वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय तेरावा

ग्रामगीता 

अध्याय तेरावा : ग्रामनिर्माण कला 

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे । हें सूत्र ध्यानीं ठेवोनि खरें । 
आपुलें ग्रामचि करावें गोजिरें । शहराहूनि ॥१॥

हें गांवीचे लोक विसरले । आळसाद्वारें दुर्दैव शिरलें । 
दैन्य दारिद्रय सर्वत्र भरलें । गांवामाजीं ॥२॥

शहरीं यंत्रादिकें आलीं । गांवची उद्योगकला मेली । 
कुशल माणसें शहरीं गेलीं । उद्योगासाठी ॥३॥

शहरीं गेली गांवची बुध्दि । शहरीं गेली गांवची समृध्दि । 
कष्टाळू शक्ति, हस्तकलासिध्दि । तेहि गेली ॥४॥

गांवीं उरली मुख्यत: शेती । ती कशीबशी चालविती । 
विशेष बुध्दि, शक्ति, संपत्ति । यांचा ओघ दुसरीकडे ॥५॥

उत्तम शिक्षित, सामर्थ्यवान । ते नोकरीसाठी फिरती वणवण । 
उद्योगधंदे वा शेती कोठून । होईल उन्नत गांवची ? ॥६॥

हे सर्व जरि लक्ष पुरविती । तरि छोटे उद्योग आणि शेती । 
निश्चयें सर्वांसि पोषिती । बेकार दीन कोणी नुरे ॥७॥

कारण, गांवींच कच्चा माल । ज्यावरि जगतां येई खुशाल । 
तो गांवीं पक्का नोहे म्हणोनि हाल । गांवाचे आमुच्या ॥८॥

कच्चा माल मातीच्या भावें । तो पक्का होतां चौपटीने घ्यावें । 
मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे ? पिकवोनीहि ते उपाशी ॥९॥

त्यांच्या सुखाचें मुख्य साधन । सर्वतोपरी स्वावलंबन । 
शहरावरि न राहतां अवलंबून । काम करावें सर्वांनी ॥१०॥

उत्तम बुध्दि कौशल्य ज्ञान । शक्ति सामर्थ्य इकडे योजून । 
गांवीं वाढवावें स्वावलंबन । आळस झाडून सर्वांचा ॥११॥

जिकडे तिकडे स्वावलंबनप्रेम । घरोघरीं चालावें कांही काम । 
आपुलें करोनि दुसर्‍यासि निष्काम । मदत करावी मानवांनी ॥१२॥

घरीं मुलाबाळांनीहि राबावे । शेतीं कामधंदे हस्तें करावे । 
बायकापोरांसहित सुखी व्हावें । कष्ट करोनिया ॥१३॥

हातीं उद्योगाचें साधन । मुखीं रामनामाचें चिंतन । 
हाचि धर्म आहे महान । गांवकरी लोकांचा ॥१४॥

गांवचा एकेक घटक । बनवावा कलावंत सेवक । 
जो आपुलें घर सुरेख । करोनि गांवा शोभवी ॥१५॥

कष्ट करणाराचें जीवन । शोभा देतें देवाप्रमाण । 
स्वत: स्वावलंबी होऊन । सहकार्य करी जो गांवाशीं ॥१६॥

पहिलें पाऊल घरचा धंदा । दुसरें पाऊल दारच्या प्रबंधा । 
पुढे ग्रामसफाईच्या छंदा । लावोनि घ्यावें आनंदें ॥१७॥

असें हें कष्टाचें स्वरूप । वाढवीत जावें आपोआप । 
नाना कलांचें देणें रूप । कष्टालागी शिकावें ॥१८॥

कला असे मानवासि भूषण । परि पाहिजे जीवनाचें त्यांत स्मरण । 
जगावें सुखसमाधान । धरोनिया अंतरीं ॥१९॥

ऐसी असावी सर्व कला । नाहीतरि वाया गेला । 
प्राणी जन्मला आणि मेला । नाहकचि ॥२०॥

कलेनेच माणसाची ओळख । एरव्ही कोण पुसतो आणिक ? 
तुम्ही आहांत रांव की रंक । आता कोणी पुसेना ॥२१॥

जरी असले कोणी धनवान । तरी व्हावें त्यांनी कलापूर्ण । 
यांतचि आहे शहाणपण । श्रीमंतांचें ॥२२॥

नाहीतरि घरचे सर्वचि बेताल । समजेना गाणें-वाजवणें समकाल । 
परि गाणारे आणोनि खुशाल । जागरण करविती प्रयासें ॥२३॥

म्हणती आमुचा उत्सव महान । करावें कांही नवरात्र म्हणोन । 
यासाठी आणिले गाणारे कलावान । देवापाशी ॥२४॥

आम्हांस कांहीच कळेना । म्हणोनि बोलाविलें ऐकणारांना । 
त्यांनी ऐकाव्या गाण्याच्या ताना । आम्ही हसावें पाहोनि ॥२५॥

काय करावी ऐसी रीति ? आपणासि नसे ज्याची मति । 
त्यापेक्षा आपणहि शिकावी कोणतीं । कला अंगीं ॥२६॥

दुसर्‍याचा राजहंसा बरवा । आपला असेनाका पारवा । 
परि स्वावलंबी कलेचा रावा । बोलवावा प्रत्येकाने ॥२७॥

अहो ! जीवनाची एक तरी कला । असावी लागते मानवाला । 
तरीच तो ’ मानव ’ शोभला । नाहीतरि कल्ला जीवनाचा ॥२८॥

गोड बोलण्याची कला । नेटकें राहण्याची कला । 
अंग-मेहनतीची कला । आवश्यक आहे जीवनासि ॥२९॥

सुंदर लिहिणें अक्षरओळी । स्पष्ट वाचणें पुस्तकें सगळीं । 
जरा न दिसे टाळाटाळी । कोठेहि कलावंताची ॥३०॥

जीवनांत यावा सरळपणा । साधा सात्विकतेचा बाणा । 
हृदय-निर्मळतेचा निशाणा । कलावंताचा धर्म हा ॥३१॥

एरव्ही कला सर्वांनाच येते । कलेवांचून नाही रिते । 
परि तारतम्य पाहिजे तेथे । लोकांपुढे न्यावया ॥३२॥

कष्ट करोनि आपुल्या हातें । आदर्श करावें घरातें । 
असेल जरी झोपडी ते । भासवावी नंदनवन ॥३३॥

माती मिळवोनि घरें बांधलीं । परि चुन्यापेक्षाहि सुंदरता आली । 
थोडके पैसे लावोनि केली । रचना सगळी घराची ॥३४॥

आपुल्या गांवींच विटा केल्या । मडकीं-सुरया ओतल्या भाजल्या । 
कवेलू-कुंडयांसहित निर्मिल्या । आपुल्या गांवीं ॥३५॥

लाकडें तासोनि सरळ केलीं । त्यांत सात्विकतेची प्रतिभा भरली । 
गांवाच्या सुताराला आली । कला आमुच्या ॥३६॥

गांवींच केले हातोडे-खिळे । ऐरणी-कुर्‍हाडी सापळे-विळे । 
पावडे-कुदळया शिंके आदि सगळें । सामान जीवनाचें ॥३७॥

दगड फोडोनि फाडी केली । सरळ चिरेदार टापोनि छाटली । 
इमारतीस बसवितां दिसली । सुंदर सगळी ॥३८॥

फडे झाडणी चटई नवार । पलंग पायपूस मोटसंदोर । 
सुंदर केले डवरे वखर । नव्या धर्तीचें ॥३९॥

कापूस पिंजोनि सूत कातलें । सुंदर वस्त्र स्वेटर विणलें । 
बेरडया मुसके दोर बनविले । जाळें उतारीसहित ॥४०॥

कोणी केली शेतीची रचना । धुरेबंधारे वाफे नाना । 
पाहतां दिसती सरळ लैना । शेतीमाजीं ॥४१॥

झाडें दिसती ओळींत बध्द । सरळ सुंदर हिरवीं शुध्द । 
घरमालकचि करी खुद्द । काम आपुल्या हातांनी ॥४२॥

घराभोंवती बाग केली । सांडपाण्यावरि झाडें वाढलीं । 
फळाफुलांचीं रोपें वेली । भाजीपाला नित्याचा ॥४३॥

घरांतूनि बाहेर दिसेना पाणी । प्रवाह करीतसे आंतूनि । 
धूर जातसे धुराडयांतूनि । गोठयांत गोमूत्र न साचे ॥४४॥

घरामाजीं निर्मळपण । टापटिपीचें वर्तन । 
प्रत्येक वस्तु ठेविल्याचें स्थान । सरळ दिसे पाहतांचि ॥४५॥

सर्व वस्तूंचीं लिहिलीं नांवें । सामान घेतां नलगे सांगावें । 
घरीं येताचि दिसतें बरवें । काय आहे ॥४६॥

दारासमोर जें जें दिसलें । तें तें कलेनेचि सुंदर सजलें । 
आपुल्याच गांवीं निर्मिलें । कलाकारांनी ॥४७॥

जरा न दिसते उसनी ऐट । परकीयांकडोन करविला थाट । 
सामान आणलें भरमसाट । परदेशींचें ॥४८॥

जें दिसलें तें आपुल्याच गांवींचें । अथवा प्रांतींचें देशींचें । 
तेणें कौतुकचि आमुचें । सर्व करिती ॥४९॥

ऐसी घरादारांची सुंदरता । आपणचि आणावी स्वता । 
कोणीहि डोळे भरोनि पाहतां । प्रसन्न होती अंतरीं ॥५०॥

ऐसी कला असावी कष्टार्जित । स्वावलंबी उद्योगें उन्नत । 
नखशिखान्त ओजहि त्यांत । जो जीवन जागवी देशाचें ॥५१॥

कुणाची कला शरीर भूषवी । कुणाची घरीं टापटीप दर्शवी । 
कुणाची कला गांवचि सजवी । हौसेने आपल्या ॥५२॥

मानवी कला गांव शोभवी । गांवाची कला प्रांत जागवी । 
प्रांताची कला देश भूषवी । वैशिष्टयाने ॥५३॥

ही सर्व कलाकुसरी । मानवासचि साधे बरी । 
परि योजकता असावी अंतरीं । कलावंताच्या ॥५४॥

नाहीतरि टोप शिरीं विदेशी । आणि खादीपंचा कटीसि । 
मारूतीचें तोंड लंबोदरासि । ऐसें होतें ॥५५॥

एकाने दिवाणखाना सुंदर केला । पाहतांना आनंद झाला । 
परि शौचकूपचि बिघडला । होता त्याचा ॥५६॥

परिचय घेणारा आला घरीं । प्रथमचि चढला शौचगृहाभीतरी । 
आंत पसरली घाणचि सारी । स्वच्छता खरी दिसेना ॥५७॥

मग पाहिलें स्वयंपाकघर । कांदे बटाटे यांचें फोतर । 
चुलीआंतचि राख-केर । झाडूनि नव्हता लागला ॥५८॥

पानाचा पीक कोपर्‍यांत । कपाटामागे घाण बहुत । 
दुमडूनि बघतां सुंदर बिछायत । कचराकागद त्याखाली ॥५९॥

म्हणे वा हो कलावंत ! बघा जरा जावोनि आंत । 
सारवण झालें नाही सात । दिवसापासोनि दिसतसे ॥६०॥

बाकी सगळें केलें सुंदर । परि एवढेंचि गालबोट त्यावर । 
ऐसें असों नये अंतर । कलेमाजीं ॥६१॥

कला असावी सर्वनिपुण । आंतबाहेर निर्मळ पूर्ण । 
हात फिरे तेथे लक्ष्मी धांवोन । येते मग ॥६२॥

यापरी कलेने घर सजविलें । आपुलें जीवन सुंदर केलें । 
परि गांव असेल बिघडलें । तरि तें सौंदर्य टिकेना ॥६३॥

काळया शरीरावरि कोड । तैसें दिसेल तें एकटें धेंड । 
म्हणोनि गांव करावें आदर्श सुघड । कलांनी आपुल्या ॥६४॥

गांवीं असावीं सेवकमंडळें । ज्यांना ’ मुखीं राम हातीं काम ’ हें कळे । 
अखंड चालविती कामाचें सोहळे । ग्रामसेवेसाठी ॥६५॥

श्रमदानाचे सप्ताह घेवोनि । रस्ते दुरुस्त करावे सर्वांनी । 
शोषक खड्डे मोर्‍या करोनि । सांडपाणी थांबवावें ॥६६॥

रस्त्यामाजीं एकार्‍या असती । पांदण झाली निमुळती । 
गोखरू कांटे झुडपें वाढती । सर्व व्यवस्था लावावी ॥६७॥

डोब साचते पडती डेरे । ठीक करावें मार्गी सारें । 
शौचगृहेंहि नव्या प्रकारें । निर्मावी सर्वांसाठी ॥६८॥

नदी तळयाकांठची स्वच्छता । तेथे पार घाट आदींची व्यवस्था । 
उत्पादन वाढवाया तत्त्वता । उपयोग घ्यावा जलाचा ॥६९॥

गांवांतील मार्ग विहिरी घरें । सुंदर सजवावीं पशूंचीं कुटीरें । 
ठायीं ठायीं मुत्रीघरें । नाल्या करणें निर्माण ॥७०॥

सडकांचिया दुतर्फा छान । सर्वांनी करावें वृक्षारोपण । 
ढोले ठेवावे मधामधांतून । कचरा त्यांत टाकावया ॥७१॥

चहूं दिशांनी गांव सुंदर । वारे करोत जीवनसंचार । 
कोठेहि घाण घर । पाहतांना न दिसावें ॥७२॥

घरें मोडकीं असतील कोठे । सर्वांनीं जावें तया वाटें । 
मिळोनि करावें चोखटें । ’ हाहि आमुचा ’ म्हणोनिया ॥७३॥

घरें खिडक्यावीण अंधारीं । कोंदट दमट बसकीं सारीं । 
गुरांचा गोठा घराभीतरी । ऐसें राहूं न द्यावें ॥७४॥

गोटे ओटे करावे दुरुस्त । कोपरे खंडारे गैरशिस्त । 
राहूं न द्यावे अस्ताव्यस्त । वाकडे तिकडे ॥७५॥

हे सर्व खणोनि काढावे । दोरीलैन धरोनि नवे । 
मोकळेचाकळे मार्ग करावे । उल्हासवावें जनलोकां ॥७६॥

मार्गी असावा लाकूडगोटा । साफ दिसाव्या चारी वाटा । 
कोणी अडला असेल करंटा । त्यास वळवावें गांवाने ॥७७॥

कुंपकाटी गवती शाकार । गांवीं नसावा शक्यतोंवर । 
उडवे-हुडे पुंजा-केर । भलतैसा न राहूं द्यावा ॥७८॥

फास गवतगंजी कडबागूड । भूस उपणणें अथवा खळवाड । 
कुंभार-आवा अग्निकुंड । सुरक्षित जागा नेमाव्या त्यांच्या ॥७९॥

मेलीं जनावरें कोठेहि नेलीं । गांवभरी घाण मांसहाडें आलीं । 
ऐसें न व्हाया पाहिजे नेमिली । जागा उघडण्या-गाडण्याची ॥८०॥

जेथे तेथे सूचनाफलक । लाविले पाहिजेत मार्गदर्शक । 
शोभवावेत रस्ते चौक । थोरांचिया नांवांनी ॥८१॥

मार्गावरि अंधार पडे । तेथे प्रकाशाची व्यवस्था घडे । 
ऐसें करावें चहूकडे । कार्यकर्त्यांनी ॥८२॥

गांवीं शाळा निर्माण करावी । कोंडवाडयाचीहि व्यवस्था व्हावी । 
बाजारगुजरी अवश्य असावी । सोयीसाठी व्यवस्थित ॥८३॥

नाहीतरि गांवीं बाजार भरला । शिस्त नाही दुकानाला । 
कोणताहि माल कोठे ठेवला । झाला सगळा कल्लोळ ॥८४॥

लोक एकमेकांस खेटती । कांहीकांचे खिसे कांपती । 
नाही समजली चालरीती । माणुसकीची ॥८५॥

तरुण पाहती भलतीकडे । बोल बोलती वेडेवाकडे । 
चालती इकडे पाहती तिकडे । तेणें धक्के बसती लोकां ॥८६॥

कोणी मधेच माल उपणती । खुंटया गाडती गाडया सोडती । 
बकर्‍या-गायी मोकाट फिरती । मधेच मांडती मिरच्याहि ॥८७॥

लैन नाही दुकानांप्रति । कोणीहि कोठे माल मांडती । 
या सर्वांमुळे होते फजीती । घेणारा आणि देणारांची ॥८८॥

त्यांत माशांचा अवघा घोळका । कोणी म्हणेना कोणा एका । 
सर्वत्र पैसा कमावण्याचा झोका । चालतसे हौसेने ॥८९॥

कोणी म्हणेल ऐसें कां करतो ? दुकानदार म्हणे आम्ही कर देतो । 
मग आम्हांला कोण काय म्हणतो । सांगा सांगा ! ॥९०॥

ऐसें जेथे जेथे होतें । दुरुस्त करावें सगळें तेथे । 
प्रेमाने सांगून पाहतां सर्वानुमतें । कोणी हट्ट करीना ॥९१॥

आपुलें जेव्हा जन न ऐकती । तेव्हा सभाद्वारें करावी दुरुस्ती । 
सांगून पाहावें सरकारप्रति । दुरुस्त कराया गांव सारें ॥९२॥

मुख्य आपुली असावी समिति । जी सुंदर ठेवील बाजाराप्रति । 
वजनें, मापें, माल, जागा, पध्दति । सर्व चोख करावया ॥९३॥

सर्वांच्या पिकांचिया रक्षणा । गांवीं येऊं न द्याया वानरसेना । 
ऐशाहि कराव्या समित्या संघटना । नाना कार्यास्तव ॥९४॥

सर्वांगीण असावी ग्रामरचना । मनोरंजनासहित पुरावाव्यात भावना । 
जेणें करून ग्रामवासीयांना । आठव ना ये शहराचा ॥९५॥

व्याख्यानें कीर्तनें कलापथक । वादविवाद पोवाडे नाटकें सात्विक । 
ऐसी नित्य नवनवी करमणूक । गांवीं चालवावी सर्वांनी ॥९६॥

एक असावा सुंदर बाग । त्यांत मनस्वाथ्याचेंचि असावें अंग । 
प्रसन्नता वाढाया नाना रंग । वृक्षवेली लताकुंज ॥९७॥

त्यांत क्रीडांगणें पाळणें । बालक-युवकांचीं प्रसन्नविती मनें । 
जातीपातीचें विसरोनि रडगाणें । सहजभावें चालवावीं ॥९८॥

गांवीं विश्रामगृह असावें । ज्यांत पाहुणे उत्साही बरवे । 
सर्वांस मुक्तद्वार ठेवावें । उतरविण्यासाठी ॥९९॥

तेथे असावी सुंदर विहीर । पाणी पिण्यासि थंडगार । 
वचनें असावीं उदबोधक सुंदर । भिंतीवरि सर्व ॥१००॥

सुंदर करावा आखाडा । मुलें बागडती उल्हासें तडतडा । 
आदर्श मल्ल-खेळाडूंचा धडा । गिरवावया ॥१०१॥

सुंदर मुलांचीं शरीरें । दिसती गुलाब जैसे गोजिरे । 
बागचि फुलले हरेभरे । सुपुत्रांचें ॥१०२॥

सुंदर असावें वाचनालय । नाना ग्रंथ ज्ञानमय । 
करावया सुबुध्दीचा उदय । गांव-लोकीं ॥१०३॥

काय चाललें जगामाजी । कळावें गांवीं सहजासहजीं । 
म्हणोनि वृत्तपत्रें असावीं ताजीं । आकाशवाणीहि त्याठायीं ॥१०४॥

तैसेंचि असावें हस्तलिखित मासिक । अक्षर गांवाचें व्हाया सुरेख । 
लेखनचित्रादि कलांचें कौतुक । वाढेल गांवीं ॥१०५॥

सहज कळावे विचार आणि वृत्त । म्हणोनि फळा असावा चौकांत । 
ती जणूं ज्ञानेश्वराची भिंत । ज्ञान देई सर्वांसि ॥१०६॥

अक्षरशत्रूंना सामर्थ्य यावें । म्हणोनि प्रौढशिक्षण चालवावें । 
घराघरावरि नंबर द्यावे । नामपाटी लावोनिया ॥१०७॥

गुराढोरांचीं औषधें जाणती । साह्य द्यावें त्या ग्रामीणांप्रति । 
अनुभूत नुसखे लोकगीतादि किती । संग्रह त्यांचा करावा ॥१०८॥

गांवचें आरोग्य असावें उत्तम । सर्व प्राणीमात्रासि लाभावें क्षेम । 
म्हणोनि चालवावें आरोग्यधाम । गांवामाजी ॥१०९॥

आपुल्याच गांवची वृक्षवल्ली । कंदमुळें आणोनि औषधें केलीं । 
निसर्ग-उपचारासहित दिलीं । पाहिजेत वैद्यें ॥११०॥

चालवावें ऐसा वैद्यांप्रति । सर्पादि विषें उतरविती । 
घाव बुजविती हाड जुळविती । औषधें ऐसीं अनुभवोनि ॥१११॥

जेथे पुरुषांचा दवाखाना । तेथे हवी सूतिकागृहाचीहि योजना । 
दोहोंचीहि आवश्यकता ग्रामजना । भासतसे अत्यंत ॥११२॥

गांवचे वैद्य गांवच्या सुईणी । गांवें घ्याव्या तयार करोनि । 
नवनवीं ज्ञानसाधनें देवोनि । सर्वतोपरीं ॥११३॥

गांवीं असावें पोस्टस्थान । त्वरित कळावया वर्तमान । 
परस्परांचा व्यवहार पूर्ण । पत्रोपत्रीं चालावया ॥११४॥

ऐशा सर्वचि सुखसोयी । लोक करूं शकतील निश्ययी । 
स्वावलंबी राहूनि सर्वहि । देतील जेव्हा सहकार्य ॥११५॥

प्रत्येकाचा कितीतरि वेळ । श्रमशक्ति आणि बुध्दीचें बळ । 
व्यर्थ जातसे तें उपयोगी सकळ । लावितां गांव सुखी होई ॥११६॥

ऐसें गांव होतां आदर्शपूर्ण । शहराहूनीहि नंदनवन । 
सर्वांचें करील आकर्षण । सुंदर जीवन तुकडया म्हणे ॥११७॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । 
स्वावलंबी ग्रामनिर्माणकला-कथित । तेरावा अध्याय संपूर्ण ॥११८॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥