥२३॥
नजरेआड केले कर्मगुण । जन्मावरोनि चालले वर्ण ।
धंद्यांवरोनी जाति भिन्न । वाढल्या लोकीं ॥२४॥
त्यांतहि ज्ञात्यांनी । ठेविलें धोरण । कर्मांतूनि गुण निर्माण ।
केले संस्कारांची देऊनि घडण । जन्मलेल्यासि त्या वर्णाचे ॥२५॥
पूर्वी त्यासाठी होते संस्कार । शिक्षणक्रम शिकवी व्यवहार ।
मागील ऋषी असती चतुर । समाजव्यवस्था चालवाया ॥२६॥
तयांनी कुटुंबेंच संस्थामय केलीं । बालपणापासून शिकवण दिली ।
परंपराचि तैसी बनविली । प्रयत्नांनी गुणकर्मांची ॥२७॥
शेतकर्याच्या मुलास शेती । तरवार क्षत्रियपुत्राहातीं ।
वैश्याचीं मुलें तराजू धरती । लहानपणापासूनि ॥२८॥
ब्राह्मणाच्या मुला मंत्रजप । शिकविला जाई आपोआप ।
ऐसा हा परंपरेचा व्याप । चालला होता ॥२९॥
जो जयाने धंदा केला । त्याचा स्वभावचि तो बनला ।
स्वभाव बनतां संस्कार जडला । अंगी तयाच्या ॥३०॥
तैसेचि मग त्याचें वर्तन । तैसेंचि खेळणे बोलणें भोजन ।
अंगे – अंगे जाती बनून । संस्कारसंगे ॥३१॥
परि ही परंपराहि मोडली । सत्तालोभें फूट पाडली ।
लहानथोरासि भावना वाढली । उपभोगाची ॥३२॥
कांही आपत्ति कांही संगति । कांही सत्ता कांही प्रकृति ।
यामुळे दुसर्यांचे धंदे हाती । घेतले सुखास्तव ॥३३॥
वैश्यधंदा एकाने धरला । व्याजभोगी व्यापारी बनला ।
आपुल्याहि मित्राचा घेतला । मुनाफा त्याने ॥३४॥
त्यांत तारतम्यचि न राही । भरमसाट वाढली मुनाफशाही ।
जनतेचें हित कोण पाही । मिसळून देई माल खोटा ॥३५॥
खोटें बोलणें सहजीं घडे । स्वार्थापायी पाप वाढे ।
यास कोण सांभाळील चोखडें । सत्ता नसतां जागरूक ॥३६॥
सहज कोणी त्यास म्हणावें । तरि शत्रुभाव अधिक बळावे ।
मग दोघांचेहि धंदे बरवे । एकाच मार्गीं ॥३७॥
गांवचे लोक विरुध्द होती । म्हणती आमुचीच कां धर्में फजीती ?
तेहि पुढे कामचोर होती । अडवणूक करिती वैश्याची ॥३८॥
सर्वांमध्ये कलह माजे । त्यासि निवारावें क्षात्रतेजें ।
तरि तेहि बिचारे पोटाच्या काजें । धावती स्वैर ॥३९॥
जिकडे पैसा मान मिळे । तिकडे धावंती क्षत्रियबाळें ।
न्यायनीती कोण सांभाळे ? झुके पारडे पैशांनी ॥४०॥
चोरी पकडण्या चोर धावले । शिपायीबाणा घेऊनि भले ।
तेणें चोरांना अधिकचि फावले । चोरी करण्या गांवाची ॥४१॥
तेथे ब्राह्मणांनी करावे न्यायदान । सर्वांसि ठेवावें सेवापरायण ।
तरि तेहि पाहूनि दान मान । झाले त्यांचेंच साह्यकारी ॥४२॥
पुढे ऐसीच झाली रीति । दंडुकेशहासि क्षत्रिय म्हणती ।
चोरव्यापारी त्यासि बोलती । लोक वैश्याधिकारी ॥४३॥
बुध्दीने जो फाटाफूट करी । तो ब्राह्मण जाहला निर्धारीं ।
ऐसी बिघडली वर्णव्यवस्था पुरी । गांवोगांवीं ॥४४॥
त्यामाजीं जो कमजोर ठरला । तो शुद्र म्हणोनि बाहेर काढला ।
अन्नान्नदशा करोनि सोडला । जीवनकलही ॥४५॥
वर्णजातींचे गुणकर्म नाही । मोडून केली नोकरशाही ।
नागविली भावना सर्वहि । वर्णाश्रमाची ॥४६॥
अभिमान राहिला वर्माचा । चुराडा झाला गुणकर्मांचा ।
ऐसा घडविला संस्कार गांवाचा । घडी काही बसेना ॥४७॥
ऐसें मुळीच पूर्वी नव्हतें । परस्परपूरक धंदे सर्व ते ।
सर्वांचेच कल्याण त्यांत होतें । समभावाने ॥४८॥
परि तो सारा वर्णाश्रम । आज होऊनि बसला भ्रम ।
वर्णांश्रमांतील नेमिलें काम । बहुतेकांनी सोडलें ॥४९॥
ब्राह्मण जोडे शिवण्यासि लागला । चांभार तो पुजारी बनला ।
क्षत्रियें नोकरीपेशा धरिला । वैश्याघरीं ॥५०॥
वैश्य लढे सैन्यांत जाऊन । शुद्र करिती कथाकिर्तन ।
यासि वर्णसंकर म्हणती जन । करिती मात्र सर्वचि ॥५१॥
परि जाति मागचीच सांगती । कामे मात्र भलतींच करिती ।
तेणें होते अनिश्चिती । समजावया लोकांसि ॥५२॥
वडिलांचा धंदा भिन्न होता । तो मुलाच्या जंव नसे हातां ।
तरि वडिलांचा धंदा मुलाने सांगतां । अर्थ काही निघेना ॥५३॥
म्हणोनि जेणें जें काम करावें । त्याच वर्णजातीचें म्हणवावें ।
ऐसें तरी असावें बरवें । वर्णजाति मानलिया ॥५४॥
ऐसेंचि नामाभिधान चालतें । आणि सर्व लोक तैसेंचि वागते ।
तरि वर्णव्यवस्था भ्रष्ट झाली म्हणतें । कोण कैसें ? ॥५५॥
परि जन ऐसें म्हणवाया लाजती । कर्में मात्र विपरीत करिती ।
पूर्वजांचिया नावें जगती । आळशापरी ॥५६॥
जरी झालो कर्मभ्रष्ट । तरी आपण इतरांहूनि श्रेष्ठ ।
ऐसा प्रतिष्ठेसाठी बळकट । धरिली रूढि ॥५७॥
वास्तविक कामाकरितां वर्ण झाले । समाजासि सर्वचि लागलें ।
म्हणोनि सर्वांनाचि महत्त्व भले । ब्राह्मणापासोनि महारावरि ॥५८॥
त्यांत ’ तूं नीच मी उच्च ’ म्हणोन । वाढविलें आडंबर पूर्ण ।
त्यानेच जाहलें पतन । वर्णांचें आणि गांवाचें ॥५९॥
प्रत्येक धंद्याचें गम्य भिन्न । वेगळी खुराक वेगळें वळण ।
यासाठीच होतें वेगळेपण । रोटीबेटी – व्यवहाराचें ॥६०॥
तेथे अज्ञानाने भेद पाडले । हाती सत्ता ते मोठे ठरले ।
समाजाची स्वच्छता करीत मेले । ते ते बोलिले नीच ऐसे ॥६१॥
वास्तविक नीचता दुराचारें होते । खरी उच्चता तपाने लाभते ।
जातीमातीवरि कैसी ठरते । उच्चनीचता ? ॥६२॥
ज्याने कांही नीचता केली । समाजाने त्यास शिक्षा दिली ।
म्हणोनि अस्पृश्यता बोलली । कांही कारणें ॥६३॥
परि त्यांची पीढीच नीच समजावी । आपुली नीचता ती लपवावी ।
दुसर्याची उत्तमताहि न गौरवावी । प्रथाच पडली यापरी ॥६४॥
अरे ! हें कुठलें न्यायदान ? हें तों गुलामीचें लक्षण ।
याने कैसे होईल पुनर्निर्माण । गांवाचें आमुच्या ? ॥६५॥
म्हणोनि अस्पृश्यता क्रियेवरि मानावी । जाति सर्व एक जाणावी ।
आपापल्या परीने उचलावीं । कामें सकळांनी ॥६६॥
जाति सर्वांचि एकचि आहे । परि धंदा गुणकर्मांसम राहे ।
आपल्या उद्योगाच्या प्रवाहें । ओळखी द्यावी ॥६७॥
येरव्ही सर्वत्रचि सर्व वर्ण । सर्वांतचि दिसती सर्वगुण ।
परि कोणतें गुणप्राधान्य । तेंचि ओळखावें मुख्यतः ॥६८॥
शुद्राघरीं उत्तमवर्तनी जन्मला । तो शूद्रचि कैसा राहिला ?
तैसा क्षत्रियाघरीं भ्रष्ट निपजला । तो क्षत्रिय कैसा ? ॥६९॥
एक ब्राह्मण दुकानीं बैसला । मांसमच्छी विकों लागला ।
त्याची पूजा कराया एक गेला । शोभा देईल काय तें ? ॥७०॥
ब्राह्मण म्हणवूनि विलास करी । नाना व्यसनें अंगीकारी ।
करी नोकरी सावकारी । तो ब्राह्मण कां मानावा ? ॥७१॥
परंपरेने गोसावी होणें । मग त्याने विवाहाचा थाट करणें ।
तें केवढें होय लाजिरवाणें । लोकांमाजी ? ॥७२॥
आचार्य आणि आचारी । एकाच जातीचे अधिकारी ।
म्हणोनि काय आदर एकाचपरी । करावा लोकीं निष्ठेने ? ॥७३॥
ऐसें कोणासहि ब्राह्मण म्हणावें । पूजूनि त्याचे पाय वंदावे ।
त्याने जोडयांच्या दुकानीं नोकर कां न व्हावें । पाय पुसाया ? ॥७४॥
वास्तविक जातिवंत जे ब्राह्मण । त्यांनी स्वतःच टाळावें हें पूजन ।
म्हणावें माणुसकीनेच नमन । करूंया सर्वां ॥७५॥
आपण वेगवेगळा धंदा करणारे । सर्व बरोबरीचे मित्र बरे ।
हें पूजेचें ढोंग सारें । आम्हीच कासया करावें ? ॥७६॥
ऐसें लोकासि शिकवावें । बिघडलें दिसेल तें सुधरावें ।
जनासि उद्योगि बनवावें । आपुल्यापरी ॥७७॥
’जेथे दिसती ब्राह्मणाचे गुण । त्यासि आदरें म्हणावें ब्राह्मण’ ।
ऐसा स्थापिलाचि आहे सनातन । नियम वर्णाश्रमाचा ॥७८॥
म्हणोनि गुणांवरचि लक्ष द्यावें । ’ जो ज्या गुणीं तो त्या वर्णीं म्हणावें ।
सर्व गुणांचा आदर स्वभावें । सर्वांकरितां असावा ॥७९॥
जो जैसा कर्म करूं लागला । तो त्याचि वर्णाचा अधिकारी झाला ।
सर्वत्र नियम हा चालला । तरीच होईल सुव्यवस्था ॥८०॥
येथे संशय उभा झाला । विविध कर्में करावी लागती एकाला ।
तरि काय वेळोवेळीं म्हणो त्याला । ब्राह्मण क्षत्रियादि गुणाऐसें ? ॥८१॥
एक वैश्यकर्मी असला । परि ध्यानासाठी मंदिरी बसला ।
तरि तो वैश्य कैसा ठरला । तया स्थानी ? ॥८२॥
एक भंगी – काम करी । वेळ मिळतांचि ये प्रार्थनामंदिरी ।
त्याचें भंगी नामचि उच्चारी । कोणत्या न्यायें ? ॥८३॥
त्यां क्षणी तो खराच ब्राह्मण । परि त्याचें नित्यकर्म अन्य ।
म्हणोनि प्रामुख्याने नामाभिधान । धंदे पाहूनि ठेविती ॥८४॥
एकाचें लक्ष्य मुख्यतः व्यापार । परि तो करितो कीर्तन सुंदर ।
म्हणोनि त्यास ब्राह्मण म्हणणे साचार । होईल कैसे ? ॥८५॥
सदब्राह्मण शेती करू लागला । म्हणोनि तो माळीच मानला ।
याने येईल क्षणाक्षणाला । अनवस्थाप्रसंग ॥८६॥
बहुरूपी कधी राजे बनती । म्हणोनि काय राज्य चालविती ?
ज्याची कला त्याचे सांगाती । येरां काय वैभव तें ? ॥८७॥
म्हणोनि याची ऐसी आहे रीती । ज्यांत ज्याची मुख्य अंतरवृत्ति ।
त्याच्या जीवनाची निश्चिती । दाखवि तें विशेष कर्म ॥८८॥
त्याचें विशेष कर्म कोणतें । गुण कोणते विषय कोणते ।
अंग कोणते अंतरंग कोणतें । तें पाहूनि नाम ठेवावें ॥८९॥
ज्यामध्ये ज्याचें सर्व तनुमन । सर्वस्व ज्यांचें ज्यांत लवलीन ।
ऐशा प्रमुख गुणावरून । म्हणावा तो त्या वर्णाचा ॥९०॥
येथे म्हणण्याचेंचि नाही महत्त्व । जें जयाचें असेल सर्वस्व ।
त्यापरी त्याचा व्हावा गौरव । समाजामध्ये ॥९१॥
समाजाची रचना नेटकी । बसेल तैसें करावें कौतुकीं ।
दीक्षा घ्यावी समजोनि निकी । गुणकर्माची ॥९२॥
जाणत्यांनी तत्त्वें अभ्यासावी । रूपांतरें व्यवहारी आणावीं ।
बिघडली घडी दुरुस्त करावी । समाजाची ॥९३॥
सुखी व्हावा गृहस्थाश्रम । मिटावा जीवनाचा संग्राम ।
सहकार्याने नांदावे ग्राम । यासाठी बुध्दि सर्वां द्यावी ॥९४॥
जेव्हा गुण गुणांशी द्रोह करी । तेव्हां पडे बुध्दि अपुरी ।
हें सांभाळण्याचें कार्य करी । ब्राह्मण तें ॥९५॥
गुणासि गुणाचें सहकार्य । मिळोनि व्हावें सफल कार्य ।
हा सृष्टिक्रमाचा व्यवसाय़ । ब्राह्मण्याकडे ॥९६॥
हें करावया ऐक्य निर्माण । आज पाहिजेत गुणवंत ब्राह्मण ।
ब्राह्मण्यावाचूनि हें साधन । घडेचि ना ॥९७॥
सामुदायिक बुध्दीची शिकवण । सर्व जीवांत समत्वस्थापन ।
विषम पात्रांचें समाधान । करूण देणे ब्राह्मणकर्म ॥९८॥
ब्राह्मण तो दूरदृष्टि । त्याचें घरचि समष्टि ।
सुरळीत चालण्या होय कष्टी । ब्राह्मण तो ॥९९॥
ब्राह्मण ह्रदयाचा अति निर्मळ । दुष्टबुध्दीचा महाकाळ ।
हिंसेवाचूनि करी प्राजंळ । मन दुर्जनांचें ॥१००॥
शक्तियुक्तीचा उदार । भक्तिमुक्तीचा आधार ।
सर्वोदयाने संसार । नटवी जो ॥१०१॥
जो सर्वांसि प्रेमें सांभाळी । गांवसेवाचि मानी आगळी ।
उणें पडों नेदी कधीकाळी । कोण्या प्रकारें ॥१०२॥
त्याचें लक्ष नोहे येरव्ही । जें बिघडेल तें नीटचि करवी ।
जुळवाजुळवीची पैरवी । ब्राह्मणाकडे ॥१०३॥
सर्वांशी सर्वाचें जळवावें । कीर्तिस्फूर्तीने ग्राम भरावें ।
लौकिक पारमार्थिक पडों न द्यावें । उणें ग्रामवासियांचें ॥१०४॥
गांव करावें व्यवहारचतुर । त्यांत भरावे निर्मळ संस्कार ।
परस्परांत निर्मावा सहकार । न्यायनीतीने चालण्या ॥१०५॥
हें शिकवाया थोरांच्या कथा । सांगत जाव्या मिटाया व्यथा ।
त्याग वाढवावा उचित प्रथा । थोरामोठयांच्या दावूनि ॥१०६॥
त्यासाठी कृष्णकथा रामजन्म । चालवावा महात्म्यांचा पुण्यतिथिक्रम ।
ग्रंथांतरीचा न्यायसंग्राम । शिकवावा निर्भय व्हाया ॥१०७॥
प्रत्येकाचें कर्तव्य सांगोनि । आपुल्या उत्साहें उद्योगी लावोनि ।
करावी ग्रामाची मेळणी । विशाल मार्गे ब्राह्मणें ॥१०८॥
असोनिया गांवी ब्राह्मण । पडली तटे चाललें भांडण ।
तरि समजावें । तो पावला पतन । गांव मोकाट सुटलें हें ॥१०९॥
त्याने आपली निष्ठा सोडली । म्हणोनि लोकांनी हेळसांड केली ।
त्याचेकडे कां न आली । पुकार लोकांची ? ॥११०॥
जंव ब्राह्मणचि चुकों लागले । तंव गांवचि स्वैराचारी झालें ।
नाना तर्हेचे तमाशे माजले । गावांमाजीं ॥१११॥
लोकश्रध्देत व्हावया बदल । काय कारण घडलें प्रबल ?
हें जाणेल तोचि निर्मल । त्यागी तपस्वी ॥११२॥
प्रभाव ऐसा अंगी यावया । त्याग यपनियमांची दीक्षा तया ।
पाहिजे , म्हणोनि तपश्चर्या । करावी लागे ब्रह्मकर्म्या ॥११३॥
आबालवृध्दा समजविण्यासाठी । ओज तेज असावें पाठी ।
म्हणोनि जपतप , सदग्रंथ कंठी । धारण करावे ब्राह्मणाने ॥११४॥
उपदेश देतां रागावूं नये । लोभें चुकवूं नये निर्णय ।
म्हणोनि सांभाळावा इंद्रियजय । अध्यात्मउपाय त्यासाठी ॥११५॥
आधी त्याग त्याने करावा । तरीच मग लोकांसि शिकवावा ।
याच मार्गे परिणाम पहावा । लोकांमाजीं आपैसा ॥११६॥
ही दीक्षा ज्याने घेतली । आपुली भोगवासनाचि निरसली ।
त्यासीच ब्राह्मण संज्ञा मिळाली । वर्णाश्रमाची ॥११७॥
ऐसे गुण जो धरण्यासि चुकला । तो ब्राह्मण म्हणोनि गौरविला ।
तरि व्यर्थचि आहे त्याला । पदवी अजागळापरी ॥११८॥
जातिवेषासि वंदणे । हें तों दुसर्याचेंचि सोने ।
फिटलें कोणाचें पारणे । रुईफळे खाऊनि ? ॥११९॥
ब्राह्मण मुळी जाति नोहे । ती विशालतेची पदवी आहे ।
हें समजोनि धरावी सोय । ग्रामवासियांनि ॥१२०॥
सर्वाघटीं ब्रह्म ईश्वर । पाहूनि होई सेवातत्पर ।
तोचि ब्राह्मण सर्वांवर । प्रभाव पाडी नम्रतेचा ॥१२१॥
त्याचें चारित्र्य बघूनि उज्ज्वल । लोभ करिती त्यावरि आबाल ।
सर्वांसीच सांगे विशाल । धर्म मानवजागृतीचा ॥१२२॥
ब्राह्मण असे अस्पृश्यांचा । क्षत्रियांचा वैश्यादिकांचा ।
कोणाशीच पारखा त्याचा । शब्द नाही ॥१२३॥
त्याने सर्वांचे भले पाहावें । भिन्न गुणांचे लोक जुळवावे ।
आणि गांव चालवूनि संतोषावें । बुध्दि देवोनि ॥१२४॥
उगीचचि लोक ना ऐकती । त्यांसि दंड देईल हा ब्रह्ममूर्ति ।
परि ग्रामी वाईट चालीरीती । प्राण गेल्या न ठेवी ॥१२५॥
ब्राह्मणाचें वचन ना ऐके । तो तिन्ही लोकीं न टिके ।
याचें कारण हेंचि इतुकें । ब्राह्मण अनर्थ करीना ॥१२६॥
त्याची हेचि साध्यमुद्रा । शांति लाभावो आब्रह्मशूद्रा ।
ग्रामसुखांत सुख लोकेंद्रा । तपस्वियासि ॥१२७॥
म्हणोनि ब्राह्मणवर्ण श्रेष्ठ बोलला । उगीच नाही डांगोरा पिटला ।
भृगूची लाथहि झेलता झाला । देव माझा ॥१२८॥
ऐसें ब्राह्मणत्व निर्माण करा । प्रचारक होऊनि घरोघरीं फिरा ।
तरीच सर्वांसि मिळे आसरा । सुखशांतीचा ॥१२९॥
हें ब्राह्मणत्व नव्हे जातीय । कुणीहि साधावें निर्भय ।
जो आदर्श प्रचारक होय । तोचि ब्राह्मण निर्धारें ॥१३०॥
ब्राह्मण सर्वांची सदबुध्दि । ती करील अन्य गुणांची वृध्दि ।
गांवी नांदतील ऋध्दिसिध्दि । गुणकर्मांच्या सहकारें ॥१३१॥
हरिकथानिरूपण राजकारण । सावधपण सेवाप्रयत्न ।
हा चारी वर्णांचा सार न्यूनपूर्ण । प्रत्येकाने आचरावा ॥१३२॥
लोकशिक्षण न्याय रक्षण । जनांचें पोषण आणि श्रमदान ।
यासाठी जे जे करितील प्रयत्न । त्यांना साधेल वर्णाश्रम ॥१३३॥
स्वभावें सर्वांनी कर्म करावें । गांव सौंदर्यें साजवावें ।
सर्वासह उध्दरोनि जावें । तुकडया म्हणे ॥१३४॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र स्वानुभव संमत ।
वर्ण – धर्म निरूपला येथ । पांचवा अध्याय संपूर्ण ॥१३५॥
॥ सद्गुरूनाथ महाराज की जय ॥