वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय चौदावा

ग्रामगीता 

अध्याय चौदावा : ग्राम-आरोग्य

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

एक श्रोता महाभाविक । म्हणे गांवहि केलें ठीक । 
तरी देवाने मारली मेख । ती निघूं शकेना ॥१॥

प्रत्यक्ष शहर जरी झालें । तरी देवापुढे ताब न चाले । 
तेथे खेडें शहरापरी केलें । तरी काय होतें ? ॥२॥

देवीदेवतांचा कोप झाला । कॉलरापटकीचा झटका आला । 
म्हणजे सुधारूंच न शके कोणाला । बाप वैद्याचा ॥३॥

म्हणोनि देवता राहती प्रसन्न । ऐसें करावें पूजन । 
गांव असो की शहर संपन्न । सुखी त्याविण न राहे ॥४॥

मित्रा ! ऐक याचें उत्तर । देवदेवता किंवा परमेश्वर । 
हे कृपेचेचि अवतार । कोपचि नाही त्याठायीं ॥५॥

कोप करिती ते दुष्टावरि । त्यांतहि उध्दार भावचि अंतरीं । 
तेथे निरपराध्यांस छळती जरि । तरि त्या देव न म्हणावें ॥६॥

सर्व लोक लेकरें त्याचीं । छळणा कां करील कोणाची ? 
कृति आपुलीच आपणा जाची । शत्रु आपणचि आपुले ॥७॥

चहूबाजूंनी केली घाण । त्यांत जंतु झाले निर्माण । 
त्यांतूनि रोगांच्या सांथी भिन्न भिन्न । वाढ घेती ॥८॥

नाही नेमाचा आचार । शुध्द नाही आहारविहार । 
अशुध्द हवापाणी, संहार । करिती जनांचा ॥९॥

कांही केव्हा कुठेहि खाणें । कधी झोपणें कधी जागणें । 
सप्तहि धातु कोपती याने । रोगरूपाने फळा येती ॥१०॥

’ हाटेलीं खाणें मसणा जाणें ’ । ऐसें बोलती शहाणे । 
त्यावरि नाना तिखट व्यसनें । आग्यावेताळासारिखीं ॥११॥

कशास कांही नियम नुरला । कोण रोगी कोठे थुंकला । 
कोठे जेवला संसर्गी आला । गोंधळ झाला सर्वत्र ॥१२॥

त्याने रोगप्रचार झाला । लागट रोग वाढतचि गेला । 
बळी घेतलें हजारो लोकांला । वाढोनि सांथ ॥१३॥

मग कोणी म्हणे कोपली देवी । कोणी मांत्रिकांसि बोलावी । 
बाहेरभितरचें समजोनि गांवीं । काढती आरत्या अंधारीं ॥१४॥

कोणी करणी कौटाळ म्हणती । कोणी पिशाच्चास भारती । 
औषधेंहि न देतां रोगी मारती । मूर्खपणाने ॥१५॥

भगत मांत्रिक अरबाडी जाणते । घुमारे बघती भाविक कोणते । 
पोटासाठी नाना मतें । फैलाविती लोकांमाजी ॥१६॥

करविती नवस सायास थोर । देवीपूजेचा जोरसोर । 
रेडे बकरे कोंबडे पामर । कापिताति अज्ञानें ॥१७॥

देवानेचि केले जीव । त्यास कैची मारण्याची हाव ? 
मधले दलाल करिती ठेव । आपुली हौस पुरवावया ॥१८॥

संतें देवास केलें प्रसन्न । तेव्हा बळी दिले कोण ? 
चोखोबा, श्रीचक्रधर, रामकृष्ण । म्हणती ’ प्रसन्न देव भावें ’ ॥१९॥

देवासि पाहिजे बलिदान । तो पशु आपुला भ्रम अभिमान । 
गांवचें गेल्याविण अज्ञान । सुखी जीवन न होई ॥२०॥

गांव असो अथवा शहर । तेथील बिघडले आचारविचार । 
म्हणोनीच रोगराईने बेजांर । जाहले सारे जन लोक ॥२१॥

गांव व्हावया निरोगी सुंदर । सुधारावें लागेल एकेक घर । 
आणि त्याहूनहि घरांत राहणार । करावा लागेल आदर्श ॥२२॥

व्यक्ति व्हाया आदर्श सम्यक । पाहिजे दिनचर्याच सात्विक । 
सारें जीवन निरोगी सुरेख । तरीच होईल गांवाचें ॥२३॥

नियमीं बांधला एकेक दिन । त्यानेच सुधरे जीवन संपूर्ण । 
गांवहि होय आरोग्यसंपन्न । सारे प्रसन्न देवीदेव ॥२४॥

नियमांचा मुख्य आधार । मजबूत पाहिजे निर्धार । 
त्यावरीच उत्कर्षाची मदार । ऐहिक आणि आध्यात्मिक ॥२५॥

नाहीतरि मानवाने नियम केले । सर्व जीवन सुरळीत चाले । 
परि एकदा दुर्लक्ष झाले । की चुकतचि जातें ॥२६॥

एकदा रात्रभरि जागला । मग सकाळीं उठणेंच कशाला ? 
आळसांत सर्व दिवस गेला । नियम मोडोनि ॥२७॥

त्यास धाक नाही काळजी नाही । घरचे लोक बोललेच नाही । 
हा उठला दुसरे दिवशींहि । दहा वाजतां दिवसाचे ॥२८॥

कांही दिवस अलक्ष झालें । उशीरां उठणें अंगवळणीं पडलें । 
मग बदलेना, कांही केले । उपचार जरी ॥२९॥

ऐसें कासया घडूं द्यावें । रोज सकाळींच उठावें । 
न उठतां घरच्यांनी जागवावें । झोपणारासि निश्चयें ॥३०॥

कांही म्हणती उशीरां उठणें । हें तों भाग्यवंताचें लक्षणें । 
त्यास काय आहे उणें । पोट भराया धनवंता ? ॥३१॥

ऐसें समजोनि आळशी केला । अरे ! हा भाग्यवान कसला ? 
निजण्यावरि भाग्यवान ठरला । तरि बीमार महाभागी कां नव्हे ? ॥३२॥

तो तर निजलाचि राहतो । झोपूनचि खातों-पितों 
काय अधिक भाग्यवान म्हणवितो ? सांगा सांगा ॥३३॥

भाग्यवंताची उलटी व्याख्या । करणें शोभतें का शहाण्यासारख्या । 
अरे ! सकाळीं उठणारासचि सख्या । भाग्यवंत म्हणावें ॥३४॥

श्रमांतूनचि उपजे भाग्यसंपत्ति । निजणारे तिची हानि करिती । 
इतरां श्रम अधिक पडती । उत्साह घटे आपलाहि ॥३५॥

झोपी गेला घरचा धनी । सुर्य चालला डोक्यावरोनि । 
उन्ह पडले तरी निजूनि । कड फेरितो झोपेचा ॥३६॥

नोकरचाकर आळस करिती । म्हणती घरधनीच झोपती । 
मग आपणचि कैशा रीतीं । काम करावें जावोनि ? ॥३७॥

ऐसा सारा अंधार पडे । वाजती श्वानांचे चौघडे । 
मूलबाळ रडेओरडे । झोप काढिती आयाबाया ॥३८॥

घरदार कोठूनि पवित्र ? जागल्यावरीहि आळसलें गात्र । 
अव्यवस्था माजे सर्वत्र । बध्दकोष्ठता वाढ घे ॥३९॥

यांतूनचि वाढती सर्व रोग । वैद्य डॉक्टरांचा लागला भोग । 
तिकडे बिघडत गेले उद्योग । शिरलें दुर्भाग्य त्या घरीं ॥४०॥

प्रात:काळची आरोग्यदायी हवा । सदासर्वदा मानवते जीवा । 
प्रसन्नता देई ऋतु तेधवा । सर्व प्राणीमात्रासि ॥४१॥

सर्व वनेंरानें जागीं होतीं । पुष्पें सारी विकास पावतीं । 
पशुपक्षीहि नेहमी उठती । प्रात:काळीं ॥४२॥

पहाटे दोहतां गाय-म्हैस । त्यांत अधिकचि सार-अंश । 
पहाटवारा चढवी रक्तास । लाली रोगप्रतिकारक ॥४३॥

म्हणोनि प्रात:काळीं उठावें । ब्राह्ममुहूर्ता डोळयांनी बघावें । 
उठतांच प्रात:स्मरण करावें । आसनस्थानीं ॥४४॥

प्रात:स्मरण म्हणजे नवीन स्फूर्ति । उगवल्या दिवशीं व्हाया प्रगति । 
उत्तम कार्य घडावें पूर्ण गतीं । म्हणोनि प्रार्थना देवाची ॥४५॥

त्यावेळीं जो संकल्प करतो । वाईट न घडो ऐसें चिंतितो । 
तो सुसंस्कारें वाढत जातो । उन्नतिमार्गे वेगाने ॥४६॥

म्हणोनि प्रात:स्मरण करावें । नैसर्गिक उत्साहभरें भरावें । 
मग प्रातर्विधी आटोपावे । नित्यनेम हा अमोलिक ॥४७॥

पहाटेस शौचमुखमार्जन । त्याने वायुदोषांचें होय शमन । 
शरीरीं नवा जोम निर्माण । होय निर्मळपण लाभोनि ॥४८॥

सकाळीं करावें उष:पान । त्याने अंतरींद्रियांचें शांतवन । 
नंतर करावें शीतजलस्नान । अति प्रसन्न चित्त राहे ॥४९॥

शीतजलस्नानाचें महिमान थोर । तेणें त्वचाशक्ति जागे सुंदर । 
शरीर राहे सदा तरतर । उत्साहाने ॥५०॥

मेंदूचा भाग थंड राहिला । तरीच बुध्दीचा उत्कर्ष झाला । 
ऐसा थोरांना अनुभव आला । कितीतरी ॥५१॥

उष्ण पाण्याने स्नान करणें । म्हणजे बीमारचि तो समजणें । 
ऐसी संवय नेहमी लावणें । हानिकारक देहासि ॥५२॥

स्नानोत्तर अरुणोदयापूर्वी । सामुदायिक ध्यान-उपासना करावी । 
प्रार्थनामंदिर अथवा पडवी । ध्यानास्तव पहावी निर्मळ ॥५३॥

अरुणोदयाची सुवर्णप्रभा । दिसे लावण्याची शोभा । 
निसर्ग वाढवी शांति प्रतिभा । अलभ्यलाभा पावती योगी ॥५४॥

जन म्हणती योग्यांनी ध्यान करावें । आपण कासया उठावें स्मरावें ? 
हें म्हणणें कदापि नोहे बरवें । कोणाचेंहि ॥५५॥

योगी आपली समाधि घरी । साधक सन्मार्गाचा योग करी । 
जीवन-उज्ज्वलतेचा योग संसारीं । प्रात:काळीं साधतसे ॥५६॥

ध्यानापरीच सहल प्रात:काळची । जरूर करावी संवय रोजचि । 
त्याने देह मन राहे निर्मल शुचि । प्राणवायुस्पर्शाने ॥५७॥

कोणी धावती कोणी चालती । कोणी आसनें सूर्यनमस्कार घालती । 
कोणी गाती चिंतन करिती । हें दृश्य दिसो प्रभातीं ॥५८॥

कांही पठण-पाठण करावें । शरीरमनासि वळण लावावें । 
आयुष्य सुंदर होतें आघवें । ऐशा क्रमें ॥५९॥

घरीं असो वा आश्रमी । प्रवासीं असो वा तीर्थधामीं । 
प्रात:काळीं नित्यनियमीं । अभ्यासक्रम उरकवावा ॥६०॥

घरा-आश्रमाची करावी सफाई । स्वच्छता मार्गी ठायीं ठायीं । 
गायीम्हशींचे गोठे सर्वहि । आरशासारखे करावे ॥६१॥

गडीमाणसांनी सहाय्य द्यावें । परि प्रत्येकाने काम करावें । 
आईबाई मिळोनि उरकवावे । कामधंदे चटचट ॥६२॥

कोणीहि बघे अरुणोदयीं । सडासंमार्जन रांगोळी रई । 
आंतबाहेर गलिच्छता नाही । कामें झालीं सकळांचीं ॥६३॥

ऐसें ज्या गांवीं झालें । समजावें लक्ष्मीचें मन मोहिलें । 
आरोग्याचें राज्य आलें । तया गांवीं ॥६४॥

तेथे उदंड आयुष्य वाढतें । जेथे प्रात:काळीं स्वच्छता होते । 
कोणीहि न दिसे झोपला जेथे । प्राणीमात्र ॥६५॥

म्हणोनि ऐसे नियम करावे । चुकलियाहि चुकों न द्यावे । 
पुन:पुन्हा सावरावें । वर्तन आपुलें ॥६६॥

ऐसा अभ्यास जडल्यावरी । आरोग्य भाग्य नांदे संसारीं । 
औषधांची गरजचि नुरे शरीरीं । वाढे अभ्यंतरीं नवें तेज ॥६७॥

पूर्वी प्रात:काळीं माध्यान्हा । आणि सायंकाळीं जाणा । 
होती त्रिकाळ संध्याप्रार्थना । संस्कारास्तव लाविली ॥६८॥

तें सर्वकाळचि उचित । म्हणोनि प्रातर्ध्यान नियमित । 
आणि सायंप्रार्थनाहि नेमस्त । करीत जावी सर्वांनी ॥६९॥

निद्रेचिया आदिअंतीं । दिवस-रात्रीच्या संधीप्रति । 
आणि भोजनसमयीं संकल्प होती । ते बनती दृढ संस्कार ॥७०॥

जनींभोजनीं हरि आळवणें । गीतापाठादि उच्चारणें । 
सात्विक भाव हृदयीं भरणें । शुध्द करी जीवनासि ॥७१॥

श्रोतयांनी प्रश्न केला । भोजनीं आळवावें भगवंताला । 
याचें फळ सांगा आम्हांला । काय कैसे ? ॥७२॥

भोजन म्हणजे आहार घेणें । तेथे कशाला देवाचें गाणें ? 
हास्यविनोद कां न करणें । उल्हासास्तव ? ॥७३॥

ऐका याचेंहि उत्तर । भोजन म्हणजे पिंडसंस्कार । 
यज्ञहि यासि म्हणती थोर । वैश्वानर अग्निमाजी ॥७४॥

भोजनाचे वेळीं प्रसन्न । केलिया विचार शुभचिंतन । 
तैसेचि भिनती निर्मळ गुण । अन्नासवें ॥७५॥

पवित्र धूप सुगंध सात्विक । तेणें वातावरण रोगनाशक । 
रांगोळया आदि प्रसन्नकारक । स्वच्छ असावी जागा तरी ॥७६॥

स्वच्छतेविणा जें भोजन । समजावें तें मलीनपण । 
अग्नि वाढाया हातपाय धुवोन । पुसोनि भोजन करावें ॥७७॥

कांही करावें भोजनापूर्वी काम । जेणें मिळे सकळांसि आराम । 
कार्य होतसे सुगम । सर्व जनां मिळोनि ॥७८॥

कोणी आसने, पाट टाकावे । कोणी वाढावे, पाणी ठेवावें । 
कोणी उदबत्ती, धूप लावावे । सुगंधासाठी ॥७९॥

प्रथम बसोनि पाठ म्हणावा । गंभीर सुरें रंग भरावा । 
वाढणें संपता शांतिमंत्र गावा । गांभीर्याने ॥८०॥

मग करावें ब्रह्मार्पण । आदराने करावें अन्नसेवन । 
भोजनींहि श्लोक, मधुरवचन । उल्हासाने बोलावें ॥८१॥

भोजनापूर्वी आचमन । त्याचा उद्देश अग्निदीपन । 
चित्राहूति जलआवर्तन । समर्पण हाचि भाव त्याचा ॥८२॥

ईश्वरें उपजविलें अन्न । तें अन्न ईश्वरी कृपादान । 
ज्यावरि सर्वांचें असे जीवन । त्याचें ऋण आठवावें ॥८३॥

त्याचीं लेकरें जीवजन । त्यांना आधी लाभावें अन्न । 
यासाठी विश्वदेवाचें संतर्पण । यज्ञमय भोजन या भावें ॥८४॥

भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद । समजोनि सुखें घ्यावा आस्वाद । 
ज्यांत शेतकर्‍यांचे कष्ट विशद । तें अन्न सेवावें सेवेस्तव ॥८५॥

ऐशा सदभावें आदरें सेवावें । उत्तम श्लोक भोजनीं गावे । 
वेडेंवाकुडें न बोलावें । क्रोधा न यावें भोजनसमयीं ॥८६॥

हास्यविनोद जरी असला । तरी अश्लीलता न यावी प्रसंगाला । 
उच्छिष्ट कण न पाहिजे टाकला । भोजनप्रसंगीं ॥८७॥

राजस तामस सात्विक । भोजनाचे प्रकार अनेक । 
त्यांत आपली शक्ति पाहूनि सम्यक । पचेल तैसें करावें ॥८८॥

कोणी सज्जन म्हणती भले । पचनासाठी सर्वचि खाद्य निर्मिलें । 
परंतु पचनाचें तारतम्य पाहिलें । पाहिजे जुळवोनि ॥८९॥

कोणी खाद्य रोग करी । कोणी खाद्य भोग भरी । 
कोणी खाद्य वाईट संस्कारी । करितें प्राण्या ॥९०॥

कांही जीव चुनखडीहि खाती । कांही मांसकिडे भक्षिती । 
परंतु त्यांची स्वभाव-प्रकृति । त्याचि परी राहे ॥९१॥

मानवाने काय खावें । म्हणजे मानवपणेंचि शोभावें । 
हेंचि येथे पाहावें । लागतें सज्जनांसि ॥९२॥

शुध्द सात्विक अन्न घेतलें । त्याने सात्विक विचार प्रवर्तले । 
तामस राजस खाद्य सेविलें । तैसें झालें आचरण ॥९३॥

मद्यमांसाहार करिती कोणी । विकारबुध्दि वाढे मनमानी । 
भलतेचि रोग जाती लागोनि । सांसर्गिक आदि ॥९४॥

हें तों निश्चितचि आहे । खाद्यें रसरक्त उत्पन्न होय । 
रक्तापासूनि मांस मेद वीर्य । नि:संशय होती शरीरीं ॥९५॥

जैसे ज्याचे रक्तरसगुण । तैसे विचार होती स्फुरण । 
क्रूर-शूर मंद-बुध्दिमान । रक्तमिश्रणें दिसताति ॥९६॥

कांही आनुवंशिक गुण येती । रक्तरेताचिया मिश्रस्थितीं । 
कांही खाण्यापिण्याचेहि होती । संस्कार अंगीं ॥९७॥

कांही संगतीने वळण लागे । भूमिपात्रें कांही परिणाम जागे । 
कांही प्रयत्नशीलतेचे धागे । वळविती जीवा ॥९८॥

हें सर्व जरी खरें असलें । तरी मुख्य अंग खाद्यपेयचि झालें । 
कारण त्यानेच बनलें-घटलें । रक्तमांस जीवांचें ॥९९॥

उत्तम रक्ताचें असावें शरीर । तरि अन्नहि उत्तमचि खावें सुंदर । 
बाष्कळ खातां मेंदू-इंद्रियांवर । बाष्कळताचि येईल ॥१००॥

मग विषय-वासना नावरे । लागेल बहिरंगाचें वारें । 
झगडती जैसीं जनावरें । तैसे अनावर मानवहि ॥१०१॥

ज्यासि क्रूरकर्मचि करणें आहे । त्याने तेंचि खावें नि:संशय । 
तैसेचि भोगावेत अपाय । झालिया अंगीं ॥१०२॥

ज्यासि मनुष्यपण लाभावें । ऐसें वाटे जीवेंभावें । 
त्याने सात्विक अन्नचि सेवावें । सर्वतोपरीं ॥१०३॥

एकाने ऐसा प्रश्न केला । सात्विक अन्न कुठलें गरीबाला ? 
त्याने काय करावें बोला । जीवनासाठी ? ॥१०४॥

मित्रहो ! सात्विक अन्नचि सहज मिळतें । जें श्रमाने शेतींत पिकतें । 
भाजीभाकरी भातपोळी लाभते । अल्प प्रयासें ॥१०५॥

सूर्यकिरणांनी तयार झालीं । कंद भाज्याफळें बागेंत पिकलीं । 
सत्वांशयुक्त सर्व तीं भलीं । आरोग्यदायी ॥१०६॥

साधें सहज ताजें पावन । तेंचि असे सात्विक अन्न । 
नाना विकृतींचें मिष्टान्न । तें सात्विक नव्हे ॥१०७॥

कळणाकोंडाहि सात्विक । ज्या सत्त्वें तगती गरीब लोक । 
सात्विक म्हणजे शरीरपोषक । आरोग्यदायी सुसंस्कारी ॥१०८॥

तळलें विटलें खाऊं नये । आंबट खारट सेवूं नये । 
तैसें अति गोडहि जेवूं नये । भोजनीं कोणी ॥१०९॥

मिष्टान्न नेहमीं सेवूं नये । तंळण मसाले खाऊं नये । 
मिरचीवरि सोकावूं नये । सर्वांनीच ॥११०॥

स्वच्छ असावें सात्विक अन्न । ताजें रुचिकर आणि रसपूर्ण । 
पालेभाजी फळभाजी विभिन्न । स्वाद संपन्न मुळांतचि ॥१११॥

उगीच आटवून आटवून रबडी खाणें । वाटून वाटून पुरणपोळी करणें । 
तळून तळून भजेपुर्‍या जेवणें । उन्मत्तांचें भोजन हें ॥११२॥

चाळून गाळून केला रवा । पिसून किसून भरला खवा । 
खातांना जीभ करी वाहवा ! पोट जाई कामांतूनि ॥११३॥

कांहींनी खाण्याचीच वाढविली कला । भात खाती टोपला-टोपला । 
वरोनि चिंचपाणी पेला पेला । भातावरि घेती ॥११४॥

कांही लाडूपेढे खूपचि खाती । रबडी हलवा तंडोनि घेती । 
पैसे ठरवोनि माप लाविती । खावयाचें ॥११५॥

मग त्याने पचन होईना । सारा शरीराचा होय धिंगाणा । 
नाना रोग जडती, यातना । द्यावयासि ॥११६॥

कोणी स्वादासाठी भोजन करिती । नको असलें तरी पोटांत कोंबती । 
मग बिमारी घेऊन उठती । कॉलरा, अपचन, संग्रहणी ॥११७॥

कांहींना होते उदर-कुंदी । चाले अपानांतून दुर्गधी । 
लोक हसती ’ खाणेंपिणें स्वच्छंदी । कां करतो ’ म्हणोनिया ॥११८॥

प्रकृतीच्या विरुध्द आहार । नाही काळवेळाचा सुमार । 
आंबट तेलकट आदि विषम मिश्र । ऐसा आहार विषारी ॥११९॥

कांही लोक ऐसेंचि खाती । प्रकृति बिघडलिया औषध घेती । 
गरीबास कुठली इतकी संपत्ति ? वैद्य होती घरोघरीं ॥१२०॥

डॉक्टर म्हणती पथ्यचि नाही । तेणें रोगाचें मूळ तैसेंचि राही । 
रोगी पाहती तेंच नित्यहि । मृत्यूची घाई झाल्यापरी ॥१२१॥

पहिलें खावोनि मस्त व्हावें । मग औषधि घेवोनि पचवावें । 
ऐसे उपद्रव कासयासि करावे । उन्मत्तपणें ? ॥१२२॥

उगीच आहे ऐसें खाणें । पचविण्यासाठी चूर्ण घेणें । 
अन्नरसाची नासाडी करणें । कशासाठी ? ॥१२३॥

आंत वाढत जातां विकृति । धन्वंतरीहि काय करिती ? 
नष्ट करोनि औषधें, संपत्ति । मुखी माती पडतसे ॥१२४॥

परंतु लोक आग्रहीं पडती । हितचिंतक म्हणवोनि खाया देती । 
ते समजावे घातक श्रोतीं । ठेवावी निश्चिती आहाराची ॥१२५॥

नियमित सात्विक अन्नचि खावें । साधें ताजें, भाजीपाले बरवे । 
दूधदही आपुल्यापरी सेवावें । भोजना करावें औषधचि ॥१२६॥

सर्व भोजनीं उत्तम भोजन । ज्यांत गोघृतदुग्धतक्रपान । 
समजावें अमृताचें सेवन । शरीरासाठी ॥१२७॥

गोदूध नित्य सेवन करितां । कायाकल्पदि होय तत्त्वता । 
शक्ति चपलता बुध्दिमत्ता । आरोग्य हातां नित्य राही ॥१२८॥

निरोगी आयुष्य लाभेल बहुत । अल्पमृत्यु अथवा रोगांची सांथ । 
हे पाऊल न ठेवितील गांवात । तुकडया म्हणे ॥१२९॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । 
व्यक्ति-आचारें ग्रामारोग्य वर्णित । चौदावा अध्याय संपूर्ण ॥१३०॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥