वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

प्रकरण आठवे

आनंदामृत
(ओवीबद्ध ग्रंथ)

प्रकरण आठवे

सदगुरु कृपा

श्रोती व्हावे सावधान । प्रेमे बोलेन काही खूण ।
जरी सद्गुरुकृपा जाण । पाहिजे तुम्हां ॥१


जरी जिज्ञासू शिष्य झाला । हदये इच्छी उद्धरण्याला ।
तयाने वैराग्यदृष्टी सद्गुरूला । शरण जावे 
॥२

जाणावे सद्गुरुचे लक्षण । पुढे कळेल त्याची खूण ।
सद्गुरुपासोनि आत्मज्ञान । प्राप्त करावे 
॥३

ज्ञान झालिया मागुती । बोधे बाणे सहजस्थिति ।
श्रद्धा ठेविता अपरोक्षप्राप्ति । ज्ञाने अद्वैती वृत्ति रमे 
॥४

प्रथम घ्यावं वैराग्यज्ञान । तेचि करावे शुद्ध वैराग्य जाण ।
गुरुपासोनि माहिती पूर्ण । घ्यावी अनासक्तीची 
॥५

जरी म्हणशी प्रपंची बुडतो । तरी परमार्थ न साधे तो ।
दोन्ही मार्ग चालू म्हणतो । तो पार कैसा पावेल ? 
॥६

संती निर्णित केले होते । सहजासमाधी कवण्या पंथे ।
पाणियांत असोनि कमळ ते । निर्लेप राही जयापरी 
॥७

पाणी असे पुरुष दोन । पुष्प राही वरीचि जाण ।
प्रपंची वासनाक्षयाचे प्रमाण । सद्गुरुलागी पुसावे 
॥८

त्या मार्गे शुद्ध वैराग्यी बनशी । मग निजगुह्याचा बोध घेशी ।
तया बोधास्तव श्रवणेसी । सादर होई आवडी 
॥९

या करिता पुढे श्रवण मनन । त्याचेनि घडे निजध्यास जाण ।
तेणे होईल स्वानुभव पूर्ण । तुझिये दृष्टी 
॥१०

या सर्व साधन-मिळणी । ग्रंथ वाचावे एकान्त स्थानी ।
परोक्ष होता निरूपणी । गुरुमुखे रंगोनि जावे ॥११॥

ऐकोनिया श्रीगुरुचा बोध । तुज विराले दिसती जगबंध ।
बनेल विदेहस्थिति अगाध । परमानंदे डुलशी तू 
॥१२

अनंत पुण्याने लाभला । नरदेह हिरा हाता आला ।
नराचा नारायण झाला । तो ऐसिया कृती निर्भयपणे ॥१३॥

सांगू केवी गुरु-महिमान । सद्गुरू तोचि देव जाण ।
धरी धरी रे तयाचे चरण । आण माझ्या गळ्याची ॥१४॥

चित्त-एकाग्रते कारणे । साधावी अजपादि साधने ।
परी अंती आत्मज्ञाने । अद्वैत व्हावे गुरुबोधे ॥१५॥

कवण चक्र कैसे पाहावे । ते गुरु योगेश्वरमुखे ऐकावे ।
मग अनुसंधान लावावे । तया चक्राचे ॥१६॥

श्रीगुरुच्या बोधे करून । जंव पाहशी सात रत्न ।
तव साधूनिया आत्मज्ञान । ब्रम्हानंदी डुलशी तू 
॥१७

आता फार बोलू काय । धरी रे आत्मज्ञानाची सोय ।
तया वाचोनिया उपाय । ते अपाय होती सर्वहि 
॥१८

इतिश्री आनंदामृत गंधे । वेदान्तसार संमते ।
तुकड्यादास विरचिते । अष्टम प्रकरण संपूर्णम् ॥१९॥