वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

उद्धव-बोध

आनंदामृत
(ओवीबद्ध ग्रंथ)
 
उद्धव-बोध


जणे होय मोक्षप्राप्ति । ते प्राणी चुकले नेणती ।
काय सांगू जनाप्रती । कोठवरी आता ॥१॥

स्वतः सिद्ध व्यापक । सोऽहं नाम सम्यक ।
ते जाणूनि न जपती कोणी देख । पडले भ्रांति-पाशी ॥२॥

प्रथम गति हेचि देखा । जेणे चौयांशीतूनि सुटका। 
सोऽहं नाम अजपा-शिखा । निरंतर घ्याइजे 
॥३

पूर्वपार सहजाक्षरी । हाचि मंत्र योगी उच्चारी ।
धृव प्रल्हादादिका-अंतरी । निश्चय हाचि 
॥४

श्रीरामाते उपदेशी । गुरु वशिष्टि तत्त्वमसि ।
संदीपने हि कृष्णासी । हाचि योग निवेदिला 
॥५

आता कलिमाजी जाण । तेथे न विश्वासे मन ।
करोनि कल्पित साधन । यमसदन भोगिती ॥६॥

कोठवरी सांगू आता । पाही प्रचीत तत्त्वता ।
देही कोणी आहे नांदता । स्वतःसिद्ध जाण तो ॥७॥

महावाक्याचा उपदेश । हाचि वेदाचा सारांश ।
भलते मंत्र जपता बहुवस । काय हातास येतसे ? ॥८॥

सोऽहं म्हणजे ब्रह्म ते मी । तत्त्वमसि ची हीच ऊर्मि ।
महावाक्यार्थ हा तत्त्वप्रेमी । अनुभविती ॥९॥

सोऽहं-अर्थ ऐसा गहन । लक्षिता प्रगटे आत्मज्ञान ।
आणि श्वासोश्वासी जपता जाण । चित्तनिरोधन होतसे ॥१०॥

शिव तो भकुटिस्थानी । सोहं शब्द लक्ष तयालागूनि ।
श्वास प्रत्यक्ष नासिकेकडोनि । नित्य घेती प्राणी की ॥११॥

जीव तो नाभिकमळी । हं शब्दनाद भूमंडळी ।
उछ्वासांतूनि घेत उफाळी । हंकार तो जगांत 
॥१२

तो कंठापर्यत येत । मिळवी कोण त्या शिवाप्रत ? ।
सत्य सोडूनि पाषाण पजीत । हेचि खोटेपण 
॥१३

आता याची हातवटी । सांगती बरे पाहे दृष्टी ।
लक्ष ठेवी, अधर कंठी । नाभिस्थानापर्यंत 
॥१४

तेथूनि उठे जो गद् गद । सोहं शब्दाचा नाद ।
ज्याचे अंत:करण शुद्ध । त्यासीचि कळे ॥१५॥

तो शब्द येत कंठावरी । उगेच बैसता अंतरी ।
मग दुमदुमे नासिके द्वारी । सोहं शब्द की ॥१६॥

सो शब्द शिववाचक । वृत्तीसि करी अंतर्मुख ।
हं शब्द जीवास दावी झुळुक । बाहेरीची ॥१७॥

दोघाचिये एकांती । जीव-शिव-ऐक्य उन्मेश वृत्ती ।
जैसी सुषुप्ति लागिजति । तैसेचि होय 
॥१८

मोठे सौख्य आहे बापा ! । मार्गहि स्वाधीन आणि सोपा ।
कोणी न करिती मापा । बुडविले आळसे 
॥१९

अंगे नाही होत कसवटी । गोष्टी करिती चावटी ।
ते गेले गेले निरयकपाटी । सत्य जाण उद्धवा ! 
॥२०

म्हणोनि घरी शद्ध भावे । सोहं समाधीतचि राहावे ।
त्यातचि आहे बरवे । नाहीतरी फजीत होशी 
॥२१

आता कोणीकडे न घाली मन । कुणाची गोष्ट न एके जाण ।
निश्चये लावी अनुसंधान । सोहं नामाशी 
॥२२

उगीच कवणा सांगो नये । ना तरी अहंकारे हानि होय ।
याचा एकांतचि राहे । न बोलावे पाखांड्याशी ॥२३


पाखांड्यासी निजगुंज । सांगता न होय त्याचे चीज ।
म्हणोनि सद्गुरुचेचि काज । नित्य करी उचित 
॥२४

सदा सत्पदी भाव ठेवी । काय सांगो सद्गुरुची पदवी ।
सद्गुरुरूप सोहंभावी । नित्य मानावे 
॥२५

ज्याने सत्यरूप दर्शविले । सोहंतत्त्वी रंगविले ।
त्या सद्गुरूसी विसरता भले । पावशील पतन ॥२६॥

मग उद्धव उगाचि बैसोन । बीजमंत्र हा उच्चारून ।
श्वासोछवासी ठेवोनि मन । पाही बरवे अंतरी 
॥२७

सोहं नामाचा गजर । चालतसे जो वारंवार ।
नाभीपासून कंठावर । ध्वनि उमटती सूक्ष्मसे 
२८॥

आधीच शुद्ध अंतःकरण । त्यावरी कृष्णे बोधिले जाण ।
त्या सुखासी मग काय उणे । उद्धवाचिया ? ॥२९


श्वासोछ्वासी चाले पाठ । इडापिंगला दुहेरी वाट ।
सत्रावीचा घडघडाट । कंठी शब्द झंकारी ॥३०॥

त्याचा न घेता अनुभव। अवघे सोंगाचेचि नांव।
तैसा नोहे की उद्धव । जया मनी निस्सीमता ॥३१॥

वृत्ति शुद्ध एकाकार । सोहंनामी जाहलो स्थिर ।
वृत्तिसाक्षी शिव साचार । होऊनि राहिला आत्मबोधे ॥३२॥

झाला समाधिस्थ पूर्ण । सोहं-स्वरूपी जाहला लीन ।
समाधिसुख जिरवून । आला देहावरी प्रारब्धे ॥३३॥

अष्ट सात्विक भावे दाटला । कंठ-शब्द सद् गत झाला ।
नेत्री अश्रु ढाळु लागला । नमस्कार केला निजभावे 
॥३४

सर्व लज्जादिक सोडून । उद्धवे साधले ब्रह्मनिधान ।
जो घेणारा असे जाण । तोचि घेतसे तत्त्वार्थ ॥३५


आता कैसा होईन उतराई ? काय अर्पावे सदगुरुपायी ?
तन मन धन अर्पूनि ही । संपवितो बोधकता ॥३६॥

॥ इति श्री उद्धवबोध संपूर्णम् 

- तुकारामजी गीताचार्य  
(०९/०१/७७)