वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय सत्ताविसावा

ग्रामगीता

अध्याय सत्ताविसावा : सामुदायिक प्रार्थना

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

मूर्तिपूजा नामजप । यांचीं मूळतत्त्वें उज्जवलरूप ।
परंतु त्यांचा विपर्यास खूप । जाहला लोकीं ॥१॥

देवीदेव दिसती जिकडे तिकडे । सांदी-बिदींचे गोटे खडे । 
कोणी न बघती तयांकडे । आवडीने ॥२॥

नेमकी प्रभावशाली मूर्ति । जी बघतांचि देई स्फूर्ति । 
होईल तात्त्विकतेची पूर्ति । ऐसी दिसे क्वचितचि ॥३॥

तेथेहि भाविकतेचा अतिरेक । जेणें बुध्दिमान होती नास्तिक । 
म्हणती हा गोंधळ असे घातक । भक्तीच्या नांवें ॥४॥

मूर्ति जयाचें स्मारक । त्याच्या गुणाकर्मांची नाही भूक । 
मूर्तीच देव ठरवोनि लोक । करिती अति वेडेचार ॥५॥

कोठे काकडआरती शेजारती । चाले पंचपदी पूजा पोथी । 
नाही शिस्त गांभीर्य शांति । सात्विक वृत्ति स्फुरेचि ना ॥६॥

एक जाती एक येती । मधेच वाकडे उभे राहती । 
फुलें अक्षता कशाहि फेकती । मंत्रपुष्पांजलीच्या ॥७॥

नगारा जातो एकीकडे । टाळ-घंटयांचा गोंधळ उडे । 
टाळया कसल्या, गारपीट पडे । ऐसेंचि वाटे ॥८॥

असल्या बाजाराने कांही । उपासनातत्त्व साधत नाही ।
तेथे शिस्त शांति सात्विकता येई । तरीच लाभ सर्वांसि ॥९॥

याचसाठी सामुदायिक प्रार्थना । हा मार्ग दाविला जना । 
हीच आजची उपासना । सर्वांचिया हिताची ॥१०॥

श्रोतीं विचारिला होता प्रश्न । पंथ भेद मिटाया उपाय कोण ? 
कैसें राहील ग्रामजीवन । एकजुटीचें ? ॥११॥

नाना पंथ असती गांवीं । भिन्न देव-पूजक वैष्णव-गोसावी । 
नाना जाती-जमाती एकत्वीं । कैशापरीं वागतील ? ॥१२॥

त्यासीहि सामुदायिक प्रार्थना । हाचि उपाय असे जाणा । 
जेथे धर्म-पंथ-संत-देव नाना । एकासनीं विराजती ॥१३॥

हा झरा राहिला नित्य शुध्द । तरि गांव होईल सदा सुबुध्द । 
आणि सामुदायिकतेने समृध्द । सर्व प्रकारें ॥१४॥

यावरि श्रोतीं प्रश्न केला । कैसें करावें सामुदायिक प्रार्थनेला ? 
जेणें सामुदायिकता गांवाला । प्राप्त होय ॥१५॥

सदभावें गांवांतील जन । करोनिया एक मन । 
कैसे करितील कार्य पूर्ण । सामुदायिक प्रार्थनेचें ? ॥१६॥

प्रार्थनीं कोणता देव योजावा । जो सर्वांसीच मान्य बरवा ? 
गांवाचा जेणें समन्वय व्हावा । कैसा ठेवावा पाठ तेथे ? ॥१७॥

मित्रा ! ऐकिले तुझे प्रश्न । तूं बोललासि विचार करून । 
वेगळेपणाची आहे अडचण । गांवोगांवीं सर्वांच्या ॥१८॥

वस्तुत: छोटीं देव-देवळें । वगळोनि सर्वांनी एके वेळे । 
एकाच देवुळीं जमावें भावबळें । प्रशांत ऐशा ॥१९॥

विसरोनि आपुला वेगळेपणा । करावी तेथे उपासना । 
परि हें नये बहुतांच्या मना । म्हणती आमुचें तेंचि थोर ॥२०॥

अनेक मंदिरें अनेक देवता । विचारें लोकां न पटे एकता । 
त्यांतूनि एक निवडाल कोणता । प्रश्नचि पडे ॥२१॥

हाचि प्रश्न संतांपुढती । पूर्वीहि होता जंव पंथ लढती । 
म्हणोनीच विठ्ठल ब्रह्ममूर्ति । ठेविला त्यांनी सर्वांपुढे ॥२२॥

सर्व पंथांच्या संतसज्जनीं । केली एकी तये स्थानीं । 
ज्ञानप्रेमज्योति पेटविली भुवनीं । महाराष्ट्राच्या ॥२३॥

बंगालीं तामस भक्तिप्रथा । सुधाराया उजळिली कृष्णकथा । 
चैतन्यप्रभूने भाविकां-पंडितां । विविध पंथां एक केलें ॥२४॥

धकाधकीचा काळ पाहिला । संतीं उपास्यांत बदल केला । 
तुलसीदासें रामदासें दाविला । राम कोदंडधारी ॥२५॥

यापरी देश-कालप्रसंगें । संघटनकेंद्र निवडावें लागे । 
आजच्या काळीं जुळवाया धागे । कोणतें रूप निवडावें ? ॥२६॥

याचा मागे मीं विचार केला । अधिकाधिक अनुभव घेतला । 
शेवटीं निश्चयाने निवडला । गुरुदेव माझा ॥२७॥

मीं जरी ’ गुरुदेव माझा ’ म्हटला । तरी तो नव्हे माझाचि भला । 
तो सर्व प्राणिमात्राचा झाला । कल्याणकारी ॥२८॥

त्यास नाही पंथपक्ष । सर्वदेशी तो सर्वसाक्ष । 
सर्व देवादिकांचा अध्यक्ष । सदगुरुराजा ॥२९॥

त्यासि सर्वचि मानव सखे । देश-विदेशींचे एकसारखे । 
नाही धर्म भिन्न त्यांचे निके । एकचि सत्य सर्वांमाजीं ॥३०॥

जैसा आत्मा नाही भिन्न झाला । तैसाचि गुरुदेव संचला । 
कोणी आकाशाचा तुकडा पाडिला । ऐसें नाही ॥३१॥

सत्य सर्वांचेंचि सत्य असतें । असत्य तें असत्यचि होतें । 
तैसेचि गुरुदेव सर्वांचे ते । एकचि राहती सर्वस्वी ॥३२॥

वैदिक असो वा त्याहूनि इतर । सर्वचि पंथीं गुरुदेवाचा आदर । 
इस्लाम, ख्रिस्तादि धर्मींहि थोर । गुरुदेव-भक्ति ॥३३॥

पंथ-प्रचारक गुरु वेगळे । त्यांत असतें द्वैताचें काळें । 
स्वतंत्र अनुभवी गुरु निराळे । ते पावती ज्ञानयोगें ॥३४॥

गुरु हाडामासांचा नोहे । गुरु नव्हे जाति-संप्रदाय । 
गुरु शुध्द ज्ञानतत्त्वचि आहे । अनुभवियाचें ॥३५॥

हें ज्ञान ज्यासि लाभलें । ज्याचें मन विश्वाकार झालें । 
पंथ-पक्ष-धर्म संपले । ज्याच्या ठायीं सर्वचि ॥३६॥

तो सर्वाचा झाला सखा । मानवमात्राचा पाठीराखा । 
कोणत्याहि भाषेने पारखा । तरी पावे तयासि ॥३७॥

करी सदभावना उत्पन्न । दीनदु:खितांचें पालन । 
मलीन मार्गाचे करी खंडण । कायावाचामनाने ॥३८॥

म्हणोनीच थोरांनी कथिलें । गुरुचि ब्रह्मा विष्णु झाले । 
महेश्वरहि गुरुचि बोलिले । याच सामर्थ्यें ॥३९॥

गुरुचि साक्षात ब्रह्म कथिला । सर्वांस व्यापोनि गुरुचि उरला । 
ऐसा देव म्हणोनि प्रार्थिला । गुरुदेव माझा ॥४०॥

महापुरुष वेगळाले । परि गुरुत्वीं मिळोनि गुरुचि झाले । 
व्यक्तिपण धर्मपणहि मुरालें । गुरु-स्वरुपीं ॥४१॥

त्याचें पूजन गंधाने नोहे । त्याचें मंदिर विशाल आहे । 
विशालतेला मर्यादा राहे । परि गुरु त्याहुनि अमर्याद ॥४२॥

भूमंडळ ज्याचें क्षेत्र पूर्ण । सर्व पृथ्वी जयाचें आसन । 
चंद्रसूर्य नंदादीप जाण । गुरुदेवाचे ॥४३॥

त्यांतचि धर्म-पंथ सामावती । तोचि वेष्टिला सर्वांभवती । 
त्याचेवांचूनि नाही रिती । जागा कोणी ॥४४॥

त्याचें ज्ञान झालिया जीवा । कोठे द्वेष-कलह-हेवा ? 
सुखशांतीचा लाभे विसावा । सर्वांठायीं ॥४५॥

म्हणोनि हेंचि व्हावया ज्ञान । विशाल मनें रचिलें साधन । 
सामुदायिक प्रार्थनेचें स्थान । सामुदायिकपणास्तव ॥४६॥

तेथे सामुदायिक देव कल्पावा । पुढे कार्यातचि अनुभवीत जावा । 
मग विश्वाकार पहावा । गुरुदेव माझा ॥४७॥

हें झालें गुरुदेवांचें वर्णन । आता ऐका प्रार्थना-साधन । 
गांव व्हावया उन्नत पूर्ण । तैसेंचि स्थान शोधावें ॥४८॥

विशाल मंदिर या गुरुदेवचौक । जेथे बसतील जन सकळीक । 
महिला, पुरुष, मुले भाविक । सदभावाने सायंकाळीं ॥४९॥

प्रथम अधिकारी सेवकाने । घेवोनि हातामाजीं झाडणें । 
त्वरित करावें मैदान निर्दळवाणें । प्रार्थनेसाठी ॥५०॥

येतां प्रत्येक गुरुवार । जाऊनि फिरावें घरोघर । 
बोलवावी प्रार्थनास्थानीं सत्वर । जनता सारी ॥५१॥

आईबाई सकळ सज्जन । मुलेबाळें वृध्द-तरुण । 
देवोनिया निमंत्रण । बोलवावे प्रार्थनेसि ॥५२॥

गांवीं सर्वांसि निरोप द्यावा । परस्परें समाज सारा जुळवा । 
येतांना घोंगडी गोणपाट आणावा । आपापला म्हणोनि ॥५३॥

सकळांनी करावी बिछायत । सर्वांना रांगेंत बसवावें शांत । 
सदभावना वाढे सकळांच्या मनांत । प्रार्थनेची ॥५४॥

सात्विक असावें वातावरण । अतिशांत ऐसें गंभीरपण । 
सर्वांनी करावें बंद संभाषण । तया स्थानीं ॥५५॥

आधी पुढे मांडावें अधिष्ठान । त्यावरि आच्छादावें सुंदर आसन । 
आपुल्याच गांवीं केलेलें पूर्ण । कलाकुसरीने खादीचें ॥५६॥

वरि ठेवावा तकिया साजिरा । जैसा कोणी बसतोच आसनीं बरा । 
दिसावा ऐसा मोहक पसारा । सात्विकतेचा ॥५७॥

जवळचि बसावे सूचक, गायक । तिसरे भाषण देणारे भाविक । 
दुसर्‍या बाजूने पुजारी, पाठक । नामधून म्हणावया ॥५८॥

ऐसा प्रार्थनेचा संच झाला । चहुबाजूंनी सेवकगण बसला । 
पाठीमागे संरक्षक दिसला । उभा तेथे ॥५९॥

तयाचें काम शांतता राखणें । भोवताली गलबला थांबवणें । 
सर्वांना शिस्तीमाजीं बसवणें । हळुवारपणाने ॥६०॥

जे कोणी येतील मागाहून । त्यांना बसवावें क्रमाने पूर्ण । 
मग करावें घंटीवादन । दोनचि ठोके ॥६१॥

उभा राही अधिष्ठानापुढे पुजारी । लावी शांतिने धूपदीपिका बरी । 
मग सूचक उभा राहतो सामोरी । सूचना द्याया प्रार्थनेची ॥६२॥

सर्वामिळोनि पाठ करवी । एकस्वरें शांतता भरवी । 
ऐसी प्रार्थना लावील चवी । अंत:करण मोहावया ॥६३॥

सहज लागेल तिकडे ध्यान । ऐसें चालावें प्रार्थनीं गायन । 
पुढे होईल नामस्मरण । गुरुदेवाचें ॥६४॥

ज्यांत असेल कुणीहि नाम । निवारोनि भेदभ्रम । 
सर्व धर्मी भाव सम । राखावया सर्वांचा ॥६५॥

हें संपतां भाषणासाठी । देईल सूचक सूचना ओठीं । 
मग भाषणाधिकारी शेवटीं । देईल भाषण सदभावें ॥६६॥

”आपण सर्व एकचि आहों । मग भिन्नपण कासया पाहों ? 
सर्वांशीं सहकार्य करा हो ! कुटुंबापरी ॥६७॥

मानव विश्वकुटुंबाचा घटक । ऐसें समजोनि वर्तावें सम्यक । 
शक्ति द्यावया प्रार्थावी भाक । शक्तिवंतापुढे ॥६८॥

सर्व संत एकचि असती । सर्व देव एकचि निश्चितीं । 
सर्वांचे संदेश ऐकतां पावती । एकचि तत्त्व सर्वहि ॥६९॥

म्हणोनि सर्वांनी सहकार्य करावें । जैसें ज्याकडोनि बनेल बरवें । 
संसारा स्वर्गासमान बनवावें । आपुल्यापरीं ॥७०॥

हेंचि सांगावें प्रार्थनेवरि । यांतचि आहे सेवा ईश्वरी । 
याहूनि भिन्न नाही कुसरी । परमार्थाची” ॥७१॥

हें भाषण झालिया पूर्ण । मग शान्तिपाठ सर्वांनी करोन । 
करावें एकनिष्ठेने नमन । एकाच पध्दतीने ॥७२॥

सूचकाने सूचना द्यावी । सर्व मंडळी उभी करावी । 
जयजयघोषें दूमदुमवावी । ऊर्वि अवघी ॥७३॥

गुरुदेवाचा जयजयकार । त्यांत ये सर्वदेवनमस्कार । 
ऐसें प्रार्थनेचें तत्त्व सुंदर । बोलिलों तुम्हां ॥७४॥

चौकीं प्रार्थना संपल्यावरि । आपापली घोंगडी पासोडी बरी । 
उचलूनि न्यावी आपुल्या घरीं । सेवा पुरी करोनिया ॥७५॥

येथे प्रार्थनापाठ नाही बोलिला । तो विषय अन्य ग्रंथीं आला । 
म्हणोनि येथे नाही विवरिला । पहावा ’ सक्रियपाठीं ’ ॥७६॥

मित्रहो ! ऐका माझें वचन । जरि व्हावें वाटे गांवाचें कल्याण । 
तरि सामुदायिक प्रार्थना-साधन । सोडूं नका कधीहि ॥७७॥

एवढें अनुभवें सांगोनि ठेवितों । प्रार्थनाच मी गांवाचें धन समजतों । 
यानेच स्वर्ग मोक्षहि पावतो । समाज अपुला ॥७८॥

आमचा देव समाजीं वसतो । समाजाकरितां सर्व करतो । 
सर्वांस व्यापूनि राहतो । प्रार्थनेच्या आसनीं ॥७९॥

तो भेटतो जनकार्यांनी । आम्ही केली प्रार्थना म्हणोनि । 
भरली भावना आत्मा ओतोनि । प्रार्थनीं या ॥८०॥

आपण होता प्रश्न पुसला । म्हणोनि ऐसा विस्तार केला । 
प्रार्थनीं तल्लीन होतांचि देव कळला । विशाल स्वरूपी ॥८१॥

त्या मूलतत्त्वाचा जो अनुभव । ज्ञानगम्य विश्वात्मक देव । 
तोचि मानिला गुरुदेव । प्रार्थनीं आम्ही ॥८२॥

त्या गुरुदेवाच्या अधिष्ठानावरि । मूर्तीच हवी असेल जरि । 
कल्पावी आपापल्या इच्छेपरी । कोणत्याहि देवाची ॥८३॥

देव गुरुदेवांत सामावले । भक्त तेवढे प्रार्थनीं एक झाले । 
मानवतेचें मंदिर उघडलें । विश्वामाजीं या रूपें ॥८४॥

एकाची प्रार्थना अनेक मिळाया । अनेकांची प्रार्थना अनंत कळाया । 
अनंत तत्त्वीं एकत्व पावावया । प्रार्थना आहे ॥८५॥

हें समजोनीच हा मार्ग धरिला । आदर द्याया भिन्नधर्मपंथांला । 
पूज्य मानावया सर्व संतांला । प्रार्थनेमाजीं ॥८६॥

यासाठी व्यापक प्रार्थना मांडली । उपासकांची वेली गुंफली । 
कळावया सर्व धर्मांची खोली । मूळरूपें ॥८७॥

वेदउपनिषदांची प्रार्थना । ’ सुख हो सर्वचि प्राणीजना ’ । 
सर्वांची उन्नति हीच धारणा । प्रार्थनेमाजीं ऋषींची ॥८८॥

येशूख्रिस्ताने प्रार्थना केली । सर्वांसाठी शांति मागितली । 
सहनशक्तीची देवता पावली । तयालागी ॥८९॥

महंमदाने केली प्रार्थना । विखुरला इस्लाम कराया शहाणा । 
संघटित केलें त्याने स्वजना । तया काळीं ॥९०॥

पावित्र्य शिकविलें झरतुष्ट्राने । संयम शिकविला महावीराने । 
अहिंसक संघ वाढविला बुध्दाने । प्रार्थनेद्वारें ॥९१॥

संतांचें नामसंकीर्तन । तें सामुदायिक प्रार्थनेचेंचि रूप जाण । 
सर्व देव-स्मरणें करोनि संघटन । दिलें ज्ञान सर्व जना ॥९२॥

कलियुगीं भक्ति-महिमान । भजन आणि नामसंकीर्तन । 
यज्ञांत श्रेष्ठ नामजपयज्ञ । प्रार्थनेंते आलें तें सारें ॥९३॥

मूर्तिउपासना आणि ध्यान । नवविधा भक्तीचा सार पूर्ण । 
प्रार्थनीं सर्वचि साधे साधन । सर्व जनांसि ॥९४॥

शिस्त, शांति, गांभीर्यादि गण । उठण्या-बसण्या-बोलण्याचें ज्ञान । 
लाभे मानव्याचें शिक्षण । प्रार्थनेमाजीं ॥९५॥

प्रार्थना मानव्यशिक्षणाची शाळा । ग्रामसंस्कृतीचा मुख्य जिव्हाळा । 
भेदकल्पना जाती रसातळा । प्रार्थनेच्या मुशीमाजीं ॥९६॥

’ सर्वचि आपण बंधुजन ’ हा भाव वाढ घे मनोमन । 
गांवाची स्वर्गीयता असे अवलंबून । याचवरि ॥९७॥

सकळांस कळाया ही संस्कृति । उपदेश द्यावा प्रार्थनेअंतीं । 
ही नित्य ठेवावी चालीरीति । गांवीं आपुल्या ॥९८॥

ही प्रार्थना गांवीं राही जागती । तरि जिवंत राहील गांवसंस्कृति । 
सामुदायिकतेची दीपज्योति । प्रकाशेल सर्वकाळ ॥९९॥

विश्वीं होऊं शकेल शांतता । तेथे गांवाची कोण कथा ? 
सामुदायिक प्रार्थनाच करील एकता । नित्यासाठी, तुकडया म्हणे ॥१००॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । 
कथिलीं प्रार्थना ग्रामोध्दारार्थ । सत्ताविसावा अध्याय संपूर्ण ॥१०१॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥