आनंदामृत
(ओवीबद्ध ग्रंथ)
प्रकरण तिसरे
श्रोती व्हावे सावधान । लक्षी घ्यावे बोबडे वचन ।
सर्व तुम्ही साधुजन । म्हणोनि तुम्हां विनवीत ॥१॥
प्रथम करा सोपा उपाय । जेणे प्रपंचातचि मुक्त होय ।
फिटे चौऱ्यांशीचे भय । ग्रहण करिता अर्थ याचा ॥२॥
नको नकोत काही साधने । नको नको पहाडी राहणे ।
नको संसार तोहि सोडणे । भक्तिरूप उपाय तो ॥३॥
असोनि खुळा पांगळा । जो का उपाधी वेगळा ।
असेल प्रपंचहि आगळा । तरी चालतसे यालागी ॥४॥
कित्येक बोलती ब्रह्मज्ञान । शास्त्रपुराणे पठन करून ।
म्हणती पाहू पाहू ब्रह्मखूण । दावू लोका सर्वहि ॥५॥
रश्मीची ज्योति लावा । मग तिकडे दृष्टि फिरवा ।
बह्ममणि दिसतो रे हिरवा । पाहा म्हणे एक दृष्टी ॥६॥
ज्यासी आहे स्पष्ट दृष्टि । तो पाही दीप्ति गोमटी।
बिचारा आंधळा अंधदृष्टी । काय जाणे ? ॥७॥
तयाने काय साधने करावी ? । ब्रह्मज्योति कैसी पाहावी ? ।
म्हणोनि सर्वचि खरी मानावी । करावे दृढ ते एकचि ॥८॥
ब्रह्म काय दृष्टीने दिसे ? । आणि दिसे तितुके नाशे ।
ब्रह्म काय अंधाजवळी नसे ? । चराचरी व्यापक जे ॥९॥
जंव शुद्ध ज्ञानमार्ग न जाणला । कि भक्तिपंथे न गेला ।
तोंवरी तया प्राण्याला । मुक्ति मिळेल कैंची ? ॥१०॥
'अहं ब्रह्मास्मि' शब्द एक । तेथे जया न लाभे ऐक्य ।
तो प्राणी जन्ममरण-शोक । सोडील केवि ? ॥११॥
जंव 'तत्पद' पाहोनि 'त्वंपद' शोधील । 'असि' पदाचा मार्ग साधील ।
तंवचि मोक्षमार्ग लाभेल । हे तू सत्य जाण पां ॥१२॥
नेम धर्म अनुष्ठान । यांनी होशील जरी पावन ।
तरी मोक्षास आत्मज्ञान । पाहिजे गड्या ! ॥१३॥
जंव सोडूनिया प्रवृत्ति । धरिशी दृढ भावे निवृत्ति ।
जरी होशील लीन संती । तरी ज्ञानदृष्टि देई तो ॥१४॥
श्रवण मननाचेनि योगे । निजध्यास लागे वेगे ।
मग साक्षात्कार भोगे । तंववरी मुक्ति मिळेना ॥१५॥
वैखरी मध्यमा पश्यंति पर । हे वेदांचे जाण घर ।
चार वाचा तीच नार । वरी प्रेमनिर्झर सत्रावी ॥१६॥
पडे शुद्ध प्रेमकिरण जयावरी । अमृत वाचा पाझरी ।
प्रगट ती वेदशब्द सत्य अवधारी । न ढळती बापारे ! ॥१७॥
तया शब्दे जीव-शिव होती एक । मुळींचे ठावे पडे देख ।
गंगाजळी टाकिता मलीनोदक । गंगारूप होतसे ॥१८॥
जरी करिशी यज्ञ अन्नदान । तरी मिळती स्वर्गादि भोग पूर्ण ।
पुण्य सरलिया तेथून । उतरे भोगाया मृत्युलोकी ॥१९॥
म्हणूनि तूं ऐसे न करी । सांगती संत ते अवधारी ।
लक्ष ठेवी पुरा-पुरी। माझिया बोला ॥२०॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । तृतीय प्रकरण संपूर्णम् ॥२१॥