वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

प्रकरण पंधरावे

आनंदामृत
(ओवीबद्ध ग्रंथ)

प्रकरण पंधरावे

आत्म-निवेदन


देखोनिया जगाची कुमति । खेद होई माझिये चित्ती ।
वाटे जन्म नको मागुती । श्रीगुरुराया ॥१


ऐसाचि करावा प्रश्न । तरी नसे पूर्ण ज्ञान ।
मनी वसे मानापमान । माझियाचि 
॥२

क्षणोक्षणी वृत्ति फिरे । काम क्रोधाचे बसती मारे ।
तेणे जीव अति घाबरे । सद्गुरुराया ! 
॥३

न करी नेम न करी धर्म । केले नसे पुण्यकर्म ।
पदरी खावोनिया संभ्रम । पडलो क्षितीवरी 
॥४

न आवडे मजला काही । सद्गुरु केवि भजावा पाही ।
जन्ममरण तूटावे तेहि । न साधवे साधन 
॥५

दुर्व्यसनी बहुत झालो । मायामोहे भ्रमूनि गेलो ।
ऐसिया स्थिती लाथलो । चरणावर विंद गुरूचे 
॥६

सोडले घरदार सर्वहि । फिरलो पोटाकारणे पाही ।
मन जिकडे तिकडे जाई । फार पीडिलो तेणेचि 
॥७

न कळे कर्म रेषा काय । दुष्ट ग्रहांनी शिणविले वाय ।
नाठवे दासांची जी माय । तोवरी मजला 
॥८

अनुदिनी जाहलो उदास । नेणवेचि सत्य सायास ।
अति पडले जी प्रयास । सद्गुरुराया ! ॥९॥

ऐसे करिता बहु जन्म गेले । दुर्गुण न साहवेसे झाले ।
सर्वस्वी मन भांबावले । एकाएकी ॥१०॥

वाटे देह त्यागावा जाण । जरी ऐसे स्थितीचे प्रमाण ।
तरी न सुटे मानपान । म्हणोनिया ॥११॥

असो वरखेड नाम नगरी । तेथे वसे संतमुरारी ।
नाम आडकोजी अवधारी । दर्शन झाले सुदैवे 
॥१२

जन्मस्थान आर्वी गावी । स्थिति नग्न दिगंबर बरवी ।
श्यामसुंदर रूप दावी । लोकांलागी 
॥१३

बहुत दिन ऐसे जाता । अडथळा करूनि अनुभव घेता ।
वाटे चमत्कार जना तत्त्वता । आडकोजीस पाहोनि 
॥१४

पुढे जनी एकमते करूनि । स्थापित केले समर्था निशिदिनी ।
उत्साह नामसंकीर्तनी । प्रेमादरे सेविती 
॥१५

जैसी गोकुळी मूर्ति अवतरली । भक्तमंडळी आनंदली ।
की स्वर्गी दुमदुमली । सेना इंद्रदेवतेची 
॥१६

इकडे झालो मी फजीत । देखिले देवधर्म अनंत ।
न मिळेचि कोणी संत । सद्गुरुराया ! ॥१७॥

अनुतापस्थिति हदयी धरोनि । गेलो मी आडकोजी चरणी ।
नमन केले लीन होऊनि । तया समर्था ॥१८॥

म्हणे काय रे करिशी ? संत-चरणी न राहशी ।
भ्रमोनि उगाचि फिरशी । आजवरी 
॥१९

गुप्त दावियली खूण । झालो तेथेचि तल्लीन ।
भानरूपि मंत्र जाण । स्मरण करी नेमेसि 
॥२०

शिरी ठेवतांचि हस्त । झालो चरणकमली मस्त ।
मन न मानेचि अन्यस्त । श्री आडकोजी-कृपेने 
॥२१

करूनि सदगुरुचे स्मरण । कथिले जना सन्मार्गज्ञान ।
जेणे होती चढे निधान । आनंदामृत 
॥२२

आदरे वदलो जे सर्वहि । मते माझी नव्हती पाही ।
संती कथिले जे जे काही । तेचि वदलो सर्वथा 
॥२३

कृपा करा स्वामिराया ! पदरी धरा दीनासि या ।
आवरोनि अपुली माया । द्या सर्वांसी निजानंद 
२४॥

इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । पंचदश प्रकरण संपूर्णम् ॥२५॥