ग्रामगीता
परंतु जगासि ताराया अपार । सामर्थ्य पाहिजे अंगीं तें ॥१॥
तें कार्य संतचि करूं जाणे । जे देवचि झाले जीवेंप्राणें ।
येरा गबाळांनी केलीं भजनें । तरी काय होतें ? ॥२॥
रामनामें तरले पाषाण । परि तें लिहिणारेहि तैसेचि पूर्ण ।
इतरांनी खडा टाकतांहि बुडोन । जाईल आता ॥३॥
निर्जीव चालविली भिंत । केले सोन्याचे पर्वत ।
विषासहि बनविलें अमृत । तेचि खरे शक्तिशाली ॥४॥
रेडयामुखीं वदविले वेद । डोहीं कोरडे ठेविले कागद ।
ऐसे थोर संत प्रसिध्द । विश्व-तारक ॥५॥
तेचि आपुल्या भजनें वचनें । जगासि उध्दरितील दयेने ।
आमुच्या भजनाचें तुणतुणें । फुकेंच सारें ॥६॥
संत मायबाप कृपाळ । ’आपणासारिखे करिती तत्काळ’ ।
कृपा करितां न लागे वेळ । पतितहि तरावया ॥७॥
त्यांचा मंत्र पडतां कानीं । होय पातकांची हानि ।
जडजीवहि जाती उध्दरोनि । अन्य भजनी हें करूं न शके ॥८॥
ऐसा श्रोतियाचा विचार । म्हणे संत करितील चमत्कार ।
तरीच तरेल हा संसार । साधन येर वाउगें ॥९॥
याचें उत्तर ऐका श्रोते ? संत जरि चमत्कारें तारिते ।
तरि कोणीच न उरते । आजवरि बध्द जनीं ॥१०॥
कारण संत अपार झाले । ज्यांची देशावरीहि सत्ता चाले ।
त्या संतांसि सर्वचि आपुले । कां न तारिले दयेने ? ॥११॥
संतांसि ’ सर्वाचेंच बरें व्हावें ’ । ऐसें वाटे जीवेंभावें ।
परि ज्यांनी कर्तव्य करावें । तेचि होती अधिकारी ॥१२॥
जनीं कर्तव्य न करितां । संत लाभ न देती आइता ।
नुसता त्यांचा मंत्र घेतां । मोक्ष होतो म्हणूं नये ॥१३॥
संत आपणासारिखे करिती । परिसें सोने केलें लोहाप्रति ।
परंतु खापर सोने नोहे निश्चिती । जाणावें हें तारतम्य ॥१४॥
उध्दार करणें हें संतांचें कर्म । परि त्यांत आहे निराळें वर्म ।
समजोनि घ्यावा शिष्यधर्म । कोणता आपुला ॥१५॥
संत जें ज्या कोणां सांगती । तैसेचि जरि ते जन वागती ।
त्यांचाचि उध्दार होतो जगतीं । ऐसें आहे ॥१६॥
उध्दार संत न करिती । मार्ग सांगती जनाप्रति ।
त्यांच्या बोधवचनें प्रगति । केली पाहिजे साधकें ॥१७॥
चोरासि वाटे चतुर निघावे । विषयी म्हणे शौकीन व्हावे ।
तैसे साधूसि वाटे सज्जन बनावे । लोक आपुले ॥१८॥
सर्वचि करिती आपुला प्रचार । तैसाचि साधूचा व्यवहार ।
कोणता उत्तम कोण अपवित्र । मार्ग जाणावा साधकें ॥१९॥
मागे कोणत्या मार्गे जन गेले ? कोणाच्या प्रचारें कल्याण झालें ?
कोणें जीवनासि पुढारिलें । कीर्तिरूपें ? ॥२०॥
एक गेला जुगारापायीं । एक मेला बुडोनि विषयीं ।
एक झाला चोर अन्यायी । गांवगुंड ॥२१॥
एक संतापाशी गेला । तोच सन्मार्गी लागोनि तरला ।
तयाचा उत्तम प्रचार झाला । सर्व लोकीं ॥२२॥
ऐसी आहे संतांची संगति । आपण ऐकिल्या होते गति ।
पण कर्तव्य केल्यासचि उन्नति । दिसों लागे ॥२३॥
संत म्हणती सत्य बोलावें । आपण नेमकें खोटें करावें ।
बोल शेवटीं संतांवरि ठेवावे । कोण्या न्यायाने ? ॥२४॥
संतांनी सांगावें दुर्गुण सोडा । आपण पापांनी भरावा गाडा ।
कासया सांगावा संत-पोवाडा । ’ उध्दार होतों ’ म्हणोनि ? ॥२५॥
ज्याने संतवचन पाळावें । आपुले दुर्गुण आवरावे ।
त्यानेच कृपापात्र व्हावें । संताठायीं ॥२६॥
कृपा हा संतांचा स्वभाव । वेगळी नाही कृपेची ठेव ।
करावयासि देवघेव । प्रयत्नाविण ॥२७॥
एकचि आहे विशेष खूण । संतांच्या वाणींत प्रेमळपण ।
मनासि लागे आकर्षण । सत्कर्मांचें ॥२८॥
त्यांची वागणूक पाहोन । प्रसन्न होतें पाहणाराचें मन ।
तैसेंचि कर्म करावें आपण । वाटे लोकां ॥२९॥
परि ज्याचे वाईट संस्कार । वृत्ति असे बहिरंग फार ।
त्यासि बोध होणें अति दुर्धर । समजा लोकीं ॥३०॥
वृत्ति उत्तम कार्यीं वळे । त्यावरि संताचा बोध मिळे ।
निश्चय होतां भाग्य उजळे । थोरपणाने ॥३१॥
मनुष्य दु:खानें होरपळला । विचारें वैराग्यभावीं वळला ।
त्यावरि गुरुचा बोध उजळला । मार्ग कळलां भाग्याचा ॥३२॥
कोणी समजोनि पाऊल टाकलें । आपुलें सत्कर्मातचि आहे भले ।
त्याने संतांचे चरण धरिले । तेहि तरले भाग्यशाली ॥३३॥
ऐसें ज्याने साधन केलें । संतवचनासि प्रतिपाळिलें ।
त्याचें कौतुक कितीहि वानिलें । तरी तें अपुरें ॥३४॥
संताचा शुध्द संकल्प । त्यासि कळला प्रगटला दीप ।
धरोनि निश्चायाचा प्रताप । उन्नत झाला सतशिष्य ॥३५॥
शेतीची जमीन झाली उत्तम । त्यावरि बीं पडलें सक्षम ।
वाढलें कुटुंबियांचेहि प्रेम । वाढतां पीक ॥३६॥
तैसेंचि साधकाचें होतें । प्रथम शुध्दाचरण शुध्दचित्तें ।
वरि संतबोध होतां तेथे । पीक वाढे भक्तीचें ॥३७॥
ऐसें ज्याने सिंचन केलें । अंकुर फुटले वाढों लागले ।
अनुभवाचें फळ आलें । संतकृपाकटाक्षें ॥३८॥
परंतु ऐसी सांडोनि रीति । उगीच बुवांच्या पायां पडती ।
त्यानेच सर्व होतें समजती । अंतरीं लोक आपुल्या ॥३९॥
पायां पडल्याने सर्व होतें । मग काम कासया करावें तें ?
पोटासि मिळेल आइतें । मोक्ष लाभेल बुवापायीं ॥४०॥
चुकीची ही धारणा अति । ऐसी नव्हती याची रीति ।
नम्र व्हावें सर्वांभूतीं । ऐसा सिध्दान्त आहे याचा ॥४१॥
सर्वांनीं सर्वांसि नम्र व्हावें । आपलें हितगुज विचारावें ।
थोरांनी लहानांसि सांगावें । कर्तव्य म्हणोनि ॥४२॥
परि लाखो लोकांनी पयांवरि पडावें । थोर सांगती तें न करावें ।
हें अजबचि घेतलें स्वभावें । भाविकांच्या ॥४३॥
ही प्रथाचि बंद करावी । श्रवणीं रुचि वाढवावी ।
मनन करोनि आचरावी । वाणीं संता-थोरांची ॥४४॥
यानेच संतपण वाढ घेई । संतसंगें संतचि होई ।
परि ’ संत ’ म्हणतां संसार सोडूनि जाई । ऐसें नव्हे ॥४५॥
संसारीं असोनि संत असती । व्यवहारीं राहोनि आदर्श होती ।
बुवा न म्हणवितांहि अधिकार ठेविती । सदगुरुचा ॥४६॥
ऐसें आहे संतपण । तें मिळे सत्संगें करोनि साधन ।
नसे अंगीं विचित्रपण । कोणतेंहि तयांच्या ॥४७॥
पावडीमाजी पाय ठेवितां । दावा म्हणे ब्रह्मसत्ता ।
त्या जयत्पालराजासि तारिलें तत्त्वता । शेवटीं ग्रंथचि बोधूनि ॥४८॥
करोनिया चमत्कार । संत न करिती उध्दार ।
हाचि मनीं राखा निर्धार । बोधचि सार तयांचा ॥४९॥
चमत्काराच्या भरीं भरोनि । झाली अनेकांची धुळधाणी ।
संतचमत्कार यापुढे कोणी । नका वर्णू सज्जन हो ! ॥५०॥
यावरि श्रोता प्रश्न करी । काय संत नव्हती चमत्कारी ?
आम्हीं प्रत्यक्ष पाहिलें तरी । कां न लोकां सांगावें ? ॥५१॥
एकाने नालींतील घाण फेकली । ती अत्तरसुगंधें घमघमाटली ।
एकाने मुठीमधूनि काढिली । खडीसाखर प्रत्यक्ष ॥५२॥
एकाने कटोरींतूनि पंगती वाढल्या । श्रोतियानेत्रीं धारा काढल्या ।
एकाने घडयाळीच बंद केल्या । सर्व गांवाच्या ॥५३॥
मित्रा ! त्वां पाहिलें साच । परि हा आभास मिथ्याच ।
संताचें हें लक्षण नव्हेच । कोणत्याहि, कदाकाळीं ॥५४॥
हे सर्व संतांघरचे क्षुद्र खेळ । कोणी मानितील यांस सबळ ।
तरि ते मुकतील प्रांजळ । सेवाव्रत महत्त्वाचें ॥५५॥
लटिकें अदृश्य तें आणावें । कांही लोकांस जेवूं घालावें ।
आणि आणिलें तेथे खळगे पाडावे । हें दिसे त्या नवल कैसें ? ॥५६॥
कोणी कीर्तिस्तव दान करी । पैसे मिळवोनि काळयाबाजारीं ।
तैसे दुसरीकडोनि आणोनि भरी । वस्तु अदृश्य ॥५७॥
एकाचे खिसे कापावे । दुसर्यास म्हणे दान घ्यावें ।
तैसेंच चमत्कारलाघव आघवें । समजावें हें ॥५८॥
कोणी गुरुची सेवा करी । जीवन वाही चमत्कारावरि ।
अडक्याचें साधन साधूनि झुगारी । आयुष्यरत्न ॥५९॥
पैसा देवोनि नांवेंतूनि जावें । तेथे तपाने पाण्यावरि चालावें ।
शेवटीं अहंकारें भ्रष्ट व्हावें । यांत थोरवी कशाची ? ॥६०॥
परि हें जनासि कळेना । संतांपासूनि इच्छा नाना ।
करिती देवोनि दानदक्षिणा । लोभासाठी ॥६१॥
लोकांचिया या ओळखोनि भावा । अनेक दांभिक येती गांवां ।
लुटती जनासि ढोंगी बुवा । मागे लावोनिया ॥६२॥
ही बुवाबाजी भुलवी जना । भ्रष्ट करी ग्रामजीवना ।
फसवोनि भोळया-बापडयांना । भलत्या छंदा लाविती ॥६३॥
कांही देती शेतीधन । मग पाहती मागे फिरोन ।
हें तंव आहे वेडेपण । आपुल्या स्वार्थांधतेचें ॥६४॥
कांही वर्गणी करोनि गोळा । गांवीं करिती भक्ति-सोहळा ।
भिकारी करोनि स्त्रियाबाळां । ठेविती कोणी ॥६५॥
प्रयत्नांचा मार्ग सोडिती । अल्पायासें लाभ इच्छिती ।
चमत्कारांच्या थापेंत जाती । गारूडियांच्या ॥६६॥
लोक चमत्कारावरि भुलती । मागाहूनि पश्चात्ताप करिती ।
कांही भुरळ पाडली म्हणती । आम्हांवरि ॥६७॥
वास्तविक संत नव्हे जादुगार । करावया चमत्कार ।
हा तों चालत आहे व्यवहार । पोटभर्यांचा ॥६८॥
चमत्कार तेथे नमस्कार । तेणें जादुगिरीस चढे पूर ।
खर्या संतांस ओळखीना नर । चमत्काराअभावीं ॥६९॥
याच भ्रांतीने भुलोनि । ’ संत आले गांवीं भुवनीं ।
परि पाप न गेलें धुवोनि ’ । म्हणती जन यापरी ॥७०॥
कोणी म्हणती घेतलें दर्शन । परि न झालें रोग-निवारण ।
कोणी म्हणती नाही संतान । दिलें संतांनी आम्हांसि ॥७१॥
कोणी म्हणती मंत्र घेतला । परि उध्दारचि नाही झाला ।
दु:खचि जाळी अजूनि मनाला । अहोरात्र आमुच्या ॥७२॥
कोणी म्हणती घेतलें दर्शन । परि नाही मिळालें आम्हां धन ।
कोणी म्हणती नोकरी लावून । द्यावी संतीं आम्हांसि ॥७३॥
कोणी म्हणती मुलगी वाढली । संताने सोयरीक नाही जुळवली ।
कोणी म्हणती गेलों पायवणी घेतली । परि ताप न गेला आमुचा ॥७४॥
कोणी म्हणती गेलों दर्शनासि । परि आठ दिवसांचा आहे उपाशी ।
सट्टा नाही दिला आम्हांसि । साधुसंताने एकहि ॥७५॥
कोणी म्हणे दर्शन घेतलें । परि चोर तुरुंगांतूनि नाही सुटले ।
चोरी केली म्हणोनि काय झालें । दर्शन घेतां मुक्त व्हावें ॥७६॥
कोणी म्हणती संत घरीं आले । आमुचें पाहिजे भाग्य उघडलें ।
कर्तव्य न करितांहि राज्य भेटलें । पाहिजे आम्हां ॥७७॥
कर्तव्य करितां सर्व होतें । मग संतदर्शन काय करावें तें ?
संताने कर्महीनासि द्यावें आइतें । आणूनिया ॥७८॥
तुम्ही म्हणतां संत दयाळ । आमुचें वेडें झालें बाळ ।
त्याने कृपा करोनि तत्काळ । बरें करावें ॥७९॥
आम्ही जरी असलों पापी । त्याने संकल्प करावा सुखरूपी ।
आम्हांस न कळतां उपदव्यापी । मिटवाव्या तेणें ॥८०॥
संताने मंत्र देताक्षणीं । आम्हांसि न्यावें उध्दरोनि ।
पाहूं नये अधिकार पडताळोनि । आमुचा त्यानें ॥८१॥
तरीच त्यास संत म्हणावें । नाहीतरि त्या ढोंगी गणावें ।
आम्ही बोलतों हे चूक मानावें । कोण्या कारणें ? ॥८२॥
ऐसें जनाचें म्हणणें चाले । परि सांगा ऐसें कोठे झालें ?
कोणत्या संताने केलें । सुखी समृध्द सर्वांलागी ? ॥८३॥
याचा विचार न करिती । चमत्कारासाठी मरमरती ।
काय संतांपाशी आहे भेदवृत्ति । इतरां शांति न द्याया ? ॥८४॥
साधुसंतचि मूल देती । तरि कां वांझ जगीं राहती ?
संत धनवैभव अर्पिती । तरि भिकारी न दिसावे ॥८५॥
संत बिमारी बसविती । मग बुवांचेहि कां प्राण जाती ?
जगीं कोणीच ना मरती । ऐसें कां होऊं नये ? ॥८६॥
संतांचा मंत्र कानीं पडे । उघडती मोक्षाचीं कवाडें ।
मग ऐसें कां न घडे । सर्व लोकीं सर्रास ? ॥८७॥
त्यांच्या संकल्पेंचि सर्व होतें । तरि दु:खी कोणीहि न राहतें ।
काय तुम्हांविषयींच दुजाभाव ते । करिते कांही ? ॥८८॥
जरि म्हणाला आमुच्या नशिबीं नाही । तरि प्रारब्धचि प्रधान होई ।
मग संतचमत्काराची राही । महिमा कोठे ? ॥८९॥
संत आपुल्यापरी झटोनि । सौख्य देती सर्वजनीं ।
सफलता त्यांच्या कार्यी बहुगुणी । परि तो नव्हे चमत्कार ॥९०॥
संतांच्या शुध्द हृदयांतूनि । अनुभवा येई निघाली वाणी ।
परि त्याचीहि कल्पना त्यांनी । केली नाही चमत्कारें ॥९१॥
मुंगीसि हत्तीचे ओझें जैसें । वाटे नवलाचें भलतिसें ।
परि तें सहज घडे शक्तिविकासें । संतकार्य तैसें वाटे जना ॥९२॥
त्यासि चमत्कार मानलिया । लोक विसरती कर्तव्यपाया ।
भजों लागती सकामपणें तयां । आंधळया भावें निष्क्रिय ॥९३॥
म्हणोनि महत्त्व नको चमत्कारा । शोधावी सत्कार्य-परंपरा ।
ज्ञान आणि कार्यस्फूर्तीचा झरा । घ्यावा संत-जीवनांतूनि ॥९४॥
वस्तुत: मार्गदर्शनचि कार्य संतांचें । पुत्रधन देणें नव्हे साचें ।
बिमारी बसविणें हें वैद्याचें । काम आहे सर्वथा ॥९५॥
संत अज्ञानरोगाचे वैद्य । जीवनविकासाचे सर्वाद्य ।
शुध्द कर्मांनी असती वंद्य । तिन्ही लोकीं ॥९६॥
त्यांचा एकचि चमत्कार । अल्पज्ञ जीव केला । विश्वाकार ।
सर्वांभूतीं देखिला ईश्वर । ठायीं ठीयीं याच डोळां ॥९७॥
त्यांचें तेंवढें करणें जाणणें । या चमत्कारापुढे आकाश ठेंगणे ।
तेथे कोण पुसतो तुणतुणें । क्षुद्र सिध्दीचें वाजतांहि ॥९८॥
संत सेवेचे अवतार । सर्वांभूतीं नम्र, सत्य व्यवहार ।
तयांसि देवहि मानी थोर । अन्य चमत्कार कासया ? ॥९९॥
साधूचा सरळ प्रेमळपणा । हा या जगीं चमत्कारचि जाणा ।
त्याने ’ अन्यहि मीच ’ म्हणावें आपणा । हा चमत्कार केवढा ! ॥१००॥
अहो ! सर्वांत मोठा चमत्कार । तो मानी ’ विश्वचि माझें घर ’ ।
त्यासाठी कष्टतो अहोरात्र । जीवें फार उल्हासें ॥१०१॥
उणें दिसे तें पूर्ण करी । जगाचा तोल बोधें सावरी ।
परंतु केल्याचा स्पर्शचि नसे अंतरीं । चमत्कारी संत ऐसे ॥१०२॥
मात्र संतचि सर्व कांही करी । आणि कर्तव्यचि नाही माणसावरि ।
ऐसी संतांची एकांगी थोरी । गाती तें नोहे उचित ॥१०३॥
ऐसें गांवीं होऊं न द्यावें । जनासि सत्य ज्ञान कळावें ।
खर्या संतांसि ओळखावें । कर्तव्यासाठी ॥१०४॥
संतांचे विचित्र व्यवहार । तैसेचि त्यांचे चमत्कार ।
हें वगळोनि दावावा सत्य सार । ग्रामीण जनासि ॥१०५॥
आपुला आपण उध्दार करावा । संतदेवांचा सहारा घ्यावा ।
हाचि संतग्रंथांचा गवगवा । चित्तीं धरावा सर्वांनी ॥१०६॥
यांतचि गांवाचें कल्याण । निघोनि जाईल दुबळेपण ।
कर्तव्य आपुलें जाणतील जन । तुकडया म्हणे करा ऐसें ॥१०७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।
संत-सामर्थ्य कथिलें येथ । एकतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥
॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥