वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

प्रकरण नववे

आनंदामृत
(ओवीबद्ध ग्रंथ)

प्रकरण नववे

मानस-पूजा (ध्यान)

मागे कथिली बहु साधने । अनेक पंथ अनेक ज्ञाने ।
परि ती सद्गुरुवाचूनि कवणे। न साधती ॥१


जरी साधका व्हावा देव । तरी हाचि सोपा उपाव ।
लीनपणे धरी दृढ भाव । एका सदगुरुचे पायी 
॥२

सांडी सांडी सर्व पंथ । सद्गुरुवाचोनि होती व्यर्थ ।
म्हणोनि सद्गुरुचा भक्त । पूर्ण होई तत्त्वतः 
॥३

नम्रतेने करी सेवा । पश्चात्तापे करी धावा ।
ठेवोनिया शुद्ध भावा । शरण जाई सुविचारे ॥४


एसे जाण सद्गुरुरूप । जे ब्रम्ह-सोहं-स्वरूप ।
हृदयी जयाचे ज्ञानदीप । उजळले असती ॥५॥

जरी असे नसे सद्गुरु जवळी। नामे राख लावी भाळी।
शीतल तो चंद्रमौळी। करी कृपा हदयीच ॥६॥

असे सांगतो सेवासाधन । करी नीट एकाग्र मन ।
ठेवी स्थिर करोनि आसन । एकांत स्थानी 
॥७

नासाग्री ठेवी लक्ष। सर्व मनाचीच साक्ष ।
हृदयी धरोनि भावपक्ष । सद्गुरुमूर्ति सन्मुख स्थापी ॥८॥

रत्नखचित चौरंग जाण  सुवर्णाचे गंगाळ घेऊन 
महागंगेचे पाणी आणून । घालो स्नान तयासी ॥९

नेसवी जरीकाठी धोतर । अंगी चोळावं सुगंध अत्तर ।
बैसवावे दिव्यासनावर । गुरुमूर्तीसी सद्भावे ॥१०॥

सद्गुरु पूजावा आदरेसी । मनसुमने वाहू नि त्यासी ।
बिल्वदले पुष्पाक्षतांसी । चंदनासह अर्पावे ॥११॥

गळा घालावा सुंदर हार । शिरी मुकुटाचा संभार ।
अंगी अंगरखा जरीदार । पायी खडावा रत्नजडित 
॥१२

मग न्याहाळावे पूर्ण स्वरूप । धरोनि चरण आपेआप ।
सदगुरु-नेत्री ज्ञानदीप । सुहास्य वदन अवलोकावे ॥१३॥

द्यावा नैवेद्य पक्वान्नांचा । हा सर्वहि भाव प्रेमाचा ।
समर्पावा गुरुचरणी साचा । भक्तिपूर्वक चिंतूनि ॥१४॥

करोनि नैवेद्य अर्पण । तांबूल द्यावा प्रेमे करून ।
पंचारती ओवाळून । चरणी मस्तक ठेवावे 
॥१५

करावी नम्रपणे प्रार्थना । स्वरूपसिद्धीची याचना ।
ध्यानी रंगवावे मना । जेणे ज्ञाना तेज चढे 
॥१६

ऐसे करिता बहुत दिनी । चित्त एकाग्र होऊनि ।
ध्यानसमाधी लागेल जनी । सद्गुरू कृपे 
॥१७

ऐसा चाले निशिदिनी नेम । तंव होईल पूर्ण काम ।
हृदयीच भेटे आत्माराम । तया नरा शुद्ध ज्ञाने ॥१८॥

शुध्द राहवे अंतरी । वैराग्यतेज शरीरावरी ।
कृपा करील तंव श्रीहरी । उद्धरावया निधारे 
॥१९

प्रथम करिता भासेभास । उघडेल कपाट अनायास ।
मोकलेल षड्विकार त्रास । तया नराचा येणे पंथे 
॥२०

न धरी काही योग-पंच । सोपे सुंदर हेचि मत ।
सद्गुरुवाचोनि ज्ञान-ज्योत । कैसी प्रकटे ? ॥२१


इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । नवम प्रकरण संपूर्णम् ॥२२॥