वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

प्रकरण सोळावे

आनंदामृत
(ओवीबद्ध ग्रंथ)
 
 प्रकरण सोळावे
 
अंतिम-कथन


थोडे करीन अंतिम कथन । साधु नसे म्हणती जन ।
सर्व भोंदूचे थैमान । जगी चाले ॥१॥

एक म्हणती देव नाही । सर्व माया-लेख पाही ।
आपण करू जे लवलाही । तेचि होय पैं ॥२॥

तरी हा विकल्प सांडोन । करा स्वयेचि साधन ।
मुमुक्षूसी सद्गुरुचरण । लाभतील आपसया ॥३॥

दांभिकांच्या जाळी न पडा । कानफुकणी दूर सांडा ।
साधा सत्संग चोखटा । निवडोनिया विवेके 
॥४

अंतःकरण होता शुद्ध । लाभे आपेआप सद् बोध ।
ज्ञानतत्त्वचि गुरुदेव सिद्ध । कृपा लाभे साधनी 
॥५

दूर होता जिवीचे मळ । प्रगटे परमात्मरूप सोज्ज्वळ ।
आत्मसुख लाभता जंजाळ । दूर होय भोगांचे 
॥६

अरे ! जाणा आता खरे । काय भ्रमता जगतांत रे !
करा पांडुरंगा सोयरे । माझिया बापा ! ॥७॥

लोकी सत्य पाहाल काही । तरी ते न दिसे सर्वथाहि ।
म्हणोनि स्वये सत्कर्म पाही । केलेचि करा ॥८॥

सत्कर्मासाठी ईश्वरी सत्ता । देव देईल सुफळ तत्त्वता ।
की जेणे स्ववेचि देव होता । वेळ न लागे 
॥९

एक म्हणती हेचि कथन । महाग्रंथी झाले जाण ।
यांत काय हो प्रमाण । विशेष ते ? 
॥१०

अरे ! जन्मापासूनि कर्म करणे । तेच ते वेळोवेळा अनुसरणे ।
तैसे केले तुकारामाने । जे ज्ञानदेवे हि संपादिले 
॥११

ऐसे नवीन झाले जे काही । अंधश्रद्धा सांडोनि पाही ।
जुने चि रूपांतर तेहि । धरा वेगी प्रसंगोचित 
॥१२

प्रथम बीज मध्ये बीज । फळी पुष्पी गुप्त सहज ।
अहो! शेवटीहि बीज । तेचि तेचि 
॥१३

परी पुरातन बीजाहूनि । नसे नव्यामाजी उणी ।
हदयभूमीमाजी पेरूनि । सुखी व्हा रे ! ॥१४

अधिक न कळे फार मज । थोर ग्रंथांचे ते गुज ।
स्वामीकृपे सत्य ते सहज । बोलिलो मी 
॥१५

सहज पावलो चिमूर ग्रामी । विठ्ठल गुरुमूर्ति-प्रेमी ।
फाल्गुन वद्य द्वितीयेसि नेमी । तेथे केला ग्रंथारंभ 
॥१६

विचारणा झाली जी खचित । ते ते वदलो प्रमाणभूत ।
घेऊनि बहुतांचे संमत । अनुभवयुक्त जुनेहि जे ॥१७॥

स्वानंदाचे अमृत । जे आत्ममंथने होय प्राप्त ।
जयाचेनि जीव प्रशांत । सुखदुःखातीत होतसे ॥१८॥

ते लाभावे सकळासी । याची पात्रता मनबद्धीसी ।
म्हणोनि दाविले बहु साधनांसी । प्रकृतिभेदा जाणोनि ॥१९॥

करोनि सुगम साधन-निश्चय । साधूनि सत्संगाची सोय 
आत्मरंगी व्हा हो निर्भय । सद्गुरुकृपे निजाभ्यासे ॥२०॥

हाचि असे येथीचा सार । करा पावन हा संसार ।
आपण तारोनि व्हा सादर । तारावया सर्व जीवा 
॥२१

आता अधिक सांगो काय । धरा आपुली आपण सोय ।
संती कथिला हाचि उपाय । माझिया बापा! ॥२२


संवत् एकोणवीसशे त्र्यांशी । प्रभव नाम संवत्सरासी ।
आषाढ शुक्लपक्षेसी । तिथि असे द्वितीया ॥२३॥

भृगुवासरी शुभ योगी । हरिस्मरणी लागवेगी ।
सद्गुरु-चरण शिरोभागी । वंदोनि ग्रंथ संपविला 
॥२४

इति श्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । षोडश प्रकरण संपूर्णम् ॥२५॥


- श्रीगुरुदेवार्पणमस्तु -