वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय छत्तिसावा

ग्रामगीता

अध्याय छत्तिसावा : जीवन-कला

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

ईश्वर-अंश सर्व जीव । यत्न तोचि जणावा देव ।
ऐसें वदती संतग्रंथ, मानव । सर्वचि नित्य ॥१॥

परंतु पाहतां जगाकडे । दिसती प्रकृति-भेदाचे पोवाडे । 
व्यक्ति तितक्या प्रकृतींचे पाढे । ठायीं ठायीं ॥२॥

वाटे ही निसर्गाचीच रचना । तेथे ठाव नाही प्रयत्ना । 
ऐसी धारणा बसली मनां । श्रोतियांच्या ॥३॥

म्हणोनि करूं निरूपण । ऐका ऐका श्रोतेजन ! 
प्रकृति ठायीं ठायीं दिसे भिन्न । परि ती स्वतंत्र म्हणों नये ॥४॥

प्रकृति पुरुषाच्या आधीन । त्याच्या इशारें करी नर्तन । 
बहु होण्याचा संकल्प पूर्ण । तीच भिन्न प्रकृति ही ॥५॥

परम पुरुष जो परमात्मा । त्याच्या शक्तीसि नाही सीमा । 
मानव त्याचीच प्रतिमा । अंशरूप निश्चयें ॥६॥

म्हणोनि जीवांत सामर्थ्य अनंत । अभ्यासाने प्रकटे निवांत । 
नलगे आत्मशक्तीचा अंत । कोणासहि ॥७॥

सर्व होतें केलें असतां । सर्व मिळतें धरितां हातां । 
अभ्यासें तंव ब्रह्मसत्ता । पावती योगी ॥८॥

आणि अभ्यासाच्याचि बळें । भिन्न मार्गीं वाढले जीव सगळे । 
जैसी श्रध्दा तैसीं फळें । श्रध्दामय पुरुष म्हणोनि ॥९॥

जैसी श्रध्दा जैसा संकल्प । जैसा यत्न पुण्यपापरूप । 
तैसाचि जीव होई आपोआप । अभ्यासाने तयार ॥१०॥

नैसर्गिक दिसे प्रकृति-भेद । तो पूर्व अभ्यासानेच सिध्द । 
मुळीं एक परि कलांनी विविध । जाहले जीव ॥११॥

पूर्व जन्मींची अभ्यासकला । तैसा या जन्मींचा यत्न आपुला । 
यांनीच भिन्नत्व आणिलें जीवाला । नानापरी ॥१२॥

आपुली आपणा कला फळली । म्हणोनि प्रकृति भिन्न झाली । 
येथे निसर्गावरि बोली । देवोंचि नये ॥१३॥

देवाने निर्मिली ही क्षिती । जिच्या पोटीं अनंत जीव होती । 
न करवे तयांची गणती । गणित-मार्गाने ॥१४॥

निसर्गत: लाभलें सारखें जीवन । परि कलेने भरलें भिन्नपण । 
एक-एकशी मिळते गुण । क्वचितचि आढळती ॥१५॥

एकचि वस्तु विश्वीं संचली । परि प्रकृतिगुणें भिन्न भासली । 
रचना बोली निराळी झाली । कला केली जीवांनी ॥१६॥

प्रत्येक जीवचि अवतार पाही । परि कोठे कांही कोठे कांही । 
एक आहे एक नाही । ऐसें वैशिष्टय सर्वत्र ॥१७॥

प्रत्येक जीव आपुल्यापरी । कलापूर्णतेने खेळे भूमीवरि । 
एक-एकाची स्वभाव-कुसरी । दुसरा पाहतां दिसेना ॥१८॥

सृष्टींत खेळती जे जीव । पहा तयांचें लीलालाघव । 
अंग-अंग अभिनव । नाना तर्‍हा तयांच्या ॥१९॥

नाना कला नाना रंग । नाना स्वभाव नाना उद्योग । 
नाना वस्त्रें, भूषणें, उपभोग । भोगणारे निर्मिले ॥२०॥

निसर्ग नानापरी नटला । तो भिन्न जीवांच्या वाटयासि आला । 
प्रकृतीकडोनि साथ मिळाला। जीवाचिया कलेऐसा ॥२१॥

जीवांत नखशिखान्त भरली कला । गुणावगुणांचा मेळा झाला । 
इंद्रियें भोगती वस्तूला । आपुलाल्या भिन्न भावें ॥२२॥

जीव आपणचि संकल्प करी । कल्पोनि आरोप वस्तूवरि । 
मग तदाकार होवोनि व्यवहारीं । रागद्वेष पाहतसे ॥२३॥

ईश्वरनिर्मित एकचि सृष्टि । परि पाहणाराची भिन्न दृष्टि । 
आपुल्या भावें सुखी-कष्टी । होय व्यष्टि-समष्टीने ॥२४॥

ईश्वरनिर्मित स्त्रीरूप सत्ता । ती कुणाची माता कुणाची कांता । 
आपुल्या भावें सुखदु:खभिन्नता । भोगी जीव ॥२५॥

एकाच निसर्गसृष्टीवरि । जीव आपली सृष्टि करी । 
तैसेंचि सुखदु:ख भिन्न अंतरीं । अनुभवा येई ॥२६॥

रागद्वेषादि दृढ विकार । ऐकिलें भोगिलें त्यांचे संस्कार । 
हे घेवोनि जन्मती पुन्हा नर । आपापल्या कलेसह ॥२७॥

पूर्व अभ्यास, प्रयत्न, संकल्प । त्यापरी लाभे वेगळें रूप । 
जीवांच्या अनंत कलांचा गोफ । ती ही सृष्टि ॥२८॥

’ बहु व्हावें ’ हा ईश्वरी संकल्प । जीवांद्वारें घेई रूप । 
म्हणोनि दुजियांची ओढ आपोआप । जीवाअंगीं ॥२९॥

एका जीवाचा भिन्न संकल्प । दुसर्‍या जीवाचा निराळा व्याप । 
परि प्रबल शक्तीचा कार्यकलाप । ओढोनि नेतो दुसर्‍यासि ॥३०॥

एकाहूनि दुसरा कलाधिकारी । अधिक टाकी मोहनी समाजावरि । 
आपुले मंत्र साजवी मधुरी । वाणी-वीणा वाजवोनि ॥३१॥

कोणी कल्पिली गायनकला । वाद्यकला चित्रकला तंतुकला । 
शब्दकला नृत्य शृंगारकला । मोहावया अन्य जीवांसि ॥३२॥

राहणें कला पाहणें कला । बोलणें कला हसणें कला । 
सर्वांमाजीं सौंदर्य-कला । ओतप्रोत दर्शवी ॥३३॥

कुणाचे मंजुळ बोल गोजिरवाणे । कुणाचें व्याघ्रापरी गर्जणें । 
रणकर्कशता जीवीं बाणे । कलंकशोभा कोणाची ॥३४॥

कुणास पाहोनि मोह वाटे । कुणास पाहतां येती कांटे । 
कुणाचे देखतां मुखवटे । छाती फाटे धीरांची ॥३५॥

कुणाची गंभीर मुद्रा सजली । वैराग्य येतें दृष्टीच पडली । 
कुणाकडे पाहतां वृत्ति गेली । विषय-वाटेने ॥३६॥

कुणास पाहतां चीड दाटे । कुणाचा संग सोडतां न सुटे । 
जीवभाव ओवाळावा वाटे । चरणीं तयाच्या ॥३७॥

हा सर्व निसर्गचमत्कार नोहे । प्रत्येक कलेचें सामर्थ्य आहे । 
प्रयत्नशील मानवचि राहे । परि देव म्हणती तयासि ॥३८॥

कृष्णाचाचि मामा कंस । परि एक देव एक राक्षस । 
मुळीं पाहतां एकचि वंश । परि भेद केला कलांनी ॥३९॥

कला मानवासि देव बनविते । परि अवकळा नसावी जरा तेथे । 
पूर्णताहि कलेनेच येते । रमतां अंगीं आत्मबोध ॥४०॥

अवकलेने छी:थू: होते । कला येतां देवत्व लाभतें । 
जैसा प्रयत्न करावा तयातें । फळ येतें याच देहीं ॥४१॥

विश्वामित्रें केली कला । राजर्षीचा ब्रह्मर्षि झाला । 
ब्रह्मवंशीय रावण राक्षस ठरला । मेला आपुल्या कलेने ॥४२॥

रावणें कला संपादिली । देवदेवता प्रसन्न केली । 
आपुली शक्ति वाढवोनि घेतली । कलाकुसरीने ॥४३॥

परि ती पचवितां नाही आली । उपभोगाची भावना झाली । 
म्हणोनि कला अवकळा पावली । अहंकारें ॥४४॥

कुंभकर्णें सुखमार्ग धरिला । आहारनिद्रेची वाढविली कला । 
क्रूरपणाचा खेळचि झाला । नाश पावला सर्वासह ॥४५॥

तोचि बिभीषण कला शिकला । रामनामीं रंगोनि गेला । 
राम धांवोनि घरीं आला । सौख्य दिलें अंतर्बाह्य ॥४६॥

दिलें लंकेचें राज्य हातीं । परि नाही उपभोगाची प्रीति । 
म्हणोनीच आजवरि कीर्ति । अमर तया सज्जनाची ॥४७॥

कलेचे ऐसे तीन प्रकार । राजस, तामस, सात्विक सुंदर । 
जो जयासि सजवी चतुर । तो ओळखावा त्या गुणाचा ॥४८॥

या सकळामाजीं जीवनकला । सात्विकतेचा प्रवाह भरला । 
मोहवूनि प्रेमाने सकलां । कीर्तिमार्ग दावी भूलोकीं ॥४९॥

एरव्ही सर्वांतचि आहे कला । एक चातुर्ये खाय एकाला । 
मोठी खातो लहानाला । नियम ऐसा जीवनीं ॥५०॥

परि हा नियम मानवी नाही । पशुपक्ष्यांना शोभे सर्व कांही । 
अंडज जारज उदभिज स्वेदजहि । याच मार्गीं ॥५१॥

याच मार्गे मानव गेला । तेणें जगीं हाहा:कार झाला । 
’ बळी तो काळ पिळी ’ या बोला । जीवनकला म्हणों नये ॥५२॥

सामुदायिक वृत्तीविण । जगीं टिकले प्राणी कोण ? 
जगावें जगवावे जीवजन । हीच खरी जीवनकला ॥५३॥

हेंच वैशिष्ठय मानवाचें । जगीं सौख्य नांदवी साचें । 
त्याविण सार्‍या प्रगतीचें । मंदिर मिळे धुळीमाजीं ॥५४॥

म्हणोनि सर्व जीवांची कला वेगळी । जगावें दुसरे घेवोनि बळी । 
परि मानवांची कला निराळी । उन्नत करी दुर्बलांहि ॥५५॥

पशुपक्ष्यांचें नर्तन गायन । मानव सर्वांतचि झाला निपुण । 
परि तयाचें मानवपण । असे भिन्न सर्वाहूनि ॥५६॥

तो कातिणीपरी काती-विणी । कोकिळेपरी गाई गाणीं । 
मत्स्यापरी तरे जीवनीं । उडे गगनीं पक्ष्यांपरी ॥५७॥

मधमाशीपरी संचय करी । मुंग्यासारिखे किल्ले उभारी । 
रंग बदली सरडयापरी । नृत्य करी मोराऐसें ॥५८॥

फुलपाखरांचे धरी वेष । चिमण्यांपरी घरटयांची हौस । 
ऐशा सर्वचि कला साधती त्यास । परि त्याची कला निराळी ॥५९॥

तो राहतो नीटनेटका । वायां न धाडी आपुला पैका । 
सर्वां सांभाळितो सारखा । आपुल्यापरी ॥६०॥

मनुष्य स्वभावेंचि भिन्न पडतो । तो सर्वांसीच सांभाळितो । 
मर्यादेने वागत जातो । सदधर्माच्या ॥६१॥

विवेक-बुध्दीने चालतो । पडलेल्यासि उचलोनि घेतो । 
दुसर्‍याचिया हितास्तव जातो । बळी प्रसंगीं ॥६२॥

देतो सर्वांसि आपुला हिस्सा । गांवीं न यावी म्हणोनि अवदशा । 
त्याचें कुटुंब गांवचि सहसा । वाटे तया ॥६३॥

आपण जें जें कांही करावें । त्याने इतरांसि दु:ख न व्हावें । 
अहर्निशीं ऐसेंचि वर्तावें । आवडे तया ॥६४॥

दूरदृष्टीचा विचार धावे । कार्यकारण तयासि ठावें । 
व्यक्तिऐसें विश्व सुखी व्हावें । म्हणोनि करी कष्ट नाना ॥६५॥

ऐसें करन्यासि जे जे चुकले । ते मानवचि नव्हती भले । 
मानवदेहीं जन्मासि आले । परि राहिले पशूचि ते ॥६६॥

जें जें असेल माझ्या घरीं । सगळया सुख लाभावें तयाचि परी । 
ऐसी चिंता नित्य करी । तोचि धन्य मानव ॥६७॥

तो आपुली कलाकुसरी । सर्वांचिया जीवनीं भरी । 
शोषण पतन कुणाचें न करी । आपुल्या कलेने ॥६८॥

कलेकरितां कला न ठेवी । जीवनासि कला भूषवी । 
आपण सजवूनि दुसर्‍या दाखवी । मनुष्यपण गोड शब्दें ॥६९॥

लोभासाठी गोड बोलणें । ही जरी कला घेतली कोणें । 
तरि तें जाणावें दु:खदवाणें । प्रेमळपण दिसे जरी ॥७०॥

कोणी विषयासाठी नटला थटला । तोंडा रंग फासोनि फिरला । 
तरी अंतरींच्या काळिमेला । बघती जन तयाच्या ॥७१॥

कोणी शिकला चातुर्यकला । साहित्य अभिनय मोही जगाला । 
परि तेणें स्वार्थापायीं घातला । समाज पतनीं ॥७२॥

कोणी नृत्यगायन नटविलें । चित्रादि कलांना शृंगारिलें । 
म्हणती आम्ही मानवां केलें । उन्नत ऐशा कलांनी ॥७३॥

परि पाहतां अनुभव आला । मानव क्षुद्र वृत्तींनी घेरला । 
याचें कारण बाजार झाला । स्वार्थापायीं कलांचा ॥७४॥

प्रत्येक कलाकौशल्यामागे । सदगुणांचीं असती अंगें । 
परि तेवढेंच विसरती जन संयोगें । घेती त्यांतूनि वाईट ॥७५॥

याचें कारण एक आहे । समजदार प्रलोभनीं दंग राहे । 
तेथे उपायचि होती अपाय । रंगविले किती तरी ॥७६॥

परि ती कला नव्हे-करंटेपण । तो शृंगार नव्हें-तें मरण । 
मधुर बोलणेंहि जहरासमान । वाटे कळतां अंतरींचें ॥७७॥

अंतरींचें दिसती डोहाळे । क्षणोक्षणीं वरि उफाळे । 
काय होतें बोलोनि प्रेमळें । कलाकुसरीचें ? ॥७८॥

हा दंभ विसरायाची कला । जो कोणी साधकजन शिकला । 
त्यासीच लोक मानिती भला । सदभावाने ॥७९॥

त्याची प्रत्येक कला निर्मळ । अनुपानें विषहि दे अमृतफळ । 
मानवतेचें वाढवी बळ । तीच कला महाथोर ॥८०॥

मुख्य कलेची सांगता । असावी लागते तारतम्यता । 
सदा सावध असावा माथा । उन्नतीसाठी सर्वांच्या ॥८१॥

मग कला मागे धावती । न कळत्या खुणा कळों येती । 
जीवनकला पाववी सुमति । सर्वांगीण उध्दाराची ॥८२॥

कुणाचें बिघडलें सुधारावें । कुणाचें भांडण तोडोनि द्यावें । 
कुणासाठी योजनाबध्द व्हावें । मार्ग सांगावया ॥८३॥

हीच खरी कला शिकावी । यानेच जीव तरतील भवीं । 
मरणावरीहि कीर्ति रहावी । कलाकाराची ॥८४॥

एरव्ही चौदा विद्या चौसष्ट कला । काय करावें शिकोनि गलबला ? 
जो दुसर्‍याच्या कामीं न आला । व्यर्थ मेला अभिमानाने ॥८५॥

कमींत कमी गरजांत राहिला । अधिकांत अधिक उपकार केला । 
समाजाशीं समरस झाला । तोचि खरा कलावंत ॥८६॥

ही जीवनकला ज्यांना गवसली । त्यांची मानवता विकास पावली । 
’ मानवी देव ’ पदवी लाभली । सात्विक कलावंतासि ॥८७॥

जो ही ऐसी कला चुकला । तो गांवीं जगण्यासचि मुकला । 
सर्व संसार फाटका झाला । सहकार्याविण बिचार्‍याचा ॥८८॥

म्हणोनि बोललों मुख्य कला । मानवतेने सजविणें विश्वाला । 
सर्व मिळोनि संसार केला । पाहिजे हा स्वर्गापरी ॥८९॥

आपुलें आपुलें सर्व करा । सर्वांच्या सुखाचाहि मार्ग धरा । 
सर्वांत आपुल्याहि सुखाचा झरा । दिसों लागे ॥९०॥

सर्व कलांहूनि श्रेष्ठ कला । सर्वांत समरसता लाभावी जीवाला ।
दृष्टीसि जो जैसा दिसला । आनंद वाटला पाहिजे मना ॥९१॥

मनचि न व्हावें वेगळें । जें दिसतें तें सुंदरचि सगळें । 
हें कळावया आत्मबळें । पाहिजे कला बोधाची ॥९२॥

आत्म्याची ओळखी ही कला । साधूनि विश्वाशीं समरस झाला । 
तोचि कसोटीला लागला । शेवटीं पूर्णत्वाच्या ॥९३॥

पूर्णत्वीं दु:खदोषादि कांही नाही । परि ही कला विरळाचि घेई । 
दु:खदोष निवारूनि जना पाही । तोहि थोर कलावंत ॥९४॥

ज्यासि आहे जगाचें भान । त्यावरि जगाची जबाबदारी पूर्ण । 
त्याने केलेंचि पाहिजे दु:ख निवारण । समाजाचें स्वकलेने ॥९५॥

म्हणोनि ऐका करा उल्हासें । मानवमात्र सुखी व्हावे ऐसें । 
उणीव दिसतां सहकार्य हर्षें । नेहमी करा सर्वांशीं ॥९६॥

सर्वांशी सर्वांचा सहकार । हाचि आहे मार्ग थोर । 
गांवीं ये स्वर्गीयता सुंदर । याच कलेने निश्चयेंसि ॥९७॥

ही मानव्याची जीवनकला । गांवीं शिकवा सर्वांला । 
मग उणें न पडे कोणाला । कधी कांही ॥९८॥

योगियांची जीवनकळा । सत्रावीचा अमृतसोहळा । 
तैसी सुखी अमर करील मानवकुळा । कला ही गांवीं ॥९९॥

गांव होईल आरोग्यवंत । ज्ञानवंत सदभाग्यवंत । 
सहकार्यावरीच जग जिवंत । विचारें पाहतां ॥१००॥

हजार साधनांहूनि अमोल । एक सहकार्यवृत्ति निर्मल । 
ही गांवीं फोफावूं द्या अमरवेल । नाना प्रयत्नें ॥१०१॥

याने मानवांअंगींची शक्ति । प्रकट होईल महादीप्ति । 
सेवा करील निसर्ग-प्रकृति । सर्व जीवांची ॥१०२॥

जीव ईश्वराचे अंश । त्यांचें गांवचि कां राक्षस ? 
जिकडे तिकडे सुखसंतोष । नांदेल या प्रयत्नांनी ॥१०३॥

म्हणोनि शिका मानव्यकला । आत्मविकास साधा आपुला । 
आता पुरे हा गलबला । दैववादाचा ॥१०४॥

अनुभवें सांगतों तुम्हांप्रति । करूं म्हणाल तें साधेल निश्चिती । 
करा करा आत्मोन्नति । तुकडया म्हणे ॥१०५॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । 
जीवनकला कथिली उन्नत । छत्तिसावा अध्याय संपूर्ण ॥१०६॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥