वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 महत्वाची सूचना : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏

अनुभव - योगी सदगुरु

(चाल : पतितपावन नाम ऐकुनी...)
 
अनुभव - योगी सदगुरु माझा, एकांती बोले ।
स्वप्नसुखाला पाहुनि का रे ! ब्रिद खोविशि अपुले धृ.
 
शोधि गड्यारे ! सत्य वस्तुला, हो सावध आता ।
मायाबी हे त्रिगुण जाणुनि, नच जा या पंथा ॥१
 
चिन्मयरुपा पाहि स्वरुपा, का भुलला बापा !
सहजासनि बैसुनी सोडवी, चौर्यांशी खेपा ॥२
 
चवथा देह शोधुनी पाही, नवलाचे नवल ।
अधो-ऊर्ध्व त्या शून्य - महाशून्यात असे बाळ ॥३
 
सोहं मंत्रा घे पटवोनि, सत्संगति साधी ।
तत्स्वरूपाचा ध्यास लागता, मग कैची व्याधी ? ॥४
 
नाद - बिंदु साधुनी,ध्वनीला अंतर्गत ठेवी ।
ध्यानी ध्याता साक्षी होशी, मग अमृत सेवी ॥५॥
 
मन बुद्धिचा होऊनि साक्षी, पाहता निजसंधी ।
जागृति स्वप्न सुषुप्तीमाजी, निजरूप आनंदी ॥६॥
 
नसे पाच मुद्रांची थोरी, अंत नसे रंगा ।
तुकड्यादास म्हणे स्वानंदी, पावे भव भंगा ॥७॥