वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय आठवा

आत्मप्रभाव
(ओवीबद्ध ग्रंथ)

अध्याय आठवा
(मायारूप आणि द्वैत निरसन)

॥ श्रीगुरुदेवाय नमः ॥

सद्गुरो ! तुझियासारखा । असता मज पाठीराखा ।
आता कवणाचा करू लेखा ? । कासया स्वामी ! ॥१

मज चातकाची तहान । पुरविसी तूचि अमृतघन ।
करी मायानिवारण । आत्मगुज दाखवी ॥२

म्हणोनि पुढतपुढती चरणी । आर्तपणे शिष्य घे लोळणी ।
संबोधी सद्गुरु कृपादानी । वरद हस्ते ॥३

म्हणे ऐकपा शिष्यराया ! असे कुठली कोण माया ? ।
ही तव कल्पनेचीच छाया । नेशी विलया तूच की ॥४

आणि आत्मा काय अप्राप्त ? । अरे तूचि तो निभ्रांत ।
काय तळमळसी व्यर्थ । शब्द जंजाळी गुंतोनि ? ॥५

एकाचे दुसरेचि भासे । तया नाव माया असे ।
हे तरी कल्पनेचेचि पिसे । उगाचि भास विपरीत ॥६

गडके, गाडगे, रांजण, परळ । ती तर माती केवळ 
रूपाकारे नामे सकळ । वेगळी भासती ॥७

तैसीच भूतभौतिक सृष्टी । असो व्यष्टी की समष्टी ।
मुळी पाहता तत्वदृष्टी । एकमय सारे ॥८

निवांत सच्चिदानंद ब्रह्मी । बहु व्हावे ही स्फुरली ऊर्मी ।
ती साकारली साउमी । विश्वरूपाने ॥९

भिन्न भिन्न सारी रूपे नामे । तेणे भिन्नत्व भासे भ्रमे ।
मुळी पाहता एकेचि ब्रह्मे । व्याप्त हे सारे ॥१०

शेला, सदरा, धोतर, लुगडे । पाहता सूतचि ते उघडे ।
भेद व्यवहारी, तत्वी न घडे । तैसे विश्व ब्रम्ह ॥११

कैची व्यष्टी, कैची समष्टी ? । एकचि व्यापक परमेष्टी ।
व्याघ्र-गाय ही साखरेची दृष्टी । एक गोडीच साकारली ॥१२

भिन्न रूपनामे इतुकीच माया । ती मिथ्याम्हणोनि मोह सोडी राया ।
शोधी मूळच्या तत्वठाया । ज्ञानदृष्टी उघडूनि ॥१३

दोर सर्प नाहीच झाला । तो भ्रमेचि भासला ।
दुःखदायी भयकंप उपजला । आपुल्याच भावे ॥१४

तैसे विश्वाचिया नामरूपे । आसक्तिद्वेषादि वाढली पापे ।
जीव पोळला विविध तापे । स्वप्नसृष्टीपरी ॥१५

मुळी तू सच्चिदानंदरूप । बिंब परब्रह्मस्वरूप ।
जाणोनि घेता हरशील ताप । आपणचि की ॥१६

सोहं तत्वमसि अयं आत्मा ब्रह्म । हाच श्रुतीचा मंत्र परम ।
साधुसंतही वाजविती डिंडिम। जीव तो शिव म्हणोनि ॥१७

स्थूल-सूक्ष्म-कारण-महाकारण । पंचकोश तनु-मन-प्राण ।
यांचा सोडूनि दे अभिमान । अधिष्ठान यांचे तू ॥१८

तुझे साक्षित्व जिवी पटले । अभ्यासे ते दृढावले ।
तरी हे अभिमान सर्व गेले । आपैसेचि ॥१९

आणि अभिमानांच्या आधारे । लिंगदेही भरले वासना-वारे ।
तेही मग केवी उरे ? एक तूचि शुद्धबुद्ध ॥२०

महावाक्याचे हेचि वर्म । स्वये तुचि शुद्ध ब्रह्म ।
अहं ब्रम्हास्मि घोष उत्तम । ब्रम्हांडी घुमू दे ॥२१

परी मी एक साक्षी ब्रम्ह । अभिमानही असे भ्रम ।
त्याचाही देखणा आत्माराम । स्वये तूचि ॥२२

स्वये अपुला अनुभव घेई । परी अनुभविता भिन्न न होई ।
जाणत्यासी जाणता ठायीचे ठायी । मौनत्व लाभे ॥२३

ज्ञेय-ज्ञाता-ज्ञान त्रिपुटी । भिन्न करूनि न होई हिंपुटी ।
आपुल्यातचि होऊ दे आटी । पाहतेपणाची ॥२४

दुजेपणासह एकपणा । विरू दे आपणात आपणा ।
स्वसंवेद्य तू निरंजना ! । स्वस्थ राही ॥२५

स्वस्थ तरी मुळीच आहे । वृत्त्यादि उठती विरती पाहे ।
विचलित न हो त्यांच्या प्रवाहे । होवो जावो काही किती ॥२६

तू तो केवळ तूचि होई । देहादि भाव झुगारी सर्वही ।
मग व्यष्टिपण मिळे हेही । समष्टीमाजी ॥२७

समष्टी तरी वेगळी कैची ?  सारे विश्व रूप तुझेचि ।
उपाधी पिंड-ब्रह्मांडाची । कल्पनारूप ॥२८

एरवी पाहता कणोकणी । चराचरी चतुर्दश भुवनी ।
नाही स्वरूपावाचूनि । वेगळी वस्तू ॥२९

वेगळा भास ते अन्यथा भान । मुळी तू एक चैतन्यघन ।
सागरामाजी बर्फासमान । अद्वैत सारे ॥३०

दागिना असताचि सुवर्ण बघावे । तैसे जगी ब्रह्म ओळखावे ।
जगासी त्यागोनि पळावे । नलगे काही ॥३१

नाही वनगमनाचे काम । नलगे धूंडावे तीर्थधाम ।
नको कायाक्लेशादि तपसंभ्रम । लाभे सार संसारी ॥३२

देह करो का प्रपंची काम । मनी परोपकारी प्रेम ।
हृदयी अनुभवी आत्माराम । पंथ हाचि सर्वोत्तम ॥३३

इतिश्री आत्मप्रभाव ग्रंथ । वेदान्त-सार-संमत ।
तुकड्यादास विरचित । अष्टमाध्याय अमोलिक ॥३४

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय !