वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय नववा

आत्मप्रभाव
(ओवीबद्ध ग्रंथ)

अध्याय नववा
(जीवन्मुक्ति-सुखलहरी) 
 
 ॥ श्रीगुरुदेवाय नमः ॥
 

सद्गुरुने कानी पेरिले । ते शिष्याचे नेत्री उगवले ।
अंतर्मुख होऊनि स्वरूप जापाले । तेच व्यापले विश्वांतरी ॥१॥

इवलेसे रोप फुली बहरले । तेणे ब्रह्मांड सुगंधे भरले ।
कणोकणी आरसे शृंगारिले । आत्मरूप पाहावया ॥२॥

आपुल्याविण अन्य नाही । मग भोगासक्ती कैची काई ? ।
शत्रू कायसा दुजा राही ? रागद्वेष कैचे मग ? ॥३॥

आनंदाचा सागर भरला । जीव-मासा अंतर्मुख झाला ।
आता काय उणे तयाला ? उठती तरंग सुखाचे ॥४॥

आनंदामाजी जाता विरून । तेथे परेसी पडे मौन ।
वाणी उठे तो आनंद घेऊन । जग ओलावया ॥५॥

आनंदसागरी आनंदलाटा । नाही अतृप्ती नाही ताठा ।
लुटून देई सुखाचा साठा। देता अधिक दुणावे ॥६॥

देहापाठी असे प्रारब्ध । परी देहाभिमानचि स्तब्ध ।
मग कवणा करील क्षुब्ध ? ढगे आकाश ना मैळे ॥७॥

देह राहो अथवा जावो । परी कोणी न नेई याचा ठावो ।
आम्ही ते आम्हीच आहो । हा निर्धार कल्पान्तीही ॥८॥

जन्मभरण हा तो खेळ । समस्त जीवन आनंदमेळ ।
देवघेव ती प्रेमरूप सकळ । मुक्तभावे ॥९॥

ऐसा शिष्य सुखी झाला । परमामृतामाजी न्हाला ।
स्वानंदबुटी सेवूनि धाला । याचि देही ॥१०॥

दीपे दीप उजळला । तेणे महाप्रकाश आकळला ।
जगाचा अंधार निवळला । ज्ञानबोधे ॥११॥

सार्थक झाले जीवनाचे । म्हणोनि शिष्य हर्षे नाचे ।
परंतु सद्गुरुरायाचे । उपकारऋण न विसंबे ॥१२॥

म्हणे अहोजी सद्गुरुराया! केवढी केली तुम्ही दया ? ।
क्षुद्र जीवाचिया ठाया । ब्रम्हखाणी उघडली ॥१३॥

केले दिव्यदृष्टीचे दान । हिरेचि बनले सृष्टीचे कण ।
देवरूप मीच झालो आपण । झाले पूर्ण जग देव ॥१४॥

देहचि हा झाला बासुरी । तुझे गीत गाया सुस्वरी ।
उतराई व्हाया करीन जे करी । ते ते होय पूजा तुझी ॥१५॥

कैचा स्वार्थ आणि परमार्थ ? झाला एकमय तत्वार्थ ।
धन्य धन्य तू स्वामी समर्थ ! चमत्कारी ॥१६॥

आता हीच माझी, विनवणी । मस्तक ठेवूनिया चरणी ।
कृपा करावी कृपादानी ! या तापल्या जगावरी ॥१७॥

जीव जे जे दुखे झुरती । त्या सकळासी द्या सुमती ।
जेणे उद्धरूनि सुखी होती । माझिया ऐसे ॥१८॥

सर्व विश्वचि सुखे डोलावे । एवढे कृपादान द्यावे ।
म्हणोनि प्रार्थितसे भावे । पुनः पुन्हा ॥१९॥

ऐकता शिष्याची प्रार्थना । प्रसन्न झाला सद्गुरुराणा ।
म्हणे कैचा गुरुशिष्यपणा? आता तू-मी एकचि की ॥२०॥

तुझा जो जो सत्यसंकल्प । तो पूर्ण होईल आपेआप ।
जरी हे जीव उजळतील दीप । आत्मप्रभावाचा ॥२१॥

इतिश्री आत्मप्रभाव ग्रंथ । वेदान्तसार-संमत ।
तुकड्यादास विरचित । नवमाध्याय संपूर्ण ॥२२॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥

॥ श्री सद्गुरुनाथार्पणमस्तु ॥

- समाप्त -