वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय पंधरावा

ग्रामगीता

अध्याय पंधरावा : गोवंश-सुधार

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

एका श्रोतियाने प्रश्न केला । दुधाचा तर दुष्काळचि पडला ।
कुठलें ताकलोणी सकळांला । गोमातेचें ? ॥१॥

दूध देणारे लबाडी करिती । म्हशीच्या दुधांत पाणी घालती ।
गायीचें म्हणोन विकती । अधिक भाव घेवोनि ॥२॥

कोठे गायी राहिल्या आता ? तुरळक दिसती विकतां वाचतां । 
वधती चपलाजोडयांकरिता । वासरेंहि करोडो ॥३॥

गोपालांचा देश भारत । आला गायीगुरें पूजीत । 
परंतु गायी झाल्या खात । लक्षचि नाही तयांकडे ॥४॥

त्यांतील कांही कसाब घेती । कांही दुसरीकडे नेती । 
उरल्या त्या कचरा असती । गायी सार्‍या ॥५॥

चारापाणी अति महाग । नाही व्यवस्थेसाठी मार्ग । 
मानवचि अर्धपोटी, मग । गायी कैशा पाळाव्या ? ॥६॥

ऐकोनि त्याचें विशद विवरण । म्हणालों तुमचें म्हणणें मान्य । 
परि यांत आपुलाचि संपूर्ण । दोष आहे ॥७॥

भारत कृषिप्रधान देश । शेतीसाठी हवा गोवंश । 
गोरसा इतुका नसे सत्वांश । अन्यत्र शुध्द ॥८॥

म्हणोनि गोवंश सुखी होता । तोंवरि नव्हती दरिद्रता । 
नव्हती ऐसी विपुलता । रोगराईची ॥९॥

गोमय गोमूत्र मिळोनि रात्रंदिस । कायम होता भूमीचा कस । 
पेवें भरती गांवागांवास । धान्याचीं तेव्हा ॥१०॥

भूमि आणि जनावरें । हींच उत्पत्तीचीं कोठारें । 
एकाचीं अनेक होतीं खिल्लारें । जोडधंदा हा घरोघरीं ॥११॥

घरोघरीं दूधदुभतें । अन्नधान्यासि सहायक तें । 
आबालवृध्द राहत होते । सशक्त आणि निरोगी ॥१२॥

म्हणोनि गायीगुरां ’ गोधन ’ । ऐसें सत्य नामाभिधान । 
सुखी होता भारत संपूर्ण । गोवंशा सुखवोनिया ॥१३॥

परि पुढे झालें दुर्लक्ष । कांही भोवला राज्यपक्ष । 
गायी होऊनि बसल्या भक्ष्य । वाढलें दुर्भिक्ष त्यागुणें ॥१४॥

आपण दुधाळ म्हशीकडे गेलों । चहाकॉफी आदि पिऊं लागलों । 
म्हणोनि गायीसमेत मुकलों । सर्वस्वासि ॥१५॥

प्राणी खावोन एकदा तोषला । तो नित्यासाठी त्यास मुकला । 
मग कुठलें दुभतें, संतान, खतादि त्याला ? ऐसें केलें वेडयापरी ॥१६॥

गायी विकोनि पोट भरलें । मग नित्यासाठी खाईल कुठलें ? 
पोट बांधोनि गायीस पोषिलें । त्यासि लाभलें सौख्य पुढे ॥१७॥

’ गोरक्षणीं स्वरक्षण ’ । ऐसें पूर्वजांचें कथन । 
म्हणोनीच गायींकरितां प्राण । दिले अनेक शूरांनी ॥१८॥

श्रीकृष्ण आणि शिवशंकर । वसिष्ठ आणि दत्तदिगंबर । 
दिलीप, शिवाजी गोसेवा-तत्पर । संत अपार गोभक्त ॥१९॥

ज्यांनी त्यागिलें सर्वस्वास । करतलीं भिक्षा तरुतलीं वास । 
ऐसे निष्काम गुरुहि गोसेवेस । न विसंबती कदापि ॥२०॥

गायीच्या शरीरांत सर्व । कल्पिले जे देवीदेव । 
तयांचा हाचि असे भाव । गाय अधिष्ठान देशाचें ॥२१॥

तिच्या शेणाने पिके शेती । शेती देई सुखसंपत्ति । 
म्हणोनिच शेणामाजी लक्ष्मीची वसती । वर्णिली असे ॥२२॥

गोरसाने आरोग्य शरीरीं । मग कोठे राहिला धन्वंतरी ? 
सत्वांश मिळतां बुध्दि गोजिरी । सरस्वती ही गोदुग्धीं ॥२३॥

उदररोगांचें नाशक । सत्वांश देई गायीचें ताक । 
तुपाने शांत डोळे मस्तक । चंद्रसूर्य जणूं नेत्रीं ॥२४॥

गाय जिवंत आरोग्यधाम । तिचे पुत्र प्रत्यक्ष परिश्रम । 
राष्ट्रसुखाचा मार्ग सुगम । गोसेवेयोगें ॥२५॥

म्हणोनि सकलांचें कर्तव्य आहे । जेणें गोवंश सुधारणा होय । 
ऐसा करावा कांही उपाय । सर्वतोपरीं ॥२६॥

कसाब आपुल्या गांवांतूनि । गायी नेती बघतां नयनीं ।
दु:ख व्हावें सकलांच्या मनीं । परतवाव्या त्या गायी ॥२७॥

ऐसे दलाल हाकोनि द्यावे । अथवा अन्य कामीं लावावे । 
परोपरीने सुमार्गी वळवावे । घेते-देते सर्वचि ॥२८॥

विकणारासि समजावावें । एवढयाने का श्रीमंती पावे ? 
मरे तों घरीं खतमूत घ्यावें । तरी फळे सेवा गायीची ॥२९॥

द्वारीं सकाळीं गाय हंबरली । गोमूत्र देवोनिया उठली । 
म्हणजे समजावी पवित्रता झाली । जागेमाजी ॥३०॥

ज्याचे घरीं शेती आहे । त्याने अवश्यचि पाळावी गाय । 
मळमूत्र सर्व उपयोगी राहे । ऐसी गाय माऊली ती ॥३१॥

गाय माऊली आईसमान । तिची निगा असावी पूर्ण । 
न करावी गोमाशांची खाण । अथवा सांपळा हाडांचा ॥३२॥

घालोनि चारा पेंड चुरी । गाय करावी हत्तीपरी । 
प्रेमें गोंजारोनि घरोघरीं । गाय प्रसन्न ठेवावी ॥३३॥

गांवीं असावा आदर्श सांड । बैल निपजावया धिप्पाड । 
सुंदर होईल शेतीसि जोड । वाहावया बैलांची ॥३४॥

उत्तम गायी सुंदर सांड । पाहतां आनंद वाटे उदंड । 
दूध पिवोनि मुलें प्रचंड । शक्ति दाविती ॥३५॥

तेंचि खरें सात्विक सौंदर्य । मुलें गोंजारिती वत्स गाय । 
दूध पूवोनि राहती तन्मय । खेळींमेळीं ॥३६॥

गोवंशाचें दूध वाढे । तरीच संतान उन्नतीस चढे । 
खाऊं घालोनि लाडू पेढें । उगीच पोटें वाढती ॥३७॥

कृत्रिम दूध-लोणी कांही । गोरसतुल्य ठरणार नाही । 
नाना रोग वाढती देहीं । न कळतां कृत्रिमतेने ॥३८॥

सर्वथैव यंत्रांनीच कांही । शेती सुखकर होणार नाही । 
गांवची संपत्ति गांवीं राही । सुगम तो मार्ग उत्तम ॥३९॥

यासाठी गायीगुरांची जोपासना । घरोघरीं ठेवावा गोवत्सठाणा । 
प्रसन्न दिसावे पशू नाना । उत्तम लाभावें दूधदही ॥४०॥

दुधादह्याची योग्य पूर्ति । व्हावी आपुल्या गांवाप्रति । 
घरोघरीं गायीवासरें असती । तेंचि गांव भाग्यशाली ॥४१॥

जो आपुल्या घरीं गाय न ठेवी । तयासाठी गोरक्षणें असावीं । 
गरीबांची तेथे सोय व्हावी । उत्तम लाभावा गोरस ॥४२॥

कांही ठिकाणीं गोरक्षणें करिती । मरतुकडया गायी जमविती । 
त्यांच्या नांवाने पैसे खाती । गायी मारती उपवासी ॥४३॥

ऐसें नको गोरक्षण । जें दुखवी मानवी मन । 
राहावी गायी-सांड पाहोन । प्रसन्न जनता सर्वदा ॥४४॥

गोरक्षणें दहीदुधाची सोय व्हावी । लोकीं सुखसंपन्नता यावी । 
कोरडी गोपूजाच न करावी । घरोघरीं अथवा गांवीं ॥४५॥

उत्तम चारापेंड देऊन । वाढवावें गायींचें वजन । 
आदर्श गायी वळू ठेवोन । उत्तम गोधन वाढवावें ॥४६॥

गांवीं सुंदर गायींचा तांडा । चराया गोचरभूमि उदंडा । 
नदी तळें विहिरीचा आखाडा । भव्य जैसा ॥४७॥

उत्तम ऐसा देवसांड । मुबलक चरावा चारा-बिवड । 
बीजारोपणीं दूधकावड । देती गायी ॥४८॥

हेंचि खरें गोरक्षण । नाहीतरि कसाबभुवन । 
उगीच गायी वाडयांत कोंडून । गोरक्षण का होई ? ॥४९॥

गायीस नसे चराऊ जमीन । तरि मोकळी पाडावी सरकाराकडोन । 
अथवा गांवीं करावी अर्पण । जमीनदारांनी ॥५०॥

गोरक्षणाचा व्हावा अभ्यास । नाना प्रयोग सावकाश । 
कैसे पुढे गेले अन्य देश । ती माहिती द्यावी सर्वां ॥५१॥

गोवंशाच्या रोगनिवारणा । गांवीं ठेवावा दवाखाना । 
लाभ मिळावा सर्वांना । प्रतिबंधकता समजावी ॥५२॥

गांवोगांवीं व्हावी गो-उपासना । गोसेवा गोदुग्धमंदिर स्थापना । 
रुचि लावावी थोरांलहानां । गोदुग्धाची परोपरीं ॥५३॥

सर्व करावें जें जें करणें । परि सुधारावें सात्विक खाणें । 
त्यावांचोनि सदबुध्दि येणें । कठिणचि वाटे ॥५४॥

सात्विक खाद्यपेयांविण कांही । गांवीं आरोग्य येणार नाही । 
उत्तम शक्ति नसतां देहीं । संपत्तिहि कैची ? ॥५५॥

उत्तम दूध उत्तम सांड । उत्तम शेती उत्तम बिवड । 
उत्तम कामगार प्रचंड । शक्तिशाली ॥५६॥

ऐसें ज्यांनी गांव केलें । तेचि आज प्रतिष्ठा पावले । 
एरव्ही तोरा करोनि मेले । निकामी ते ॥५७॥

निकामियाची व्यर्थ संपत्ति । निकामियाची व्यर्थ शक्ति । 
नाना मार्गे संपोनि अंतीं । दु:ख देई जीवासि ॥५८॥

खूप सत्वमय खावोनि अन्न । मेद घेतला वाढवोन । 
तेथे रोगांची फौज निर्माण । होतसे दु:ख द्यावया ॥५९॥

म्हणोनि केलें पाहिजे काम । आरोग्यदायी कुणी व्यायाम । 
अंगांतोनि निघतां घाम । नष्ट होती रोगजंतु ॥६०॥

व्यायाम आरोग्यदायी मित्र । हें ध्यानीं ठेवावें सूत्र । 
आळस वैरी मानिला सर्वत्र । सर्वतोपरीं ॥६१॥

व्यायामाविण सात्विक भोजन । तेंहि मारी विकारी होऊन । 
व्यायामें होय अग्निदीपन । अन्नपचन सहजचि ॥६२॥

व्यायामें जडत्व जाई दुरी । व्यायामें अंगीं राहे तरतरी । 
रक्तव्यवस्था उत्तम शरीरीं । वाढे विचारीं सजीवपण ॥६३॥

व्यायामाने सशक्त स्नायु । व्यायामें मानव होय दीर्घायु । 
व्यायामहीना पित्त कफ वायु । जर्जर करिती अत्यंत ॥६४॥

व्यायामें वाढे प्रतिकारशक्ति । स्वावलंबनाची प्रवृत्ति । 
व्यायामें अंगीं वाढे स्फूर्ति । कार्य करण्याची ॥६५॥

ऐसा व्यायाम सर्वांकरितां । असे उपयुक्त पाहतां । 
ही नव्हे केवळ एकांगी संथा । पहिलवानांची ॥६६॥

कोणी व्यायामामागेच लागले । ते मल्ल-पहिलवान झाले । 
लोकां दिपवोनि सामर्थ्य दाविलें । देह-शक्तीचें ॥६७॥

त्यांत कोणी बक्षिसासाठी । करिती जीवनाची आटाआटी । 
पैशांसाठीं मारापिटी । करिती कोणी ॥६८॥

देह झिजवावा सेवेस्तव । सत्यमार्गे रक्षावें गांव । 
दुर्बळासि उचलावें हेंचि वैभव । मल्लविद्येचें ॥६९॥

परि इकडे नाही ध्यान । नष्ट करोनिया मिष्टान्न । 
शक्ति खर्चिती दुष्कर्मी पूर्ण । ऐसे व्यायामी कितीतरी ॥७०॥

कोणाच्या भरदार देहावरि । कपडे मुलायम जरतारी । 
आपुल्याच खाद्य खुराकीची करी । सर्वदा चिंता ॥७१॥

गांवसेवेचें काम आलें । तेथे पुढारीपण दिलें । 
तरि तोंडचि त्याचें चाले । स्वयें न करी एकहि ॥७२॥

कपडयास न पडावी वळी । म्हणोनि दुरुनीच सांभाळी । 
कामें करिती माणसें सगळी । परि तो जागचा हालेना ॥७३॥

असेल कुस्तीमाजी बरवा । परि जो प्रसंगीं कामीं न यावा । 
तो मल्ल म्हणोनि गौरवावा । कोणत्या न्यायें ? ॥७४॥

तोचि खरा पहिलवान । जो देह-उन्नति साधूनि पूर्ण । 
सेवेसाठी अर्पितो जीवन । हनुमंतापरी ॥७५॥

नुसतें दंडमोंढे मारणें । कुस्ती जिंकणें, चणे पचविणें । 
थोरालहानांस तंबी देणें । नव्हती लक्षणें व्यायामाचीं ॥७६॥

साधाया सेवेचा उपक्रम । कराया जीवनाचें काम । 
जो शक्ति दे तोच व्यायाम । आवश्यक सर्वां ॥७७॥

व्यायाममंदिरांतचि कांही । व्यायाम होतो ऐसें नाही । 
उत्पादनासि सहायक होई । तो व्यायाम श्रेष्ठ ऐसा ॥७८॥

हाते घेवोनि दंड मारणें । त्याहूनि उत्तम पाणी ओढणें । 
दळणें, फोडणें, जमीन खोदणें । आरोग्यदायी ॥७९॥

जीवनाचा अमोल वेळ । घालवोनि खेळती तकलादी खेळ । 
त्यापेक्षा परिश्रमाचें फळ । उत्तम सर्वतोपरीं ॥८०॥

दळणकांडणादिकें उत्तम । मिळे आरोग्यकारी व्यायाम । 
देह विशेष राही कार्यक्षम । ऐसा सत्वांशहि लाभे ॥८१॥

वाचेल बरीचशीं संपत्ति । देशांत वाढेल श्रमाची शक्ति । 
सर्व कार्यांचीं होईल पूर्ति । गांवींच या मार्गाने ॥८२॥

होवोनिया लोकसेवा । आरोग्याचा लाभेल मेवा । 
गांवास लाभे सुखाचा ठेवा । अडचण कोठे कशाची ? ॥८३॥

आपुली शेती आपुल्या कष्टें । शेणमूत्रादि घालोनि गोमटे । 
करिता ऐसी आदर्श नेटे । उत्पन्नासी वाण नुरे ॥८४॥

आबालवृध्द नरनारी । यासाठी झटतील घरोघरीं । 
तरि सर्व सुखें संसारीं । लाभतील त्यांना ॥८५॥

लाभेल व्यायामाचें फळ कामामाजींच सकळ । 
निसर्गचि देईल आरोग्यबळ । सर्व लोकां ॥८६॥

वनस्पति आदींचा सहवास । सूर्यकिरणांतील सत्वांश । 
शुध्द हवेंतील श्रम सर्वांस । अमृतापरी लाभदायी ॥८७॥

मग गांव असो की शहर । तेथे रोगांचा न राहे संचार । 
एक-एक व्यक्ति करील आचार । ऐसा जरी ॥८८॥

व्यसनें आळस दुराचार । यांपासोनि राहिला दूर । 
ऐसा एकेक घटक सुंदर । पाहिजे गांवीं ॥८९॥

सदगुण जेथे जेथे दिसती । ते उचलोनि आणावे अनुभवाप्रति । 
यानेच उन्नत होईल व्यक्ति । जीवन सुधारेल गांवाचें ॥९०॥

जीवन लाभावें उज्जवलतेचें । तरि सर्व कामधाम असावें सोयीचें । 
जें जें कराल तें चालावें साचें । त्याच मार्गी ॥९१॥

भोजनस्थानीं निद्रास्थानीं । सभास्थानीं उधोगस्थानीं । 
विशेष प्रसंगीं सहजस्थानीं । सदविचारेंचि वर्तावें ॥९२॥

संस्कार आणि शुध्दबुध्दता । आरोग्य आणि पवित्रता । 
यांवरि लक्ष ठेवोनि सात्विकता । बिंबवावी जीवनीं ॥९३॥

यांकरितां बोललों कांही दिनचर्या । आहारविहारादि कार्या । 
ग्रामस्थांनी अनुभवोनिया । उध्दार करावा जीवनाचा ॥९४॥

ऐसें करावें एकेक कार्य । जेणें गांवीं नांदेल सात्विक सौंदर्य । 
यांतचि स्वर्गीय सुखाचें माधुर्य । तुकडया म्हणे ॥९५॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । 
गोरसव्यायामसेवन कथित । पंधरावा अध्याय संपूर्ण ॥९६॥

॥ सद्गुरूनाथ महाराज की जय ॥