वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय सदतिसावा

ग्रामगीता

अध्याय सदतिसावा : आत्मानुभव

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

’अनुभव’ ऐसा शब्द ऐकला । त्यावरि श्रोत्यांनी प्रश्न पुसला ।
आत्मानुभवाचा मार्ग सांगितला । पाहिजे आम्हां ॥१॥

केले प्रयत्न तुम्हीं कोण ? कैसें गेलें तुमचें जीवन ? 
खरी आत्मानुभवाची खूण । काय आहे ? ॥२॥

मित्रांनो ! ऐका सावकाश । प्रत्येक जीव देवाचा अंश । 
आपुल्या कर्तव्यें पद त्यास । प्राप्त होय हवें तें ॥३॥

करणी करितां विवेकें पूर्ण । नरचि होय नारायण । 
प्रारब्ध आणि परिस्थिति जाण । वाट देई तयासि ॥४॥

ज्यासि करूं आवडे उन्नति । निसर्ग होई ग्रंथ त्याप्रति । 
साधन होई एकेक वृत्ति । जाणत्यासि ॥५॥

आधि पाहिजे सुंसंस्कार । पुढे जाण्याचा निर्धार । 
संत, ग्रंथ काय, अवघाचि संसार । सहायक होई तयासि ॥६॥

बुडतें जग त्यासि जागवी । संकटें स्फूर्ति देती नवी । 
अघातांतूनि हितचि भावी । साधक तो ॥७॥

मनीं आत्मोन्नतीची तळमळ । त्यासि वाट देती सकळ । 
आपुलें आपणांतचि बळ । पाहिजे आधी ॥८॥

सत्य संकल्पाचा निश्चय । लावी जीवनासि सोय । 
वाट चालतां निर्भय । मुक्काम पावे ठायींच ॥९॥

आपुल्या अंगीं प्रकाश भरला । तो पाषाणचि हिरा ठरला । 
खाणींत शोधूनि आणिती त्याला । प्रयत्नें जन ॥१०॥

मृगनाभीची कस्तुरी । ती स्थान पावे राज-शिरीं । 
कमल चढे देवावरि । चिखलीं जन्मूनि स्वगुणांनी ॥११॥

हाचि अनुभव प्रमाण । यत्नाअंगींच देवपण । 
हें संतग्रंथांचें सत्यचि कथन । जाणावें श्रोतीं ॥१२॥

तुम्हीं विचारिलें माझें जीवन । म्हणोनि करितों थोडे कथन । 
जनासह आपण जनार्दन । हीच खूण अनुभवाची ॥१३॥

हीच अनुभवावयासाठी । सर्व कराव्या आटाआटी । 
ऐसेंचि प्रत्यया येई शेवटीं । साधकाच्या ॥१४॥

देवत्वाची ज्योत दीप्तिमान । परि आवरण पडलें मलीन । 
तें साफ करावयासीच प्रयत्न । म्हणती साधन त्यालागी ॥१५॥

ऐसीं साधनें निमित्तमात्र । स्वरूप एकचि असे सर्वत्र । 
तें अनुभवा आणी वृत्ति पवित्र । हेंच सूत्र उन्नतीचें ॥१६॥

या उन्नतिमार्गी जो लागला । विवेकें अंतरीं जागला । 
तो स्वयें उध्दरोनि गेला । तारक झाला जनांसि ॥१७॥

हें प्रयत्नाचें शुध्द महिमान । ऐकोनि मींहि केलें साधन । 
तें कळाया करितों वर्णन । थोडकेपण आयुष्याचे ॥१८॥

लहान ऐशा गांवामाजीं । मागासलेल्या जनसमाजीं । 
उपासाचीच लाभे रोजीं । ऐशा ठायीं जन्मलों ॥१९॥

घरीं दारिद्रयाचें वरदान । परि भावभक्तीची नसे वाण । 
ऐकत सुसंस्कारांचें गान । सोशीत कष्ट वाढलों ॥२०॥

अंतरीं जिज्ञासा असे खूप । ती घरी हूडपणाचें रूप । 
अल्लडपणें साहोनि ताप । सर्वांमाजी वावरलों ॥२१॥

ऐकिलें श्रवणीं थोडें कीर्तन । त्यावेळीं होतें आर्तपण । 
धृवप्रल्हादाचें आख्यान । मना वाटे ऐकावें ॥२२॥

कांही ऐकिली संतचर्चा । कांही कथां ऐंकिल्या पुरानीच्या । 
कांही वाढविल्या भावना मनाच्या । वैराग्ययोगें ॥२३॥

झाली परिस्थितीहि कारण । धरावया एकान्तीं मुद्राध्यान । 
तें सर्व केलिया कथन । वेळ पुरेना वर्षाचा ॥२४॥

महत्त्वाचेम सांगावें वाटतें । साधकाला मिळेल आइते । 
आत्मानात्म-विचार येथे । श्रोते ऐकती म्हणोनि ॥२५॥

कांही संगतीचें लाभलें फळ । आलें आत्मचिंतनासि बळ । 
देवदर्शनाची खळबळ । झाली हृदयीं दृढ ऐसी ॥२६॥

पुढे कल्पना सरसावली । धृवानेच कां तपस्या केली ? 
आपणासहि कां न घडली । पाहिजे तैसी ? ॥२७॥

काय करावें वाटे मनीं । कैसें ध्यान करावें नेत्र लावोनि । 
कोणा विचारावें, समाधानी । वृत्ति व्हाया जीवाची ? ॥२८॥

मग बळेंचि रानीं जावें । वृक्षाखाली ध्यान धरावें । 
कधी मूर्तिपूजनचि करावें । मंदिरामाजीं ॥२९॥

कधी रेणुकांची करावी मूर्ति । वनपुष्पपत्रें पूजावी ती । 
भजन करावें अहोरातीं । तन्मय चित्त करोनिया ॥३०॥

ऐसा वाढला प्रेमनिश्चय । मानसिक संकल्पांचा समुच्चय । 
धरिली ध्यान-मुद्रेची सोय । एकांतामाजीं ॥३१॥

परि झालें नाही समाधान । चित्त उडे मधून मधून । 
तशांतचि करावें कीर्तन । तळमळोनि ॥३२॥

आपणचि मना समजावावें । आपणचि समाधान मानावें । 
गावें नाचावें बोलत जावें । आपल्याशींच एकान्तीं ॥३३॥

परि प्रारब्धभोग आडवा पडे । विषयांकडे वृत्ति ओढे । 
कधी दुष्परिणाम घडे । देह-धारणेने ॥३४॥

म्हणोनि निघालों घर सोडून । बावळट ऐसा वेष घेऊन । 
कधी कधी विसरों देहभान । चिंतेंत देवदर्शनाच्या ॥३५॥

राहिलों वनीं, घोर रानीं । रानवट लोकीं, धनिकाभुवनीं । 
अनेक अनुभव आले जीवनीं । स्फुरले मनीं सदभाव ॥३६॥

कांही योगाचें साधन । थोडें अध्यात्म-वाचन ।
विशेष विश्वनिरीक्षण । केलें मनन सर्वकाळ ॥३७॥

भजन, सप्ताह, यज्ञयाग । महोत्सव, व्रतें, महाप्रसंग । 
नाना कार्यें, साधनप्रयोग । असंख्य केले ॥३८॥

केलें बहुत पर्यटन । वनभ्रमण तीर्थाटन । 
पाहिले सर्व प्रांत फिरून । आयुष्यांत ॥३९॥

नाना मंदिरें, देवालयें । संस्था, आश्रम, वाचनालयें । 
दरीं कंदरीं होऊनि निर्भय । पाहिलीं स्थानें ॥४०॥

भेट घेतली वरिष्ठांची । पाहिली भिन्नता रीतिरिवाजांची । 
रुचि घेतली खाण्यापिण्याची । देशीं-भेंषीं ॥४१॥

पाहिले अखाडे साधुजनांचे । गोसाव्यांचे, संन्याशांचे । 
वैराग्यांचे, महानुभवांचें । वारकर्‍यांसहित ॥४२॥

प्रवास केला बैलगाडीचा । घोडे, टांगे, हत्ती-अंबारीचा । 
सायकल, मोटार, विमानाचा । सर्वकाही ॥४३॥

पाहिले सागर, भव्य स्थानें । सातपुडा सह्याद्रि विंध्याद्रि, रानें । 
हिमालयासहित अति उंचपणें । गगनभेदी ॥४४॥

निसर्गाचीं दृश्यें अपूर्व । मानवकृत चमत्कार-वैभव । 
सुखसाधनें ज्ञानसाधनें सर्व । पाहिलीं लोकीं ॥४५॥

हें सर्वकांही पाहूनि पूर्ण । नाहीच झालें शांत मन । 
शेवटीं घ्यावा लागला अनुभव जाण । आपणामाजीं ॥४६॥

बहिर्मुख दृष्टीने पाहतां । समाधान न लागे हातां । 
हीच असे अनात्मता । दु:खदायी सर्वांसि ॥४७॥

विश्व कोण मी कोण ? यांचें मुळांत एकपण । 
तें जाणतां विचारें पूर्ण । अंतर्मुख वृत्ति होय ॥४८॥

एकचि तत्त्व चैतन्यघन । सागरीं बर्फ-तुकडयांसमान । 
त्यावरि सजलें विविधपण । हीच खूण अनुभवाची ॥४९॥

मीच आहे सकळांस कारण । माझ्याच आत्म्याचें हें विशालपण । 
ओळखी होतां कळलें पूर्ण । अद्वैतपण सर्वांचें ॥५०॥

मग मुरली पाहण्याची हौस । निवांत झालों सावकाश । 
जें जें दिसे या दृष्टीस । तें तें भासे आपणचि ॥५१॥

वाटे सर्वचि येथे आमचे । भिन्न कोण निवडायाचे ? 
हर्ष न समाये, मनाचें । मोठेपणीं आतलाचि ॥५२॥

मुंगी आणि ऐरावत । अणुरेणु आणि मेरूपर्वत । 
सर्व माझेचि संकल्प मूर्त । कळों आलें ॥५३॥

अजूनि कितीतरी आत्मा थोर । न चाले मोजमाप अनिवार । 
अनंत ब्रह्मांडें विश्वाकार । संचले असती ॥५४॥

माया, ईश्वर, ब्रह्म, सृष्टि । सर्व आत्मरूपाचिया पोटीं । 
पोटपाठहि नाही शेवटीं । तेंचि तत्त्व मी ॥५५॥

ब्रह्म म्हणती सर्वांत मोठें । परि ही भाषा परकी वाटे । 
अनुभव घेतां वेगळें न भेटे । ब्रह्मपण आटे आपणांत ॥५६॥

प्रथम गांव-मंदिर मोठें वाटलें । मग तीर्थाटन मोठें झालें । 
आणि पुढे निसर्गरूप दिसूं लागलें । मोठें मोठें ॥५७॥

परि त्याच्या मुळाचा अनुभव घेतां । मोठा कळलाच नाही कोणता । 
हा आत्म्याचा विलासचि तत्त्वता । अनुभवा आला ॥५८॥

मोठा तो पंचतत्त्वादि भेदोनि । लहान तोचि अणुरेणूहूनि । 
पाहतां पाहणें दुरी सारोनि । कळला एकपणीं जवळचि तो ॥५९॥

तेथेचि झालें पूर्ण साधन । मग दिसों लागलें एकचिपण । 
सुखदु:ख आणि जन्ममरण । सारिखेंचि ॥६०॥

भिकारी आणि धनवान । हे तों संकुचित भावें दोन । 
विकास होतां न राहती भिन्न । होती समान उन्नत ॥६१॥

नाही जातिपंथादि भेद । आपपरभाव हर्षखेद । 
प्रकट होई सच्चिदानंद । सर्व ठायीं समरूपें ॥६२॥

जन्मणें मरणें झाला खेळ । सुखदु:ख सर्व झालें शीतळ । 
संकटें येतां वाटे प्रेमळ । प्रवाह आला ॥६३॥

आता विषादचि नाही उरला । विचार विस्ताररूपें व्यापला । 
जें जें करणें असेल निसर्गाला । रुचि वाटे तयाची ॥६४॥

यासीच खरा बोलती प्रारब्धवाद । ज्यांतूनि आसक्तीचा उच्छेद । 
इच्छेविरहीत आनंद । सर्वांसाठीं निर्विषय ॥६५॥

नाही शृंगार सौंदयाचा । नाही पाल्हाळ काव्यकलांचा । 
जें असेल जैसें तयाचा । आनंद वाटे चित्तासि ॥६६॥

हें सर्व कासयाने झालें ? यासाठी काय साधन केलें ? 
कासयाने द्वैतपण मुरलें । आपणामाजीं ? ॥६७॥

हें आठवतां भान येतें । साक्षित्वरूपें पाहतां कळतें । 
अंतरंगीं विचारितां वळतें । कार्यमर्म सर्वकांही ॥६८॥

बुध्दीसि स्वातंत्र्य दिलें । जैसें जें दिसलें तें विचारिलें । 
त्यापरी कार्यसंबंध जोडले । आत्मत्व आलें देहभावा ॥६९॥

आपण तैसे सकळ जन । मग कासया मानावें भिन्नपण ? 
ऐसा होतां झालें सावधान । ज्ञानमार्ग सर्वकांही ॥७०॥

ऐसा जीवेंचि मंत्र धरिला । न कळे कोणीं वरदहस्त ठेविला ।
परि सदभावें मीं नमस्कारिला । आडकोजी गुरुस्थानीं ॥७१॥

बहिरंग बोध नाही केला । स्वयेंचि श्रध्दाभावें घेतला । 
अहंकार न हो म्हणोनि पूजिला । सदगुरुराजा ॥७२॥

परि अंतरीं कळलें मर्म । गुरुशिष्यपण आहे भ्रम । 
आहे एकचि वस्तु अगम्य । दोघांमाजीं ॥७३॥

हें कळावयासि संगति लागे । संगतियोगें भावना जागे । 
भावना जागतां अंतरंगें । दिसे मुळींचें आत्मरूप ॥७४॥

मग जें जें मागे पाहिलें । तें तें सर्व सहज झालें । 
स्वाभाविकपणचि अंगीं आलें । स्वरूपानुभवें ॥७५॥

स्वरूप म्हणजे अखंड स्थिति । जी आत्म्याची सहजगति । 
नाही कृति ना विकृति । स्वरूपामाजीं ॥७३॥

अखंड प्रेम अगाध ज्ञान । अबाधित सत्य आनंद पूर्ण । 
हेंच स्वरूपाचें लक्षण । अवीट अभिन्न अक्षय जें ॥७७॥

परि हें प्रथम कळलें नव्हतें । म्हणोनि धुंडिलें स्थानमानातें । 
नवल तोंवरि वाटलें होतें । न लक्षितां स्वरूपस्थिति ॥७८॥

जैसी जैसी जाणीव वाढवी । तैसी शक्ति व्यापक झाली । 
पुढे वाटली पर्वतावलि । गोवरी जैसी ॥७९॥

राजाहि वाटला घरचा गडी । सुचवावयाची झाली तातडी । 
संसार झाला आपुला सवंगडी । याचि गुणें ॥८०॥

आपुला आनंद पैसावला । सुखवूं पाहे दु:खिताला । 
निद्रेत कोणी ओसणला । तरी ये दया त्याची जैसी ॥८१॥

परकेपणाची दृष्टीच गेली । वासना भावनेंत विरूं लागली । 
दुसर्‍यांचीं सुखदु:खें झालीं । आपणाऐसीं सहजचि ॥८२॥

मग माघारलीं पूजामंदिरें । दिसूं लागलीं जिवंत शरीरें । 
यानेच दिसे सर्वांचें बरें । देवकृपा व्हावयासि ॥८३॥

जिकडे जिकडे उणीव भासे । तिकडे तिकडे मन उल्हासें- । 
धाविनो करी आपणाऐसें । एकचि अंग समजोनि ॥८४॥

जंव अंतरीं आत्मा कळला । तंव आपल्यांतचि विश्व पाहों लागला । 
जैसा दिव्यदृष्टीचा प्रकाश गवसला । अर्जुनालागी ॥८५॥

मग अनंत उदरें अनंत हस्त । दिशा व्यापूनिया समस्त । 
दिसे विराटरूप महासमर्थ । ठायींच्या ठायी ॥८६॥

ही दृष्टि सर्वांसचि आहे । परि विचारें उघडील तोचि पाहे । 
तो अनुभवमार्ग सांगती लवलाहें । संतसज्जन ॥८७॥

जैसे आकाशाचे तुकडे नोहे । ते घटोपाधीमुळेचि भासती पाहे । 
तैसा जीव अल्पज्ञ वेगळा न राहे । अनुभव घेतां ॥८८॥

नुरे जीवाचें जीवपण । दारिद्यदु:ख रंकपण । 
आनंदाचें शिखर पूर्ण । प्राप्त होई निश्चयें ॥८९॥

मग प्रारब्ध तयाचा खेळ । प्रयत्न लीलारूप केवळ । 
आत्मरूपें विश्व सकळ । अनुभवा ये एकपणें ॥९०॥

जीव आपुली वारी व्यथा । तैसाचि सुखवी जगा समस्ता । 
उरला उपकारापुरता । सर्वांचिया आत्मभावें ॥९१॥

त्यासि नाही उरली कामना । निष्काम कर्म त्याचा बाणा । 
मग बाधक होईल कोणा । कैशापरी संसारीं ? ॥९२॥

तो जें करी तें ईश्वरपूजन । बोलेल तेंचि वेदवचन । 
त्यांच्या शब्दें आंदोलन । करिती जन सदभावें ॥९३॥

सत्तेविण त्याची सत्ता । क्रांतीहूनि सेवेची महत्ता । 
इशारा होतां मालमत्ता । लोक लाविती सत्कार्यीं ॥९४॥

त्याच्या संदेशाचें बळ । गांवीं करी प्रेमाचा सुकाळ । 
सुखी होती लोक सकळ । गांवोगांवींचे ॥९५॥

त्याच्या ज्ञानें भारले अज्ञजन । ते ज्ञानियांसि देतील शिकवण । 
झुंजती काळाशीं दारूण । स्त्रिया मुलेंहि ॥९६॥

हें आत्मविकासाचें बळ । मानवी प्रयत्नाचेंचि फळ । 
देव होवोनि करील सकळ । लोकचि देव ॥९७॥

मित्रा ! ऐसा अभ्यास करि । धरोनि मार्ग-बोध अंतरीं । 
मग दिसेल याच शरीरीं । तो श्रीहरि व्यापला ॥९८॥

लाभतां अनुभवाची खूण । जनता होईल जनार्दन ।
गांवीं ऐसा एकटाहि जाण । उन्नत करी गांव सारें ॥९९॥

तो प्रलोभनीं कोठे फसेना । रागद्वेषेंहि गोंधळेना । 
त्याच्या सहवासेंचि ग्रामजीवना । अमृत लाभे ॥१००॥

ऐसा सेवकचि पाया जगाचा । गांवचा रत्ननिधिच तो साचा ।
अभ्यास करा सक्रिय अध्यात्माचा । याचसाठी ॥१०१॥

प्रयत्नें मानव होई देव । प्रयत्नें स्वर्गतुल्य होई गांव । 
संतांच्याहि अभेदभक्तीचें वैभव । ग्रामसेवा-प्रयत्नीं ॥१०२॥

ऐसे लोक निर्माण करावे । तरीच उदया ये जग नवें । 
नांदेल ग्राम, विश्व, वैभवें । सर्वकाळ तुकडया म्हणे ॥१०३॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्रस्वानुभव संमत । 
स्वानुभवें कथिला अध्यात्मपथ । सदतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०४॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥