वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय पस्तिसावा

ग्रामगीता

अध्याय पस्तिसावा : प्रयत्नवाद

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

मागील अध्यायीं निरुपण । इच्छा-प्रयत्नें गुंफलें जीवन । 
हानि लाभ जन्ममरण । त्यावाचून नसे कांही ॥१॥

आजची असो वा पूर्वीची । आपुलीच इच्छा बर्‍यावाईटाची । 
आपणा सुख दे अथवा जाची । हें निर्विवाद ॥२॥

जें झालें तें होऊनि गेलें । आता पुढे पाहिजे सूधारलें । 
इच्छा-कर्तव्यें लाभती फलें । सर्व कांही ॥३॥

यावरि श्रोत्याने प्रश्न केला । आपण इच्छा-कर्तव्याला मान दिला । 
परि अचानक मृत्यु घडतो त्याला । कोणती इच्छा सांगाना ? ॥४॥

कोणी अकस्मातचि मेले । थोडेहि बिमार नाही पडले । 
छातीमाजीं कळ आली वाटलें । तैसेचि गेले मृत्युमुखीं ॥५॥

कोणीं एकाएकी विहिरींत पडला । अथवा रानीं व्याघ्राने भक्षिला । 
तो काय त्या प्रसंगाला । इच्छीत होता त्या पूर्वी ? ॥६॥

कोणास मार्गात मारोनि टाकिती । कोणी ठोकर लागतां मरती । 
त्यांची काय ती इच्छा होती ? अथवा कर्तव्य ? ॥७॥

अहो ! हो देवा-दैवाची लीला । ठावी असोनि आपणाला । 
आम्हांसि लावाया कार्याला । सांगतां भलतें ॥८॥

मित्रा ! ऐसा न धरी भ्रम । सत्यचि आहे कथिलें तें वर्म । 
इच्छा-प्रयत्नेंचि देव-काल-कर्म । देती फळें ॥९॥

मीं तर आधीच सांगितलें । अचानक कर्तृत्व नाही दिसलें । 
परि पूर्वी तेंचि कार्य असेल घडलें । आघाताचें ॥१०॥

करतेवेळीं कळलें नाही । प्रसंग येतां वाटलें कांही । 
परि दैवावरि भार देवोनि राही । मोकळा बिचारा ॥११॥

जैसें, धन संग्रहीं न करता । तरि चोर कासयासि मारता ? 
पाहोनिया वाट चालता । तरि ठोकर कैसी लागती ? ॥१२॥

देह, स्थान, संग निवडोनि । आधीच घेता उत्तमपणीं । 
आहारविहार करिता समजोनि । तरि दु:खी होता कैसा तो ? ॥१३॥

अविवेक, क्रूरता, गर्व, बेहोशी । लागलीं मृत्यूच्या मार्गासि । 
निमित्त केलें व्याघ्रादिकांसि । परि तो प्रयत्न आपुलाचि ॥१४॥

आणि अचानक दिसे घडलें । तें तरी देहावरीच पडलें । 
जन्मचि न घेतां कोठलें । संकट त्यासि ? ॥१५॥

जन्म हाचि इच्छेचा खेळ । जगीं अनेक इच्छांचा मेळ । 
तेथे संघर्ष असे अटळ । सुखदु:खफळ कर्माचें ॥१६॥

येथे दैव मारतें, देव मारितो । काय म्हणून आम्हीं म्हणतों ? 
आम्हीं काय कुणाचें खातों ? सांगा मज ॥१७॥

देवदैव आपुल्याने करी । तरि दोष लागेल देवावरि । 
तैसी नाहीच देवाची कामगिरी । दु:ख देणें मानवासि ॥१८॥

आपणचि मार्ग चुकतों । इच्छेने संगतीने वाया जातों । 
मग ’ कैसें झालें ’ म्हणतों । एकाएकी फळ येतां ॥१९॥

तेथे जबाबदार धरतों दैव । अथवा म्हणतों देवाची माव । 
नाहीतरि ग्रहगोलांचा प्रभाव । समजतों शुभाशुभ ॥२०॥

कोणी करिती ग्रहशांति । वाचती पोथी गिर्‍हे बांधती । 
परंतु दुराग्रह बसला चित्तीं । तो न काढिती भ्रांतीचा ॥२१॥

नक्षत्रांचा सृष्टीवरि प्रभाव । परि ते निमित्तमात्रचि सर्व । 
आपुल्याचि शुभाशुभ कर्मांची ठेव । फळा येई त्या त्या वेळीं ॥२२॥

आपण बरें-वाईट बीं पेरलें । तें त्या त्या ऋतूंत उदया आलें । 
येथे कालाने काय केलें ? साह्य दिलें उदय होण्या ॥२३॥

परि नारळीस न येती रुई-फळें । पेरिलें तेंचि उगवतें बळें । 
त्यासि फक्त साह्यचि दिलें जळें । तैसा देव साह्यकारी ॥२४॥

तो स्वत: कांही न करी । ज्याचें त्यास देई निर्धारी । 
’ प्राप्त काळघडी ’ सारी । निमित्तमात्र करोनि ॥२५॥

काळ चाले आपुल्या गतीं । ईश्वर व्यापक सम स्थितीं । 
कर्मे आपचि फळा येती । सृष्टिनियमें आपुलीं ॥२६॥

कर्म करायाची स्वतंत्रता । ही जीवाहातीं महान सत्ता । 
आपुल्या दैवाचा विधाता । आपणचि आहे ॥२७॥

ग्रहगोलांचा अनिष्ट प्रभाव । न पडावा म्हणोनि शोधिले उपाव । 
यांतहि कर्तबगार मानव । सिध्दिचि असे ॥२८॥

उपासनेद्वारें मानसिक शक्ति । वाढतां दु:खींहि सुखाची प्राप्ति । 
ही ईश्वरी कृपाहि असे हातीं । जीवाच्याचि ॥२९॥

मित्रा ! हें विसरूं नको आता । आपणचि सर्व कर्ताहर्ता । 
यांत देव-दैवाची वार्ता । आपणचि केली ॥३०॥

ऐसें धरूनि राहा जीवीं । शुध्द कर्मे करीत जावीं । 
तरीच गति पावे बरवी । पुढे पुढे ॥३१॥

असो निसर्ग वा योगायोग । असो प्रारब्धाचाहि भोग । 
उत्तम प्रयत्नें त्यांचाहि ओघ । वळवितां येई ॥३२॥

तैसी नसती जरि शक्यता । जीव सर्वस्वीं पराधीन असता । 
तरि शास्त्र कोण देते हातां । नाना उपाय सांगोनि ? ॥३३॥

’ धर्मे वाग, सत्य वद ’ । ऐसा कां सांगता वेद ? । 
सारेचि होतील विधिनिषेध । अनाठायीं मग ॥३४॥

पडोनि दैवादिकांच्या प्रवाहीं । जीव अधिकचि बुडेल डोहीं । 
निघायासि मार्गचि नाही । उरला मग, ऐसें होतां ॥३५॥

परंतु मिथ्या हा विचार । जीवास असे कर्मस्वातंत्र्य । 
प्रयत्न करतां होतो उध्दार । आपुला शत्रुमित्र आपणचि ॥३६॥

वाईट चिंतितां वाईट होतें । जें जें साधूं तें साधतें । 
मग कां न घ्यावें थोरपण येथे । सदगुण सारे शिकोनि ? ॥३७॥

यावरि श्रोता म्हणे ऐका । माझी अजूनि आहे शंका । 
जगीं धडपडती सर्वचि सर्वचि सुखा । परि एक एका न मिळे ॥३८॥

बरें करतांहि ब्रह्महत्त्या । लागे कित्येकांच्या माथां । 
कित्येकां जन्मभरि टाळ कुटतां । ताल तोहि न साधे ॥३९॥

याचें काय आहे कारण ? काय नाही केला प्रयत्न ? 
उलट सुखी असती पापें करून । कित्येक लोक ॥४०॥

याचें ऐका समाधान । लोक दिसती भिन्न भिन्न । 
परि त्यासि कारण त्यांचेच प्रयत्न । वेगळाले ॥४१॥

भिन्न संस्कारें भरले लोक । म्हणोनि न मिळती एकासि एक । 
कोणी जन्मतांचि गुणी सुरेख । ताल न जन्मीं साधे कोणा ॥४२॥

संस्कारचि हे नान तर्‍हांचे । कांही गायनाचे कांही विद्वत्तेचे । 
कांही चित्रकलेचे, धाडसाचे । चातुर्याचे कित्येक ॥४३॥

कांही धनाचे कांही मानाचे । कांही अध्यात्म आणि भक्तीचे । 
कांही असती कार्यशक्तीचे । संस्कार नाना ॥४४॥

ज्या प्राण्याने जो यत्न केला । तो संस्कार त्याच्या वाटयासि आला । 
म्हणोनि सर्वचि सर्वाला । येतां दिसेना ॥४५॥

एकास मिळे संपत्ति । परि अक्कल नाही त्यासि पुरती । 
एकास विद्वत्ता पिसे अति । परि खाया पुरेना ॥४६॥

एक अतीच धाडसी दिसतो । परि बुध्दीने शून्यचि भासतो । 
म्हणोनि जीवनांत तो ठरतो । वेडा अथवा गुंड जैसा ॥४७॥

एक शब्दसृष्टि उभी करितो । एक गायनें जग डोलवितो । 
एक अदभुत वाद्यें वाजवितो । लहानपणीं ॥४८॥

एक ध्यान करण्यांत प्रवीण । एका भक्तीचेंचि अवधान । 
एकास विश्वज्ञान आत्मज्ञान । लहानपणीं ॥४९॥

याचें एकचि कारण । ज्याने जें कर्तव्य केलें समजोन । 
तेचि त्याचे संस्कार पूर्ण । पावले तया पूर्वीचे ॥५०॥

इच्छा-संस्कार कर्तव्य-संस्कार । यांचेंच हें रूपान्तर । 
ज्याने केला जो व्यवहार । तोच फळला यत्नें त्यासि ॥५१॥

प्रयत्नशील त्यासीच म्हणावें । इच्छेंत तेंच चिंतनीं असावें । 
हातांनी कार्य तेंचि घडावें । सर्वकाळ ॥५२॥

मनीं वसे तें ध्यानीं दिसे । ध्यानीं ठसे तेंचि स्थानी भासे । 
तैसेंचि कर्तव्य इच्छाउल्हासें । उमटों लागे जीवनीं ॥५३॥

या सर्वांचा मेळ झाला । तरीच यश प्रयत्नाला । 
नाहीतरि अवघा गलबला । एक मिळेना एकाशीं ॥५४॥

याचा अनुक्रम ऐसा आहे । प्रथम मनीं संकल्प राहे । 
संकल्प दृढ होतां निश्चय । सत्कार्याचें रूप घेई ॥५५॥

कुणाचे संकल्प अवधी न लाविती । त्यांची तैसीच असते प्रकृति । 
कांही संस्कार मागील असती । कांही लाभती मातापित्याचे ॥५६॥

ऐसे संग्रहित होत जाती । त्यांची पुढे पुढे होई प्रगति । 
तैसी तैसी लाभे गति । बर्‍यावाईट फळांची ॥५७॥

पूर्वी केले उत्तम यत्न । म्हणोनि हातीं आलें रत्न । 
वाईट वर्तनाने पुढे पतन । फळा येईल आपैसें ॥५८॥

पूर्वीची कमाई भोगली । पुढे सुकृत-जोड नाही केली । 
त्यासि भोगावी लागली । राज्याअंतीं नर्कगति ॥५९॥

पूर्वी कांही पुण्य घडलें । म्हणोनि सुख वाटयासि आलें । 
परि पाप करतां येतील घाले । निश्चयाने या पुढती ॥६०॥

पुण्यवंता आज कष्ट । याचें कारण आहे स्पष्ट । 
एका संस्कारें तो पुण्यनिष्ठ । परि दुसरा फळला दु:खरूपें ॥६१॥

प्रयत्न सर्वांगीण आदर्श । सर्वचि संस्कारांचा उत्कर्ष । 
ऐसें न होय म्हणोनि पुरुष । विचित्र फळें भोगिती ॥६२॥

तुकाराम आणि एकनाथ । दोघें सारखेचि अधिकारी संत । 
परि एका त्रास एक धनवंत । फळें हीं भिन्न संस्कारें ॥६३॥

सकाळीं उठण्याचें फळ निराळें । अभ्यासाचें फळचि वेगळें । 
उत्तम राहणीचें फळ आगळें । झाकवितां झाकेना ॥६४॥

चित्तशुध्दीचें वेगळें फळ । दानादिकांचें भिन्न सकळ । 
ज्ञान-साधनाचें फळ प्रांजळ । नाही मेळ एक-एका ॥६५॥

उत्तम कार्या फळ उत्तम । परि दुसरें एक वाईट कर्म । 
म्हणोनि फळ लाभे अधम । मागे-पुढे याचें त्याचें ॥६६॥

कल्याणकर्म केलें जेवढें । तें कधीतरी फळेल मागेपुढे । 
हा सिध्दान्त व्यर्थ न घडे । कदाकाळीं ॥६७॥

म्हणोनि उपकार नाही फळले । पुण्य करितां अपकार झाले । 
हें म्हणणेंचि नाही शोभलें । शहाण्या जना ॥६८॥

फळ वेगळेंचि आज दिसतें । परि आलें कैसें धुंडितां तें । 
सहज कळेल, प्रयत्नचि होते । मागे केले ॥६९॥

उपकरपुण्य संग्रहीं पडलें । अपकाररूपें पूर्वपाप फळलें । 
ऐसा मिश्र व्यवहार चाले । ओळखूं येना ॥७०॥

कोणत्या कर्माचें कोणतें फळ । हें जाणतां येना तत्काळ । 
तेणें चित्तीं होय गोंधळ । वाढूं लागे कुशंका ॥७१॥

प्रत्येक कर्माचें वेगळें फळ । परि जाणताचि लावी मोल सकळ । 
प्रयत्न-फळांची गुंतवळ । उकलेना सहजपणें ॥७२॥

उत्तमगाण्याचें फळ खाद्य नोहे । परि त्याहूनि त्यांत सुख आहे । 
हें कैसें कळेल ? जोंवरि रुचि नये । गायनाची ॥७३॥

उपकार-सेवेंत आत्मसमाधान । हें फळचि असे महान । 
तेथे कां इच्छावें बक्षीस अन्य । सज्जनांनी ? ॥७४॥

आपुले प्रयत्नचि सरस करावे । केले तरी करीतचि राहावें । 
थोडें उणें होऊं न द्यावें । प्रयत्नामध्ये ॥७५॥

क्षण एक चुकीं न द्यावें । प्रयत्नासि दूरदृष्टीने जपावें । 
प्रयत्नहि सर्वांगीण व्हावे । सर्व सुखें भोगावया ॥७६॥

एरव्ही प्रयत्नाशिवाय कोणीच नाही । प्रयत्न होती सर्वदाहि । 
परि दु:खचि देती प्रयत्न कांही । जीवजना ॥७७॥

कांही प्रयत्न नांवलौकिका नेती । कांही प्रयत्नें होय फजीती । 
कांही प्रयत्न प्राणचि घेती । आपुले आणि परक्यांचे ॥७८॥

म्हणोनि प्रयत्न करावे चांगले । कर्त्या सज्जना पाहिजे पुसलें । 
लोभप्रतिष्ठेसि जे नाही भाळले । तेचि खरे प्रयत्नशील ॥७९॥

कांही प्रयत्न उलटे घडती । त्यांचीं फळें मरणतुल्य येती । 
कांही प्रयत्न प्रांजळ होती । तेणें पावती उत्तम जन्म ॥८०॥

मरणासीहि प्रयत्नचि कारण । जन्मण्यासहि प्रयत्नचि प्रमाण । 
भोग-सुख-दु:खांचें निधान । प्रयत्नचि ॥८१॥

कांही प्रयत्न योजनारूप होती । त्यांनी कीर्तिपळें लाभती । 
कांही प्रयत्नीं शिकस्त करिती । मुक्ति पावती साक्षात्कारें ॥८२॥

कांही प्रयत्न संचितीं पडती। प्रारब्ध भोगतां जे जे घडती । 
नाही मुळीच उपभोगाची वृत्ति । त्यांचे प्रयत्न कळसाचे ॥८३॥

त्यांचे प्रयत्न शुभप्रारब्ध झाले । दोन्ही मिळोनि देवपणासि आले । 
आपण आपणांत मिळाले । साक्षात्कारें आत्मत्वें ॥८४॥

मित्रा ! म्हणोनि प्रयत्नशील व्हावें । प्रारब्धाचें थोरपण न मानावें । 
कर्तव्याने चमकून उठावें । भूमंडळीं उत्साहें ॥८५॥

अमका प्रारब्धें श्रीमंत झाला । अमका पुण्य करितां दैवें गिळिला । 
अमका ’ देव देव ’ म्हणतां तरला । प्रयत्नाविण ॥८६॥

हें तों म्हणणें अज्ञानाचें । पुन्हा करूं नको उच्चार वाचें । 
सुप्रयत्नासि फळ सौख्याचें । निश्चयें आहे ॥८७॥

दुसर्‍याचें फळ पाहोनि झुरावें । आपण कांहीच न करावें । 
हें तों लक्षण आहे बरवें । अधोगतीचें आपुल्या ॥८८॥

आमुचें पूर्वसुकृत नाही बळी । म्हणोनि हात ठेवावा कपाळीं । 
हें तों आमुच्याने कधीकाळीं । घडोंचि नये ॥८९॥

नाही तेंचि आता कमावूं । आहे तें तें अधिक वाढवूं । 
इच्छा फलद्रूप करोनि घेऊं । हाचि करावा निर्धार ॥९०॥

याच निर्धारें वाल्या कोळी । पुण्यश्लोक झाला भूमंडळीं । 
संत योगी वीर बळी । गाजले मानव-इतिहासीं ॥९१॥

वेश्यागामी बिल्वमंगल । यत्नें झाला सूरदास निर्मल । 
आपणासह महीमंडल । केलें पावन भजनाने ॥९२॥

हेंचि शिकावें सत्संगतीने । यानेचि मानव होती शहाणे । 
भाग्य उजळेल सूर्याप्रमाणें । उद्योगशील झालिया ॥९३॥

प्रत्येक उद्योगा फळ पावे । शेतकर्‍यासि हितगुज पुसावें । 
प्रयत्नें एक बीज लावावें । फळ पावावें कणसापरी ॥९४॥

प्रयत्नविण स्वयंपाक झाला । प्रयत्नाविण घास मुखीं गेला । 
प्रारब्धानेच व्यवहार चालला । ऐसें कोण सांगो शके ? ॥९५॥

पटवावया प्रारब्धवाद । त्यासहि लागे प्रयत्न सिध्द । 
विमान, दूरध्वनि आदि शोध । लाविले काय प्रारब्धें ? ॥९६॥

उघड आहे प्रयत्नाची थोरी । प्रयत्नापुढे प्रारब्ध ताण करी । 
हें म्हणणेंचि अपुरें सर्वतोपरीं । दूरदृष्टीने पाहतां ॥९७॥

मुख्य असे प्रयत्नचि केवळ । प्रारब्ध हेंहि प्रयत्नाचें फळ । 
वृक्षावांचोनि झालें फळमूळ । कोण म्हणे ? ॥९८॥

प्रयत्न सोडोनि प्रारब्ध धरलें । तरि ते प्राणी दोघांतूनि गेले । 
नाही प्रयत्नहि पूर्ण केले । प्रारब्ध पळालें दूरदेशीं ॥९९॥

कोणी एक झाड लावलें । दिवसेंदिवस सुकतचि गेलें । 
त्याचेकडे दुर्लक्ष केलें । कोणी एकीं ॥१००॥

लोक म्हणती आयुष्य सरलें । कोणी म्हणती किडयांनी ग्रासलें । 
कोणी म्हणती त्याचें प्रारब्ध आलें । मरणस्थानीं ॥१०१॥

कोणी म्हणती येथे झाड जगेना । कोणी म्हणती चुकूं द्या यातना । 
कोणी म्हणती काय आपणा- । हातीं आहे ? ॥१०२॥

अरे ! हें सर्वचि आहे खरें । परि प्रयत्न करोनि पहा बरें । 
झाड जगतें की ऐसेंचि मरे । प्रयत्न केलिया ? ॥१०३॥

म्हणोनि त्यास खत घातलें । तारतम्य ठेवोनि सांभाळिलें । 
पाणी देवोनि वाचविलें । मूळडाळ सर्वचि ॥१०४॥

पुढे पुढे झाड फुललें । पुष्पींफळीं बहरोनि आलें । 
प्रयत्न केल्यानेचि झालें । आहेना हें प्रत्यक्ष ? ॥१०५॥

कलमें करोनि नानापरीं । फुलें आणिलीं बहुप्रकारीं । 
हात ठेवितां कपाळावरि । ऐसें कधी होईल का ? ॥१०६॥

तैसेंचि मानवाचें जीवन । उन्नत व्हावया हवा प्रयत्न । 
अपमृत्यु आदि धोके दारूण । टळती संशोधन केलिया ॥१०७॥

मानव सृष्टीहूनि थोर । तो ईश्वराचा अंशावतार । 
अचूक प्रयत्न दैवी हत्यार । निर्मू शके प्रतिसृष्टि ॥१०८॥

म्हणोनि सांगतों प्रयत्न करा । विचारशक्ति प्रयत्नांत भरा । 
शिका शिकवा, प्रयत्न सारा । व्यापूं द्या गांवोगांवीं ॥१०९॥

ज्या ज्या राष्ट्रांनी ऐसें केलें । त्यांचें वैभव शिगेस गेलें । 
जीवनमान आदि वाढलें । इच्छेसारिखें तयांचें ॥११०॥

प्रारब्धवादी शिथील झाला । प्रयत्नवादी चेतना पावला । 
शोध करीत पुढे गेला । दिगंतरीं ॥१११॥

केलें मंगळावरि उड्डाण । चढला हिमगिरिशिखरीं पूर्ण । 
शोधिलें अग्निअस्त्र अणुअस्त्र महान । हैड्रोजनादि ॥११२॥

ऐकती करोडो मैलांवरून । परस्परांचें गायन-भाषण । 
विश्व हें आटोक्यांत आणून । घर केलें राहण्याचें ॥११३॥

प्रयत्नाची शिकस्त झाली । अजूनिहि जागा आहे उरली । 
धाव कधीच नाहीं संपलीं । प्रयत्नशीलांची ॥११४॥

प्रयत्नें देवपण पावला भक्त । प्रयत्नें योगी झाला जीवन्मुक्त । 
प्रयत्नें बध्द झाला निरासक्त । विषयामाजीं ॥११५॥

प्रयत्नें गांव झाला आदर्श । प्रयत्नें सुखी होय स्वदेश । 
प्रयत्नें विश्वशांतीचे सायास । सफल होती ॥११६॥

यासाठी प्रयत्न करावे आपण । मिरवावें देवाचें थोरपण । 
अंगां येईल अहंकार म्हणोन । देव मध्यस्थीं घालावा ॥११७॥

प्रयत्नें राज्य समृध्द करावें । प्रयत्नें भूमंडल डोलवावें । 
प्रयत्नेंचि दासपण शोभवावें । कार्यप्रभावें ॥११८॥

प्रयत्नें मानव होई उन्नत । गांवचि नव्हे, हालवी दिक्प्रांत । 
ही अनुभवाची मात । विसरूं नका तुकडया म्हणे ॥११९॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । 
कथिला प्रयत्नवाद समर्थ । पस्तिसावा अध्याय संपूर्ण ॥१२०॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥