आनंदामृत
(ओवीबद्ध ग्रंथ)
प्रकरण चौथे
बहुत ग्रंथ जरी करिशी पठण । तरी चंचल होय मन जाण ।
आता सख्या ! निवांतपण । करी येथे ॥१॥
नाना साधने नाना सुविद्या । नाना पंथ, नाना कुविद्या ।
ही सर्वही जगद्वंद्या । साठी करिजेत ॥२॥
जोवरी न होय एकाग्र मन । तोवरी करिशी यांत भ्रमण ।
जेथे सद्गुरुचे चरण । न आढळती ॥३॥
बोलणे तुला सत्य खास । होई स्वदेहावरी उदास ।
लागे त्वरित सद्गुरुपदास । यापरता मार्ग नाही ॥४॥
सेवा करी रे लक्ष लावूनि । तेणे होशील आत्मज्ञानी ।
मुक्ति लाभेल तुजलागूनि। तत्त्वविचारे वागता ॥५॥
पुढे जरी करिशी श्रवण । तरी अल्प सांगेन साधन ।
पंचमुद्रा त्या कवण । परियेसी गड्या ! तूं ॥६॥
भूचरी, चाचरी, अगोचरी । खेचरी घेऊनि अलक्ष्य अवधारी ।
सांगेन परोपरी । उकलोनिया ॥७॥
ठेवोनि दृष्टि नासिकाग्री । लक्ष देइजे पृथ्वीभीतरी ।
तंव ती झाली भूचरी । मुद्रा पहा ॥८॥
दृष्टि असता सम । होईल अगोचरीचे काम ।
तीक्ष्णपणे पाहता प्रेम । देईल चाचरी ॥९॥
जरी पाहशी ऊर्ध्वीकडे । खेचरी मुद्रा सहज घडे ।
आता अलक्ष्याचे पवाडे । सांगतो ऐक ॥१०॥
दृष्टि ठेवोनि ऊर्ध्व जाण । नेत्र दुखावती क्षणोक्षण ।
वामभागी लक्ष पुरवून । अलक्ष्य मुद्रा साधी रे ॥११॥
जंव दृष्टि फिरविशी आप । तंव चक्राकार दिसे कंप ।
पुढे नीलवर्ण दिसे चाप । तीच खूण तूर्येची ॥१२॥
श्रवण, मनन, निजध्यास । एकाग्र करिशी सावकाश ।
तंव तूर्येचा आभास । दिसो लागे ॥१३॥
रंग तूर्येचा श्यामता । वारंवार पाहो जाता ।
पीत रंग दिसे त्राता । अद्वैतपणे ॥१४॥
पाहणे दिसणे एक होता । लागे उन्मनि अवस्था ।
नाभी-कुंडलिनी निगुता । चढे ब्रह्मरंध्री ॥१५॥
ऐक राया ! सांगू वचन । मुद्रेमध्ये रे खंडण ।
समाधीचे उत्थान । पावोनि हळू चालावे ॥१६॥
प्रथम करोनि पद्मासन । नासिकाग्री नेत्र फिरवून ।
दोन्ही अंगुष्ठे श्रवण । बंद करी तत्काळ ॥१७॥
नेत्री ठेवोनि तर्जनी । मध्यमा ती नासिकस्थानी ।
मुख अनामिके रोधोनी । श्वास बंद करी तो ॥१८॥
ऐसे कीजे दोन्ही करे । लक्ष देइजे सामोरे ।
गुरु घेवोनि हाते रे । तदनंतरे पाहावे ॥१९॥
शंख, मृदंग आवाज । स्पष्ट ओळखो ये सहज ।
प्रभा फाके गगन-शेज । दंग वृत्ति राहतसे ॥२०॥
वृत्तिसाठी ही साधने । रंगरूप सकळ मिथ्या ज्ञाने ।
ध्वनि मुद्रांची मायिक भूषणे । ब्रह्मरूपी न उरती ॥२१॥
झालिया एकाग्र साधन । अलक्ष्य लक्षावे विंदाण ।
लक्ष ठेविता अलक्ष्य जाण । होशील पूर्ण गुरुकृपे ॥२२॥
इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । चतुर्थ प्रकरणम् ॥२३॥