वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

प्रकरण दुसरे

आनंदामृत
(ओवीबद्ध ग्रंथ)

प्रकरण दुसरे

श्रीसद्गुरु-स्वरूप

नमो आता सद्गुरुनाथा ! । कर द्वय जोडूनि नमितो त्राता ! 
मज लाविले नाथपंथा। त्वाचि येवोनिया ॥१॥

तुझे नवल वर्णावया । वेदहि शिणले वाया ।
ऐसा तू कृपाळू गुरुराया ! । धन्य धन्य लीला तुझी ॥२

त्वाचि उपजविला भक्ति भाव । तूचि जगाचा उद्घारिता राव ।
निर्मिले ब्रह्मा विष्णु महादेव । तुझेचि शक्तियोगे ॥३

तव स्वरूप वाटे सत्य सुंदर । मुळी असशी निर्विकार ।
निरंजना ! तुज नसोनि आकार । दाविशी लीला जगी पै ॥४॥

वाढविले देव-महिमान । जगी प्रगटला भक्तिकारण ।
असोनिया स्वयेचि पूर्ण । पूर्णात्मा चिंतूनि दाविशी ॥५

पाहोनिया तुझे स्वरूप । उद्धरलो वाटे आपोआप ।
सुटे कामक्रोधासी कंप । वास करी क्षमाशांति ॥६॥

उडता धूळ तव चरणांची । उद्धरेल कायावाचा साची ।
तुटे बाधा द्वैताची । अद्वैत-जोडी लाभूनि ॥७

आता नमस्कार तुजलागूनि । अन्य दुजा कवणा न मानी ।
तूचि मूळ कर्ता जाणोनि । शरण आलो तवपायी ॥८॥

प्रेमे गाता तव महिमा। तन्मय होई अंतरात्मा ।
चालविणे नलगे इसर नेमा । गुण जो नित्य गाई तुझे ॥९॥

तूचि केला देव समोर । इतरांचा न लागे थार ।
जेथे शिणला धराधर । तूचि आधार गुरुराया ! ॥१०॥

त्वाचि वाढविला भक्ति-पंथ । बहुत उद्धरिले पापी अनाथ ।
न पाहशी शुद्ध शेत । कृपा करिशी दीनावरी ॥११

तूचि प्रेमानंद सदोदित । राहशी सर्वांशीहि अलिप्त ।
तुझिया नामाचा पंथ । वाढू लागला जगामाजी ॥१२॥

काय उतराई होऊ संता । लाविले जेणे भक्तिपंथा ।
परमहंस कृपानाथा । वरदान देई दासासी ॥१३

तूचि सद्गुरु रूपे येऊनि । उत्पत्ति स्थिति लया दावूनि ।
कर्ता-कारण-करणी । घेतली हाती तुवा ॥१४

विधिरूपे उत्पत्र करिशी । विष्णुरूपे प्रतिपाळिशी ।
महेशांगे संहारिशी । सूत्रधारी तूचि एक ॥१५॥

जागृति स्वप्न सुषुप्ति तूर्या । साक्षि तूचि गुरुवर्या !।
उपजोनि सृष्टि जाई विलया । नित्य तुझ्या दृष्टिपाते ॥१६॥

सकळ सूत्रे तुझ्या हाती । अभक्ता लाविशी भक्तिपंथी ।
रिद्धि सिद्धि लोळती । चरणी तुझे ॥१७॥

तूचि चराचरांचा कर्ता । सर्व जग हे तुझीच वार्ता ।
इच्छेनुरूप केली समर्था ! फार काय बोलू ? ॥१८॥

पूर्ण ईश्वर गमसी मजला । शरण जाऊ मी कवणाला ?।
जैसा देही स्वर्ग उतरला । दुमदुमोनिया ॥१९॥

गुरुराया ! तुझे आसन । दशव्यावरी करिशी शयन ।
जेथे नलगे मानपान । वासना आदि ॥२०॥

आता तन-मन-धनदि करून । तुला अर्पिला हा प्राण ।
मज देई देई ज्ञान । ग्रंथवचन वदावया ॥२१॥

माझिया सद्गुरो मुरारी ! धाव धाव गा जिव्हाग्री ।
बैसवोनिया सत्रावरी-तिरी । लोटवी पाझर प्रेमाचा ॥२२॥

इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । द्वितीय प्रकरण संपूर्णम् ॥२३॥