वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

प्रकरण अकरावे

आनंदामृत
(ओवीबद्ध ग्रंथ)

प्रकरण अकरावे
 
भविष्य-दर्शन

झाले होते आधी कर्म । पुढे कर्म-फळाचा नियम ।
कैसे तुटे मायिक प्रेम । कर्माचेनि योगे ? ॥१॥

मागे संस्कार झाले फार । तेणे बासना लालचे सुंदर ।
करीतसे तैसाचि व्यवहार । रात्रंदिनी ॥२॥

केवी तुटावे हे कर्म । न कळे जीवा याचे वर्म ।
म्हणोनि फलभोगाचा अनुक्रम । सांगिजेल ॥३॥

घडते होते जे जे काही। नको अहंभाव पाही।
कृष्णार्पण करी त्याहि। सत्य-असत्यासी 
॥४

पुढे जे ठाकेल पापकर्म । न घेई ओढोनि आत्माराम 
 परी अहंतागुणे सर्व नेम । वाया गेला ॥५

नकळे अंत जया नरा । तो शाश्वत मानील पसारा ।
म्हणोनि ज्ञाने पूर्वीच दोरा । तोडावा आसक्तीचा ॥६॥

जरी योगी असेल दूर । तरी तये शोधावे घर ।
कोण गेले, कोण जाणार । आहेत ते ॥७॥

शुक्लपक्षी चंद्रछाया । तये वेळी वनी जावे फिराया ।
एकांतस्थान पाहोनिया । स्थिर व्हावे ॥८॥

आपुली छाया पडे पृथ्वीवरी । तेथे लक्ष कंठी धरी ।
ऊर्ध्व पाहता अवधारी । छायापुरुष उमटे तत्काळ 
॥९

तया विराटावरी भविष्यखूण । खुलासेवार आता सांगेन 
कोण चिन्ह पाहता कवण । हानि-लाभ होय ॥१०

जरी नाही शिर दिसले । धड पूर्ण सर्व असले ।
तरी जाणा मरण आले । सहा मासी ॥११॥

सर्व स्वरूप असोनि पूर्ण । हस्त डावा नसे जाण ।
तरी स्त्रीशोक दारुण । घडे तयासी ॥१२


सर्व असोनि नसे उदर । तरी पुत्र मरे हा निर्धार ।
षण्मासाचे असे अंतर । तया दुर्घटनेसी 
॥१३

रक्तवर्ण दिसला दृष्टी । तरी निजदेह होईल कष्टी ।
स्वरूपी स्पष्टता दिसे गोमटी । तरी लाभ तया असे 
॥१४

दृष्टी पडता श्याम-वर्ण । तरी होय मानखंडण ।
हे सत्य भविष्य जाण । न चुके सर्वथा ॥१५॥

तरी यालागी शोक तो काय ? धरा धरा सद्गुरुचे पाय ।
नसे काळापुढे उपाय । दृढ धरोनि नेईल तो ॥१६॥

मायाडंबर लागे गोड । सदगुरुचि याचा करील मोड ।
मोडील जन्ममरणाचे बंड l सत्य जाणा सर्वस्वी 
॥१७

बहुत काय बोलू आता । सद्गुरु-अंगी सर्वज्ञता ।
त्याचिये चरणी ठेवोनि माथा । सुखदुःखचिंता निवारी ॥१८॥

इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।
बादास विरचिते । एकादश प्रकरण संपूर्णम् ॥१९॥