ग्रामगीता
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
श्रोता सदभावें करी प्रश्न । चमत्कार नव्हे संत-खूण ।
मग संतांची ओळखण । समजावी कोण्या प्रकारें ? ॥१॥
साधू दिसती जेथे तेथे । कैसे जाणावे खरे-खोटे ते ?
त्यांचें तात्त्विक रूप कोणतें ? सांगावें आम्हां ॥२॥
श्रोतियांचा ऐकोनि प्रश्न । करोनि सकळांसि नमन ।
कथितों संतांची ओळखण । ग्रामहितासाठी ॥३॥
श्रोतियांत साधु नसे बैसला । म्हणतां लागेल काळें तोंडाला ।
म्हणोनि प्रथमचि नमस्कार केला । ग्राम-श्रोतेजना मीं ॥४॥
साधु सर्वत्रचि आहे । साधुत्वाविण स्थिर काय राहे ?
जें असेल तें विलया जाय । साधुत्व नसतां ॥५॥
सती आणि साधुवृत्ति । हीच गांवाची महासंपत्ति ।
साधुत्वाविण कोणे रीतीं । टिकेल जीवन जगाचें ? ॥६॥
सर्व परस्परां खाऊं बघती । त्यांना सांभाळी संतवृत्ति ।
आघात सोसूनि देई शांति । सर्वजना अन्य कोण ? ॥७॥
दया क्षमा शांति विवेक । यांचें केंद्रस्थान साधु देख ।
प्रत्येक कार्यी आवश्यक । पुरुष ऐसा सर्वहिता ॥८॥
परि तयाची ओळखण । बहिरंगावरोनि करील कोण ?
संत ओळखावा वृत्तीवरून । अथवा सदगुण पाहोनिया ॥९॥
नाहीतरि ओळखतां नये । नाना सांप्रदायिक संत दिसताहे ।
नाना रंगांनी सजला राहे । वरोनिया संत कोणी ॥१०॥
कोणीं भववींच वस्त्रें घालिती । कोणी काळा रंग पसंत करिती ।
कोणी पांढरें फटफटीत वापरती । वस्त्र अंगीं ॥११॥
कोणी माथां भार ठेविती । कोणी माळा, टिळे लाविती ।
कोणी लंगोटीच परिधान करिती । नारळाची ॥१२॥
कोणी अंगासि फासती भस्म । कोणी धुनी लावूनि घेती नाम ।
कोणी साधिती पंचाग्निकर्म । बहिरंगाने ॥१३॥
चिरकुटचिंध्या अंगा बांधती । घोगडी भोपळेच कोणी मिरविती ।
कोणी ओंजळीनेच पाणी पिती । सर्वकाळ ॥१४॥
कोणी अखंड उभे राहती । कोणी दिवसभरि पहारा देती ।
कोणी गुप्तचि वावरती । लोकामाजीं ॥१५॥
कोणीं एकाने समाधी साधली । खळगा करोनि मान पुरविली ।
चोवीस तासांनी काढली । शेवटीं घेतली शिफारस ॥१६॥
कोणी म्हणवी दीन सेवक । कोणी अवतार म्हणवी अलौकिक ।
योगीराज म्हणवोनि वाजवी शंख । ऐसे अनेक खरे-खोटे ॥१७॥
नाना मतांचे नाना संत । नाना संतांचे नाना पंथ ।
कोण निवडावा उत्तम त्यांत । वेषादिकांनी कळेना ॥१८॥
म्हणोनि संतांच्या ऊणखुणे । कोणी न पावे बहिरंगाने ।
त्यास पाहिजे सहवास करणें । अथवा ओळखणें कार्यावर ॥१९॥
कार्य कधी दांभिकहि करी । आंतलें न जाणवे लौकरी ।
ज्ञानध्यानहि बोले वैखरी । ओळखूं ये ना सहजीं तो ॥२०॥
त्याला कारण आपलाहि स्वभाव । भिन्न प्रकृतींचें भिन्न भाव ।
परि बाह्य वेषावरि संत-असंत गौरव । देतां नोहे हिताचें ॥२१॥
बाह्य सतकार्य सदाचार ज्ञान । यांसि मानिलें श्रध्दास्थान ।
तेणें मात्र अध:पतन । नव्हे आपुलें सदभावें ॥२२॥
उत्तम गुण, सदाचरण । अभेदवृत्ति, विशाल ज्ञान ।
हें दिसे तोंवरिच तेथे गुरुपण । मानितां कोणी फसेना ॥२३॥
मानव्याचा उत्तम आदर्श । नाही विषाद नाही हर्ष ।
सरळ विवेक सत्कार्य-संतोष । संतापाशीं पाहावा ॥२४॥
ज्याचें गेलें संकुचितपण । झालें विशाल अंत:करण ।
ज्याचा व्यवहार आदर्श पूर्ण । त्यासीच नम्र असावें ॥२५॥
एरव्ही संत म्हणतां हात जोडावे । जवळ जातां निरखीत जावें ।
ऐसें करितां फजीत न व्हावें । लागेल कधी ॥२६॥
आसक्तीने लोभी न व्हावें । मुमुक्षुत्व अंगीं बाणवावें ।
म्हणजे ऐशातैशा गुरूसि न फावे । भुरळ घालणें ॥२७॥
जो स्वयें उत्तम शिष्य झाला । त्यासि गुरूहि लाभे भला ।
परि सात्विकतेचाचि आदर केला । पाहिजे निश्चयें ॥२८॥
अहो ! सत्वशील तोचि साधु भला । जो रिकामा कधीच न पाहिला ।
तो काम करितांचि ओळखला । पाहिजे सत्य ॥२९॥
समजा तो जेथे उभा असे । कांही कराया स्मरे उल्हासें ।
तो जेथे बैसला दिसे । तेथे लोक तैसे बसावे म्हणोनि ॥३०॥
जेथे तो सभास्थानीं जाय । लोकांचे जोडे रांगेत ठेविताहे ।
अथवा लोकां बैसवी नीट उपायें । समाजसौंदर्य कळावया ॥३१॥
तो जेथे भोजनास बैसे । उणें पडोंचि न देतसे ।
उणें दिसतां कामीं लागतसे । व्यवस्थेच्या आपणचि ॥३२॥
तो जेथे जेथे काम करी । तें ग्राम बनवी स्वर्गपुरी ।
त्याची सेवा महाक्रांतिकारी । ग्रामोध्दारक ॥३३॥
बोले तैसा चाले उत्तम । लोकसंग्रही त्याचें प्रेम ।
आपणचि करी आपुलें काम । नरवदेव न होतां ॥३४॥
जगणें परिश्रमावांचून । हें नव्हे संताचें लक्षण ।
झटूनि करावें लोक-कल्याण । निष्कामपणें ॥३५॥
आपुल्या देहीं अनासक्त । परि हीनदीनांचा झाला भक्त ।
अहोरात्र सेवानुरक्त । नम्रभावें, संत तो ॥३६॥
जनता तयासि वाटे देव । सेवेंत नाही लपंडाव ।
परि अधिकार तैसी देई ठेव । उपदेशाची सर्वजना ॥३७॥
मूर्खासि करावें शहाणे । हेंचि त्याचें नेहमी पाहणें ।
जडाज्ञानासि बोध देणें । कामचि संताचें ॥३८॥
हा तों संताचा सहजस्वभाव । न पहावा भेद-भाव ।
बोध करावा सदैव । सत्कार्मांचा सर्वांसि ॥३९॥
ओज असे तयांचिया वाणीं । सहज बोलतां घेई वेधोनि ।
नम्र होती ऐकतां प्राणी । संत-वचना ॥४०॥
संतांचे सदा प्रेमळ बोल । वाक्य-बोध अति विशाल ।
कर्तव्यतत्परता प्रबल । संतांपाशी ॥४१॥
संतवचनांचा महाप्रताप । ऐकतां श्रवणीं होय अनुताप ।
दुष्ट आपोआप । निरसोनि जाय सत्संगें ॥४२॥
संतांची नजर कृपेने पडे । त्यासि तीर्थाटन ठायींच घडे ।
संत प्रसन्नतेने धडे । पदोपदीं देताति ॥४३॥
संत मातेहूनि मायावी । संत वैभव असोनि गोसावी ।
राज्य करोनि फकीरी दावी । आपुल्या अंगीं ॥४४॥
संत सत्तेविण राज्य करी । धनावांचूनि वैभव भरी ।
स्त्रीपुत्र नसतांहि संसारी । विश्वव्यापी ॥४५॥
संत गंगेहूनि पवित्र । शीतल निर्मल सूर्यचंद्र ।
संत कल्पतरूहूनि थोर । मोक्षदानी ॥४६॥
संत हृदयें असती कोवळे । दया द्रवोनि ह्रुदय उफाळे ।
मनुष्य-कल्याणाचे निर्वाळे । संतापाशी ॥४७॥
संत ह्रुदयें जरी दयाळ । कठिण काळाचेहि काळ ।
न्यायनीतीने अति निर्मळ । निर्भय वृत्ति ॥४८॥
संतापाशी एकचि धर्म । सकल जीवांचें कल्याणकर्म ।
मानवता हेंचि मुख्य वर्म । सर्वकाळ ॥४९॥
संतास नाही जात-परजात । विश्वकुटुंब संतांचें गोत ।
जे जे भेटतील ते आप्त । सुह्रद त्यांचे ॥५०॥
कोणा कधीहि न होवो दु:ख । संतुष्ट राहावेत सकळीक ।
असोत राव अथवा रंक । समान त्यांना ॥५१॥
विश्वसुखें संत संतोषे । जनदु:खें दु:खी भासे ।
सदा सत्कर्मी उल्हासें । लागती संत ॥५२॥
संतांचा तो मूळस्वभाव । सर्वांत वाढवावा प्रेमभाव ।
करावा सज्जनांचा गौरव । कौतुकाने ॥५३॥
कोठे सज्जनांवरि नाराजी । कोठे दुर्जनासीहि पूजी ।
परि ध्येय एकचि, समाजीं । वाढ करणें उत्तमाची ॥५४॥
दुर्जनावरीहि प्रेम करावें । दुर्जनतेसि निवारावें ।
सज्जन करोनि सोडावें । प्रेमबळें ॥५५॥
आपुलें अंगहि अर्पोनि । उणें करावें पूर्ण जनीं ।
शांति दे चंदनापरी झिजोनि । संत तोचि ॥५६॥
अंध रूढयांचें उच्चाटन । मानवधर्माचें संस्थापन ।
यासाठी करी प्राणहि अर्पण । प्रसंगीं संत ॥५७॥
ऐसें सुंदर बहिरंग । याहूनि थोर अंतरंग ।
संपादिल्या संतसंग । फिटे पांग जीवाचा ॥५८॥
संतसंगति ज्यास लाभली । त्याची दुर्दशाच पळाली ।
कर्तव्यफळें उमगूं लागलीं । जीवनाचीं ॥५९॥
संतांचिया सहज संगतीं । सदबोधाचीं फळें लाभती ।
प्रवृत्ति ते होय निवृत्ति । अंतरंगीं ॥६०॥
अंतरंग आणि बहिरंग । उन्नत करील सर्व अंग ।
ऐसा आहे संतसंग । सर्वोदयकर्ता ॥६१॥
उज्ज्वल संतांचें जीवन । भक्तिभाव-वैराग्यपूर्ण ।
आत्मानात्मविवेक ज्ञान । संतापाशी ॥६२॥
आत्मशक्ति कर्मशक्ति । ज्ञानशक्ति प्रेमशक्ति ।
सात्विक कला प्रमाणशक्ति । वास करी संतांठायीं ॥६३॥
मानसिक शक्तीचे सागर । संत करितील जो निर्धार ।
निश्चयें होईल तो व्यवहार । सर्वांगपूर्ण ॥६४॥
परि प्रत्येक साधु सर्वोदयी नव्हे । कांही तत्त्वीं अपूर्णता राहे ।
त्यांतहि अधिकारभेद आहे । अवस्थापरत्वें ॥६५॥
जीवलोक आणि देवकोटी । परलोक तैसी परात्परकोटी ।
चढती वाढती संतदृष्टी । परि केंद्रबिंदु एकचि ॥६६॥
जो ऐहिक दृष्टीने जन । मानी सेव्य, एक समजोन ।
करितो सेवा रात्रंदिन । मानिती धन्य लोक तया ॥६७॥
परि त्यास नाही खंती महंती । रागद्वेष नाही कोणाप्रति ।
मान-अपमानहि नये चित्तीं । कार्यीच वृत्ति समाधानी ॥६८॥
हा जीवसृष्टीचा साधुसंत । ईशसृष्टीचा साधूहि तद्वत ।
तो ’ देव-देवी ’ म्हणोनीच ओळखीत । जनलोकां भक्तिभावें ॥६९॥
न मानी देशवेष धर्मपंथ । नाठवे नीच-उंच जातपात ।
देवाचें कुटुंब मानी जग समस्त । व्यवहार उन्नत तयाचा ॥७०॥
ओळखी एकाच स्थानावरूनि । त्यास न दिसे रावरंक कोणी ।
राजा-प्रजा भेद न मानी । साधु देवकोटीचा ॥७१॥
ज्याने परसृष्टि अनुभवली । त्यासि परमात्मता साधली ।
आप-पर बोलीच निघोनि गेली । एकात्मता झाली सर्वभूतीं ॥७२॥
अखिल ब्रह्मांडीं जें जें दिसे रूप । तें तें झालें ब्रह्मस्वरूप ।
जन मिथ्याभ्रमें सोशिती ताप । तो निवारी नानापरी ॥७३॥
स्वप्न मिथ्या परि ओसणे कोणी । त्यास जागवी हालवोनि ।
तैसा दयाळुपणें करी जनीं । सर्व सुखकार्य ॥७४॥
सर्वांसि समत्वाकडे न्यावें । एकत्व व्यवहारीं नांदवावें ।
अवघें विश्वचि ब्रह्मसुखीं डोलावें । वाटे तया संता ॥७५॥
परात्पर स्थितीं विश्वचि नाही । सर्व स्वानंद कोंदला पाही ।
त्याची राहणीच सहजीं ब्रह्ममयी । सहज बोलहि वेदोत्तम ॥७६॥
ऐसे असती भिन्न प्रकार । साधुसंतांचे विविध संसार ।
तेथे आम्ही पडतों पामर । जाणावयासि ॥७७॥
म्हणोनि संतांच्या अगम्य खुणा । संतचि जाणतील संतजना ।
परि आपुल्या जाणिवेने त्यांना । ओळखीत जावें ॥७८॥
जितकें संतरूप जाणूं आपण । तितकें अंगीं येईल संतपण ।
गंगेसि मिळतां गंगाचि होऊन । राही नाला ॥७९॥
गंगा नेहमीच झुळझुळ वाहे । परि पाणी घ्यावयासि जो जाये ।
त्याच्या पात्राइतुकेंचि राहे । पाणी जवळी ॥८०॥
गंगा जरी मोठी असली । तरी घरीं कैसी न्यावी भली ?
ज्याने नेण्याची व्यवस्था केली । प्राप्त झाली शांति त्यासि ॥८१॥
तैसे संत सदा कृपाळू । दयाळू स्नेहाळू प्रेमळ मायाळू ।
जीवजनांचे नित्य कनवाळू । सुसंकल्पी ॥८२॥
उकलोनि दाविती ग्रंथवर्म । आपुल्या अनुभवें नाशिती भ्रम ।
सकळां दाविती वाट सुगम । संत मार्ग झाडोनिया ॥८३॥
त्यांसि शरण लागे जावें । बोलतां वचन श्रवणीं भरावें ।
भरलें तैसेंचि करावें । निश्चयाने जीवनांत ॥८४॥
मग जीवन होय उन्नत । हाचि उध्दाराचा पंथ ।
संत दाविती मार्ग सतत । जडजीवांसि सदभावें ॥८५॥
तयांचा बोध ऐकतां स्वभावें । जडजीवहि उध्दरोनि जावे ।
या मार्गेंचि सर्व सुख पावे । जनतेलागी ॥८६॥
संत जनतेशीं समरस होती । म्हणोनीच जडली त्यांवरि भक्ति ।
संत चालती बोलती मूर्ति । भगवंताची ॥८७॥
मित्रहो ! जें जें देवाने केलें । तेंचि संतांनी हातीं धरलें ।
प्रचाराद्वारें गाजविलें । देव-वाक्यां सर्वत्र ॥८८॥
ईश्वरी अवताराचें कार्य । तेंच संतांचे अंगीं चातुर्य ।
सर्वांठायीं आणोनि माधुर्य । वळण देती जनाला ॥८९॥
विसरोनि आपुलें मोठेपण । वाढविती सत्याचें महिमान ।
न जाती प्रतिष्ठावैभवा भुलोन । आडमार्गें कधीहि ॥९०॥
जुनींच साधनें घेवोनि हातीं । करिती जनांची जागृति ।
समयानुरूप स्वरूप देती । सर्व उत्तम प्रथांसि ॥९१॥
असो दगडाचाहि उत्सव । परि त्यांत भरोनि दिव्य भाव ।
त्याद्वारें उन्नत करिती मानव । साधुसंत ॥९२॥
सर्व संस्था पक्ष पंथ । यांच्यामध्ये जें जें उचित ।
त्यासि करिती प्रोत्साहित । संतजन समभावें ॥९३॥
जनांचिया चालीं चालतो । जनांचिया बोलीं बोलती ।
परि आपुलें उद्दिष्ट घालती । कुशलपणें त्यामाजी ॥९४॥
सर्वांस वाटती आपुल्यासारखे । नव्हती कोणासि पारखे ।
आबालवृध्दांसि करिती कौतुकें । आकर्षित प्रेमाने ॥९५॥
सर्वांपासूनि पुढेच असती । परि दूर न वाटे कोणाप्रति ।
तेणें करूं लागली प्रगति । लोक निराश न होतां ॥९६॥
लहान मुलासि शिकवावें । त्यासाठी पांडित्य दूर ठेवावें ।
तैसे वर्तती स्वभावें । साधुसंत जनासाठी ॥९७॥
आंधळयांचे होती नेत्र । चैतन्य ओतिती सर्वत्र ।
घुसती होऊनि ऐक्यसूत्र । संत विरोधांअंतरीं ॥९८॥
सर्व मानवांसि उन्नत करावें । सर्वत्र समाधान पोंचवावें ।
प्रत्येकाने प्रत्येकास व्हावें । पूरक, ऐसें उपदेशिती ॥९९॥
मेघवर्षावासारिखा उपदेश । तेथे नाही गुरु-शिष्य ।
आत्मवत पाहती सर्वास । संतसज्जन ॥१००॥
त्यांचा उपदेश म्हणजे अमृत । शांति लाभे होतां प्राप्त ।
त्रिविध तापें जीव जे तप्त । होती तृप्त सत्संगें ॥१०१॥
म्हणोनि ग्रंथीं वर्णिलें सकळ । संत उध्दरील आपुलें कूळ ।
ऐसेंचि नव्हे, प्रेमाचा सुकाळ । करील गांवीं ॥१०२॥
जया गांवीं वसेल संत । तेथे पुण्य करील पापांचा अंत ।
उध्दरोनि जाय प्रांतचा प्रांत । दु:खें होत देशोधडी ॥१०३॥
संत करिती आपणासमान । संतसंगें संतपण ।
प्रयत्नें उन्नत होय जीवन । संतबोध लाभतां ॥१०४॥
ऐसा संतांचा महिमा । आवडतो पुरुषोत्तमा ।
सर्व जीवांच्या येतो कामा । मायबाप म्हणोनिया ॥१०५॥
ऐसे क्रियाशील संतजन । त्यांचीच गांवीं असावी चलन ।
तरीच उध्दरेल गांव पूर्ण । नांदती सदगुण तुकडया म्हणे ॥१०६॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।
सत्संग कथिला ग्रामोध्दारार्थ । बत्तिसावा अध्याय संपूर्ण ॥१०७॥
॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥
॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥