वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

प्रकरण पहिले

वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज - विरचित

आनंदामृत
(ओवीबद्ध ग्रंथ)

प्रकरण पहिले

श्रीगणेश - शारदा

॥ श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥ 

ॐ नमोजी विनायका । स्वरूपसुंदरा सुखदायका ! 
सकळ विघ्न निवारका । मूळपुरुषा गजानना ! ॥१

सरळ सोंड नासिक । लंबायमान लवचिक ।
दंती तेजाची झुळुक । दीप्ति पडे मुखावरी ॥२

मस्तकी मुकुट रत्नांकित । कंकण मुद्रिका मंडित हस्त ।
उदरी त्रिवळी शोभत । त्रैलोक्य संपूर्ण भरले असे ॥३

तू सिद्धिबुद्धीचा दाता । सकळ विद्यांचा भर्ता ।
सकळ कलांचा अधिष्ठाता । सबल मायाभंजना ! ॥४

तूचि सर्व सृष्टीचा कर्ता । मायातीत गुणभरिता ! 
तू ब्रह्म सनातन अव्यक्ता !  निर्विकारा जगद्वंद्या ! ॥५

तुझे वर्णू जाता गुण । वेडावला चतुरानन ।
वासुकी पावोनिया शीन । जिव्हा चिरोन बैसला ॥६

श्रुतिस्मृतीचे भांडार । उकलिता सापडे सार ।
ऐसा अगम्य अगोचर । लंबोदर मूर्ति तू ॥७

तुझा ऐसा गुणार्णव । वर्णावया न चले वाव ।
तेथे मी अल्पमति मानव । काय वर्णू शके ? ॥८

ग्रंथरचनेची आर्त । मने घेतली स्फूर्त ।
निर्विघ्न करी सावचित्त । विनवणी हेचि असे ॥९

आता नमूं शारदा सुंदरी । हंसवाहिनी वीणा करी ।
शुभ्रवसन, कंचुकी वरी । शोभे सुंदर मौक्तिकांनी ॥१०

कपाळी कुंकुमतिलक । वाटे केवळ माणिक ।
नासिकेचे झळकती मौक्तिक । प्रभा पडे मुखावरी ॥११

रत्नखचित किरीट । मस्तकी शोभे लखलखाट ।
पदी जोडवे अनुवट । काय वर्णू शोभा ती ॥१२

मस्तकी कुरळ केशकलाप । जणू दिसे षट्पदांचा गुंफ ।
सुगंध देखोनिया अमूप । भ्रमर घालिती रुंजीते ॥१३

आदिमाया मूळप्रकृति । चहू वाचांची जन्मदाती ।
सकळ विद्यांची स्फूर्ति । देशी भक्तां लागुनी ॥१४

तरि या ग्रंथाचिये अवधाने । रस भरी वो रसने ।
दास-इच्छा कृपादाने । पूर्ण करी कृपावंते ! ॥१५

आता मागणे यापरी । मम रसनेवरी वास करी।
रंग कला नाना कुसरी । ग्रंथामाजी ओवी वो ॥१६

यथामति तुझे स्तवन । केले असे अल्प जाण ।
प्रेमभरे करी ग्रहण। हीच सेवा दासाची ॥१७

गंगोदके गंगापूजन । जेवि करिती सज्जन ।
तेवि वागीश्वरी तू असोन । तुझी वाणी तूज ओपिली ॥१८

लोकसेवेचे निमित्त करून । मने घेतली धाव जाण ।
म्हणोनि आनंदामृत ग्रंथ प्रमाण । निरूपणार्थ घेतला ॥१९

महाराज आडकोजी समर्थ । तुकड्यादास तयाचा अंकित ।
सेवूनि तयांचे पदामृत । चरणी लीन जाहला ॥२०

इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । प्रथम प्रकरण संपूर्णम् ॥२१