वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय सहावा

ग्रामगीता

अध्याय सहावा : संसर्ग-प्रभाव

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

ईश्वरें जग केलें निर्माण । त्याचें कार्य अजूनि अपूर्ण ।
तें आपल्यापरीं कराया पूर्ण । सदबुध्दि दिली मानवा ॥१॥

एकापासूनि अनेक व्हावे । अनेकासि एकत्वीं आणावें । 
हा आपुला मूळ संकल्प देवें । चित्तीं घातला सर्वांच्या ॥२॥

अनेक ईषणा प्रेरणा । त्या कारण होती आत्मविकसना । 
पुत्रपौत्रादि रूपें नाना । मानव आपणा प्रकटवी ॥३॥

कोणी शिष्यशाखा वाढवी । कोणी ग्रंथादिक उपजवी । 
जगीं आपुली परंपरा चालावी । ऐसी इच्छा स्वाभाविक ॥४॥

जगावरचि मानव जगला । समुदायांतचि उन्नत झाला । 
तो समुदायाचें कार्य विसरला । तरि तें उचित कैसें ? ॥५॥

पिंडब्रह्मांड हें निगडित । संस्कारहि जगाशीं संबंधित । 
आत्मज्ञानें राहो जीव अलिप्त । परि उपेक्षा न व्हावी जगाची ॥६॥

सत्य शिव सुखी सुंदर । ऐसा व्हावा हा संसार । 
हें सोपविलें कर्तव्य थोर । देवें मानवाप्रति ॥७॥

मानवें आपुला उध्दार करावा । तैसाचि समाज सुधारावा । 
यासाठीच दिला धर्म आघवा । नेमूनि सकळां ॥८॥

यासाठीच झाले अवतार । यासाठीच संतभक्तांचा व्यवहार । 
’ सुखी करीन अवघाचि संसार ’ । ब्रीद तयांचें ॥९॥

न सुधारवे अखिल विश्व । तरि उन्नत करावें आपुलेंचि गांव । 
यानेच संतोषेल देवाधिदेव । लाभेल ठेव मोक्षाची ॥१०॥

हें ठीक म्हणती श्रोतेजन । परि गांवाप्रति आमुचें कर्तव्य कोण ? 
काय होईल आम्हीच झुरोन ? गांवी कोणी ऐकेना ॥११॥

सर्व करीती आपुल्यासाठी । स्त्रीपुत्रांसाठी चैनीसाठी । 
परि आठवचि नाही येरासाठी । कांही करावें म्हणूनि त्यां ॥१२॥

सर्वांस वाटे आमुचें ऐकावें । पण ऐकतील कैसे हें न ठावें । 
म्हणोनि यास्तव पुढे जावें । न वाटे कोणा ॥१३॥

कार्य करावया पुढे जावें । साथ न मिळतां फजीत व्हावें । 
संकटी कोणी जीव द्यावे ? । वाटे ऐसें बहुतेका ॥१४॥

आम्हांस वाटे गांव सुधारावें । परि सांगा त्यासाठी काय करावें ? 
कैसे वळतील आघवे । लोक सन्मार्गीं ? ॥१५॥

आपण पुसलिया प्रश्नाचें । मी उत्तर देईन साचें । 
परि लक्षीं ठेवोनि ह्रदयाचे । आचरा तैसें ॥१६॥

मी सांगेन म्हणूनि नव्हे । संती हेंचि कथिले बरवें । 
माझा विश्वास जेथे धांवें । तेंचि सांगेन तुम्हांला ॥१७॥

सर्वाआधी एक निश्चय । लोक असती अनुकरप्रिय । 
विशेष दिसे ती घेती सोय । न सांगतांहि ॥१८॥

मुख्य कार्यकर्त्याची राहणी । निरोक्षोनि बघतीं कोणी । 
लागती त्याच्याच मागे धावोनी । वत्स जैसे ॥१९॥

म्हणोनी कार्यकर्त्यांत असावें आकर्षण । सेवाचारित्र्यांचे ओजपूर्ण । 

सुधार नोहे त्यावांचून । गांवाच्या कोण्या ॥२०॥


या मार्गानेचि जनजागृती । हेंचि सूत्र घ्यावें हाती । 

आपण वागावें तैसे वागती । जनहि सारे ॥२१॥


यासाठी प्रथम करावी आपुली शुध्दि । शरीरशुध्दि ह्रदयशुध्दि । 

घरशुध्दि ग्रामशुध्दि । सर्वतोपरीं ॥२२॥


जैसें तुम्ही कराल आपुले घर । तें पाहतील जन सत्वर । 

करतील तैसेचि प्रकार । आपुल्या घरीं ॥२३॥

 

सुंदर दृश्य पाहतां डोळां । आवडे पाहणाराहि तसाच सोहळा । 

आपणहि वर्तावयाचा चाळा । करितो प्राणी ॥२४॥


फुललेली बाग पाहिली । अनंतरंगी फुलें फुललीं । 

सुरस फळांनी बहरली । सौंदर्यखाणि ॥२५॥


पाणी वाहे झरणापरी । वृक्षलतांच्या कुंजांतरी । 

आमोद दरवळे नानापरी । फळफुलांचा ॥२६॥


गर्द छायेतळीं हिरवळ । दुर्वांकुरांचे जाळे कोमळ । 

नाना रंगी फुलपाखरें सोज्वळ । मन मोहविती जीवांचें ॥२७॥


कोठे पाणी चमके आरशापरी । कोठे दगडांच्या कणांची कुसरी । 

कोठे कोमलरूप भूमि धरी । वाटे अंकीं लोळावें ॥२८॥


कोठे भूमिचेहि भिन्न वर्ण । कोठे काळे, पिंगटपण । 

कोठे पांढरे लाल मधून । सुवर्णापरी ॥२९॥


लतालतावरि झुलती पक्षी । सर्व फळाफुलांचे साक्षी । 

जरी फिरती अंतरीक्षीं । पिकलीं फळें त्या ठावी ॥३०॥


उडोनि तेथेचि मारिती झडप । रसाचा आस्वाद घेती अमूप । 

जैसा करील प्राणी संकल्प । तैसा भोग त्या पावे ॥३१॥


जिकडे तिकडे सुगंध उसळे । उल्हासित इंद्रियें भोगती सगळें । 

नाक कान जीभ डोळे । नाना विषयारसानंद ॥३२॥


ऐसें दृश्य पाहे प्राणी । तेव्हा आपणहि करावें वाटे मनीं । 

जातो घरासि परतोनि । सजवाया घर आपुलें ॥३३॥


लहान अंगणी बाग लावी । अथवा कुंडींतचि फुलें फुलवी । 

शृंगारी झोपडी आपुली बरवी । आपुल्यापरीं ॥३४॥


जरि त्या बागचि न दिसता । तरि तो कैसा प्रयत्न करता ? 

ऐसाचि आहे मानव तत्त्वता । जें देखें आपण करी ॥३५॥


विशेषतः ऐसें मुलांचे वागणें । त्यांचें कार्यंचि प्रतिध्वनि उठवणें । 

जें जें पाहतील डोळयाने । तेंचि आचरती उल्हासें ॥३६॥


म्हणूनि मुख्यांची ही जबाबदारी । ते जे करतील ग्रामभीतरी । 

मुलें आचरतील घरीं दारीं । मातापित्यासि वळवोनि ॥३७॥


एका प्रमुखाने कोंबडी पाळली । तिला सुंदर पिलीं झालीं । 

दुसर्‍यानेहि तीच घेतली । कला त्याची ॥३८॥


मग गांवासि तोच आनंद । चढला तयांना उन्माद । 

लढाई करण्याचा लागला नाद । कोंबडियांची ॥३९॥


एकादा कोंबडयांची झुंज पाहिली । सर्व गांवास धुंदी चढली । 

मग कोंबडयात्रा भरली । लढाईसाठी ॥४०॥


बांधतीं कोंबडयांच्या पायीं सुरा । लढविती मैदानीं भरभरा । 

रक्तबंबाळ खेळ सारा । क्रूरवृत्तीने वाढविला ॥४१॥


मग पाटील म्हणे कर लावा । पैदासीचा धंदा वाढवा । 

लोक चेतले गांवोगांवां । झुंज करण्या कोंबडयांची ॥४२॥


बिचार्‍या दीन जीवानें काय केलें । यांनीच त्यास निमित्त धरलें । 

त्यांचे प्राण लढतां गेले । धंदे वाढले पापांचे ॥४३॥


एका प्रमुखाने चालना दिली । ती रीती सर्व गांवाने उचलली । 

प्रौढ माणसेंहि करूं लागली । लढाई मग कोंबडयांची ॥४४॥


सारी शक्ति कोंबडयांमागे । प्रतिष्ठितहि झाले बेढंगे । 

म्हणोनि एकाने आपुल्या अंगे । नगर-आखाडा निर्मिला ॥४५॥


जमविलें बाल तरुण कांही । उल्हास ओतिला त्यांच्या देहीं । 

व्यायामाच्या नव्या उत्साहीं । लाविलें तयां ॥४६॥


प्रथम भरविला गांवी दंगल । इनामी कुस्त्यांचा जंगी मेळ । 

पाहतांचि मुलेंबाळें सकळ । लागले करण्या व्यायाम ॥४७॥


घरोघरीं मुले खेळती कुस्ती । गल्लीगलींत चंग बांधती । 

चढली व्यायामाची मस्ती । लहानथोरां ॥४८॥


कवायत करेला मल्लखांब । लाठीकाठी भाला लेजीम । 

तरवार छडीपट्टा मर्दानी काम । व्यायामाचें ॥४९॥


त्याने गांवांतील वाईट व्यसन । सर्वचि गेलें हारपोन । 

शरीर कमाविण्याची लागली धुन । लहानथोरां ॥५०॥


जो तो आपुली छाती पाही । दंड मोंढे फिरवीत राही । 

मांडियांचे पट वाढवी देहीं । सौंदर्य यावया मल्लाचें ॥५१॥


मैदानी मर्दानी खेळ चाले । सर्व गांव लाल मातीने रंगलें । 

कोंबडयांचे व्यसन कमी झालें । लढाई गेले विसरोनि ॥५२॥


दुसर्‍या एकास बुध्दि सुचली । त्याने जोडी चारूनि मस्त केली । 

दुसर्‍या बैलजोडीशीं लाविली । धावण्यासाठी ॥५३॥


जनलोकांचें लक्ष वेधलें । त्यांतचि मनोरंजन वाटलें । 

पुढे शंकरपट सुरू झाले । गांवोगांवीं ॥५४॥


त्यांत कांही उद्देश उत्तम असती । बैलांना खुराक देवोनि बनविती । 

स्पर्धेने वाढविती बैलांची शक्ति । शेतीसाठी ॥५५॥


पण त्यांतूनि प्रकटे दुष्परिणाम । राहतें मागे उत्तम काम । 

बैल पळविण्याचाहि हंगाम । पुढे येतो ॥५६॥


मग जो बैल पळेना । त्यास टोचती तुतारी-अणा । 

रक्ताळोनि दुखविती प्राणा । नंदीबैलाच्या ॥५७॥


राहिलें शेतीभातीचें काम । शंकरपटाचाचि उद्दम । 

माणसें करिती कसाबकर्म । नानापरी ॥५८॥


सहजचि गाडी जुंपती । पुराणी हातीं धरोनि टोचती । 

पळतां पळेना तरी मारिती । निर्दयपणें ॥५९॥


गांव पडले त्याच प्रवाहीं । उत्तम नाद घेणेंचि नाही । 

राक्षसी धंदे ग्रामीं सर्वहि । वाढूं लागती त्वरेने ॥६०॥


ऐसा धूमधडाका चालला । एकाने गांवी तमाशाचि आणला । 

सारा रागरंग बदलला । मागीलपैकी ॥६१॥


जो तो लावणी मुखें उच्चारी । घरींदारीं शेतीं मंदिरीं। 

ज्याच्या त्याच्या तोंडी सारीं । गाणीं विषयांचीं ॥६२॥


तमाशाचे प्रस्थ वाढलें । लहान मुलांत संस्कार बिंबले । 

मुलें तरुणहि नटूं लागले । तमाशागिरापरी ॥६३॥


जो तो चांगभांग करी । मुद्रा सुरू झाली लाजरी । 

हावभाव शरीरावरी । नाचती घरी मुलेंबाळें ॥६४॥


आईवडील कौतुक करिती । मुली मौज म्हणोनि हासती । 

कोणी ताटपाट बडविती । डफासारिखे आनंदे ॥६५॥


परंतु कोणी इकडे बघेना । काय होणार विंटबना । 

सारा गांव तमाशाच्या रंजना । राजी झाला ॥६६॥


’ डुबती ’ म्हणे ढोलक ओरडून । तुणतुणें म्हणें ’ कोणकोण ’ । 

मंजिरा सांगे ’ सर्वजन ’ । परि कोणा न कळें हें ॥६७॥


मग कूठले कथाकीर्तन । भजन वा साधूंचें प्रवचन । 

टिंगल करिती मार्गी तरुण । सदभावांची ॥६८॥


ज्याने गांवी तमाशे आणले । त्याचे पुत्र नाचे निघाले । 

गांवोगांवी जाऊं लागले । तेथेहि झाले सुरू फड ॥६९॥


मुलींना मार्गी जायाची चोरी । मुलें छळती निलाजरीं ।

येणें जाणें वाढवूनि घरीं । नेल्या काढून कित्येक ॥७०॥


मग पाटलासि पडला उजेड । अरे काय वाढले थोतांड ? 

माझ्या घरांतहि शिरले बंड । तमाशाचें ॥७१॥


माझ्या भावाने तमाशा आणला । त्याचा तर वंशच बिघडला । 

मुलगी पळाली मुलगाहि गेला । घर दुसर्‍याचे बुडवोनि ॥७२॥


मग विचारी ज्याला त्याला । कैसें बंद करावें तमाशाला ? 

जो तो म्हणे तुम्हीच होऊं दिला । धिंगाणा या गांवाचा ॥७३॥


कुस्ती व्यायामाच्या नादांत । गांव सुंदर आदर्श अदभुत । 

परि हे भलभलते छंद नेत । लया सगळया गांवासि ॥७४॥


सुंदर होतें मुलांचें खेळणें । बरें होतें बैल तयार करणें । 

पण या पापाने औदासीन्य । आणले गांवी ॥७५॥


आता भोगा त्याची सजा । सारींच मुलें वाजविती वाजा । 

झाला तमाशाचाचि अगाजा । सर्व गांवी उत्सवीं ॥७६॥


या गांवांत जे जे येती । ते तमाशाचे रंगीच रंगले असती । 

ओघ न थांबवे पाटलाप्रति । कठीण झालें ॥७७॥


एकाने त्यांत छंद आणला । दारू पिऊन फिरूं लागला । 

तमाशाचे आनंदाचा लोकांला । कळस दिसे त्या ठायीं ॥७८॥


हळुहळू तीच वाढली प्रथा । दारूबाजांचा जमला जत्था । 

काय पुसतां गांवाची व्यथा । आता तुम्ही ॥७९॥


कोणी दंढारी तमाशे करी । कोणी दारु पिऊन शिव्या उच्चारी । 

कोणी कोणा न माने तिळभरी । लहान थोर स्वैर झाले ॥८०॥


व्यभिचार्‍यांची झाली दाटी । गंजिफा खेळती पैशांसाठी । 

मुलें करिती चोरीचपाटी । काढती भट्टी घरोघरीं ॥८१॥


मांस खाण्याचें वाढलें व्यसन । चैन न पडे मद्यावांचून । 

अनेक रोग मांसमद्यांतून । वाढले गांवी ॥८२॥


मुलें तेल लावूनि बाल फिरविती । पान चावूनि कोठेहि थुंकती ।

सिगारेट ओढूनि धुर सोडिती । धाकचि नाही कोणाचा ॥८३॥


मजूर कष्टाने पैसा मिळविती । तोहि दारूपायीं उधळती । 

मुलाबाळां उपवास पडती । होय दुर्गति जीवनाची ॥८४॥


दारू पिऊनि मारिती स्त्रीला । सगळया गांवीच चळ सुटला । 

पूर आला भांडाभांडीला । कोर्टकचेर्‍या गजबजल्या ॥८५॥


लोळे गटारांत अमीरहि । कोणीहि कोणास मारूनि देई । 

मुलीबाळी सुरक्षित नाही । ऐसा प्रसंग ओढवला ॥८६॥


पैसाआडका नष्ट झाला । ऐसा गांव ’ उन्नती ’ स चढला ! 

सगळ्या गांवाचाचि धिंगाणा केला । दारूबाजांनी ॥८७॥


गावांचा मुखंड दारू प्याला । म्हणोनि व्यसन लागले बहुतेकाला । 

मग सर्व गांवचि लागला । गटारगंगेमार्गी ॥८८॥


तैसेंचि आहे जुगाराचे । चोरीचें आणि व्यभिचाराचें । 

पहिले बिघडती मुखंड आमुचे । मग बिघडे गांव सारा ॥८९॥


आज जें जें लोकांचें बिघडले । तें तरी कुणाचें होतें पाहिलें । 

म्हणोनीच तैसे करूं लागले । लोक सर्व ॥९०॥


स्वतः प्रथम त्याने आचरिलें । मगचि लोकांना सांगितलें । 

म्हणोनीच जनलोक रंगले । रंगी त्याच्या ॥९१॥


सर्व गांवाचें वर्तन । कार्यकत्यावरचि जाण । 

कार्यकर्ते गांवाचें प्राण । समजों आम्ही ॥९२॥


गांवी चार भले वागती । तरीच गांवा होय उत्तमगति । 

मुख्य म्हणविणारे स्वार्थ साधती । तरि सर्व गांवचि तैसें ॥९३॥


गांव म्हणजे शुध्द आरसा । जें दाखवाल तें दिसेल सहसा । 

जें कराल तें करील खासा । गांव आमुचा ॥९४॥


मी जें प्रारंभी बोललो । बाग बघोनि प्रसन्न झालों । 

तैसाचि घरीं वर्तूं लागलों । ऐसें होते सकळांचें ॥९५॥


म्हणोनि मी आपणांसि विनवितों । योग्य जो वाटे आदर्श तो तो । 

निर्माण करूनि ठेवतां येतो । प्रभाव आपुल्या अंगीं ॥९६॥


अस्थिपंजर फकीर तो आज । भूमिदानयज्ञाचा उठवी आवाज । 

तरि तीच लाट उसळली सहज । गांवोगांवीं ॥९७॥


आपली झुगारूनि सुखचैन । किती लोक दान मागती फिरून । 

गरीब-अमीरहि स्वार्थ विसरून । देती भूदान उल्हासें ॥९८॥


पुढारी जें जें गांवी करी । लोक तैसेंचि वागती घरोघरीं । 

म्हणोनि याची आहे जबाबदारी । मुखंडावरती ॥९९॥


तेव्हा काय करावें आपुल्या गांवी । ती योजना आपण ठरवावी । 

तैसीच आपुली सर्व सुधारावी । टापटीप ॥१००॥


त्यांत नेहमी सावध असावें । जें जें करणें असेल बरवें । 

तें दूरदृष्टीने शोधूनि पाहावें । तेव्हा घ्यावे कार्य हातीं ॥१०१॥


नाहीतरि सहज केलें । परि तें प्राणावरीच आलें ।

सारें गांवचि बिघडलें । होईल ऐसें ॥१०२॥


म्हणोनि गांवी तेंच सुरू करावें । ज्याने गांव नांवलौकिक पावे । 

येरव्ही शिवेआंतहि येऊं न द्यावें । विडंबनकार्य ॥१०३॥


कदाचित केलें एखाद्याने । तेंहि सहन करू नये कोणे । 

लावावी उधळोनि समंजसपणें । वाईट रीति ॥१०४॥


कारण जैसी संगती घडे । तैसे अनुभवा येई रोकडे । 

म्हणोनि सावध असावें मागेपुढे । उत्तम गुण वाढवाया ॥१०५॥


उत्तम खेळ उत्तम कार्य । उत्तम कला उत्तम सौंदर्य । 

गांवास भूषण ज्याने होय । तें अगत्याने उचलावें ॥१०६॥


कोठे कांही व्यसन घुसलें । त्यास लगेच पाहिजे कमी केलें । 

त्यासाठी गांवचे मुखंड लागले । पाहिजेंत पाठीं ॥१०७॥


जरी कांही नाराजी झाली । मुलेंबाळें रुसूं लागलीं । 

तरी पाहिजे समज घातली । वडीलधार्‍यांनी ॥१०८॥


सर्वांमाजी उत्तम उपाय । तें वातावरणचि बदलूनि जाय । 

ऐशा नव्या छंदाची द्यावी सोय । कार्यकर्त्यांनी ॥१०९॥


कायकर्ता तोचि गांवचा । ज्यास लोभचि नाही कोणचा । 

आमुचा गांवचि मोक्ष, आमुचा । मानावा त्याने ॥११०॥


मग त्याचा आदर्श गांव पाही । सर्व गांवचि सुधरोनि जाई । 

मुखंडावरीच गांव राही । तुकडया म्हणे ॥१११॥


इति श्री ग्रामगीत ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभवसंमत । 

निवेदिलें ग्रामजीवनमर्म येथ । सहावा अध्याय संपूर्ण ॥११२॥


॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥