वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

प्रकरण दहावे

आनंदामृत
(ओवीबद्ध ग्रंथ)
 
प्रकरण दहावे

सद्गुरु-लक्षणे

सद्गुरु कैसा करावा हा प्रश्न । याचे सांगतो गा निरूपण ।
कवणा गेलिया शरण। मुक्ति लाभे ? ॥१


कवण सद्गुरु कैसा करावा ? कवणापायी भाव ठेवावा ?
की जो तया अन भवा । पाववील ॥२


जगी बहुविध संतजन । कित्येक ते पोटाकारण ।
कित्येक ध्यानस्थ मौन धरून । बसती पहाडी 
॥३

कित्येक भजनी संत होती । कित्येक नवविधा पंथ धरिती ।
कित्येक योगरूपे राहती । जगामाजी ॥४॥

कित्येक मचविती ढोंग । कित्येक घेती स्वामी- सोंग ।
कित्येक औदासीन्याचा रोग । शिरी धरिती 
॥५

कित्येक दाविती चमत्कार । भूत - भविष्याचे आडंबर ।
कित्येक परोक्षी निर्भर । जगामाजी ॥६॥

कित्येक नारळ दुपट्टा घेती । जनी बहूत शिष्य करिती ।
शिष्यास सेवे राबविती । मी गुरु म्हणवोनिया 
॥७

कित्येक विदेहरूपे राहती । कित्येक कोणासहि न कळती ।
कित्येकांची सिद्ध स्थिति । अबाधित राहे ॥८॥

गुरु शोधावा यामधून । सत्य मत तयाचे जाण ।
नित्यानित्य-विवेक करून । पाहील जो सत्यवस्तु ॥९॥

न घे जो शिष्याची सेवा । शिष्य गुरुत्वे मानावा ।
सत्य - स्वरूपी मेळवावा । ऐसे मत ॥१०॥

शमदमादि साधने । ठेवियली स्वाधीन जेणे ।
स्वरूपावाचून अन्य नेणे । सोहं तोचि सद्गुरु ॥११॥

ऐसा करावा सद्गुरुराव । तेथे वसावा शुद्ध भाव ।
करील जो पार नाव । सत् शिष्याची ॥१२॥

जी जी निघेल परमार्थ शंका । सदगुरु फेडोल ती कुशंका ।
सत् शिष्याचा मान राखा । असे म्हणोनिया ॥१३॥

ज्याचा असेल शुध्दभाव । तया नलगे काही उपाव ।
कोणताहि फळे त्या गुरुदेव । सुदृढतेने ॥१४॥

शद्ध भाव व्हावयासी । जावे लागे संतापाशी ।
या कारणेच मानसी । गुरु भजावा 
॥१५

जयाची फिटे अज्ञानदृष्टि । लागे चित्तशद्धीचिये पाठी 
तये स्वरूप-ज्ञानासाठी । सद्गुरु करावा ॥१६

अद्वैत करील जो वृत्ति । षविकारांतुनि फिरवी मति 

सदा नामस्मरण-पंक्ति । घोषवी जो ॥१७

ऐसा काढावा शोधून । सिद्धस्थिति ज्याची जाण ।
तया साष्टांगे नमन। करावे वेगी 
॥१८

करावे आज्ञेचे पालन । वेचूनि घ्यावे ज्ञानकण ।
तत्त्वनिष्ठेने सेवा पूर्ण । शंका-समाधान निश्चये 
॥१९

यास्तव शिष्य कैसा असावा ? जेणे परमार्थ साधावा ।
जयास मोक्षचि व्हावा । यमनियमी बरबा तोचि तो ॥२०॥

अपरोक्ष नाही मज ज्ञान । मी तो बालक अज्ञान ।
परी सद्गुरुकृपे करून । वदलो असे ॥२१॥

इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । दशम प्रकरण संपूर्णम् 
॥२२