वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय सव्वीसावा

ग्रामगीता

अध्याय सव्वीसावा : मूर्ति-उपासना

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

ईश्वर सर्वांठायीं व्यापला । तो पंथीं नाही विभागला । 
मग उणें-अधिक कोणाला । कां म्हणावें ? ॥१॥

ऐसें ऐकोनि निरूपण । एक श्रोता करी प्रश्न । 
देव विशाल व्यापक पूर्ण । मग कां समर्थन मूर्तीचें ? ॥२॥

असो कोणाहि धर्माची खूण । परि मूर्ति मानवांनी केली निर्माण । 
तिथे कोठलें देवपण ? तिचें पूजन कशाला ? ॥३॥

देव कुणाची पूजा नेघे । त्यास नको हें वाउगें । 
स्वयें बोलला भक्तासंगें । ’ मज हवें शुध्द प्रेम ’ ॥४॥

याचें ऐकावें उत्तर । प्रेम निर्मावें एका मूर्तीवर । 
तेंचि क्रमाने करावें विश्वाकार । हाच हेतु पूजनाचा ॥५॥

देवाची स्मरणमूर्ति बघतां । त्याचें जीवनकार्य ध्यानीं आणतां । 
शक्ति येते मनासि तत्त्वता । मानसिक संयोगें ॥६॥

मनासि लावावया चिंतन । लागावया मार्गाचें आकर्षण । 
नेमिलें असे प्रतिमापूजन । साधुसंतीं ॥७॥

मनास पाहिजे कांही आधार । म्हणोनि आरंभीं मानिले साकार । 
देवें व्यापिलें चराचर । तेथे मूर्ति तद्रुपचि ॥८॥

परि जो सिध्दान्ताचा पुरस्कर्ता झाला । त्यासहि जन देव बोलला । 
त्याचीहि प्रतिमा पूजूं लागला । भोळेपणाने ॥९॥

जरी पूजिली व्यक्तिमूर्ति । तरी चुकलें मी न म्हणे चित्तीं । 
परि सिध्दांत वाउगे राखिती । हें तों आहे अज्ञानपण ॥१०॥

सुखासाठी आखिली दिशा । रेखिला घराचा नकाशा । 
परि लाभली शेवटीं निराशा । नकाशाचि राखतां ॥११॥

घर राहाया नाही मिळालें । नकाशे नकाशेच राहिले । 
तेणें समाधान भंगलें । जाणीव होतां पुढे पुढे ॥१२॥

तैसेंचि झालें मूर्तिपूजेचें । जे जे पंथ दिसती आजचे । 
तेथील साधक मूर्तिपूजेपुढचें । कांहीच नेणे ॥१३॥

तो मूर्ति धरोनीच बसला । मूर्खचि समजतो पुढचियाला । 
म्हणतो भ्रष्टाचार झाला । मूर्तिपूजेवांचोनि ॥१४॥

त्यासि कळला नाही धर्म । मूर्तिपूजेचें काय वर्म । 
उगीच वाढवूनि घेतला भ्रम । बिचार्‍याने अंतरीं ॥१५॥

घरीं देवाचा कट्टर पुजारी । असत्य करीत असे बाजारीं । 
व्यवहार करितां झाला वैरी । ज्याचा त्याचा ॥१६॥

देवळामाजीं कान घरी । नाक धरोनि प्राणायाम करी । 
बाहेर येतां शिवी दे, कावरी । ज्यासि त्यासि ॥१७॥

देवाद्वारीं हवन करी । बाहेर भिकार्‍यासि मारी । 
पोटा न दे चूनभाकरी । उपाशीयाच्या कधीहि ॥१८॥

आमचा देव सत्यचि बोले । परि आम्हीं पाहिजे खोटें केलें । 
ऐसें असोनि भक्त झाले । म्हणती आम्ही ॥१९॥

स्वयें म्हणवी रामभक्त । नाही एकपत्नीव्रत । 
नित्य पूजितो हनुमंत । व्यसनें झाला प्रेताऐसा ॥२०॥

देव दुर्जनासि संहारी । कष्ट करितो भक्तांघरीं । 
भक्त बघा हा व्यभिचारी । आळसे घरीं झोपतसे ॥२१॥

देव म्हणे ’मी सर्वत्र । दीनरंक माझे पुत्र’ । 
उपासक त्यांसि दिवसरात्र । पिळोनि चैन भोगितसे ॥२२॥

’प्रभु आमुचा पतितपावन’ । म्हणोनि कंठरवें करी गायन । 
मानवासि अस्पृश्य हीन । मानून डौल मिरवितो ॥२३॥

देवाचिया मूर्तीसाठी । सोने हिरे बैसवी मुकुटीं । 
न दे श्रमिकासि लंगोटी । मंदिर बांधतां मेला तरी ॥२४॥

कसलें हें देवपूजन ? मूर्तिपूजेचें विडंबन । 
केवढें शिरलें आहे अज्ञान । आपणांमाजीं ! ॥२५॥

देवळामाजीं करी भजन । बाहेर येतां खोटें भाषण । 
ऐशा पुजार्‍या पुसेल कोण ? सांगा तरी ॥२६॥

म्हणोनि हें वाईट विसरावें । पूजेने पूज्यासि ओळखीत जावें । 
अभ्यासाने पाऊल टाकावें । पुढे पुढे ॥२७॥

जैसी ज्याची भावना । त्याने तैसीच मानावी देवता मनां । 
परि न चुकावी उपासना । सत्कर्मांची ॥२८॥

मूर्तिपूजेचा अर्थ एक । आपण मूर्तीच व्हावें सम्यक । 
म्हणजे करावी तैसी वागणूक । अभ्यासाने ॥२९॥

जयाची मूर्ति उपासावी । तयाची चरित्रकथा वाचावी । 
पुढे कामेंहि करीत जावीं । आपणहि तैसीं ॥३०॥

काय केलें माझिया देवें । मजसी मुळीच नाही ठावें । 
फक्त मूर्तीच धरोनि बसावें । हें वेडेपणाचें ॥३१॥

ऐसी असावी उपासना । उपासनीं वाढवावें कर्तव्यगुणा । 
कर्तव्यपूर्तीने मोठेपणा । अंगीं घ्यावा मिळवोनि ॥३२॥

संकटें येतां कार्यामाझारीं । चिंतनीं घ्यावें चारित्र्य अंतरीं । 
अभ्यासाचें तेज वृत्तीवरि । वाढवावें सर्वकाळ ॥३३॥

चुकलिया संतां विचारावें । पुढे कार्य करावयासि धजावें । 
आपुल्या परीने सुख देत जावें । जीवांलागीं ॥३४॥

यासाठीच मूर्तिस्थापना । ठायींठायीं केली जाणा । 
आठवण राहावी साधकांना । म्हणोनिया ॥३५॥

पदोपदीं हो पवित्र वृत्ति । म्हणोनि स्थळोस्थळीं स्थापिली मूर्ति । 
वृक्षपशुपक्षी ठरविल्या विभूति । सदभावासाठी ॥३६॥

मनोभावें मूर्तीसि पुजावें । श्रवण, कथन, स्मरणादि करावें । 
मूर्तीप्रमाणे सत्कर्म घडावें । आपुलिया अंगें ॥३७॥

सर्व सोडोनि भिन्न भावना । हृदयीं धरावी उपसना । 
जेणें प्रसन्नता येई मना । तेंचि उत्तम समजावें ॥३८॥

मन जेथे समाधान पावे । तेथूनि शक्तीचें तेज घ्यावें । 
मग कार्यासि लागावें । सदगुणी ऐशा ॥३९॥

सदभावें करावें पूजन । विनम्र करोनिया देहमन । 
निर्मळ असावें वातावरण । ध्यान धराया देवाचें ॥४०॥

येथे मानसिक पूजेचेंच महत्त्व । विचारसामर्थ्य हें मूलतत्त्व । 
तेणेंचि पावे ईश्वरत्व । जीवालागी प्रयत्नें ॥४१॥

जीवासि मूळतत्त्व कळावें । सर्वांभूतीं आत्मरूप समजावें । 
ऐसेचि पूजनाचे गोडवे । वर्णिले संतीं ॥४२॥

संतीं बोलिलें हरिनांम घ्यावें । हेंहि वाटे साधन बरवें । 
परि अर्थ समजोनि जपावें । तरीच सार्थक जीवाचें ॥४३॥

नाम ईश्वराची शब्दमूर्ति । ’ मुखीं नाम हातीं मोक्ष ’ म्हणती । 
यज्ञाहूनि थोर जपावी महती । ठाऊक हें सर्वां ॥४४॥

परि कासयासि जपावें नाम । साधावयाचें तें कोण काम । 
या ध्येज्ञानावांचोनि सर्व कर्म । निरर्थक ॥४५॥

कितीतरी जन नाम घेती । माळा-मणी ओढीत राहती । 
परि क्षणहि त्यांची मति । रामीं न रंगे ॥४६॥

मुखें नाम उच्चारिती । व्यवहार अधोगामी करिती । 
पापें करोनि शपथ घेती । देवधर्मांची ॥४७॥

कसलें हें नाम जपणें ? स्वार्थें विश्वासघात करणें । 
आशातृष्णा न सोडणें । इंद्रियविषायांची ॥४८॥

येथे तारतम्यचि पाहिजे । नामजपीं व्रतस्थ होइजे । 
तरी जीवास सुखाचें साजे । स्थान जीवनीं ॥४९॥

मुखीं नामाचें चिंतन । हातीं सेवाकर्य पूर्ण । 
करील चारित्र्य संपादन । तोचि भक्त ॥५०॥

नामें शक्ति येते अंगीं । संकटें निवारण्याची प्रसंगीं । 
परि पुरुषार्थ असावा जंगी । तरीच फळे ॥५१॥

दुराचार सज्जन-विरोध । ऐसे दोष आणिती बाध । 
काया-वाचा-मनें टाळिले अपराध । तरीच फळे ॥५२॥

मग तें नाम मंदिरीं जपावें । अथवा शेतीमाजीं घ्यावें । 
चालतां बोलतांहि गावें । तरी तो यज्ञ ॥५३॥

मुख्य नामाचें अधिष्ठान । कर्तव्य करावें संपादन । 
हेंचि साधावया संतजन । नामजप सांगती ॥५४॥

जे पुरुषार्थ सोडोनि जपती नाम । त्यांसि कैसा पावेल आराम ? 
हें तों झालें आंधळें काम । देवाद्वारीं ॥५५॥

आमुचा राम कामें करी । आम्ही मागावी भाकरी । 
होवोनि फिरावें भिकारी । ही भक्ति कैची ? ॥५६॥

रामें असुरांसि मर्दावें । आम्हीं पूजापात्र अवलंबावें । 
निर्बल होवोनि शरण जावें । ही भक्ति कैची ? ॥५७॥

भक्त म्हणजे विभक्त नव्हे । एकरूपचि होवोनि जावें । 
देवें लोकांचें दु:ख हरावें । आम्हीं का करावें देवदेव ? ॥५८॥

ऐसा जप जयाने केला । तो शेवटीं मूर्खचि राहिला । 
बोल देवोनिया देवाला । काय होतें ? ॥५९॥

पापक्षालनासि नाम घ्यावें । पुढती पाप करीतचि जावें । 
ऐसें कोण वदलें बरवें । सांगा मज ॥६०॥

ऐसी आहे ज्यांची स्थिति । त्यांसि नामजपी म्हणती । 
मी म्हणेन कलंक लाविती । नामादिकासि ते ॥६१॥

याहूनि न जपे तो पुरवला । उत्तम राहणी ठेवी जो भला । 
दु:ख न देईच कोणाला । कोण्या प्रसंगीं ॥६२॥

व्यवहार करीतसे कष्टून । जोडोनिया उद्योगें धन । 
सदा राहतो प्रसन्न । खेळींमेळीं प्रेमभावें ॥६३॥

असेल तें गरजूंना देणें । कोणा उत्तम-वाईट न म्हणे । 
आपणा ऐसें सर्वांचें जाणे । सुखदु:ख सज्जन ॥६४॥

हेंचि शिकावयासाठी । नामजप सांगितला उठाउठी । 
सदा राहणी गोमटी । प्रेमळपणाची सर्वांशीं ॥६५॥

प्रथम नाम दुजें चिंतन । तिजें निश्चयीं लावावें मन । 
मग होवोनि सत्कार्यप्रवण । समाजसेवा साधावी ॥६६॥

ऐसें सत्कर्म जरी नाचरवें । सदगुण विसरोनि नामचि गावें । 
तरी तें पूर्णतेस न पावे । आत्मोन्नतीच्या ॥६७॥

म्हणोनि संतांचिया वचना । निरीक्षोनि ठेवावी धारणा । 
तरीच ग्रंथीं कथिल्या त्या खुणा । पावती रामनामाच्या ॥६८॥

देव बोलला ’ कामें करा । निर्भय होवोनि देशीं विचरा ’ । 
सकळ देवाचाचि पसारा । सेवाभाव साधा ॥६९॥

जनता ज्याला देवरूप कळली । त्याचीच भक्ति देवा पावली । 
साक्षात्कारें वृत्ति वळली । विश्वात्मभावीं ॥७०॥

तें साधाया बोलिलें नाम । लाभावया जीवास आराम । 
तुटावया अज्ञानभ्रम । दु:खमूळ जो ॥७१॥

आपण तरूनि जग तारावें । शक्तियुक्तीने विश्व भरावें । 
नामें लोकांसि जागवावें । ऐसा आदेश संतांचा ॥७२॥

संतमुकुटमणि तुकाराम । त्यांनी अभंग कथिले अति सुगम । 
मार्ग केला व्यवहारक्षम । भोळयाभाळया जनांसाठी ॥७३॥

अत्यंत साधी गर्जली वाणी । गेली वेदादिकांस भेदोनि । 
भ्रमचि निवारिला तत्क्षणीं । अज्ञानी जडजीवांचा ॥७४॥

हजारो मुखांतूनि गरजला । ’ वेदान्त आम्हांसीच कळला ’ । 
’ ज्याने पंढरीराज वंदिला । सर्व पावला शास्त्रगुह्य ’ ॥७५॥

म्हणे ’ नको ब्रह्मज्ञानादि भाव । आत्मस्थितीचा गौरव । 
आम्ही भक्त तूं चहूकडे देव । ऐसें करी आम्हांसि ’ ॥७६॥

’ कोठोनि आणावी विद्वत्ता ? सेवेंचें काम आमुच्या हातां । 
नाम गाऊं कष्ट करितां । पंढरीनाथा पावाया ’ ॥७७॥

प्रभूने ऐकिली त्यांची सेवा । संकटीं आला ऐकोनि धांवा । 
त्यांच्या शब्देंहि लोक तरावा । ऐसा केला चमत्कार ॥७८॥

ऐसे झाले संत अनेक । मूर्तिभक्त बहु नामधारक । 
जे सेव्यचि झाले असोनि सेवक । हनुमंतापरी ॥७९॥

सर्वचि पंथांचे भक्तिप्रकार । तत्त्व साधतां असती सार । 
हा आचरोनि दाविला समन्वय सुंदर । रामकृष्ण परमहंसें ॥८०॥

नाम जपोनि मूर्ति पूजितां । देवचि झाले देवा भजतां । 
पूजूं लागले विश्वा समस्ता । स्त्रीपुरुष-भेद विसरोनि ॥८१॥

मूर्तिपूजा जपतप कांही । तत्त्व साधतां बाधक नाही । 
हें सिध्दचि केलें अनुभवें पाही । संतजनांनी ॥८२॥

उत्तम भाकरी करितां यावी । म्हणोनि मुलीने मातीची करावी । 
तैसी अमूर्त देवाचा मार्ग दावी । मूर्तिपूजा ही ॥८३॥

देव आहे मूळचा अंतरीं । त्याची साधना करावी लागे बाहेरी । 
ओळख पटतां विचारें पुरी । भिन्नपणा राहीना ॥८४॥

सत्कर्मांचें ज्ञान झालें । सत्कर्म करणें अंगीं आलें । 
मूर्तिपूजेचें साधन संपलें । साधकाचें ॥८५॥

राहिलें जीवनांत तैसे वागणें । देव भजतां देवचि होणें । 
देव होण्याचीं कारणें । अनुभवोनिया ॥८६॥

माझा देव दयावंत । पुरवी हीनदीनांचे मनोगत । 
मजसी पाहिजे निष्ठावंत । तेंचि केलें ॥८७॥

ऐसा जप जाले अंतरीं । हातीं व्यवस्थेची चाकरी । 
लागला रंग याचिपरीं । अहोरात्रीं देहाला ॥८८॥

आता परोपकारचि उरला । देव अंतरी-बाहेरी भरला । 
पाहणेंचि नाही दुसर्‍या कोणाला । कोणे ठायीं ॥८९॥

विसरोनि गेले व्यक्तिपण । झाले कार्यरूपचि आपण । 
ऐसें होतां देवपण । अंगीं आलें धांवोनि ॥९०॥

नाना विरोधकांस तोंड दिलें । नाना कष्ट सहन केले । 
शेवटी सर्वांनी ठरविलें । हेंचि खरें म्हणोनि ॥९१॥

पूर्वी मूर्तीस शृंगार करी । तैसेंचि मानवांसि शृंगारी । 
’ कष्ट नसो कोण तिळभरी । गांवीं माझ्या ’ म्हणोनि ॥९२॥

हीच खरी देवपूजा । याविण नाही मार्ग दुजा । 
संतदेव बोलिले माझ्या । हृदयामाजीं येवोनि ॥९३॥

देव जैसा जैसा आकळला । तैसा देह-अंहकार मावळला । 
लवणकण सागरीं मिळाला । सागर झाला एकत्वें ॥९४॥

यापरी पुढची आहे पायरी । जैसी वृत्ति धरोनि चढाल वरी । 
तैसा जीव ब्रह्म होवोनि अंतरीं । अनुभव घेई आपणचि ॥९५॥

म्हणे मीचि सर्व आता झालों । विश्वीं विश्वाकार होवोनि ठेलों । 
सर्वचि कार्ये करूं लागलों । आपणाचि साठी ॥९६॥

माझ्याविरहित कोणी नुरला । अणुरेणूमाजीं मीचि संचला । 
ऐसा अनुभव येतां झाला । पूर्ण योगी ॥९७॥

प्रथम पाहिली देवुळीं मूर्ति । पुढे पाहिलें जीवजनाप्रति । 
पूर्णता होतां सर्वत्र व्याप्ति । आपुल्याचि रूपाची ॥९८॥

ऐसी लाभावया आनंद-ठेव । पूजावयासि मांडिला देव । 
द्रष्टा-दृश्य-दर्शनभाव । एकतत्त्वी दिसावया ॥९९॥

हाचि धरोनि निर्धार । केलिया नवविध पूजाप्रकार । 
पावेल सर्वोत्तम सार । ईश्वरभक्तीचा ॥१००॥

एरव्ही कितीहि पूजिली मूर्ति । तरी वाढचि घेईल भ्रांति । 
न मिळेल कदाकाळीं शांति । जनामनासि ॥१०१॥

नसता वाढेल अहंकार । ’ आमची प्रतिमा अधिक थोर ’ । 
न मिटेल पंथद्वेष साचार । व्यापक ईश्वर जाणल्याविण ॥१०२॥

म्हणोनि प्रतिमा धरोनीच न बसावें । पायरीने वाढत जावें । 
क्रियाशीलपणें विश्वीं पाहावें । विश्वंभरासि ॥१०३॥

सर्व लोकचि आमुचा ईश्वर । सर्व गांवचि आमुचें मंदिर । 
सेवा करणें निरंतर । पूजा आमुची ॥१०४॥

प्रामाणिकतेने करणें काम । हेंचि आमुचें ईश्वरनाम । 
सर्व जीवमात्राशीं ऐक्यप्रेम । धर्म हा आमुचा ॥१०५॥

हाचि दृढ धरितां निर्धार । परमार्थ याहूनि नाही थोर । 
किंबहुना हाचि परमार्थ-सार । अनुभवियांचा ॥१०६॥

अंगीकारोनि या तत्वांसि । एक करावें सर्व भक्तांसि । 
लावावें पूजाया ग्राममंदिरासि । तुकडया म्हणे ॥१०७॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । 
पूजनस्मरण-रहस्य कथित । सहविसावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥